श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६८ वा

कौरवांवर बलरामांचा कोप आणि सांबाचा विवाह -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! युद्धात विजय मिळविणार्‍या जांबवतीपुत्र सांबाने स्वयंवरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला पळविले. त्यामुळे कौरवांना राग आला. ते म्हणाले, " हा मुलगा उर्मट आहे. त्याने आम्हांला तुच्छ लेखून बळजबरीने आमच्या कन्येचे तिच्या मर्जीविरुद्ध अपहरण केले. म्हणून या उद्धटाला पकडून बांधून टाका. यादव आमचे काय वाकडे करू शकणार ? ते आम्हीच दयाबुद्धीने दिलेल्या धान्यसंपन्न जमिनीचा उपभोग घेत आहेत. आपल्या मुलाला कैद केल्याचे ऐकून जर ते लोक इकडे आले, तर आम्ही त्यांची घमेंड जिरवू. त्यामुळे जसे संयमी पुरूष इंद्रियांना शांत करतात त्याप्रमाणे तेही शांत होतील. असा विचार करून कर्ण, शल, भूरिश्रवा, यज्ञकेतू आणि दुर्योधन यांनी कुरुवंशातील ज्येष्ठांच्या संमतीने सांबाला पकडण्याची तयारी केली. (१-५)

कौरव पाठलाग करीत आहेत असे पाहून महारथी सांब एक सुंदर धनुष्य घेऊन सिंहासारखा एकटाच रणांगणात उतरला. इकडे कर्णाला सेनापती बनवून कौरववीर, धनुष्य घेतलेल्या सांबाजवळ येऊन पोहोचले आणि रागाने त्याला पकडण्याच्या इच्छेने " थांब ! थांब ! " असे म्हणत त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. परीक्षिता ! यदुनंदन सांब अचिंत्य ऐश्वर्यशाली अशा भगवान श्रीकृष्णांचा पुत्र होता. जसा सिंह तुच्छ पशूंच्या आक्रमणामुळे चिडतो, त्याप्रमाणे तो कौरवांच्या चढाईने त्यांच्यावर चिडला. सांबाने आपल्या सुंदर धनुष्याचा टणत्कार करून, जे वेगवेगळ्या सहा रथांवर स्वार झाले होते, त्या कर्ण इत्यादी सहा वीरांच्यावर एकदम सहा बाणांनी वेगवेगळा वर्षाव केला. (६-९)

त्यांपैकी चार चार बाण त्यांच्या चार चार घोड्यांवर, एक एक त्यांच्या सारथ्यावर आणि एक एक त्या महान धनुष्यधारी वीरांवर सोडला. सांबाचे हे अद्‍भूत हस्तकौशल्य पाहून शत्रुपक्षातील वीरसुद्धा त्याची प्रशंसा करू लागले. नंतर त्या सहा वीरांपैकी चौघांनी एकेका बाणाने त्याचे चार घोडे मारले, एका वीराने सारथ्याला मारले आणि एका वीराने सांबाचे धनुष्य मोडून टाकले. अशा प्रकारे त्यांनी सांबाला रथहीन व शस्त्रहीन केले. अशा प्रकारे विजयी कौरवांनी रथहीन सांबाला कसेबसे बांधून त्याला आणि आपल्या कन्येला घेऊन ते हस्तिनापुरात परतले. (१०-१२)

परीक्षिता ! नारदांकडून हा वृत्तांत ऐकून यादवांना अतिशय क्रोध आला. उग्रसेनाच्या आज्ञेवरून ते कौरवांवर चढाई करण्याच्या तयारीला लागले. कलह नाहीसा करू इच्छिणार्‍या बलरामांनी युद्धसज्ज यादवांचे सांत्वन केले. कारण कुरू आणि वृष्णी यांचे आपापसातील भांडण त्यांना योग्य वाटत नव्हते. नंतर स्वत: सूर्यासारख्या तेजस्वी रथावर स्वार होऊन ते हस्तिनापुरला गेले. त्यांच्याबरोबर काही ब्राह्मण आणि ज्येष्ठ यादव होते. ग्रहांसमवेत चंद्र असावा, तसे त्यांच्यासमवेत बलराम होते. हस्तिनापुरला जाऊन बलराम नगराच्या बाहेर एका उपवनात थांबले आणि कौरवांचा काय मानस आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी उद्धवाला धृतराष्ट्राकडे पाठविले. (१३-१६)

उद्धवाने कौरवांच्या सभेत जाऊन धृतराष्ट्र, भीष्म, द्रोणाचार्य, बाल्हीक आणि दुर्योधन यांना विधिपूर्वक प्रणाम करून निवेदन केले की, " बलराम आले आहे. " आपले परम सुहृद बलराम आले आहेत, हे ऐकून कौरव अतिशय आनंदित झाले. उद्धवाचा सत्कार करून व आपल्या हातत पवित्र सामग्री घेऊन बलरामाच्या स्वागतासाठी ते निघाले. नंतर आपपल्या वयोमानानुसार आणि संबंधानुसार सर्वजण बलरामांना भेटले आणि त्यांच्या सत्काराप्रीत्यर्थ त्यांना गाय अर्पण करून त्यांनी त्यांची पूजा केली. त्यांपैकी जे भगवान बलरामांचा प्रभाव जाणत होते, त्यांनी मस्तक लववून त्यांना नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी एकमेकांना खुशाली विचारली आणि ती त्यांनी एकमेकांना सांगितली. नंतर निर्भयपणे बलराम त्यांना म्हणाले. (१७-२०)

राजाधिराज महाराज उग्रसेनांनी तुम्हांला एक आज्ञा केली आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घेऊन ताबडतोब तिचे पालन करा. महाराजांनी सांगितले आहे- " आम्हांस हे माहित आहे की, तुम्ही पुष्कळांनी मिळून अधर्माने, धर्मशील, एकाकी सांबाल एकटाच जिंकून बंदिवान केले. आम्हा बांधवांत फूट पडू नये म्हणून आम्ही ते सहन केले. (असमर्थ होतो म्हणून नव्हे )" (२१-२२)

बलरामांचे बोलणे वीरता, शौर्य आणि सामर्थ्य यांच्या उत्कर्षाने परिपूर्ण तसेच त्यांच्या शक्तीला अनुरूप असेच होते. ते ऐकून कौरव रागाने म्हणाले. " अहो ! ही तर मोठ्या आश्चर्याचीच गोष्ट आहे. कालगती कोणी टाळू शकत नाही, हेच खरे ! म्हणून जेथे मुकुटाने बसावे, तेथे आज पायातील जोडे बसू इच्छितात ! यांच्याशी आम्ही विवाह- संबंध जोडला. हे आमच्याबरोबर झोपणे-बसणे, खाणे-पिणे करू लागले. आम्हीच त्यांना राजसिंहासन देऊन आमच्या बरोबरीला आणले. आम्ही दुर्लक्ष करतो, म्हणून हे यदुवंशी चवर्‍या, पंखा, शंख, पांढरे छत्र, मुगुट, राजसिंहासन आणि बहुमोल शय्या यांचा उपयोग करीत आहेत. यापुढे ही राजचिन्हे यादवांना द्यायलाच नकोत ! जसे सापाला दूध पाजणे घातक ठरते, त्याचप्रमाणे राज्य देणार्‍या आमच्याच विरुद्ध हे वागत आहेत. आमच्याच कृपेने ज्यांची भरभराट झाली तेच यादव (कृतघ्न होऊन) निर्लज्जपणे आम्हांलाच आज्ञा करीत आहेत. धिक्कर असो यांचा ! सिंहाचा घास जसा मेंढा काढून घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे जर भीष्म, द्रोण, अर्जुन इत्यादी कौरववीरांनी राज्य द्यायचे नाकारले, तर स्वत: इंद्र तरी ते कसे घेऊ शकेल ? (२३-२८)

श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! कौरव उच्च कूळ, शूर बांधव आणि राज्यलक्ष्मी यांच्या गर्वाने उन्मत्त झाले होते. बलरामांना असभ्यपणे अशी दुरुत्तरे ऐकवून ते हस्तिनापुरात परतले. बलरामांनी कौरवांचे असभ्य वर्तन पाहिले, त्यांची दुरुत्तरेही ऐकली. त्यामुळे त्यांचा चेहेरा रागाने लालबुंद झाला. त्यावेळी त्यांच्याकडे पाहावतही नव्हते. ते वारंवार जोरजोराने हसत म्हणू लागले. जे दुष्ट निरनिराळ्या मदांनी उन्मत्त होतात, त्यांना शांतीची इच्छा नसते. पशूंना वठणीवर आणण्यासाठी दंडुक्याचा प्रयोग करणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे अशांना योग्य मार्गावर आणण्याचा उपाय म्हणजे त्यांना शासन करणे हेच होय. आता हेच पहा ना ! यादव आणि श्रीकृष्णसुद्धा रागाने लढाई करण्याच्या तयारीत होते. मीच त्यांना समजावून सांगून यांना शांत करण्यासाठी येथे आलो होतो. तरीसुद्धा हे भांडणाची खुमखुमी असणारे, अहंकारी मूर्ख वारंवार माझा तिरस्कार करून, बोलू नये ते बोलले. इंद्र इत्यादी लोकपालही ज्यांच्या आज्ञेचे पालन करतात, ते भोज, वृष्णी आणि अंधकवंशी यादवांचे राजे उग्रसेन यांना आज्ञा करू शकत नाहीत काय? सुधर्मासभेत जे विराजमान असतात, ज्यांनी देववृक्ष पारिजातक आणून आपल्या उपवनाला लावला, ते भगवान श्रीकृष्णसुद्धा राजसिंहासनाचे अधिकारी नाहीत काय? सगळ्या जगाची स्वामिनी भगवती लक्ष्मी स्वत: ज्यांच्या चरणकमलांची सेवा करते, ते लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण छत्र, चामरे इत्यादी राजोचित सामग्री जवळ बाळागू शकत नाहीत काय ? ज्यांच्या चरणकमलांची धूळ संत पुरूष सेवन करीत असलेल्या गंगा इत्यादी तीर्थांनासुद्धा तीर्थपणा आणून देणारी आहे, सगळे लोकपाल आपापल्या श्रेष्ठ मुगुटावर जिला धारण करतात, ज्यांच्या अंशांचे अंश असलेले ब्रह्मदेव, शंकर, मी आणि लक्ष्मी जी नेहमी मस्तकांवर धारण करतो, त्या " श्रीकृष्णांना राजसिंहासन कोठून ? " असे म्हणता ! बिचारे यादव म्हणे कौरवांनी दिलेला जमिनीचा तुकडा भोगतात. आम्ही म्हणे पायातील जोडे ! आणि हे कौरव म्हणे मस्तक ! वाहवा रे ! अहो ! ऐश्वर्याने माजलेल्या, घमेंडखोर, वेड्याप्रमाणे बडबडणार्‍या यांची असंबद्ध, निरर्थक बडबड, यांना शासन करू शकणारा माझ्यासारखा कसा सहन करू शकेल ? आज मी सगळी पृथ्वी कौरवरहित करून टाकीन, असे म्हणत बलराम अत्यंत क्रोधाने जणू त्रैलोक्याचे भस्म करून टाकण्यासाठी आपला नांगर हातात घेऊन उभे राहिले. त्यांनी त्याच्या टोकाने हस्तिनापूर उखडले आणि ते बुडविण्यासाठी अतिशय क्रोधाने गंगेकडे ओढू लागले. (२९-४१)

नांगराच्या ओढण्याने, पाण्यामध्ये नाव जशी डगमगते, त्याप्रमाणे हस्तिनापुर हलू लागले. आपले नगर गंगेमध्ये बुडवण्यसाठी ओढले जात असलेले पाहून कौरव घाबरले. नंतर त्यांनी लक्ष्मणेसह सांबाला पुढे केले आणि आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी, कुटुंबियांसह हात जोडून, सर्वशक्तिमान अशा भगवान बलरामांना ते शरण गेले. " हे लोकाभिराम बलराम ! आपण सगळ्या जगताचे आधार आहात. आम्ही आपला प्रभाव जाणला नाही. हे प्रभो ! आम्हां मूर्खांच्या अपराधाबद्दल आम्हांला क्षमा करावी. आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात आणि स्वत: कोणत्याही आधाराविना राहाता. हे सर्वशक्तिमान प्रभो ! हे त्रैलोक्य आपली खेळणी आहेत, असे ज्ञानी म्हणतात. हे अनंता ! आपली हजारो मस्तके आहेत आणि आपण सहजपणे हे भूमंडल आपल्या मस्तकावर ठेवले आहे. जेव्हा प्रलय होतो, तेव्हा आपण सार्‍या जगाला आपल्यामध्ये लीन करून घेता आणि शिल्लक असलेले एकटेच आपण शयन करीत असता. हे भगवन ! आपण जगताची स्थिती आणि पालन करण्यासाठी विशुद्ध सत्वमय शरीर धारण केले आहे. आपला हा क्रोध, द्वेष किंवा मत्सर यांमुळे नसून सर्वांना शिक्षण देण्यासाठी आहे. हे सर्व शक्तींना धारण करणार्‍या सर्वप्राणिस्वरूप अविनाशी भगवन ! आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत. हे विश्व निर्माण करणार्‍या देवा ! आम्ही आपणांस शरण आलो आहोत. (४२-४८)

श्रीशुक म्हणतात- नगर डगमगू लागल्याने भयभीत झालेले कौरव भगवान बलरामांना शरण आले आणि त्यांनी त्यांची स्तुती केली. तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन, "भिऊ नका " असे म्हणून त्यांनी त्यांना अभय दिले. कन्येवरील प्रेमामुळे दुर्योधनाने वरदक्षिणा म्हणून साठ साठ वर्षांचे बाराशे हत्ती, दहा हजार घोडे, सूर्यासारखे चमकणारे सोन्याचे सहा हजार रथ आणि सोन्याचे हार घातलेल्या एक हजार दासी दिल्या.
आप्तांनी सत्कार केलेले यदुश्रेष्ठ भगवान बलराम त्या सर्वाचा स्वीकार करून नवदांपत्याला बरोबर घेऊन द्वारकेकडे परतले. नंतर बलराम द्वारकापुरीत पोहोचले व आपल्या प्रिय बांधवांना भेटले. त्यांनी हस्तिनापुरात कौरवांशी जे काही घडले, ते सर्व यादवसभेत सांगितले. आजही दक्षिणेकडे उंच असलेले आणि गंगेकडे थोडेसे झुकलेले हे हस्तिनापूर बलरामांच्या पराक्रमाचे सूचक आहे. (४९-५४)

अध्याय अडुसष्टावा समाप्त

GO TOP