श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६२ वा

उषा - अनिरुद्ध मिलन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

परीक्षिताने म्हटले- हे महायोगी ! मी असे ऐकले आहे की, यदुश्रेष्ठ अनिरुद्धाने बाणासुराची कन्या ऊषा हिचाशी विवाह केला होता आणि याप्रसंगी श्रीकृष्ण व शंकराचे अतिशय घनघोर असे युद्ध झाले होते. हा वृत्तांत आपण विस्तारपूर्वक मला सांगावा. (१)

श्रीशुक म्हणाले- महात्मा बलीची कथा तर तू ऐकलीच आहेस. ज्याने वामनसूपधारी भगवंतांना सार्‍या पृथ्वीचे दान केले होते, त्या महात्म्या बळिराजाला शंभर मुलगे होते. त्यांपैकी सर्वांत थोरल्याचे नाव बाण होते. बळीचा औरस पुत्र भगवान शंकरांच्या भक्तीमध्ये नेहमी गढून गेलेला असे. समाजात त्याच्याविषयी मोठा आदर होता. त्याचे औदार्य आणि बुद्धिमत्ता प्रशंसनीय होती. स्वत:ची प्रतिज्ञा तो पूर्ण करीत असे. शिवाय तो निष्ठेने व्रतपालन करीत असे. त्या काळी तो रमणीय अशा शोणितपुरामध्ये राज्य करीत असे. भगवान शंकरांच्या कृपेने इंद्रादी देव नोकरांप्रमाणे त्याची सेवा करीत होते. त्याला एक हजार हात होते. एके दिवशी शंकर तांडवनृत्य करीत असताना त्याने एक हजार हातांनी अनेक प्रकारची वाद्ये वाजवून त्यांना प्रसन्न करून घेतले. भक्तवत्सल, शरणागताचे रक्षण करणारे आणि भूतमात्राचे स्वामी असलेले शंकर बाणासुराला म्हणाले, "तुला हवा तो वर माग." बाणासुर म्हणाला- " भगवन ! आपण माझ्या नगराचे रक्षण करीत राहावे." (२-५)

बळाचा गर्व चढलेल्या बाणासुराने एके दिवशी त्याच्या शेजारी असलेल्या भगवान शंकरांच्या चरणकमलांना सूर्याप्रमाणे चमकणार्‍या मुकुटाने स्पर्श करून प्रणाम केला आणि म्हटले. "हे महादेवा ! आपण सर्व चराचर जगाचे गुरू आणि ईश्वर आहात. मी आपणास नमस्कार करीत आहे. ह्या लोकांचे मनोरथ पूर्ण झालेले नसतात, त्यांचे ते मनोरथ पूर्ण करणारे आपण कल्पवृक्ष आहात. भगवन ! आपण मला एक हजार हात दिले आहे. परंतु ते मला केवळ भाररूप झाले आहेत. कारण या त्रैलोक्यात आपणाखेरीज माझ्याबरोबरीचा दुसरा कोणीच योद्धा मला आढळत नाही. (६-८)

हे आदिदेवा ! एक दिवस लढाईसाठी माझे हात एवढे सळसळू लागले की, मी पर्वत फोडीत दिग्गजांवर चालून गेलो. परंतु तेसुद्धा मला भिऊन पळून गेले." ते ऐकून रागावून भगवान शंकर म्हणाले- "अरे मूर्खा ! ज्यावेळी तुझी रथावरील ध्वजा मोडून खाली पडेल, त्यावेळी माझ्यासारख्याच योद्ध्याशी तुझे युद्ध होईल आणि तो तुझा गर्व नाहीसा करील." परिक्षिता ! हे ऐकून मूर्ख बाणाला अतिशय आनंद झाला आणि तो आपल्या घरी परतला. आता तो मूर्ख, भगवान शंकरांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याचा नाश करणार्‍या त्या युद्धाची वाट पाहू लागला. (९-११)

त्याची ऊषा नावाची एक कन्या होती. ती अजून कुमारीच होती. तरीसुद्धा एके दिवशी स्वप्नामध्ये तिने पाहिले की, "अनिरुद्धाशी आपला समागम झालेला आहे." विशेष म्हणजे तिने अनिरुद्धाला कधी पाहिले नव्हते की त्याच्याविषयी काही ऐकलेही नव्हते. स्वप्नातच तो न दिसल्याने ती म्हणाली, "नाथ ! आपण कोठे आहात ?" असे म्हणताच ती जागी झाली व व्याकूळ होऊन उठून बसली. नंतर आपण सख्यांच्या मध्ये आहोत, असे पाहून अतिशय लज्जित झाली. बाणासुराच्या कुंभांड नावाच्या मंत्र्याची चित्रलेखा नावाची कन्या होती. ऊषा आणि चित्रलेखा एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. चित्रलेखेने ऊषाला कुतूहलाने विचारले. "हे सुंदर राजकुमारी ! अजून तुझे कोणी पाणिग्रहण केलेले नाही. तर मग तू कोणाला शोधीत आहेस ? आणि तुझ्या मनात काय आहे ?" (१२-१५)

ऊषा म्हणाली- " गडे ! मी स्वप्नात एक पुरूष पाहिला. त्याच्या शरीराचा वर्ण सावळा असून नेत्र कमलदलाप्रमाणे होते. तो पीतांबर नेसलेला असून त्याचे बाहू पुष्ट होते. तो स्त्रियांना आवडेल, असाच होता. त्याने आपले अधरामृत मला पाजले. तो माला आणखी हवा होता, तेवढ्यात तो मला दु:खसागरात लोटून कुठेतरी निघून गेला. मी माझ्या त्याच प्राणवल्लभाचा शोध घेत आहे. (१६-१७)

चित्रलेखा म्हणालि- "सखे ! तुझा चित्तचोर त्रैलोक्यात जर असेल, तर मला तो दाखव. मी त्याला आणीन आणि तुझी विरहव्यथा नाहीशी करीन." असे म्हणून चित्रलेखेने काही देव, गंधर्व, सिद्ध, चारण, पन्नग, दैत्य, विद्याधर, यक्ष आणि माणसांची हुबेहूब चित्रे काढली. मनुष्यांमध्ये तिने वृष्णिवंशातील शूरसेन, वसुदेव, बलराम आणि श्रीकृष्ण यांची चित्रे काढली. नंतर प्रद्युम्नाचे चित्र पाहताच ऊषा लाजली. परीक्षिता ! जेव्हा तिने अनिरुद्धाचे चित्र पाहिले, तेव्हा तर लाजेने आपली मान खाली घातली. नंतर स्मितहास्य करीत ती म्हणाली- "हाच. हाच तो माझा प्राणवल्लभ. " (१८-२१)

परीक्षिता ! चित्रलेखा योगिनी होती. हा श्रीकृष्णांचा नातू आहे, हे ओळखून ती आकाशमार्गाने श्रीकृष्णांच्या द्वारकापुरीत पोहोचली. तेथे सुंदर पलंगावर झोपलेल्या अनिरुद्धाला योगसिद्धीच्या प्रभावाने चित्रलेखेने उचलून शोणितपुरात आणले आणि सखी ऊषेला तिच्या प्रियतमाचे दर्शन घडविले. आपल्या परमसुंदर प्राणवल्लभाला पाहून आनंदाने तिचे मुखकमल प्रफुल्लित झाले आणि ती त्याच्याशी रममाण झाली. तिच्या त्या अंत:पुराकडे कोणीही पुरूष डोकावूनसुद्धा पाहू शकत नव्हता. ऊषाचे त्याच्यावरील प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागले. ती बहुमोल वस्त्रे, फुलांचे हार, सुगंधी द्रव्ये, धूप, दीप, आसन, सुमधुर पेये, खाद्यपदार्थ, मधुर वाणी इत्यादींनी त्याची सेवा करून त्याला खूष करीत असे. आपल्या प्रेमाने ऊषाने त्याचे मन जिंकून घेतले होते. त्या अंत:पुरात गुप्तपणे तिच्या सहवासात राहिलेल्या अनिरुद्धाला किती दिवस निघून गेले, याचा पत्ताच लागला नाही. (२२-२६)

यदुवीराच्या सहवासाने ऊषाचे कौ‍मार्य नष्ट झाले होते. तिच्या शरीरावर अशी चिन्हे दिसू लागली होती की, जी कोणत्याही प्रकारे लपविली जाऊ शकत नव्हती. ऊषाही अतिशय आनंदी दिसत होती. पहारेकर्‍यांनी ते ओळखून बाणासुराकडे जाऊन सांगितले की, "राजन ! आपल्या राजकुमारीचे जे काही रंग-ढंग आम्ही पाहात आहोत, ते आपल्या कुळाला बट्टा लावणारे आहेत. हे प्रभो ! सावधपणे आम्ही महालावर पहारा देत असतो. आपल्या कन्येला बाहेरचा मनुष्य पाहूसुद्धा शकत नाही. असे असता ही कलंकित कशी झाली, कळत नाही." (२७-२९)

आपल्या कन्येचा कलंक ऐकून बाणासुराला अतिशय वाईट वाटले. तो ताबडतोब ऊषेच्या महालात जाऊन पाहातो, तर तेथे अनिरुद्ध. अनिरुद्ध कामावतार प्रद्युम्नाचा पुत्र होता. त्याच्यासारखा सुंदर त्रिभुवनात दुसरा कोणी नव्हता. त्याच्या सावळ्या शरीरकांतीवर पीतांबर शोभत होता. लांब बाहू होते. कमलदलाप्रमाणे डोळे, कुरळे केस, कुंडलांची दीप्ती आणि मंद मंद हास्ययुक्त नजर यांमुळे मुखाचे सौं‍दर्य काही आगळेच दिसत होते. त्यावेळी अनिरुद्ध सुंदर वेषभूषा केलेल्या प्रियेबरोबर द्यूत खेळत होता. मोगर्‍याचा हार त्याच्या गळ्यात होता आणि त्या हाराला ऊषाच्या अंगाचा स्पर्श झाल्याने तिच्या वक्ष:स्थाळाचे केशर लागले होते. त्याला ऊषेच्या जवळच बसलेला पाहून बाणासुर आश्चर्यचकित झाला. बाणासुर पुष्कळशा शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या वीर सैनिकांसह महालात घुसल्याने जेव्हा अनिरुद्धाने पाहिले, तेव्हा त्याला मारण्यासाठी तो लोखंडाचा एक भयंकर परिघ उगारून पवित्र्यात उभा राहिला. जणू कालदंड घेतलेला यमच. ते सैनिक त्याला पकडण्यासाठी जसजसे त्याच्या अंगावर घावून जात, तसतसा तो त्यांना, डुकरांच्या कळपाच्या नायकाने कुत्र्यांना मारावे, त्याप्रमाणे मारू लागला. अनिरुद्धाच्या फटकार्‍याने त्या सैनिकांची मस्तके, हात, मांड्या इत्यादी अवयव तुटू लागले, तेव्हा ते महालाबाहेर पळून गेले. आपल्या सेनेचा संहार करणार्‍या त्याला शूर बाणासुराने संतापून नागपाशांनी बांधले. आपल्या प्रियतमाला बांधलेले ऐकून ऊषा शोकाने आणि खेदाने अत्यंत विव्हळ झाली, तिच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ती रडू लागली. (३०-३५)

अध्याय बासष्टावा समाप्त

GO TOP