श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ११ वा - अध्याय ५ वा

भक्तिहीन पुरूषांची गती आणि भगवंतांच्या पूजाविधीचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजाने विचारले - हे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरांनो ! ज्यांच्या भोगेच्छा पूर्ण झालेल्या नसतात, तसेच ज्यांचे मन स्वाधीन नाही, त्यामुळे जे लोक भगवंतांचे बहुधा भजन करीत नाहीत, अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते ? (१)

चमस म्हणाला - विराट पुरूषांच्या मुखापासून सत्त्वप्रधान ब्राह्मण, भुजांपासून सत्त्वरजप्रधान क्षत्रिय, मांड्यांपासून रजतम प्रधान वैश्य आणि चरणांपासून तमप्रधान शूद्र अशी गुणांनुसार चार वर्णांची उत्पत्ती झाली आहे तसेच त्यांच्याच मांड्यांपासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्य, वक्षःस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे चार आश्रम उत्पन्न झाले आहेत जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणार्‍या भगवंतांचे भजन करीत नाहीत, उलट त्यांचा अनादर करतात, ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात. पुष्कळशा स्त्रिया आणि शूद्र इत्यादी भगवंतांच्या कथा आणि त्यांचे नामसंकीर्तन इत्यादींना दुरावले आहेत आपल्यासारख्यांनी त्यांना कथाकीर्तनाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया करावी. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जन्माने, वेदाध्ययनाने तसेच उपनयनादी संस्कारांनी भगवंतांच्या चरणांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत तरीसुद्धा वेदांतील अर्थवादामुळे ते कर्मफलांत आसक्त होतात. त्यांना कर्माचे रहस्य कळत नसते मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरफटून जातात ते गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूप वाणीची चटक लागलेले ते मूर्ख स्वतःही स्वर्गसुखांची वाखाणणी करू लागतात. रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात त्यांच्या इच्छांनातर सीमाच नसते सापासारखा त्यांचा क्रोध असतो असे हे ढोंगी, घमेंडखोर पापी भगवंतांच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवितात. ते स्त्रियांच्या सहवासात राहून गृहस्थाश्रमामध्ये सर्वात अधिक सुख तेच असल्याचे सांगतात ते अन्नदान, यज्ञविधी, दक्षिणा इत्यादी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचार्‍या पशूंची हत्या करतात. धन, वैभव, कुलीनता, विद्या, दान, सौंदर्य, सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधळे बनतात असे हे दृष्ट, भगवत्प्रेमी संतांचा, इतकेच नव्हे तर ईश्वराचासुद्धा अपमान करतात. भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणार्‍यांमध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहेत हे वेदांनी सांगितलेले तत्त्व हे मूर्ख लक्षात घेत नाहीत आणि आपल्या मनातील कामना वेदांनी सांगितल्याचे सांगतात. जगात मैथुन, मांस आणि मद्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते म्हणून त्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करीत नाहीत तर विवाह, यज्ञ आणि सौत्रामणी यज्ञांच्या द्वारे जी त्यांच्या सेवनाची व्यवस्था लावून दिली आहे, ती लोकांच्या उच्छृंखल प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठी आहे. धनाचे उद्दिष्ट धर्म हेच होय कारण धर्मामुळेच परमतत्त्वाचे ज्ञान, त्यापासून साक्षात्कार व त्यामुळेच परम शांती यांचा लाभ होतो परंतु लोक त्या धनाचा उपयोग कामोपभोगासाठी करतात आणि शरीराला मृत्यू अटळ आहे, हे ते पाहात नाहीत. सौत्रामणी यज्ञामध्येसुद्धा मद्याचा वास घेणे, एवढेच विधान आहे पिण्याचे नाही यज्ञामध्ये पशूला फक्त स्पर्श करावयासच सांगितले आहे, हिंसा नव्हे ! तसेच धर्मपत्‍नीबरोबर मैथुनसुद्धा विषयभोगासाठी नव्हे, तर संततीसाठी आहे हा आपला विशुद्ध धर्म ते जाणत नाहीत. (२-१३)

जे हे जाणत नाहीत, ते गर्विष्ठ वास्वविक अज्ञानी असूनही स्वतःला योग्य समजतात व निःशंकपणे पशूंची हिंसा करतात परंतु मेल्यानंतर ते पशूच त्यांना खातात. हे शरीर मरणारे आहे व याच्याशी संबंधित असणारेही तसेच आहेत तरीही जे लोक फक्त आपल्या शरीरावर प्रेम करून दुसर्‍या शरीरात राहाणाराही आपलाच आत्मा सर्वशक्तिमान श्रीहरीच आहे, हे न कळून त्यांचा द्वेष करतात म्हणून त्यांचा अधःपात होतो. ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानीसुद्धा नाहीत, ते धर्म, अर्थ, काम या तीन पुरूषार्थांनाच महत्त्व देतात त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही ते आत्मघातकीच होत. अज्ञानालाच ज्ञान मानणार्‍या या आत्मघातकी लोकांना कधीच शांती मिळत नाही काळाने ज्यांचे मनोरथ धुळीला मिळवले आहेत, असे हे लोक कृतकृत्य न होताच नाश पावतात. जे लोक भगवंतांना विन्मुख झाले आहेत, ते अत्यंत परिश्रम करून मिळविलेली घर, पुत्र, मित्र आणि धनसंपत्ती सोडून देऊन शेवटी नाईलाजाने घोर नरकात जाऊन पडतात. (१४-१८)

राजाने म्हटले - भगवान, कोणत्या वेळी, कोणता रंग व कोणता आकार धारण करतात आणि माणसे त्यांची कोणत्या नावांनी आणि विधींनी उपासना करतात, ते आपण सांगावे. (१९)

करभाजन म्हणाला - सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशी चार युगे आहेत या युगांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे रंग, नामे आणि आकृती असतात तसेच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते. सत्ययुगांमध्ये भगवंतांचा रंग शुभ्र असतो त्यांना चार हात आणि मस्तकावर जटा असतात ते वल्कले नेसतात कृष्णाजिन, यज्ञोपवीत, रूद्राक्षांची माळ, दंड आणि कमंडलू ते धारण करतात. त्या युगातील माणसे शांत, वैरभाव न बाळगणारी, सर्वांचे हित चिंतिणारी आणि समदर्शी असतात इंद्रिये आणि मन ताब्यात ठेवून ती तपश्चर्येने देवाची आराधना करतात. त्या युगात हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरूष, अव्यक्त आणि परमात्मा ही त्यांची नावे असतात. त्रेतायुगामध्ये भगवंतांचा रंग लाल असतो त्यांना चार हात असतात ते तीन मेखला धारण करतात त्यांचे केस सुवर्णासारखे असतात ते वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपात राहून स्रुक, स्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात. त्या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि वेदांचे अध्ययनअध्यापन करणारी असतात ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदरूप वेदत्रयीच्या द्वारे ते सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरींची आराधना करतात. त्रेतायुगामध्ये त्यांना विष्णू, यज्ञ, पृश्निगर्भ, सर्वदेव, उरूक्रम, वृषाकपी, जयंत आणि उरूगाय या नावांनी संबोधतात. द्वापरयुगात भगवंतांचा रंग सावळा असतो ते पीतांबर धारण करतात शंख, चक्र, गदा, पद्म ही स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात वक्षःस्थळावरील श्रीवत्स इत्यादी चिह्ने आणि कौस्तुभमणी इत्यादी लक्षणांनी ते ओळखले जातात. राजन ! त्यावेळी जिज्ञासू माणसे, राजचिह्नांनी युक्त अशा त्या परमपुरूषाची वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना करतात. ते म्हणतात, "वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरूद्ध या चतुर्व्यूह रूपात असणार्‍या आपणास आम्ही नमस्कार करतो ऋषी नारायण, महात्मा नर, विश्वेश्वर, विश्वरूप आणि सर्वभूतात्मा अशा भगवंतांना नमस्कार असो. राजन ! अशा प्रकारे द्वापरयुगातील लोक जगदीश्वराची स्तुती करतात आता कलियुगामध्ये अनेक तंत्रांच्या पद्धतींनी भगवंतांची जशी पूजा केली जाते, त्याचे वर्णन ऐक. (२०-३१)

कलियुगामध्ये भगवंतांचा कृष्णवर्ण असतो इंद्रनील रत्‍नाप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्ज्वल असते ते हृदय इत्यादी अंगे, कौस्तुभ इत्यादी उपांगे, सुदर्शन इत्यादी अस्त्रे आणि सुनंद प्रभृती पार्षदांनी युक्त असतात श्रेष्ठ बुद्धिमान पुरूष कलियुगात, नामसंकीर्तनरूप यज्ञांनी त्यांची आराधना करतात. ते लोक अशी स्तुती करतात "हे शरणागतरक्षका ! आपले चरणारविंद सर्वदा ध्यान करण्यायोग्य, सांसारिक संकटांचा नाश करणारे, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे आहेत ते तीर्थस्वरूप आहेत शिव, बह्मदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात शरण जाण्यास योग्य, सेवकांच्या सर्व विपत्तींचा नाश करणारे व संसारसागर पार करून नेणारी ती नौका आहे हे महापुरूष ! अशा आपल्या चरणारविंदांना मी वंदन करीत आहे. हे धर्मशील महापुरूष ! रामावतारामध्ये जे पित्याच्या सांगण्यावरून देवतांनीसुद्धा इच्छा करावी आणि जी टाकणे कठीण अशा राज्यलक्ष्मीला सोडून रानावनात फिरत राहिले, पत्‍नीला हव्या असलेल्या मायावी हरिणाचा ज्यांनी पाठलाग केला, त्या चरणारविंदांना मी वंदन करतो. (३२-३४)

राजन ! निरनिराळ्या युगांतील लोक याप्रमाणे आपपल्या युगानुरूप नामरूपांनी भगवंतांची आराधना करतात कारण सर्व पुरूषार्थांचे स्वामी श्रीहरीच आहेत. कलियुगामध्ये केवळ संकीर्तनानेच सगळे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या युगाचा हा गुण जाणणारे सारग्राही श्रेष्ठ पुरूष कलियुगाची अतिशय प्रशंसा करतात. संसारचक्रामध्ये फिरणार्‍या माणसांना भगवंतांच्या नामसंकीर्तनापेक्षा अधिक दुसरा लाभ नाही कारण त्यामुळेच त्यांच्या संसाराचा नाश होऊन त्यांना परम शांतीचा अनुभव येतो. राजन ! सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांतील प्रजेला असे वाटते की, आपला जन्म कलियुगात व्हावा कारण कलियुगात काही काही ठिकाणी भगवत्परायण भक्त जन्माला येतील म्हणून महाराज ! कलियुगात द्रविड देशामध्ये पुष्कळसे भक्त होतील तेथे ताम्रपर्णी, कृतमाला, पयस्विनी, परम पवित्र कावेरी, महानदी आणि प्रतीची नावाच्या नद्या वाहातात राजन ! जे लोक या नद्यांचे पाणी पितात, त्यांचे अंतःकरण शुद्ध होते आणि ते बहुधा भगवान वासुदेवांचे भक्त होतात. (३५-४०)

राजन ! जो कर्तृभाव सोडून सर्वात्मभावाने शरणागतवत्सल, भगवान मुकुंदांना शरण जातो, तो, देव, ऋषी, भूत, कुटुंबीय, अतिथी व पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो तो कोणाचाही सेवक किंवा कोणाच्याही ऋणात राहात नाही. जो भक्त आपल्या प्रियतम भगवंतांच्या चरणकमलांचे अनन्यभावाने भजन करतो, त्याच्याकडून चुकून एखादे पापकर्म घडले, तरी त्याच्या हृदयात असलेले परमपुरूष श्रीहरी ते सगळे धुऊन टाकतात. (४१-४२)

नारद म्हणतात - असे हे भागवतधर्म ऐकून मिथिलानरेश संतुष्ट झाला त्याने आपल्या आचार्यांना घेऊन त्या नऊ जयन्तीपुत्रांची पूजा केली. यानंतर सर्वांच्या देखतच हे सिद्ध अंतर्धान पावले निमीने त्यांच्याकडून ऐकलेल्या भागवतधर्मांचे आचरण केले आणि परमगती प्राप्त करून घेतली. हे वसुदेवा ! तुही ऐकलेल्या या भागवत धर्मांचे जर श्रद्धेने आचरण करशील, तर शेवटी सर्व आसक्तींपासून मुक्त होऊन भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेशील. तुम्हा दांपत्यांच्या कीर्तीने सर्व जग भरून गेले आहे कारण सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्ण तुमचे पुत्र झाले आहेत. श्रीकृष्णांवर पुत्रप्रेम करणार्‍या तुम्ही त्यांच्यासंबंधीच्या दर्शन, आलिंगन, बोलणेचालणे, झोपवणे, बसविणे, जेवू घालणे, इत्यादींद्वारा आपले हृदय शुद्ध करून घेतले आहे. शिशुपाल, पौंड्रक, शाल्व इत्यादी राजांनी वैरभावाने का असेना, श्रीकृष्णांचे चालणे, लीलाविलास पाहणे इत्यादींचे झोपताबसताना चिंतन केले होते आणि त्यायोगे त्यांची वृत्ती श्रीकृष्णाकार झाली त्यामुळे ते सारूप्यमुक्तीचे अधिकारी झाले तर मग जे लोक अनन्य प्रेमभावाने त्यांचे चिंतन करतात, त्यांच्याविषयी काय बोलावे ? श्रीकृष्णांना तुम्ही फक्त तुमचा समजू नका ते सर्वात्मा, सर्वेश्वर, सर्व कारणांच्या पलीकडचे आणि अविनाशी आहेत त्यांनी मायेने मनुष्यरूप प्रगट करून आपले ऐश्वर्य झाकून ठेवले आहे. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजरूप असुरांचा नाश, संतांचे रक्षण आणि जीवांना मुक्ती देण्यासाठीच ते अवतीर्ण झाले आहेत, म्हणूनच त्यांची कीर्ती सगळ्या जगात गाईली जाते. (४३-५०)

श्रीशुक म्हणतात नारदांच्या तोंडून हे सर्व ऐकून भाग्यवान वसुदेव आणि भाग्यवती देवकी या दोघांनाही अतिशय आश्चर्य वाटले त्यांच्या मनात जो काही मोह शिल्लक होता, तो त्यांनी त्याच क्षणी सोडून दिला. राजन ! हा पवित्र इतिहास जो एकाग्र चित्ताने आत्मसात करतो, तो आपला सगळा शोकमोह दूर सारून ब्रह्मपदाला पात्र होतो. (५१-५२)

अध्याय पाचवा समाप्त

GO TOP