श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६६ वा

पौंड्रक आणि काशिराजाचा उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणता - परीक्षिता ! बलराम जेव्हा नंदबाबांच्या व्रजामध्ये गेले होते, तेव्हा इकडे करूष देशाचा अज्ञानी राजा पौंड्रक याने श्रीकृष्णांकडे एक दूत पाठवून असे कळविले की, " भगवान वासुदेव मी आहे. " मूर्ख लोक त्याला चिथावणी देत होते की, आपणच भगवान वासुदेव आहात आणि जगाचे रक्षण करण्यसाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. " त्यामुळे तो मूर्ख स्वत:लाच भगवान समजू लागला. लहान मुले खेळताना ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला राजा करतात आणि तो राजाप्रमाणे त्यांच्याशी वागू लागतो. त्याप्रमाणे मंदबुद्धी अज्ञानी पौंड्रकाने, अचिंत्यस्वरूप भगवान श्रीकृष्णांकडे द्वारकेला आपला दूत पाठविला. पौंड्रकाचा दूत द्वारकेला आला आणि राजसभेत बसलेल्या कमलनयन भगवान श्रीकृष्णांना त्याने राजाचा निरोप सांगितला. (१-४)

"मीच एकमात्र वासुदेव आहे. दुसरा कोणी नाही. प्राण्यांवर कृपा करण्यसाठी मीच अवतार धारण केला आहे. तू आपले वासुदेव असे खोटेच नाव घेतले आहेस. ते आता टाकून दे. हे यादवा ! तू मूर्खपणाने माझी चिन्हे धारण केली आहेस. ती टाकून मला शरण ये. नाहीतर माझ्याशी युद्ध कर. " (५-६)

श्रीशुक म्हणतात- मंदबुद्धी पौंड्रकाची ही बडबड ऐकून उग्रसेन इत्यादी सभासद जोरजोराने हसू लागले. त्या लोकांचे हसणे संपल्यावर भगवान श्रीकृष्ण दूताला म्हणाले- " तू आपल्या राजाला सांग की, " अरे मूर्खा ! मी माझी चक्र इत्यादी चिन्हे तुझ्यावर व ज्या साथीदारांच्या चिथावणीवरून तू ही बडबड करीत आहेस, त्यांच्यावरही सोडीन. त्यावेळी हे मूर्खा ! तू आपले तोंड लपवून घार, गिधाड, होला, इत्यादी मांसभक्षण करणार्‍या पक्ष्यांच्या गराड्यात पडून राहाशील आणि कुत्र्यांना शरण जाशील. " दूताने भगवंतांचा हा रस्कारयुक्त निरोप पौंड्रकाला जसाच्या तसा सांगितला. इकडे श्रीकृष्णांनीसुद्धा रथावर स्वार होऊन काशीवर चढाई केली. (कारण तो राजा त्यावेळी मित्र असलेल्या काशिराजाजवळ राहात होता.) (७-१०)

भगवान श्रीकृष्णांनी आक्रमण केल्याची बातमी ऐकून महारथी पौंड्रकसुद्धा दोन अक्षौहिणी सेनेसह ताबडतोब नगराच्या बाहेर आला. काशीचा राजा पौंड्रकाचा मित्र होता. म्हणून तो सुद्धा त्याला साहाय्य करण्यासाठी तीन अक्षौहिणी सेनेसह त्याच्या पाठोपाठ आला. परीक्षिता ! त्यावेळी श्रीकृष्णांनी पौंड्रकाला पाहिले. पौंड्रकानेसुद्धा शंख, चक्र, तलवार, गदा, शार्ड्ग.धनुष्य आणि श्रीवत्सचिन्ह इत्यादी धारण केले होते. त्याच्या छातीवर कौस्तुभमणी आणि गळ्यात वनमालासुद्धा होती. त्याने रेशमी पीतांबर परिधान केले होते आणि रथाच्या ध्वजावर गरुडचिन्हसुद्धा लावून ठेवले होते. त्याच्या मस्तकावर मौल्यवान मुगुट होता आणि कानांमध्ये मकराकृती कुंडले होती. जशी एखाद्या नटाने रंगमंचावर वेषभूषा करावी, तशी आपल्यासारखीच त्याची कृत्रिम वेष-भूषा पाहून श्रीकृष्ण खदाखदा हसू लागले. आता शत्रूंनी श्रीकृष्णांवर त्रिशूल, गदा, मद्गर, शक्ती, ऋष्टी, प्रास, तोमर, तलवारी, पट्टिश आणि बाण या शस्त्रास्त्रांचा मारा केला. प्रलयाच्या वेळी ज्याप्रमाणे आग सर्व प्रकारच्या प्राण्यांना जाळून टाकते, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनीसुद्धा गदा, तलवार, चक्र आणि बाण या शस्त्रास्त्रांनी पौंड्रक व काशिराजाचे हत्ती, रथ, घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेला उध्वस्त केले. ती रणभूमी, भगवंतांच्या चक्राने तुकडे तुकडे झालेल्या रथ, घोडे, हत्ती, सैनिक, गाढवे आणि उंटांनी भरून गेली. त्यावेळी असे वाटत होते की, जणू भूतनाथ शंकरांचे ते भयानक क्रीडास्थळच आहे. ते पाहून शूरांचा उत्साह अधिकच वाढत गेला होता. (११-१८)

भगवान श्रीकृष्ण पौंड्रकाला म्हणाले, " ए, पौंड्रका ! तू दूताद्वारे मला जी चिन्हे सोडून द्यायला सांगितली होतीस, ती मी आता तुझ्यावर सोडतो. तू जे खोटेच माझे नाव धारण केले आहेस, तेही मूर्खा ! आता तुला सोडायला भाग पाडतो. आणि जर मी तुझ्याशी युद्ध करू शकलो नाही, तर तुला शरणही येतो. " श्रीकृष्णांनी त्याला अशा प्रकारे खडसावून तीक्ष्ण बाणांनी त्याच्या रथाचे तुकडे केले आणि जसे इंद्राने वज्राने पर्वताचे शिखर उडवावे तसे चक्राने त्याचे मस्तक उडविले. तसेच जशी वार्‍याने कमळाची कळी जमिनीवर पाडवी, त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाणांनी काशी-नरेशाचे मस्तक धडावरून उडवून काशीपुरीत टाकले. अशा प्रकारे आपला द्वेष करणार्‍या पौंड्रकाला आणि त्याचा मित्र काशिराज याला मारून श्रीकृष्ण द्वारकेला परतले. त्यावेळी सिद्धगण भगवंतांच्या अमृतमय कथांचे गायन करीत होते. परीक्षिता ! पौंड्रक भगवंतांच्या रूपाचे नेहेमी चिंतन करीत असे. यामुळे त्याची सर्व बंधने गळून पडली. भगवंतांसारखा वेषही तो धारण करीत असे. त्यामुळे तो भगवंतांच्या सारुप्याला जाऊन मिळाला. (१९-२४)

इकडे काशीनगरात राजमहालाच्या दरवाजावर एक कुंडले असलेले मस्कत पडल्याचे पाहून लोक विचार करू लागले की, हे काय आहे ? हे कोणाचे मस्तक आहे ? (२५)

ते काशीनरेशाचे मस्तक आहे, असे जेव्हा समजले, तेव्हा त्याच्या राण्या, पुत्र, बांधव तसेच नागरिक हे नाथ ! हे राज ! हाय ! हाय ! आमचा सर्वनाश झाला, असे म्हणून मोठ्याने रडू लागले. त्याचा सुदक्षिण नावाचा पुत्र होता. त्याने पित्याचे अंत्येष्टि संस्कार करून मनोमन निश्चय केला की, आपल्या पित्याच्या वध करणार्‍याला मारूनच मी पित्याच्या ऋणातून मुक्त होईन. असे ठरवून तो आपल्या कुलपुरोहितांसह एकाग्रतेने भगवान शंकरांची आराधना करू लागला. काशी नगरीमध्ये त्याच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले. सुदक्षिणाने आपल्या पित्याचा वध करणार्‍याला मारण्याचा उपाय सांगा, असा इच्छित वर मागितला. भगवान शंकर म्हणाले, " तू ब्राह्मणांसह यज्ञदेवता ऋत्विजस्वरूप दक्षिणाग्नीची आभिचारिक विधीने आराधना कर. यामुळे तो अग्नी प्रमथगणांसह प्रगट होईल व तू जर ब्राह्मणांचे भक्त नसणार्‍यांवर त्याचा प्रयोग करशील, तर तो तुझा संकल्प सिद्धीला नेईल. " असे सांगितल्यावर सुदक्षिण श्रीकृष्णांना मारण्यासाठी नियमपूर्वक अनुष्ठान करू लागला. अनुष्ठान पूर्ण होताच यज्ञकुंडातून अतिशय भीषण असा अग्नी मूर्तिमंत होऊन प्रगट झाला. त्याचे केस आणि दाढी-मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल होत्या. डोळ्यांतून ज्वाळा बाहेर पडत होत्या. उग्र दाढा आणि चढवलेल्या भुवयांमुळे त्याच्या तोंडातून जणू क्रूरताच बाहेर पडत होती. तो आपल्या जिभेने तोंडाची दोन्ही टोके चाटीत होता. तो उघडाबंब असून त्याने हातात पेटता त्रिशूळ घेतला होता आणि तो वारंवार फिरवीत होता. त्याचे पाय ताडाच्या झाडाप्रमाणे लांब होते. त्याच्या चालण्याने जमीन हादरत होती आणि ज्वाळांनी आजूबाजूचा प्रदेश दग्ध करीत तो पुष्कळ भूतांसह द्वारकेजवळ जाऊन पोहोचला. ती आभिचारिक आग अगदी जवळ आल्याचे पाहून, जंगलाला आग लागल्यानंतर जसे पशू भयभीत होतात, त्याप्रमाणे द्वारकेतील लोक भयभीत झाले. ते लोक भयभीत होऊन भगवंतांच्याकडे आले. भगवान त्यावेळी सभेमध्ये द्यूत खेळत होते. त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली, " हे त्रैलोक्यनाथा ! वाचवा. नगर जाळणार्‍या या आगीपासून आमचे रक्षण करा. स्वजन भयभीत झालेले पाहून व त्यांचा आक्रोश ऐकून शरणागतवत्सल भगवंत हसून म्हणाले- " घाबरू नका. मी तुमचे रक्षण करीन." (२६-३७)

सर्वांचे अंतर्बाह्य साक्षी असलेल्या भगवंतांनी ही माहेश्वरी कृत्या आहे, हे जाणून तिचा प्रतिकार करण्याची आपल्याजवळव असलेल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली. भगवान मुकुंदांचे अस्त्र सुदर्शन चक्रकोट्यवधी सूर्यांप्रमाणे तेजस्वी आणि प्रलयकालीन अग्नीप्रमाणे धगधगणारे होते. त्याच्या तेजाने आकाश, दिशा आणि अंतरिक्ष उजळून निघाले आणि त्याने अभिचार- अग्नीला निस्तेज केले. भगवान श्रीकृष्णांचे अस्त्र (असलेल्या) सुदर्शन चक्राच्या शक्तीने कृत्यारूप आगीचे मुख छिन्न-विछिन्न झाले. तिचे तेज नष्ट झाले, शक्ती कुंठित झाली आणि ती तेथून परतून काशीला आली व तिने ऋत्विज-आचार्यांसह सुदक्षिणाला जाळून भस्म केले. अशा प्रकारे त्याचा अभिचार त्याच्याच विनाशाला कारणीभूत ठरला. कृत्येच्या पाठोपाठ सुदर्शन चक्रसुद्धा काशीला येऊन पोहोचले. त्याने गच्च्या, सभागृहे, बाजार, गोपुरे, बुरुज, कोठारे, खजिने, हत्ती, घोडे, रथ आणि अन्नशाळा असलेली संपूर्ण काशी जाळून आनंदपूर्ण कृत्ये करणार्‍या भगवान श्रीकृष्णांकडे ते परत आले. (३८-४२)

जो मनुष्य पुण्यकीर्ती श्रीकृष्णांचा हा पराक्रम एकाग्रतेने ऐकतो किंवा दुसर्‍याला ऐकवितो, त्याची सर्व पापांपासून सुटका होते. (४३)

अध्याय सहासष्टावा समाप्त

GO TOP