|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ६३ वा
श्रीकृष्णांबरोबर बाणासुराचे युद्ध - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! पावसाळ्याचे चार महिने निघूने गेले; परंतु अनिरुद्धाचा शोध लागला नाही. यामुळे त्यांच्या घरातील लोक अतिशय शोकाकुल झाले होते. नारदांकडून अनिरुद्धाचा पराक्रम व त्याचे नागपाशात बांधले जाणे, या घटना ऐकून श्रीकृष्णांनाच आपले दैवत मानणार्या यादवांनी शोणितपुरावर चढाई केली. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर असलेल्या प्रद्युम्न, सात्यकी, गद, सांब, सारण, नंद, उपनंद, भद्र इत्यादी यादवश्रेष्ठांनी बारा अक्षौहिणी सेनेचा बाणासुराच्या राजधानीला चारी बाजूंनी वेढा दिला. यादवसेना नगरातील उद्याने, तट, बुरूज आणि गोपुरे यांची तोड-फोड करू लागली आहे, हे पाहून क्रोधाविष्ट बाणासुर बारा अक्षौहिणी सेना घेऊन नगराच्या बाहेर पडला. बाणासुराच्या बाजूने भगवान शंकर नंदीवर स्वार होऊन आपले पुत्र आणि गणांसह राम-कृष्णांशी युद्ध करू लागले. परीक्षिता ! ते युद्ध इतके अद्भूत आणि घनघोर झाले की, ते पाहून अंगावर रोमांच उठत. भगवान श्रीकृष्णांशी शंकरांचे आणि प्रद्युम्नाशी कार्तिकेयाचे युद्ध झाले. बलरामांशी कुंभांडाचे आणि कूपकर्णाचे युद्ध झाले. बाणासुराच्या पुत्राला सांब आणि बाणासुराला सात्यकी जाऊन भिडले. ब्रह्मदेव इत्यादी श्रेष्ठ देव, ऋषी, सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा आणि यक्ष विमानांत बसून ते युद्ध पाहाण्यासाठी आले. श्रीकृष्णांनी आपल्या शार्ड्ग. धनुष्यावरून सोडलेल्या तीक्ष्ण टोकाच्या बाणांनी शंकरांचे सेवक असलेले भूत, प्रेत, प्रमथ, गुह्यक, डाकिणी, यातुधान, वेताल, विनायक, प्रेतगण, मातृगण, पिशाच, कूष्मांड आणि ब्रह्मराक्षस यांना मारून पळवून लावले. पिनाकपाणी शंकरांनी शार्ड्गधारी श्रीकृष्णांवर निरनिराळ्या प्रकारची अस्त्रे फेकली, परंतु श्रीकृष्णांनी कोणत्याही प्रकारे विचलित न होता त्यांना आपल्या विरोधी अस्त्रांनी शांत केले. त्यांनी ब्रह्मास्त्राच्या शांतीसाठी ब्रह्मास्त्राचा, वायव्यास्त्रासाठी पर्वतास्त्राचा, आग्नेयास्त्रासाठी पर्जन्यास्त्राचा आणि पाशुपतास्त्रासाठी नारायणास्त्राचा प्रयोग केला. यानंतर भगवान श्रीकृष्णांनी जृंभणास्त्राने महादेवांना मोहित केले. त्यामुळे ते युद्ध सोडून जांभया देऊ लागले. तेव्हा श्रीकृष्ण तलवार, गदा आणि बाणांनी बाणसुराच्या सेनेचा संहार करू लागले. इकडे प्रद्युम्नाने बाणांच्या वर्षावाने कार्तिकेयाला घायाळ केले. त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो रणांगण सोडून आपले वाहन असणार्या मयूरावर बसून निघून गेला. बलरामांनी आपल्या मुसळाच्या प्रहाराने कुंभांड आणि कूपकर्णाला घायाळ केले. ते रणभूमीवर कोसळले. अशा प्रकारे सेनापतींची वाताहत झालेली पाहून त्यांची सेना इकडे तिकडे पळू लागली. (१-१६) रथावर स्वार झालेल्या बाणासुराला आपली सेना पळत असलेली पाहून अतिशय क्रोध आला. त्याने सात्यकीला सोडले आणि तो श्रीकृष्णांवर धावला. रणोन्मत्त बाणासुराने आपल्या एक हजार हातांनी एकाचवेळी पाचशे धनुष्यांच्या दोर्या खेचून प्रत्येकांतून दोन दोन बाण सोडले. परंतु भगवान श्रीकृष्णांनी एकाच वेळी त्याची सर्व धनुष्ये तोडून टाकली आणि त्याचे सारथी, रथ व घोड्यांना मारले व जयशंखध्वनी केला. कोटरा नावाची बाणासुराची एक धर्ममाता होती. आपल्या पुत्राच्या प्राणरक्षणासाठी आपले केस मोकळे सोडून नग्नावस्थेत, ती भगवान श्रीकृष्णांसमोर येऊन उभी राहिली. तिच्यावर आपली दृष्टी पडू नये, म्हणून श्रीकृष्णांनी आपले तोंड दुसरीकडे फिरविले. तोपर्यंत बाणासुराची धनुष्ये व रथ मोडल्यामुळे तो आपल्या नगराकडे परतला. (१७-२१) इकडे शंकरांचे भूतगण जेव्हा इकडे-तिकडे विखुरले गेले, तेव्हा तीन मस्तके आणि तीन पायांचा ज्वर जणू दाही दिशा जाळीत श्रीकृष्णांवर धावला. तो आपल्याकडे येत असलेला पाहून भगवान श्रीकृष्णांनी आपला ज्वर सोडला. आता वैष्णव आणि माहेश्वर हे दोन्ही ज्वर आपापसात लढू लागले. तेव्हा वैष्णव ज्वराच्या तेजाने माहेश्वर ज्वर हवालदिल होऊन ओरडू लागला आणि तो भयभीत झाला. जेव्हा त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही, तेव्हा आपले रक्षण व्हावे, म्हणून अत्यंत नम्रतेने हात जोडून तो श्रीकृष्णांना प्रार्थना करू लागला. (२२-२४) माहेश्वर ज्वर म्हणाला- हे प्रभो ! आपली शक्ती अनंत आहे. आपण परमेश्वर आहात, आत्मा आहात. आपण अद्वितीय आणि परम ज्ञानस्वरूप आहात. संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांचे कारण आपणच आहात. श्रुती आपलेच वर्णन करतात. आपण समस्त विकाररहित असे स्वत: ब्रह्म आहात. मी आपणांस प्रणाम करीत आहे. काल, दैव, कर्म, जीव, स्वभाव, द्रव्य, शरीर, सूत्रात्मा प्राण, अंहकार, अकरा इंद्रिये आणि पंचमहाभूते या सर्वांचा समुदाय असलेले लिंग शरीर आणि बीजांकुर न्यायानुसार त्याचे कर्म व कर्मातून पुन्हा लिंगशरीराची उत्पत्ती, ही सर्व आपली माया आहे. आपण मायेच्या पलीकडे आहात. मी आपणास शरण आलो आहे. आपण लीलेनेच अनेक रूपे धारण करून देव, साधू व लोकमर्यादांचे पालन करता. त्याचबरोबर उन्मत्त आणि हिंसक अशा असुरांचा संहारही करता. आपला हा अवतार पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी झाला आहे. हे प्रभो ! आपल्या शांत, उग्र आणि अत्यंत भयानक, दु:सह अशा तेजस्वी ज्वरामुळे मी अत्यंत तप्त होऊ लागलो आहे. भगवन ! देहधारी जीव जोपर्यंत आशेच्या फासात अडकून आपल्या चरणकमलांना शरण येत नाही, तोपर्यंत त्याचे ठिकाणी ताप राहातोच. (२५-२८) श्रीभगवान म्हणाले- " हे त्रिशिरा ! मी तुझ्यावर प्रसन्न आहे; आता माझ्या या ज्वरापासूनचे तुला वाटणारे भय दूर होवो. जगात जो कोणी आम्हा दोघांच्या या संवादाचे स्मरण करील, त्याला तुझ्यापासून काहीही भय राहणार नाही. श्रीकृष्णांनी असे म्हटल्यानंतर माहेश्वर ज्वर त्यांना प्रणाम करून निघून गेला. तोपर्यंत बाणासुर रथावर स्वार होऊन श्रीकृष्णांशी युद्ध करण्यासाठी पुन्हा आला. परीक्षिता ! बाणसुराने आपल्या हजार हातांमध्ये निरनिराळ्या प्रकारची शस्त्रे घेतली होती. आता तो अत्यंत क्रोधाने चक्रपाणी भगवंतांवर बाणांचा वर्षाव करू लागला. श्रीकृष्णांनी एकसारखी अस्त्रे फेकणार्या बाणासुराचे हात तीक्ष्ण धारेच्या चक्राने झाडाच्या फांद्या तोडाव्या, तसे तोडून टाकले. बाणासुराचे हात तोडले जात असताना भक्तवत्सल भगवान शंकर, चक्रधारी भगवान श्रीकृष्णांजवळ येऊन स्तुती करू लागले. (२९-३३) भगवान शंकर म्हणाले- हे प्रभो ! वेदमंत्रांमध्ये आपण तात्पर्यरूपाने गुप्त असणारे, परमज्योतिस्वरूप, परब्रह्म आहात. शुद्ध हृदयाचे महात्मे आपल्या आकाशाप्रमाणे सर्वव्यापक आणि निर्विकार अशा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात. आकाश आपली नाभी, अग्नी मुख आणि पाणी वीर्य आहे. स्वर्ग मस्तक, दिशा कान आणि पृथ्वी चरण आहे. चंद्र मन, सूर्य नेत्र आणि मी शिव आपला अंहकार आहे. समुद्र आपले पोट आणि इंद्र हात आहे. वनस्पती रोम आहेत. मेघ केस आहेत, ब्रह्मदेव बुद्धी आहे, प्रजापती लिंग आणि धर्म हृदय आहे. अशा प्रकारे आपणच विराट पुरूष आहात. हे अखंडज्योतिस्वरूप परमात्मन ! आपला हा अवतार धर्माचे रक्षण आणि जगाचे कल्याण व्हावे, यासाठी आहे. आम्ही सर्वजण आपल्या प्रभावानेच संपन्न होऊन सातही भुवनांचे पाल करीत असतो. आपण सजातीय, विजातीय आणि स्वगतभेदरहित, एकमेव आणि अद्वितीय असे आदिपुरूष आहात. तुर्यतत्व आपणच आहात. आपण स्वयंप्रकाश आहात. आपण सर्वांचे कारण आहात, परंतु आपले कोणीही कारण नाही. असे असूनही आपण तिन्ही गुणांचे वेगळेपण प्रकाशित करण्यासाठी आपल्या मायेने देव, पशु-पक्षी, मनुष्य इत्यादी शरीरांनुसार वेगवेगळ्या रूपाने प्रतीत होता. हे प्रभो ! ज्याप्रमाणे सूर्य आपलीच छाया असलेल्या ढगांनीच झाकला जातो आणि तो ढगाला व वेगवेगळ्या रूपांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे आपण स्वयंप्रकाश तर आहातच, परंतु गुणांमुळे जणू झाकले जाता आणि समस्त गुण तसेच गुणाभिमानी जीवांना प्रकाशित करता. वास्तविक आपण अनंत आहात. (३४-३९) आपल्या मायेने मोहित होऊन लोक स्त्री-पुत्र, देह-घर इत्यादींमध्ये आसक्त होतात आणि पुन्हा दु:खाच्या अथांग समुद्रात गटांगळ्या खातात. जो मनुष्य हे मानवी शरीर मिळून सुद्धा आपली इंद्रिये ताब्यात ठेवीत नाही आणि तुमच्या चरणकमलांचा आश्रय घेत नाही, त्याचे जीवन अत्यंत शोचनीय होय. तो स्वत:च स्वत:ला फसवणारा समजावा. सर्व प्राण्यांचे आत्मा, प्रियतम आणि ईश्वर असणार्या आपल्याला जो मनुष्य सोडतो आणि या उलट असणार्या तुच्छ विषयांमध्येच रमतो, तो अमृत सोडून विष पितो. मी, ब्रह्मदेव, सर्व देवता आणि विशुद्ध हृदयाचे ऋषी सर्वात्मभावाने आपल्यालाच शरण असतात. कारण आपणच सर्वांचे आत्मा, प्रियतम आणि ईश्वर आहात. आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे कारण आहात. आपण सर्वांचे ठायी, सम, परम शांत, सर्वांचे सुहृद, आत्मा आणि इष्टदेव आहात. आपण एक, अद्वितीय आणि जगताचे आधार तसेच अधिष्ठान आहात. हे प्रभो ! आम्ही सर्वजण या जन्ममृत्युरूप संसारचक्रातून मुक्त होण्यासाठी आपले भजन करीत आहोत. (४०-४४) हे देवा ! हा बाणासुर माझा परमप्रिय, कृपेला पात्र झालेला सेवक आहे. मी याला अभय दिले आहे. प्रभो ! याचे पणजोबा प्रल्हाद याच्यावर आपली जशी कृपा आहे, तशीच कृपा याच्यावरही असावी. (४५) श्रीकॄष्ण म्हणाले- भगवन ! आपण आम्हांला जे सांगितले, त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असणारे मी करीन. याच्यासाठी आपण पूर्वी जे ठरवले होते त्याला अनुसरूनच मी याचे हात तोडले आहेत. बाणासुर बलीचा पुत्र आहे, म्हणून मी याचा वध करू शकत नाही. कारण प्रल्हादाला वर दिला आहे की, " तुझ्या वंशातील कोणाचाही मी वध करणार नाही." याचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी याचे हात तोडले आहेत. तसेच जी सेना पृथ्वीला भार झाली होती, तिचा मी संहार केला. याचे चार हात अजून शिल्लक आहेत. ते अजर व अमर होतील. आपल्या पार्षदांमध्ये हा प्रमुख असेल. आता याला कोणापासूनही कोणत्याही प्रकारची भीती नाही. (४६-४९) अशा प्रकारे श्रीकृष्णांकडून अभय मिळाल्यावर बाणासुराने त्यांच्याजवळ येऊन जमिनीवर डोके टेकवून त्यांना नमस्कार केला आणि आपली कन्या ऊषा हिच्यासह अनिरुद्धाला रथात बसवून भगवंतांकडे घेऊन आला. यानंतर श्रीकृष्णांनी महादेवांच्या संमतीने वस्त्रालंकार विभूषित ऊषा आणि अनिरुद्ध यांना पुढे करून एक अक्षौहिणी सेनेसह द्वारकेकडे प्रस्थान केले. इकडे द्वारका ध्वजतोरणांनी सजविली गेली. सडका आणि चौकांमध्ये चंदनमिश्रित पाण्याचा सडा शिंपडला गेला. नगरातील नागरिक, बांधव आणि ब्राह्मण सामोरे आले. त्यावेळी शंख, नगारे आणि ढोल यांचा तुंबळ आवाज होता. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या राजधानीमध्ये प्रवेश केला. (५०-५२) परीक्षिता ! जो कोणी श्रीशंकरांच्याबरोबर श्रीकॄष्णांचे युद्ध आणि त्यांचा विजय, या कथेचे प्रात:काळी उठल्यावर स्मरण करतो, त्याचा कधीही पराजय होत नाही. (५३) अध्याय त्रेसष्टावा समाप्त |