|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ६९ वा
देवर्षी नारदांनी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहाणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात-देवर्षी नारदांनी जेव्हा ऐकले की, भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून एकट्यानेच हजारो राजकुमारींशी विवाह केला आहे, तेव्हा भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. ते विचार करू लागले, " अहो! श्रीकृष्णांनी एकाच शरीराने, एकाच वेळी, सोळा हजार महालांमध्ये वेगवेगळ्या सोळा हजार राजकुमारींचे पाणिग्रहण केले, हे केवढे आश्चर्य आहे ! " या उत्सुकतेने देवर्षी नारद भगवंतांची ही लीला पाहाण्यासाठी द्वारकेत आले. तेथील उपवने आणि उद्याने फुलांनी लहडलेली होती. त्यावर निरनिराळ्या प्रकारचे पक्षी किलबिलत होते आणि भ्रमर गुंजारव करत होते. निर्मळ पाण्याने भरलेल्या सरोवरांमध्ये निळी, लाल आणि शुभ्र रंगाची निरनिराळ्या जातींची कमळे उमललेली होती. त्यामध्ये हंस आणि सारस किलबिल करीत होते. तेथे स्फटिकाचे आणि चांदीचे नऊ लक्ष महाल होते. तेथील पाचूच्या फरशा कांतीने झगमगत होत्या. तेथे सोने आणि रत्नांच्या पुष्कळ वस्तू होत्या. राजमार्ग, इतर रस्ते, चौक, बाजार, घोडे, हत्ती, जनावरे इत्यादी बांधण्याची ठिकाणे, सभागृहे आणि मंदिरे यांमुळे नगराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तेथील सडका, अंगणे, चौक आणि देवड्या याठिकाणी सडे घातले होते. पताका व ध्वज यांमुळे रस्त्यांवर ऊन लागत नव्हते. (१-६) त्या द्वारका नगरीत श्रीकृष्णांचे अत्यंत सुंदर असे अंत:पुर होते. सर्व लोकपाल त्यांची पूजा आणि प्रशंसा करीत असत. ते निर्माण करण्यामध्ये विश्वकर्म्याने आपले सारे कौशल्य पणाला लावले होते. त्या अंत:पुरात भगवंतांच्या राण्यांचे सोळा हजाराहून अधिक शोभिवंत महाल होते. त्यांपैकी एका विशाल भवनामध्ये देवर्षी नारदांनी प्रवेश केला. त्या महालांत पोवळ्यांचे खांब, वैदूर्य मण्यांच्या उत्तम फळ्या आणि इंद्रनील मण्यांच्या भिंती झगमगत होत्या. तसेच तेथील फरशा चमकदार इंद्रनील मण्यांच्या बनविलेल्या होत्या. विश्वकर्म्याने पुष्कळसे असे चांदवे बनविलेले होते की, ज्यांना मोत्यांच्या माळा लावल्या होत्या. तेथे रत्नजडित हस्तिदंती आसने आणि पलंग होते. गळ्यांत सोन्याचे हार घातलेल्या आणि सुंदर वस्त्रांनी नटलेल्या दासी तसेच अंगरखे व पगडी घातलेले आणि रत्नजडित कुंडले धारण केलेले सेवक त्या महालांची शोभा वाढवीत होते. अनेक रत्नजडित दिवे आपल्या झगमगाटाने त्यांतील अंधकार नाहीसा करीत होते. अगुरू धूप घातल्यामुळे झरोक्यातून धूर बाहेर पडत होता. तो पाहून रंगी-बेरंगी रत्नमय सज्जावर बसलेले मोर ते ढग आहेत, असे वाटून मोठ्याने केकारव करीत थुई थुई नाचू लागत. देवर्षी नारदांना तेथे असे दिसले की, भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर तेथे असून ती स्वत: भगवंतांना सोन्याची दांडी असलेल्या चवरीने वारा घालीत आहे. तसेच तेथे रुक्मिणीसारख्याच गुण, रूप, वय आणि वेष-भूषा असलेल्या हजारो दासीसुद्धा नेहमी असत. (७-१३) नारदांना पाहाताच सर्व धार्मिक लोकांचे मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पलंगावरून लगेच उठून उभे राहिले. देवर्षी नारदांच्या चरणी त्यांनी मुगुट असलेल्या मस्तकाने प्रणाम केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसविले. भगवान श्रीकृष्ण चराचर जगाचे परम गुरू आहेत आणि त्यांच्या चरणांपासून निघालेले गंगाजल सगळ्या जगाला पवित्र करणारे आहे, यात बिलकुल शंका नाही. तरीसुद्धा ते संतांचे परम आदर्श होते. शिवाय त्यांचे ’ब्रह्मण्यदेव’ (ब्राह्मणांना देव मानणे) हे त्यांच्या गुणांना अनुरूप असेच नावही आहे. म्हणूनच त्यांनी स्वत: नारदांची पाद्यपूजा करून ते चरणामृत आपल्या मस्तकी धारण केले. नराचे मित्र पुराण ऋषी भगवान नारायणांनी शास्त्रोक्त पद्धतीने देवर्षी नारदांची पूजा केली. नंतर अमृतापेक्षाही मधुर व मोजक्या शब्दांनी त्यांचे स्वागत करून त्यांना म्हटले- " प्रभो! आपण स्वत: समग्र ज्ञान, वैराग्य, धर्म, यश, श्री आणि ऐश्वर्याने परिपूर्ण आहात. तरीही आम्ही आपली कोणती सेवा करावी? " (१४-१६) नारद म्हणाले- भगवन ! आपण सर्व लोकांचे स्वामी आहात. आपली सर्वांशी मैत्री आहे. तरीही आपण दुष्टांना शासन करता, यात काही आश्चर्य नाही. हे परमयशस्वी प्रभो ! आपण जगाचे पालन आणि रक्षण करण्याबरोबरच जीवांचे श्रेष्ठ कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने अवतार धारण केला आहे, हे आम्ही चांगल्या रीतीने जाणतो. आज आपल्या चरणकमलांचे मला दर्शन झाले, ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आपली ही चरणकमले सर्व लोकांना मोक्ष देण्यास समर्थ आहेत. ज्यांचे ज्ञान अमर्याद आहे, असे ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव आपल्या हृदयामध्ये त्यांचे चिंतन करीत असतात. आपले हे चरणच संसाररूप विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर येण्याचे साधन आहे. आपण माझ्यावर अशी कृपा करा की, आपल्या चरणकमलांचे मला नेहमी स्मरण राहावे आणि मी त्यांच्या ध्यानात तन्मय असावे. (१७-१८) परीक्षिता ! यानंतर देवर्षी नारद योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अशा भगवान श्रीकृष्णांच्या योगमायेचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दुस-या पत्नीच्या महालात गेले. तेथेही त्यांनी असे पाहिले की, भगवान आपली प्रिया आणि उद्धव यांच्याबरोबर द्यूत खेळत आहेत. तेथेसुद्धा भगवंतांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले, आसनावर बसविले आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली. यानंतर भगवंतांनी आपल्याला काहीच माहीत नाही असे दाखवीत नारदांना विचारले, " आपण केव्हा आलात ? आपण तर सर्व दृष्टींनी परिपूर्ण आहात. अपूर्ण अशा आम्ही आपली काय सेवा करावी? तरीसुद्धा हे ब्रह्मन ! आपण आम्हांला आपल्या सेवेची संधी देऊन आमचा जन्म सफळ करा. " हे ऐकून चकित झालेले नारद तेथून गुपचूपपणे दुस-या महालाकडे निघून गेले. नारदांना त्या महालात श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवीत आहेत, असे दिसले. तेथून पुढच्या महालात गेले, तर भगवान स्नानाला जाण्याची तयारी करीत आहेत, असे त्यांनी पाहिले. कोठे ते हवन करीत आहेत, तर कोठे पंचमहायज्ञ करीत आहेत. कोठे ब्राह्मणांना भोजन देत आहेत, तर कोठे त्यांच्या भोजनानंतर स्वत: अन्न ग्रहण करीत आहेत. कोठे संध्या करीत आहेत, तर कोठे मौन धारण करून गायत्रीमंत्राचा जप करीत आहेत. कोठे हातात ढाल-तलवार घेऊन ते चालवण्याचा सराव करीत आहेत. कोठे घोडे, हत्ती किंवा रथावर स्वार होऊन फिरत आहेत. तर कोठे पलंगावर झोपले आहेत. कोठे भाट त्यांची स्तुती करीत आहेत. एखाद्या महालात उद्धव इत्यादी मंत्र्यांबरोबर राजकीय विषयावर चर्चा करीत आहेत, तर कोठे उत्तमोत्तम स्त्रियांसमवेत जलक्रीडा करीत आहेत. कोठे वस्त्रालंकारांनी सुशोभीत अशा गाईंचे श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करीत आहेत, तर कोठे मंगल अशा इतिहास पुराणांचे श्रवण करीत आहेत. कोठे आपल्या प्रियेबरोबर हास्यविनोद करीत खिदळत आहेत. तर कोठे धर्मशात्राचा अभ्यास करीत आहेत. कोठे अर्थाजन चालू आहे, तर कोठे धर्माला अनुकूल अशा विषयांचा उपभोग घेत आहेत. कोठे एकांतात बसून प्रकृतीच्या पलीकडे असणा-या पुरुषाचे ध्यान करीत आहेत, तर कोठे गुरुजनांना त्यांच्या इच्छेनुसार हवे ते अर्पण करुन त्यांची सेवाशुश्रूषा करीत आहेत. (१९-३०) ते कोणाबरोबर युद्धासंबंधी बोलत आहेत, तर कोणाबरोबर तहासंबंधी ! कोठे ते बलरामांबरोबर बसून सत्पुरुषांचे कल्याण करण्याबाबत विचार करीत आहेत. योग्य वेळ आल्याने कोठे पुत्र आणि कन्या यांचे इचित अशा पत्नी आणि वरांबरोबर शास्त्रानुसार थाटामाटात विवाह लावून देत आहेत. कोठे सासरी चाललेया कन्यांना निरोप देत आहेत, तर कोठे त्यांना बोलवण्याच्या तयारीत आहेत. योगेश्वरेश्वर श्रीकृष्णांचे हे थाट पाहून लोक आश्चर्यचकित होत होते. कोठे मोठमोठे यज्ञ करून सर्व देवतांचे पूजन करीत आहेत, तर कोठे विहिरी, बगीचे, मठ इत्यादी बांधून पूर्त धर्माचे आचरण करीत आहेत. कोठे श्रेष्ठ यादवांच्या समवेत घोड्यावर बसून यज्ञाला योग्य पशूंची शिकार करीत आहेत. आणि काही वेळा लोक, अंत:पुरे इत्यादी ठिकाणी सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी गुप्त वेषात ते योगेश्वर फिरत आहेत. (३१-३६) अशा प्रकारे मनुष्यासारखी लीला करीत असलेल्या श्रीकृष्णांच्या योगमायेचे वैभव पाहून नारद हसत हसत त्यांना म्हणाले. " हे योगेश्वरा ! ब्रह्मदेव इत्यादी मायावींनासुद्धा दिसण्यास कठीण अशी योगमाया आपल्या चरणकमलांची सेवा केल्याने स्वत:च आमच्यासमोर प्रगट झाली आहे. हे भगवंता ! मला निरोप द्या. यानंतर आपल्या सुयशाने परिपूर्ण असलेल्या त्रिभुवनात मी आपल्या त्रिभुवनाला पावन करणा-या लीलेचे गायन करीत विहार करीन. " (३७-३९) श्रीकृष्ण म्हणाले- नारदमुनी ! मीच धर्माचा उपदेशक, पालन करणारा आणि त्याचे अनुष्ठान करणा-यांना अनुमोदन देणाराही आहे. म्हणून जगाला धर्माचे शिक्षण देण्याच्या उद्देशानेच मी अशा प्रकारे धर्माचरण करतो. वत्सा ! या मायेने तू मोहित होऊ नकोस. (४०) श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमातील लोकांना पवित्र करणा-या श्रेष्ठ धर्मांचे आचरण करीत होते. सर्व प्रासादांतून ते एकटेच वावरत आहेत, असे नारदांनी पाहिले. (४१) अनंत शक्ती असणार्या श्रीकृष्णांच्या योगमायेचे परम ऐश्वर्य वारंवार पाहून देवर्षी नारदांच्या आश्चर्याला आणि कुतूहलाला सीमाच राहिली नाही. धर्म, अर्थ आणि काम या पुरुषर्थांच्या ठायी श्रद्धा असणा-या श्रीकृष्णांनी नारदांचा चांगला सन्मान केला. त्यामुळे आनंदित होऊन, भगवंतांचेच स्मरण करीत ते तेथून निघून गेले. राजन ! भगवान नारायण सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत्य मायेचा स्वीकार करून मनुष्यासारख्या लीला करीत सोळा हजारांहूनही अधिक पत्न्यांच्या लज्जायुक्त आणि प्रेमपूर्ण नजरांनी तसेच मंद स्मितहास्यांनी केलेली सेवा घेऊन त्यांच्याबरोबर रममाण होते. परीक्षिता ! विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे परम कारण असणा-या श्रीकृष्णांनी ज्या लीला केल्या, त्या दुसरा कोणीही करू शकणार नाही. जे त्यांच्या लीलांचे गायन, श्रवण करतात आणि गायन श्रवण करणा-यांना उत्तेजन देतात, त्यांच्या ठिकाणी मोक्षाला मार्गस्वरूप अशा भगवंतांविषयी भक्ती उत्पन्न होते. (४२-४५) अध्याय एकोणसत्तरावा समाप्त |