|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७० वा
भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या आणि जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताचे त्यांच्याकडे येणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - जेव्हा पहाटे कोंबडे आरवू लागत, तेव्हा ज्यांच्या गळ्यात श्रीकृष्णांचा हात असे, त्या श्रीकृष्णपत्न्या विरहाच्या भयाने व्याकूळ होऊन त्या कोंबड्यांना शिव्याशाप देत. त्यावेळी पारिजातकांच्या वनातील वा-याने जागे झालेले पक्षी भाटांप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना जागविण्यासाठी मधुर किलबिलाट करीत आणि भ्रमर गुंजारव करीत. प्रियतमाच्या बाहूंत असलेल्या रुक्मिणीला तर आता आलिंगन सोडावे लागणार, म्हणून अत्यंत पवित्र असा ब्राह्ममुहूर्तसुद्धा येऊच नयेसा वाटत असे. श्रीकृष्ण दररोज ब्राह्ममुहूर्तावर उठून हात-पाय, तोंड धुऊन प्रसन्न अंत:करणाने मायातीत आत्मस्वरूपाचे ध्यान करीत. ते आत्मस्वरूप अखंड, स्वयंप्रकाश, निरुपाधिक व अविनाशी आहे. ते स्वभावत:च अविद्यारहित आहे. या जगाच्या उत्पात्ती, स्थिती व लयाला कारण असणा-या त्या आत्म्याच्या शक्तींमुळेच त्याची सत्ता व आनंद यांचा अनुभव येतो. त्यालाच ब्रह्म असे नाव आहे. नंतर सदाचरणतत्पर असे ते विधिपूर्वक निर्मळ आणि पवित्र पाण्याने स्नान करीत. मग स्वच्छ धोतर नेसून व उपरणे पांघरून संध्यावंदनादी कर्मे करीत. त्यानंतर हवन करून मौन धरून गायत्रीमंत्राचा जप करीत. यानंतर ज्ञानी असे ते सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे उपस्थान करीत आणि आपल्या अंशस्वरूप असलेल्या देव, ऋषी व पितरांना उद्देशून तर्पण करीत. नंतर ज्येष्ठ व आदरणीय ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांना वस्त्रालंकार देऊन दररोज प्रत्येकी एकेक बद्व (तेरा हजार चौ-याऐंशी) दुधाळ, प्रथमच व्यालेल्या, वासरू असणा-या, शांत स्वभावाच्या गाई, रेशमी वस्त्र, मृगचर्म आणि तीळ यांसह दान करीत. त्यावेळी त्यांना सुंदर वस्त्रे आणि मोत्यांच्या माळा घातल्या जात. त्यांच्या शिंगांना सोने आणि खुरांना चांदी मढविलेली असे. त्यानंतर आपल्याच विभूतिरूप असलेल्या गाई, ब्राह्मण, देवता, वडिल माणसे, गुरुजन आनि सर्व प्राण्यांना प्रणाम करून मंगल वस्तूंना स्पर्श करीत. परीक्षिता ! भगवंत करी या मनुष्यलोकाचा अलंकार असले, तरीसुद्धा ते आपली दिव्य वस्त्रे, अलंकार, फुलांचे हार, आणि चंदन इत्यादी वस्तूंनी स्वत:ला अलंकृत करीत. यानंतर ते तूप आणि आरशात आपले मुख पाहात. गाय, बैल, ब्राह्मण आणि देवता यांचे दर्शन घेत. मग पुरवासी आणि अंत:पुरात राहाणा-या चारही वर्णांच्या लोकांच्या कामना पूर्ण केल्यानंतर आपल्या अन्य प्रजेची इच्छापूर्ती करून त्यांना संतुष्ट करीत. आणि या सर्वांना प्रसन्न पाहून स्वत: आनंदी होत. फुलांच्या माळा, तांबूल, चंदन इत्यादी वस्तू ते अगोदर ब्राह्मणांना देत. नंतर स्वजन, मंत्री आणि राण्यांना वाटीत व नंतर स्वत: उपयोगात आणीत. तोपर्यंत त्यांचा सारथी सुग्रीव इत्यादी घोडे जुंपलेला अत्यंत अद्भूत रथ घेऊन येई आणि प्रणाम करून भगवंतांच्या समोर उभा राही. यानंतर ते सात्यकी आणि उद्धवासह आपल्या हाताने सारथ्याचे हात पकडून सूर्य ज्याप्रमाणे उदयाचलावर आरूढ होतो, त्याप्रमाणे रथावर स्वार होत. त्यावेळी अंत:पुरतील स्त्रिया लज्जा आणि प्रेमपूर्ण नजरांनी त्यांच्याकडे पाहाय आणि मोठ्या कष्टाने त्यांना निरोप देत. तेव्हा भगवान स्मित हास्य करून त्यांचे मन बरोबर घेऊन महालाच्या बाहेर पडत. (१-१६) परीक्षिता ! त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सर्व यादवांसह सुधर्मा नावाच्या सभेत प्रवेश करीत. जे लोक त्या सभेत बसत, त्यांना तहान-भूक, शोक-मोह आणि जरा-मृत्यू हे सहा विकार बाधत नसत. भगवान तेथे जाऊन जेव्हा श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान होत, तेव्हा त्यांच्या अंगकांतीने सर्व दिशा उजळून जात. जसा आकाशात तारकांनी वेढलेला चंद्र शोभून दिसतो, त्याप्रमाणे श्रेष्ठ यदुवीरांच्या मध्ये विदूषक निरनिराळ्य़ा प्रकारच्या हास्यविनोदांनी, नटाचार्य अभिनयांनी आणि नर्तकी कलापूर्ण नृत्यांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांची सेवा करीत. त्यावेळी मृदंग, वीणा, पखवाज, बासरी, झांज आणि शंख या वाद्यांच्या घोषात सूत, मागध व भाट नाचत, गात आणि भगवंतांची स्तुती करीत. काही वेदवेत्ते ब्राह्मण तेथे बसून वेदमंत्रांचे विवेचन करीत आणि काहीजण पवित्रकीर्ती राजांची चरित्रे ऐकवीत. (१७-२१) एके दिवशी तेथे एक नवीन मनुष्य आला. द्वारपालांनी भगवंतांना तो आल्याची सूचना देऊन त्याला सभागृहात आणले. त्या मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना हात जोडून नमस्कार केला आणि त्या राजांचे दु:ख सांगितले की, जे वीस हजार राजे जरासंधाच्या दिग्विजयाच्या वेळी त्याला शरण आले नव्हते, त्यांना जरासंधाने बळजबरीने कैद करून एका किल्ल्यात ठेवले होते. " हे भगवान श्रीकृष्ण ! आपले स्वरूप कोणालाही न कळणारे आहे. जे आपल्याला शरण येतात त्यांचे सर्व भय आपण नाहीसे करता. हे प्रभो ! आमची भेदबुद्धी नाहीशी झालेली आहे. आम्ही संसारामुळे भयभीत होऊन आपल्याला शरण आलो आहोत. हे भगवन ! बहुतेक लोक निषिद्ध कर्मे करण्यात गुंतलेले असतात. ते आपण सांगितलेली आपली उपासनारूप कल्याणकारी कर्मे करीत नाहीत. जीवनसंबंधी आशा-अभिलाषांमध्ये भ्रमाने भटकत असतात. जे बलवान असे आपण कालरूपाने त्यांची जीवनाची आशा तत्काळ धुळीला मिळविता, त्या कालरूप आपल्याला आम्ही नमस्कार करतो. जगदीश्वर अशा आपण जगामध्ये संतांचे रक्षण आणि दुष्टांना शासन करण्यासाठी बलरामांसह अवतार घेतला आहे. असे असता हे प्रभो ! एखादा राजा आपल्या आज्ञेविरुद्ध वागून आम्हांला दु:ख देतो, की आमचीच कर्मे आम्हांला दु:ख देत आहेत, हे आम्हांला कळत नाही. हे प्रभो ! राज्योपभोगाचे सुख विषयसाध्य असून स्वप्नाप्रमाणे क्षणभंगुर आहे. तरीही नेहमी भयग्रस्त अशा नाशवंत शरीराने आम्ही हे ओझे ओढतोच. तुमच्याच मायेमुळे अत्यंत दीनवाणे झालेले आम्ही, निष्काम भक्तांना तुमच्यापासून मिळणारे आत्मसुख सोडून अकारण हे कष्ट भोगत आहोत. हे भगवन ! आपले चरण शरणागतांचे दु:ख नाहीसे करणारे आहेत. म्हणून आपणच जरासंधरूप कर्मांच्या बंधनातून आम्हांला सोडवा. हे प्रभो ! त्या एकट्याजवळ दहा हजार हत्तींचे बळ आहे आणि जसा सिंह मेढ्यांना जरबेत ठेवतो, त्याप्रमाणे त्याने आम्हांला आपल्या वाड्यात बंदिस्त करून ठेवले. हे चक्रपाणी ! आपण जरासंधाशी अठरा वेळा युद्ध करून सतरा वेळा त्याचा पराभव करून त्याला सोडून दिले; परंतु एक वेळ त्याने आपल्यावर विजय प्राप्त केला. आपला पराक्रम अनंत आहे, हे आम्ही जाणतो; असे असूनही साधारण माणसासारखे वागत आपण पराभूत झाल्याचा अभिनय केलात; परंतु यामुळे त्याची घमेंड वाढली. कधीही जिंकले न जाणारे हे भगवन ! आपली प्रजा असलेल्या आम्हांला तो त्रास देणार नाही, असे करावे. " (२२-३०) दूत म्हणाला- जरासंधचे बंदी असलेले राजे आपल्या पायाशी शरण आले आहेत आणि ते आपले दर्शन घेऊ इच्छितात. तरी आपण त्या दीनांचे कल्याण करावे. (३१) श्रीशुकदेव म्हणतत- राजांचा दूत असे सांगत होता, तेवढ्यात सोनेरी जटा असलेले परमतेजस्वी देवर्षी नारद सूर्योदय व्हावा तसे तेथे येऊन पोहोचले. ब्रह्मदेव इत्यादी सर्व लोकपालांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण त्यांना पाहाताच सभासद आणि सेवकांसह आनंदाने उठून उभे राहिले आणि मस्तक लववून त्यांना वंदन करू लागले. देवर्षी नारद जेव्हा आसनावर बसले, तेव्हा भगवंतांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली आणि आपल्या श्रद्धेने त्यांना संतुष्ट करीत मधुर वाणीने ते म्हणाले. हे देवर्षे! सध्या तिन्ही लोकांचे कुशल आहे ना ? आपण तिन्ही लोकांमध्ये जात असता. यामुळेच आम्हांला आपल्याकडून सर्वांची खुशाली समजते. ईश्वराने रचलेल्या तिन्ही लोकांमधील अशी कोणतीही घटना नाही की, जी आपल्याला माहीत नाही. म्हणून आम्ही तुम्हांला विचारतो की, " पांडवांचे यावेळी काय चालले आहे? " (३२-३६) श्रीनारद म्हणाले- " हे सर्वव्यापी अनंता ! आपण विश्वाचे निर्माते असणा-या ब्रह्मदेव इत्यादींनासुद्धा कळण्यास कठीण अशी आपली माया मी अनेक वेळा पहिली आहे. लाकडात गुप्त असलेला अग्नी जसा स्वत:चे तेज लपवून ठेवतो, तसे आपण चराचरामध्ये आपल्या अचिंत्य शक्तीने गुप्तपणे व्यापून राहिलेले आहात. म्हणून आपण जे हे विचारीत आहात, त्याबद्दल मला काहीही आश्चर्य वाटत नाही. हे भगवन ! आपण आपल्या मायेनेच या जगाची निर्मिती आणि संहार करता. आपल्या मायेमुळेच ते असत्य असूनही सत्य असल्यासारखे वाटते. आपण केव्हा काय करू इच्छिता, हे चांगल्या त-हेने कोणाला कळणार आहे? ज्यांचे स्वरूप अचिंतनीय आहे, त्या आपल्याला मी नमस्कार करतो. या अनर्थकारक शरीरांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत राहातो व यातून मुक्त कसे व्हावे, हे तो जाणत नाही. वास्तविक त्याच्याच हितासाठी आपण नाना प्रकारचे लीलावतार धारण करून आपल्या पवित्र यशाचा दीप प्रज्वलित करता. त्या आपणांस मी शरण आलो आहे. प्रभो! आपण स्वत: परब्रह्म असून माणसासारखी लीला करीत मला विचारीत आहात. म्हणून मी आपला आतेभाऊ आणि भक्त, राजा युधिष्ठिर काय करू इच्छितो, ते सांगतो. आपल्या पूजेला योग्य अशी श्रेष्ठ संपत्ती मिळावी म्हणून राजा युधिष्ठिर, यज्ञांत श्रेष्ठ अशा राजसूय यज्ञाने आपली आराधना करू इच्छितो. आपण याला संमती द्यावी. हे भगवन ! त्या श्रेष्ठ यज्ञामध्ये आपले दर्शन घेण्यासाठी देव आणि यशस्वी राजे येणार आहेत. हे प्रभो ! ब्रह्मस्वरूप अशा आपले श्रवण, कीर्तन आणि ध्यान केल्याने अंत्यजसुद्धा पवित्र होतात. तर मग जे आपले दर्शन आणि स्पर्श प्राप्त करून घेतात, त्यांच्याबद्दल काय सांगावे ! हे त्रिभुवनमंगला ! ज्याप्रमाणे आपली चरणामृतधारा स्वर्गामध्ये मंदाकिनी, पाताळात भोगवती आणि मृत्युलोकात गंगा या नावाने वाहात जाऊन सा-या विश्वाला पवित्र करीत आहे, त्याचप्रमाणे आपली निर्मळ कीर्ती सर्व दिशांमध्ये विस्तारली असून तिने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ व्यापले आहेत. (३७-४४) श्रीशुक म्हणतात- जरासंधाला जिंकू इच्छिणा-या यादवांना नारदांचे हे म्हणणे पसंत पडले नाही. तेव्हा श्रीकृष्ण स्मितहास्य करीत अतिशय गोड वाणीने उद्धवाला म्हणाले. (४५) श्रीकृष्ण म्हणाले- " उद्धवा ! तू माझा सुहृद, दिव्य नेत्र आणि राजनीती चांगल्या प्रकारे जाणणारा आहेत. म्हणून याविषयी काय करावे, ते तू सांग. तुझ्या म्हणण्यावर आमची श्रद्धा आहे म्हणून तुझ्या सल्ल्यानुसारच आम्ही वागू. उद्धवाने पाहिले की, आपले स्वामी सर्वज्ञ असूनही अजाणत्यासारखे सल्ला विचारीत आहेत. तेव्हा त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून तो म्हणाला. (४६-४७) अध्याय सत्तरावा समाप्त |