|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ६१ वा
भगवंतांच्या संततीचे वर्णन व अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मीला मारणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नीला दहा दहा पुत्र झाले. ते सर्व गुणांच्या बाबतीत वडिलांपेक्षा कमी नव्हते. श्रीकृष्ण आपल्या महालाबाहेर कधीच जात नाहीत, असे पाहून आपणच श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहोत, असे त्या राजकन्यांना वाटे. कारण त्यांना श्रीकृष्णांच्या खर्या स्वरूपाची जाणीव नव्हती. आत्मानंदामध्ये असलेल्या श्रीकृष्णांचे कमळाच्या कळीप्रमाणे सुंदर मुख, दीर्घ बाहू, आकर्ण नेत्र, प्रेममय हास्य, भावपूर्ण नजर आणि मधुर वाणी यांमुळे त्या सुंदरी स्वत:च मोहित झालेल्या असत. त्या आपल्या श्रृंगारपूर्ण हावभावांनी त्यांचे मन जिंकू शकत नसत. मंद हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी व भुवयांच्या विलासाने त्या सोळा सहस्त्र स्त्रिया कामकलेच्या भावांनी परिपूर्ण असे कामबाण त्यांच्यावर सोडीत, परंतु कोणत्याही साधनांनी, त्या भगवंतांचे मन विचलित करू शकल्या नाहीत. (१-४) ब्रह्मदेव इत्यादी देवांनासुद्धा ज्यांचे खरे स्वरूप कळले नाही, त्याच रमारमणांना त्या स्त्रियांनी आपल्या पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतले होते. आता नित्य त्यांचे प्रेम आणि आनंद वाढत होते. आणि त्या प्रेमपूर्ण हास्ययुक्त पाहाणे, नव्या समागमाची लालसा इत्यादींनी भगवंतांची सेवा करीत असत. त्या सर्व पत्न्यांच्याबरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी असत. तरीसुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत, तेव्हा त्या स्वत: पुढे होऊन त्यांचे स्वागत करीत. श्रेष्ठ आसनावर बसवीत. उत्तम सामग्रीने त्यांची पूजा करीत. चरणकमले धूत. विडा देत. पाय चेपून त्यांचा थकवा दूर करीत. पंख्याने वारा घालीत. सुवासिक चंदन इत्यादी लावीत. फुलांचे हार गळ्यात घालीत. केस विंचरीत. झोपवीत. स्नान घालीत आणि अनेक प्रकारच्या पदार्थांचे भोजन करवून स्वत: भगवंतांची सेवा करीत. (५-६) श्रीकृष्णाच्या प्रत्येक पत्नीला दहा दहा पुत्र होते, हे मी सांगितलेच आहे. त्यांपैकी ज्या आठ पट्टराण्या होत्या, त्यांच्या प्रद्युम्न इत्यादी पुत्रांविषयी मी आता सांगतो. प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, पराक्रमी चारुदेह, सुचारू, चारूगुप्त, भद्रचारू, चारूचंद्र, विचारू आणि दहावा चारू असे रुक्मिणीला दहा पुत्र झाले. हे सर्वजण कोणत्याही बाबतीत वडिलांहून कमी नव्हते. भानू, सुभानू, स्वर्भानू, प्रभानू, भानुमान, चंद्रभानू, बृहद्भानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू असे सत्यभामेचे दहा पुत्र होते. जांबवतीचे सांब, सुमित्र, पुरूजित, शतजित, सहस्त्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमान, द्रविड आणि क्रतू असे दहा पुत्र होते. हेही श्रीकृष्णांना प्रिय होते. नाग्नजितीला वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगू, वेगवान, वृष, आम, शंकू, वसू आणि कांतिमान कुंती असे दहा पुत्र झाले. कालिंदीचे हे दहा पुत्र होते - धुत, कवी, वृष, वीर, सुबाहू, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि धाकटा सोमक. (७-१४) मद्रदेशाची राजकुमारी लक्ष्मणा हिच्यापासून प्रघोष, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित यांचा जन्म झाला. मित्रविंदेचे वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्धन, अन्नाद, महाश, पावन, वन्ही आणि क्षुधी हे पुत्र होते. भद्रेचे संग्रामजित, बृहत्सेन, शूर, प्रहरण, अरिजित, जय, सुभद्र, वाम, आयू आणि सत्यक हे पुत्र होते. या पट्टराण्यांव्यतिरिक्त भगवंतांच्या रोहिणी इत्यादी आणखीही सोळा हजार एकशे पत्न्या होत्या. त्यांचे दीप्तिमान, ताम्रमान इत्यादी पुत्र होते. प्रद्युम्नाचा भोजकट नगरात राहणार्या रुक्मीची कन्या रुक्मवती हिच्याशी विवाह झाला होता. तिच्यापासून बलशाली अनिरुद्धाचा जन्म झाला. परिक्षिता ! श्रीकृष्णांच्या मुलांच्या सोळा हजार एकशे आठ माता होत्या. म्हणून त्यांच्य पुत्र-पौत्रांची संख्या कोट्यावधी झाली. (१५-१९) राजाने विचारले- हे विद्वन ! भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीवर रुक्मीचा पराभव केला होता. त्यामुळे तो श्रीकृष्णांना मारण्यासाठी संधीची वाट पाहात होता. अशा स्थितीत त्याने आपली कन्या शत्रूच्या मुलाला कशी दिली ? या दोन शत्रूंमध्ये पुन्हा परस्पर वैवाहिक संबंध कसा जुळून आला ? कारण योगीजन भूत, भविष्य आणि वर्तमानकाळातील इंद्रियातीत, पुष्कळ लांबच्या किंवा एखाद्या अडथळ्यामुळे न दिसणार्या गोष्टीसुद्धा प्रत्यक्ष पाहात असतात. (२०-२१) श्रीशुक म्हणतात- प्रद्युम्न मूर्तिमंत कामदेव होता. त्याला रुक्मवतीने स्वयंवरामध्ये स्वत:च वरमाला घातली होती. त्यावेळी युद्धामध्ये प्रद्युम्नाने एकट्यानेच तेथे एकत्रित आलेल्या राजांना जिंकले आणि रुक्मवतीचे हरण केले. (२२) श्रीकृष्णांकडून अपमानित झाल्यामुळे जरी रुक्मीच्या मनातील वैर कायम होते, तरीसुद्धा आपली बहीण रुक्मिणी हिला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपली नात रोचन हिचा विवाह रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध याच्याशी लावून दिला. अशा प्रकारचा विवाह-संबंध शास्त्रविरुद्ध होता, हे रुक्मीला माहीत असूनसुद्धा बहिणीच्या प्रेमाखातर त्याने असे केले. राजा ! अनिरुद्धाच्या विवाहसोहळ्यासाठी भगवान श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी, प्रद्युम्न, सांब इत्यादी भोजकट नगरीला आले. विवाहसोहळा संपल्यावर कलिंगनरेश इत्यादी गर्विष्ठ राजे रुक्मीला म्हणाले, "तू बलरामा द्यूतात जिंकून दाखव. हे राजा रुक्मी ! बलरामाला द्यूत खेळता येत नाही. परंतु खेळण्याचे त्याला जबरदस्त व्यसन आहे." त्या लोकांनी इरेला घातल्याने रुक्मीने बलरामांना बोलावून तो त्यांच्याबरोबर द्यूत खेळू लागला. बलरामांनी अगोदर शंभर, नंरत हजार व त्यानंतर दहा हजार मोहरांचा डाव लावला. ते सर्व रुक्मीने जिंकले. तेव्हा कलिंगराजा दात विचकावून, खदखदा हसून बलरामांची खिल्ली उडवू लागला. बलरामांना ते सहन झाले नाही. यानंतर रुक्मीने एक लक्ष मोहरांचा पण लावला. तो बलरामांनी जिंकला. परंतु रुक्मी लबाडीने म्हणू लागला की, "मी जिंकलो." यावर बलराम खवळला. त्याचे डोळे स्वभावत:च लाल होते. क्रोधामुळे ते आणखीनच लाल झाले. आता त्यांनी दहा कोटी मोहरांचा पण लावला. यावेळीसुद्धा द्यूताच्या नियमानुसार बलरामाचाच जय झाला. परंतु रुक्मीने कपटाने म्हटले, "मी जिंकलो ! या विषयातील तज्ज्ञ याचा निर्णय करू देत." (२५-३२) त्यावेळी आकाशवाणी झाली की, " नियमानुसार बलरामांनीच हा डाव जिंकला आहे. रुक्मी खोटे बोलतो." यावेळी रुक्मीचा मृत्यु जवळ आला होता. त्यामुळे त्याच्या साथीदार दुष्ट राजांनी त्याला भडकावले. तेव्हा त्याने आकाशवाणीकडे लक्ष न देता बलरामाची खिल्ली उडवीत म्हटले, "तुम्ही वनात भटकणारे गवळी ! द्यूतातले तुम्हांला काय कळणार ? फाशांनी आणि बाणांनी फक्त राजे लोकांनीच खेळावे. तुम्ही नव्हे !" रुक्मीने असा अपमान केल्यामुळे बलरामांनी क्रोधाने एका लोखंडी काटे लावलेल्या सोट्याने त्या विवाहमंगलसभेतच रुक्मीला ठार केले. जो कलिंगनरेश अगोदर दात विचकावून हसत होता, तो आता तेथून निसटला, परंतु बलरामांनी दहा पावलांवरच त्याला गाठून क्रोधाने त्याचे दात पाडून टाकले. बलरामांनी त्याच सोट्याने दुसर्या राजांचेही हात, मांड्या, मस्तके इत्यादी तोडून टाकली. रुक्मीने माखलेले ते भयभीत होऊन तेथून पळू लागले. परीक्षिता ! श्रीकृष्णांनी विचार केला की, बलरामांची प्रशंसा केली तर रुक्मिणी रागावेल आणि हे वाईट केले, असे म्हटले तर बलराम रागावेल. म्हणून आपला मेहुणा रुक्मी याच्या मृत्युबद्दल ते चांगले अगर वाईट काहीच बोलले नाहीत. यानंतर अनिरुद्धाचा विवाह आणि शत्रूचा वध ही दोन्ही कामे पूर्ण करून भगवंतांचे आश्रित बलराम इत्यादी यादव नवविवाहिता रोचना तिच्यासह अनिरुद्धाला श्रेष्ठ रथात बसवून भोजकट नगरातून द्वारकापुरील निघून आले. (३३-४०) अध्याय एकसष्टावा समाप्त |