श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६५ वा

श्रीबलरामांचे व्रजाकडे जाणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! भगवान बलरांना व्रजातील स्वजनांना भेटण्याची अत्यंत उत्कंठा लागली. म्हणून ते रथावर स्वार होऊन नंदगोकुळात गेले. इकडे व्रजवासी गोप आणि गोपीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ दिवसांपासून उत्सुक होत्या. ते आल्याचे पाहून सर्वांनी त्यांना आलिंगन दिले. बलरामांनी माता-पित्यांना नमस्कार केला. त्यांनीसुद्धा त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे स्वागत केले. " बलरामा ! जगदीश्वर असा तू धाकटा भाऊ श्रीकृष्णासह नेहमी आमचे रक्षण करीत राहा. "

असे म्हणून त्यांनी त्यांना मांडीवर घेऊन आलिंगन देऊन आपल्या प्रेमाश्रूंनी भिजविले. यानंतर ज्येष्ठ गोपांना बलरामांनी आणि कनिष्ठ गोपांनी बलरामांना नमस्कार केला. ते आपले वय, मैत्री आणि संबंधानुसार सर्वांना भेटले. नंतर गोपालांच्याजवळ जाऊन कोणाशी हस्तांदोलन केले. तर कोणाला खूप हसविले. यानंतर जेव्हा बलराम विश्रांतीनंतर निवांत बसले, तेव्हा सर्व गोपाल त्यांच्याजवळ आले. त्यांनी कमलनयन श्रीकृष्णांसाठी सर्व विषयांचा त्याग केला होता. बलरामांनी जेव्हा त्यांच्यासबंधी आणि त्यांच्या घरच्यांच्यासंबंधी विचारपूस केली, तेव्हा त्यांनी प्रेमाने सद्गीदित झालेल्या वाणीने त्यांना विचारले. " बलरामा ! आमचे सर्व बांधव खुशाल आहेत ना ? आता तुम्ही बायकामुलांबरोबर राहात असता. तर आमची कधी आठवण येते का ? पापी कंसाला आपण मारले आणि आपल्या अप्तेष्टांना मोठ्या संकटातून वाचविले, हे चांगले झाले. आपण आणखीही पुष्कळ शत्रूंना मारलेत किंवा जिंकलेत आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी जाऊन राहात आहात. हेही उत्तम झाले. " (१-८)

बलरामांच्या दर्शनाने खूष झालेल्या गोपींनी हसून विचारले, " बलरामा ! शहरी स्त्रियांचे प्राणवल्लभ श्रीकृष्ण खुशाल आहेत ना ? आपल्या बांधवांची, माता- पित्यांची त्यांना कधी आठवण येते का? आपल्या आईला भेटण्यासाठी ते एकदा तरी येणार काय ? पराक्रमी श्रीकृष्णांना कधी आम्ही केलेल्या सेवेची आठवण येते का? आपल्या माणसांना सोडणे किती कठीण असते ! तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी आमचे आई-वडिल, भाऊ, पति-पुत्र, बहिणी यांनासुद्धा सोडून दिले. परंतु, हे प्रभो ! त्यांनी अगदी सहजपणे आमचे प्रेमाचे बंधन तोडून आम्हांला सोडून ते निघून गेले. त्यांच्या त्या गोड गोड बोलण्यावर आम्ही भाबड्या स्त्रिया विश्वास कसे बरे ठेवणार नाही ? " एक गोपी म्हणालॊ, " आम्ही तर अडाणीच. आमचे जाऊ दे. परंतु शहरातील चतुर स्त्रिया चंचल आणि कृतघ्न श्रीकृष्णांच्या बोलण्याला कशा बरे फसतील ? त्यावर दुसरी गोपी म्हणाली, " अग ! का नाही फसणार ! ते गोड गोड बोलण्यात मोठे पटाईत आहेत ना ! शिवाय त्यांचे ते सुंदर स्मितहास्ययुक्त पाहाणे, यामुळे शहरातील त्या स्त्रियासुद्धा प्रेमावेगाने स्वत:ला विसरून व्याकूळ होत असतील आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असतीलच."

तिसरी गोपी म्हणाली, " गोपींनो ! त्यांच्याबद्दल कशाला बोलता? दुसरा एखादा विषय काढा. जर त्या निर्दयाचा वेळ आमच्याखेरीज जात असेल, तर आमचाही वेळ त्याच्यासारखाच का जाऊ नये? " गोपी आता भगवान श्रीकृष्णांचे हसत बोलणे, सुंदर पाहाणे, चालणे, प्रेमालिंगन इत्यादी गोष्टी आठवून रडू लागल्या. (९-१५)

निरनिराळ्या प्रकारे समजूत घलण्यात निपुण असलेल्या भगवान बलरांनी श्रीकृष्णांचे हृदयस्पर्शी संदेश सांगून गोपींचे सांत्वन केले. रात्रीच्या वेळी गोपींबरोबर राहून त्यांचे प्रेम वृद्धिंगत करीत भगवान रामांनी चैत्र आणि वैशाख असे दोन महिने तेथेच घालविले. (१६-१७)

त्यावेळी कमलपुष्पांचा सुगंध घेऊन मंद वारा वाहात असे. पूर्ण चंद्राचे चांदणे यमुनेच्या काठावरील उपवन शुभ्र करीत असे. आणि भगवान बलराम गोपींसह तेथेच विहार करीत असत. वरुणदेवाने आपली कन्या वारुणीदेवीला तेथे पाठविले होते. ती एका झाडाच्या खोडातून वाहात बाहेर पडून आपल्या सुगंधाने सगळे वन सुगंधित करी. मधुमधुरेचा तो सुगंध वायूने बलरामांना भेट म्हणून दिला. त्याच्या सुगंधाने आकृष्ट होऊन बलराम गोपींना घेऊन तेथे पोहोचले आणि त्यांच्यासह त्यांनी ती प्राशन केली. गोपी त्यावेळी बलरामांच्या चारही बाजूंनी राहून त्यांच्या चरित्राचे गायन करीत होत्या आणि ते धुंद होऊन वनामध्ये विहार करीत होते. आनंदाने त्यांचे डोळे मादक दिसत होते. गळ्यामध्ये फुलांचा हार व वैजयंतीमाला होती. त्यांच्या एका कानात कुंडल झळकत होते. मुखकमलावर स्मित होते. त्यावर आलेले घामाचे बिंदू दवबिंदूसारखे दिसत होते.

जलक्रीडा करण्यासाठी सर्वशक्तिमान बलरामांनी यमुना नदीला बोलावले. हे यावेळी वारुणीच्या नशेत आहेत असे पाहून यमुना नदी आली नाही. तेव्हा तिने आपले म्हणणे मानले नाही म्हणून बलरामांनी क्रोधाने आपल्या नांगराच्या टोकाने तिला खेचून घेतले. " हे पापिणी ! मी बोलावून्सुद्धा तू माझा अपमान करून इकडे आली नाहीस. आता मी नांगराच्या टोकाने स्वत:च्या मनाप्रमाणे वागणार्‍या तुझे शोकडो तुकडे करतो. " राजा ! बलरामांनी जेव्हा यमुनेला असे फटकारले, तेव्हा आश्चर्यचकित आणि भयभीत होऊन बलरामांच्या चरणांवर तिने लोटांगण घातले आणि ती त्यांची प्रार्थना करू लागली. " हे रामा ! हे रामा ! हे महाबाहो ! हे जगत्पते ! ज्यांचा अंश असलेला शेष हे सर्व जग धारण करतो, त्या आपला प्राक्रम माझ्या लक्षात आला नाही. हे सर्वस्वरूप भक्तवत्सल भगवन ! आपण परम ऐश्वर्यशाली आहात. आपले खरे स्वरूप न जाणल्याकारणानेच माझ्याकडून हा अपराध घडला. मी आपल्याला शरण आले आहे. मला सोडून द्यावे. (१८-२७)

त्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान बलरामांनी तिला सोडून दिले. नंतर गजराज जसा हत्तिणींबरोबर क्रीडा करतो, त्याप्रमाणे ते गोपींबरोबर जलक्रीडा करू लागले. यथेष्ट विहार करून जेव्हा ते यमुना नदीच्या बाहेर आले, तेव्हा लक्ष्मीने त्यांना निळी वस्त्रे, बहुमोल अलंकार आणि सोन्याचा सुंदर हार दिला. बलरामांनी निळी वस्त्रे परिधान केली आणि सोन्याचा हार गळ्यात घातला. अंगाला चंदन लावून व सुंदर अलंकारांनी विभूषित होऊन ते ऐरावतासारखे शोभू लागले. परीक्षिता ! अजूनही बलरामांनी ओढून आणलेल्या मार्गानेच यमुना नदी वाहात आहे. त्यामुळे जणू अनंतशक्ती भगवान बलरामांच्या यशाचे ती गायन करीत आहे, असे वाटते. व्रजवासी गोपींच्या माधुर्याने बलरामांचे चित्त अशा प्रकारे मुग्ध झाले होते की, व्रजात विहार करताना पुष्कळ रात्री एक्च रात्र असल्यासारख्या त्यांना वाटल्या. (२८-३२)

अध्याय पासष्टावा समाप्त

GO TOP