|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७१ वा
श्रीकृष्णांचे इंद्रप्रस्थाला जाणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्णांचे म्हणणे ऐकून अत्यंत बुद्धिमान उद्धवाने देवर्षी नारद, सभासद आणि श्रीकृष्णांच्या मतावर विचार केला आणि नंतर तो बोलू लागला. (१) उद्धव म्हणाला- भगवन ! देवर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे आपण आतेभाऊ पांडवांच्या यज्ञात जाऊन त्यांना साहाय्य केले पाहिजे. त्याचबरोबर शरणागतांचे रक्षण करणे हेही आपले कर्तव्यच आहे . हे प्रभो ! जो सर्व दिशांवर विजय मोळवतो, तोच राजसूय यज्ञ करू शकतो. तेव्हा जरासंधाला जिंकण्यामुळे पांडवांचा यज्ञ आणि शरणागतांचे रक्षण या दोन्ही गोष्टी साधतील असे मला वाटते. शिवाय यामुळेच हे गोविंदा ! आमचेही मोठे काम होईल. त्याचबरोबर कैद केलेले राजे मुक्त केल्याने आपली सर्वत्र कीर्ती होईल. जरासंध इतर बलवानांना जिंकण्यासारखा नाही. कारण त्याला दहा हजार हत्तींचे बळ आहे. त्याला फक्त तुल्यबल भीमसेनच पराभूत करू शकतो. त्याला द्वंद्वयुद्धातच जिंकले पाहिजे. तो शंभर अक्षौहिणी सेना घेऊन युद्धात उतरेल्, तेव्हा नको. जरासंध हा ब्राह्मणभक्त आहे. जर ब्राह्मणांनी त्याच्याकडे याचना केली, तर तो त्याला विन्मुख पाठवीत नाही. म्हणून भीमसेनाने ब्राह्मणाचा वेष घेऊन त्याच्याकडे भिक्षा मागावी. आपल्या उपस्थितीमध्ये द्वंद्वयुद्धात भीमसेन त्याला मारील, याविषयी शंकान् नाही. हे प्रभो ! आपण सर्वशक्तीमान, रूपरहित कालस्वरूप आहात. विश्वाची निर्मिती आणि प्रलय आपल्याच शक्तीने होतात. ब्रह्मदेव आणि शंकर हे केवळ निमित्तमात्र आहेत. (त्याचप्रमाणे जरासंधाचा वध आपल्या शक्तीने होईल, भीमसेन त्याला फक्त निमित्तमात्र असेल.) तेव्हा कैदखान्यात पडलेल्या राजांच्या राण्या स्वत:च्या महालांत आपल्या या विशुद्ध लीलेचे गायन करतील की, आपण त्यांच्या शत्रूचा नाश केलात आणि त्यांच्या पतींना सोडविलेत. यापूर्वी ज्याप्रमाणे गोपी स्वत:ला शंखचूडापासून सोडविण्याचा पराक्रम गात, शरणागत मुनिगण, गजेंद्र आणि जानकीच्या उद्धाराची लीला गात तसेच आम्ही आपल्या माता-पित्यांना कंसाच्या कारागृहातून सोडविलेल्या लीलेचे गायन करीत असतो. म्हणून हे श्रीकृष्णा ! जरासंधाचा वध पुष्कळ गोष्टी साध्य करून देईल. बंदिस्त राजांच्या पुण्यप्रभावाने किंवा जरासंधाच्या पापप्रभावाने, आपणही यावेळी राजसूय यज्ञ होणेच पसंत करीत आहात. (२-१०) श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! उद्धवाचा हा सल्ला सर्वप्रकारे हितकारक होता. शिवाय खोडून काढता येणारा नव्हता. देवर्षी नारद, यदुवंशातील ज्येष्ठ-श्रेष्ठ आणि स्वत: श्रीकृष्णांनीसुद्धा त्याचे म्हणणे मनापासून मान्य केले. अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी यानंतर वसुदेव इत्यादी गुरुजनांची संमती घेऊन दारुक, जैत्र इत्यादी सेवकांना इंद्रप्रस्थाकडे जाण्यासाठी तयारी करण्याची आज्ञा केली. यानंतर शत्रुसंहारक श्रीकृष्णांनी यदुराज उग्रसेन व बलरामांची आज्ञा घेऊन मुलाबाळांसह राण्या आणि त्यांचे सर्व सामान पुढे पाठविले व पाठोपाठ दारुकाने आणलेल्या गरुडध्वज रथावर ते स्वत: आरूढ झाले. त्यानंतर रथ, हत्ती, घोडेस्वार आणि पायदळ यांची प्रचंड सेना घेऊन ते निघाले. त्यावेळी मृदंग, नगारे, ढोल, शंख आणि रणशिंगांच्या उच्च स्वराने सर्व दिशा दुमदुमून गेल्या. रुक्मिणी इत्यादी श्रीकृष्णांच्या हजारो पतिव्रता पत्न्या आपल्या मुलांसह सुंदर वस्त्रालंकार, चंदन, फुलांचे हार इत्यादींनी नटूनथटून, डोल्या, रथ आणि सोन्याने मढविलेल्या पालख्यांत बसून पतींच्या मागून निघाल्या. यावेळी पायदळ शिपाई हातात ढाल-तलवारी घेऊन त्यांचे रक्षण करीत चालले होते. याच प्रकारे त्यांच्या सेवकांच्या स्त्रिया आणि वारागंना चांगल्या प्रकारे वेषभूषा करून गवताच्या झोपड्या, वेगवेगळ्या प्रकारचे तंबू, कनाती, कांबळी तसेच अंथरूण-पांघरूण इत्यादी सामग्री बैल, म्हशी, गाढवे आणि खेचरांवर लादून तसेच स्वत: पालख्या, उंट, छकडे आणि हत्तिणी यांवर बसून चालू लागल्या. जसा सुसरी मगरी आणि लाटांच्या उसळण्याने क्षुब्ध झालेला समुद्र शोभून दिसतो, तशी अतिशय गोंगाट होत असलेली, फडफडणा-या मोठमोठ्या पताका, छत्रे, चामरे, श्रेष्ठ शस्त्रास्त्रे, वस्त्रालंकार, मुगुट, कवचे यांनी युक्त आणि दिवसा त्यांच्यावर पडलेली सूर्याची किरणे यांमुळे भगवान श्रीकृष्णांची सेना अतिशय शोभून दिसत होती. नंतर श्रीकृष्णांनी सत्कार केलेले नारद त्यांचा निश्चय ऐकून व त्यांचे दर्शन झाल्यामुळे प्रसन्न झाले. त्यानंतर त्यांनी केलेली पूजा स्वीकारून देवर्षी नारदांनी त्यांना प्रणाम केला आणि त्यांची दिव्य मूर्ती हृदयात धारण करून आकाशमार्गाने प्रस्थान केले. यानंतर भगवान श्रीकृष्ण जरासंधाच्या बंदी राजांच्या दूताला आपल्या मधुर वाणीने आश्वासन देत म्हणाले- " दूता ! तू तुझ्या राजांना जाऊन सांग की, भिऊ नका ! तुम्हा सर्वांचे कल्याण असो ! मी जरासंधाला मारवीन. " भगवंतांचा निरोप घेऊन गेलेल्या दूताने त्यांचा संदेश राजांना सांगितला. ते राजेसुद्धा कारागृहातून सुटण्यासाठी, भगवंतांच्या दर्शनाची वाट पाहू लागले. (११-२०) नंतर श्रीकृष्ण आनर्त, सौवीर, मरू, कुरुक्षेत्र आणि तेथे जाताना मध्ये लागणारे पर्वत, नद्या, नगरे, गावे, गौळवाडे, खाणी इत्यादी पार करून पुढे जाऊ लागले. (२१) भगवान मुकुंद दृषद्वती व सरस्वती नदी पार करून तसेच पांचाल आणि मत्स्य हे देश मागे टाकून इंद्रप्रस्थाला जाऊन पोहोचले. ज्यांचे दर्शन माणसांना होणे दुर्मिळ आहे, ते श्रीकृष्ण जवळ आलेत, ही बातमी स्मजली, तेव्हा आचार्य आणि संबंधितांसह युधिष्ठिर त्यांच्या स्वागतासाठी नगराच्या बाहेर आला. मंगल गीते गायिली जाऊ लागली, वाद्ये वाजू लागली. इंद्रियांनी मुख्य प्राणाला भेटण्यासाठी आतुरतेने जावे, त्याप्रमाणे धर्मराज अत्यंत आदराने हृषीकेशांचे स्वागत करण्यासाठी निघाला. श्रीकृष्णांना पाहून युधिष्ठिराचे हृदय अत्यंत स्नेहाने सद्गदित झाले. पुष्कळ दिवसांनंतर आपला प्रियतम भेटल्यामुळे तो पुन्हा पुन्हा त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळू लागला. लक्ष्मीचे पवित्र निवासस्थान असलेल्या श्रीकृष्णांच्या श्रीविग्रहाला दोन्ही बाहूंनी आलिंगन दिल्यामुळे युधिष्ठिराचे सारे पाप नष्ट झाले. तो परमानंदसमुद्रात डुंबू लागला. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अंग-अंग रोमांचित झाले. त्याला या मायिक प्रपंचाचे स्मरणही राहिले नाही. त्यानंतर भीमसेनाने मंद हास्य करून आपले मामेभाऊ श्रीकृष्णांना आलिंगन दिले. त्यावेळी झालेल्या आनंदाने आणि प्रेमोत्कर्षाने त्याची सारी इंद्रिये उचंबळून आली. नकुल, सहदेव आणि अर्जुन यांनी सुद्धा आपले परम प्रियतम आणि अकारण परम हितचिंतक अशा भगवान श्रीकृष्णांना मोठ्या आनंदाने आलिंगन दिले. त्यावेळी त्यांच्याही नेत्रांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना पुन्हा आलिंगन दिले. नकुल आणि सहदेवाने अभिवादन केले आणि स्वत: भगवान श्रीकृष्णांनी ब्राह्मणांना आणि कुरुवंशातील वृद्धांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नमस्कार केला. कुरु, सृंजय आणि कैकय देशांच्या राजांनी भगवान श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा त्यांचा यथायोग्य सत्कार केला. सूत, मागध, वंदी आणि ब्राह्मण भगवंतांची स्तुती करू लागले. तसेच गंधर्व, नट, विदूषक इत्यादी मृदंग, शंख, नगारे, वीणा, ढोल आणि शिंगे वाजवून भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी नाचू गाऊ लागले. पुण्यकीर्तींचे चूडामणी अशा श्रीकृष्णांनी अशाप्रकारे आपल्या सुहृदबांधवांसह सर्व प्रकारे सुशोभित केलेल्या इंद्रप्रस्थ नगरीत लोकंकडून स्तुती घेत प्रवेश केला. (२२-३१) इंद्रप्रस्थ नगरातील मार्ग हत्तींच्या मदरसाने व सुगंधित पाण्याने सुगंधित झाले होते. जागोजागी रंगीबेरंगी ध्वज लावले होते. सोन्याची तोरणे बांधली गेली होती. आणि पाणी भरलेले सुवर्णकलश ठेवलेले होते. नगरातील स्त्री-पुरुष स्नान करून नवीन वस्त्रे, अलंकार, फुलांचे हार आणि सुवासिक द्रव्यांनी नटलेले होते. प्रत्येक घराच्या झरोक्यातून धुपाचा सुगंधी धूर बाहेर पडत होता. त्या घरांवर पताका फडकत होत्या. ज्यांच्यावर सोन्याचे कळस बसवले होते, अशी चांदीची शिखरे झगमगत होती. अशा प्रकारचे वाडे असलेली पांडवांची राजधानी पाहात भगवान श्रीकृष्ण चालले होते. तरुणींना जेव्हा समजले की मानवी डोळ्यांचे पारणे फेडणारे भगवान श्रीकृष्ण राजमार्गावरून निघाले आहेत, तेव्हा त्यांच्या दर्शनाच्या उत्कंठेने त्यांच्या वेण्या आणि निरगाठी ढिल्या पडल्या. काहींनी घरातील काम अर्धवट सोडून दिले तर काहीजणी शय्येवर झोपलेल्या पतींनासुद्धा सोडून देऊन श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी धावतच राजमार्गावर आल्या. सडकेवर हत्ती, घोडे, रथ आनि पायदळ सेना यांची एकच गर्दी झाली होती. त्या स्त्रियांनी गच्च्यांवर चढून सपत्नीक श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला आणि मनोमन त्यांना आलिंगन देऊन प्रेमपूर्ण मंद हास्ययुक्त नजरेने त्यांचे स्वागत केले. चंद्राभोवती असणा-या ता-यांप्रमाणे श्रीकृष्णांच्या पत्न्यांना राजमार्गावर पाहून नगरातील स्त्रिया आपापसात म्हणू लागल्या की, " या भाग्यवान राण्यांनी असे कोणते पुण्य केले असावे की, ज्यामुळे पुरुषोत्तम श्रीकृष्ण आपले दिव्य हास्य आणि विलासपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या डोळ्यांना परम आनंद देत आहेत. " श्रीकृष्ण अशा प्रकारे जात असता निष्पाप शिल्पकारांनी ठिकठिकाणी त्यांना भेटून अनेक मंगल वस्तूंनी त्यांची पूजा करून त्यांचे स्वागत केले. (३२-३७) श्रीकृष्णांना पाहून अंत:पुरातील स्त्रियांनी घाईघाईने येऊन प्रेमपूर्ण डोळ्यांनी भगवंतांचे स्वागत केले. त्याचा स्वीकार करीत श्रीकृष्ण राजवाड्यात आले. (३८) आपला त्रिभुवनपती भाचा श्रीकृष्ण याला जेव्हा कुंतीने पाहिले, तेव्हा तिचे हृदय प्रेमाने भरून आले. पलंगावरून उठून ती सुनांसह पुढे आली आणि तिने भाच्याला छातीशी धरले. युधिष्ठिराने देवदेवेश्वर भगवान श्रीकृष्णांना राजमहालात आदरपूर्वक आणले. पण तेव्हा आनंदाच्या भरात भगवंतांची पूजा कशी करावी, तेच राजा विसरून गेला. राजा ! भगवान श्रीकृष्णांनी आत्या कुंती आणि वडिल मंडळींच्या पत्न्यांना अभिवादन केले. त्यांची बहीण सुभद्रा आणि द्रौपदीने भगवंतांना नमस्कार केला. सासूने सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने वस्त्रे, अलंकार, पुष्पहार इत्यादींद्वारा रुक्मिणी, सत्यभामा, भद्रा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, लक्ष्मणा आणि सत्या या भगवान श्रीकृष्णांच्या पट्टराण्यांचा व तेथे आलेल्या अन्य राण्यांचाही यथायोग्य सत्कार केला. युधिष्ठिराने श्रीकृष्णांच्या त्यांची सेना, सेवक, मंत्री आणि पत्न्यांना नित्य नवे वाटेल अशा ठिकाणी आरामात राहाण्याची व्यवस्था केली. अर्जुनाच्या बरोबर राहून श्रीकृष्णांनी खांडव वन देऊन अग्नीला तृप्त केले होते आणि त्यातून मयासुराला वाचविले होते. त्या मयासुरानेच युधिष्ठिराला एक दिव्य सभागृह तयार करून दिले. युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी श्रीकृष्ण काही महिने तेथेच राहिले. ते अर्जुनासह् वेळोवेळी रथावर स्वार होऊन विहार करण्यासाठी सैनिकांसह इतरत्र जात असत. (३९-४६) अध्याय एकाहत्तरावा समाप्त |