श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६७ वा

द्विविदाचा उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

परीक्षित म्हणाला- अनंत, मनबुद्धीला न कळणार्‍या व अलौकिक कृत्ये करणार्‍या भगवान बलरामांनी आणखी जी काही अद्‍भूत कर्मे केली असतील, ती मी पुन्हा ऐकू इच्छितो. (१)

श्रीशुक म्हणाले- द्विविद नावाचा एक वानर होता. तो भौ‍मासुराचा मित्र, सुग्रीवाचा मंत्री आणि मैंदाचा शक्तिमान भाऊ होता. श्रीकृष्णांनी भौ‍मासुराला मारल्याचे त्याने ऐकले, तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी त्याने श्रीकृष्णांच्या राज्याला उपद्रव देण्यास सुरवात केली. तो वानर नगरे, गावे, खाणी आणि गवळ्यांच्या वस्त्यांना आगी लावून त्या जाळू लागला. कधी कधी तो मोठमोठे पर्वत उखडून टाकून त्याने अनेक प्रदेशांचा चक्काचूर करीत असे आणि हे तो विशेष करून काठेवाडामध्ये करीत असे, कारण त्याच्या मित्राला मारणारे भगवान श्रीकृष्ण त्याच देशात राहत होते. द्विविद वानराच्या अंगी दहा हजार हत्तींचे सामर्थ्य होते. तो दुष्ट कधी-कधी समुद्रात उभा राहून हाताने इतके पाणी उडवीट असे की, त्यामुळे समुद्राच्या काठावरील देश बुडून जात.

तो दुष्ट मोठमोठ्या मुनींच्या आश्रमांतील झाडे उपटून उध्वस्त करीत असे आणि त्यांनी यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मल-मूत्र टाकून तो अग्नी दूषित करीत असे. ज्याप्रमाणे कुंभारमाशी दुसर्‍या किड्यांना आणून आपल्या बिळात त्यांना डांबून टाकते, त्याचप्रमाणे तो मदोन्मत्त वानर स्त्रिया आणि पुरुषांना घेऊन जाऊन डोंगराच्या गुहांमध्ये डांबून त्यांना बाहेरून मोठमोठ्या शिळा लावून त्यांची तोंडे बंद करीत असे. तो अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांना त्रास देई. शिवाय कुलीन स्त्रियांनासुद्धा भ्रष्ट करीत असे. एके दिवशी तो दुष्ट मधुर संगीत ऐकून रैवतक पर्वतावर गेला. (२-८)

तेथे त्याने यदुश्रेष्ठ बलरामांना पाहिले. ते सर्वांगसुंदर असून त्यांनी कमळांची माळ गळ्यात घातली होती. त्यांच्या आजूबाजूला अनेक तरुणी होत्या. मधुपान करून ते मधुर संगीत गात होते. त्यावेळी त्यांचे डोळे आनंदाने धुंद झाले होते. त्यांचे शरीर एखाद्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे शोभून दिसत होते. तो दुष्ट वानर झाडांच्या फांद्यांवर चढून त्या जोराने हलवीत आप्ले अस्तित्व दाखविण्यासाठी किलकिलाटही करीत असे.

स्वभावत:च चंचल आणि हसण्याची आवड असणार्‍या बलरामाच्या तरुण भार्या त्याच्या माकडचेष्टा पाहून खदखदा हसू लागल्या. आता तो वानर बलरामांच्या देखतच त्या स्त्रियांना पाहून समोरून जात, त्यांना आपला गुह्यभाग दाखवीत, तर कधी डोळे मिचकावीत त्यांची चेष्टा करू लागला. ते पाहून वीरश्रेष्ठ बलरामांनी रागाने त्याला एक दगड फेकून मारला, परंतु तो चुकवून द्विविदाने झेप घालून त्याचा मधुकलश पळविला आणि तो बलरामांची खिल्ली उडवू लागला. नंतर त्या लबाड वानराने तो कलश फोडून वस्त्रेही फाडली. आणि कुचेष्टेने हसून बलरामांना तो चिडवू लागला.

परीक्षिता ! जेव्हा अशा प्रकारे मदोन्मत्त बलवान द्विविद बलरामांना तुच्छ मानून त्यांची हेटाळणी करू लागला, तेव्हा त्यांनी त्याचा उर्मटपणा पाहून तसेच त्याने प्रदेशांची केलेली दुर्दशा पाहून त्याला मारण्याच्या हेतूने क्रोधाने आपला नांगर आणि मुसळ उचलले. द्विविदसुद्धा मोठा बलवान होता. त्याने एका हाताने सागवान उपटून मोठ्या वेगाने धावत जाऊन तो बलरामांच्या डोक्यावर मारला. पण बलरामांनी पर्वताप्रमाणे निश्चल राहून डोक्यावर पडणारा तो वृक्ष पकडला आणि आपल्या सुनंद नावच्या मुसळाने त्याच्यावर प्रहार केला. मुसळाच्या घावाने द्विविदाचे डोके फुटले आणि त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. एखाद्या पर्वतावरून पातळ कावेची धार वाहात आहे असे ते दृश्य दिसू लागले. परंतु द्विविदाने आपले डोके फुटल्याची पर्वा केली नाही. अतिशय रागाने त्याने दुसरा एक वृक्ष उपटला. त्याची पाने-फांद्या तोडून टाकल्या आणि त्याचा बलरामांवर जोराने प्रहार केला. बलरामांनी त्याचे शेकडो तुकडे केले. अशा प्रकारे तो वानर त्यांच्याशी वृक्षांनी युद्ध करीतच राहिला. एक वुक्ष तोडल्यावर तो दुसरा वृक्ष उपटत असे. अशा तर्‍हेने सगळीकडचे वृक्ष उपटून त्याने सर्व वनच वृक्षहीन केले. नंतर द्विविदाने संतापून बलरामांच्यावर दगडांचा वर्षाव सुरू केला. परंतु बलरामांनी मुसळाने त्या सर्व दगडांचा सहजपणे चक्काचूर केला. शेवटी कपिराज द्विविदाने आपल्या ताडाप्रमाणे लांब असलेल्या हाताच्या मुठींनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या छातीवर प्रहार केले. तेव्हा यदुवंशशिरोमणी बलरामांनी नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागाने दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर प्रहार केला. त्यामुळे तो वानर रक्त ओकीत जमिनीवर पडला. परीक्षिता ! वादळ आल्यावर नाव जशी पाण्यात डगमगू लागते. त्याप्रमाणे त्याच्या पडण्याने वृक्ष आणि शिलाखंडांसह सगळा पर्वत डळमळू लागला. आकाशात देवता ’जय-जय’, सिद्ध लोक ’नमो नम:’ आणि मोठमोठे ऋषी ’साधु-साधु’ असे म्हणून बलरामांवर फुलांचा वर्षाव करू लागले. जगात उपद्रव माजविणार्‍या द्विविदाला अशा प्रकारे मारून भगवान द्वारकापुरीला परतले. त्यावेळी. सगळे नगरवासी त्यांची स्तुती करीत होते. (९-२८)

अध्याय सदुसष्टावा समाप्त

GO TOP