श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६० वा

श्रीकृष्ण-रुक्मिणी-संवाद -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात- जगद्‌गुरू श्रीकृष्ण एके दिवशी रुक्मिणीदेवींच्या पलंगावर आरामात बसले होते. भीष्मकनंदिनी रुक्मिणी आपल्या सख्यांसह पतीची पंख्याने वारा घालून सेवा करीत होती. जे परमेश्वर सहजतया या जगाची निर्मिती, पालन आणि प्रलय करतात, तेच अजन्मा प्रभू आपणच तयार केलेल्या धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. रुक्मिणीदेवीचे अंत:पुर अतिशय सुंदर होते. त्यामध्ये मोत्यांच्या लड्या लावलेले छत होते, रत्‍नांचे दिवे झगमगत होते. जाईच्या माळा लावलेल्या होत्या. भ्रमरांचे थवे त्या फुलांवर गुंजारव करीत होते. झरोक्यांच्या जाळीतून चंद्राची शुभ्र किरणे आत येत होती. राजा ! उपवनातीन पारिजातकाचा सुगंध घेऊन बगीच्यात वारा वाहात होता. झरोक्यांच्या जाळ्यांतून धुपाचा धूर बाहेर जात होता. अशा महालात दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र बिछाना घातलेल्या पलंगावर मोठ्या आनंदाने विराजमान झालेल्या त्रैलोक्याच्या स्वामींची रुक्मिणी सेवा करीत होती. रत्‍नाची दांडी असलेली चवरी सखीच्या हातातून रुक्मिणीने घेतली आणि त्याने वारा घालीत ती भगवंतांची सेवा करू लागली. तिच्या अंगठी व बांगड्या असलेल्या हातात चवरी शोभत होती. पायांत रत्‍नजडीत पैंजणे रुणझुण करीत होती. पदराच्या आड लपलेल्या स्तनांच्या केशराच्या लालीमुळे गळ्यातील मोत्यांचा हार लालसर दिसत होता आणि कमरेवर बहुमुल्य कमरपट्टा चमकत होता. अशी ती भगवंतांच्या जवळ राहून त्यांची सेवा करीत होती. कुरळे केस, कुंडले आणि गळ्यातील सुवर्णाचे हार यांनी शोभणार्‍या तिच्या मुखचंद्रावरुन हास्यरूप चांदण्यांचा अमृतवर्षाव होत होता. ती साक्षात एकनिष्ठ लक्ष्मीच होती. यावेळी तिने लीलेने भगवंतांना अनुरूप असे मनुष्यरूप धारण केले होते. तिल पाहून प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णांनी हसत हसत तिला म्हटले. (१-९)

श्रीभगवान म्हणाले- हे राजकुमारी ! ज्यांच्याजवळ लोकपालांच्यासारखे ऐश्वर्य होते, जे मोठे प्रभावशाली आणि श्रीमंत होते, त्याचप्रमाणे सौंदर्य, औदार्य आणि ताकदीमध्येही जे असामान्य होते, असे राजे तुला इच्छित होते. तुझे वडिल आणि भाऊ यांनीसुद्धा त्यांना शब्द दिला होता. जे कामोन्मत्त होऊन तुझे याचक बनले होते, त्या शिशुपाल इत्यादींना सोडून तुझ्या तोडीच्या नसलेल्या मला तू का वरलेस ? हे सुंदरी ! जरासंध इत्यादी राजांच्या भीतीने आम्ही समुद्रात वस्ती केली आहे. बलवानांशी आम्ही वैर धरले आहे आणि जवळ जवळ राजसिंहासनही आम्हांला मिळण्यासारखे नाही. हे सुंदरी ! आमचा मार्ग कोणता, हे सुद्धा लोकांना माहीत नाही. लौकिक व्यवहार सोडून वागणारे आम्ही ! तसेच स्त्रियांना खूषही न करणार्‍या पुरूषांना वरणार्‍या स्त्रियांना बहुदा दु:खच भोगावे लागते. हे सुंदरी ! आम्ही असे जवळ काही न बाळगणारे ! आणि जे जवळ काहीं बाळागत नाहीत अशाच लोकांवर आम्ही प्रेम करतो. यामुळेच धनवान लोक बहुदा आमच्या वार्‍यालाही राहात नाहीत. ज्यांच्या धन, कूळ, ऐश्वर्य, सौंदर्य आणि प्रताप या गोष्टी सारख्या असतात, त्यांचेच परस्पर विवाह आणि मैत्री होतात. श्रेष्ठ-कनिष्ठांचे नव्हेत. हे विदर्भराजकुमारी ! दूरदर्शीपणा नसल्यामुळे तू या गोष्टींचा विचार केला नाहीस आणि भिक्षुकांकडून माझी खोटी प्रशंसा ऐकून माझ्यासारख्या गुणहीनाला तू वरलेस. अजूनही तू आपल्याला अनुरूप अशा श्रेष्ठ क्षत्रियाशी विवाहबद्ध हो; त्यामुळे तुझ्या इहपरलोकातील आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. हे सुंदरी ! तुला माहीतच आहे की, शिशुपाल, शाल्व, जरासंध, दंतवक्त्र इत्यादी राजे आणि तुझा थोरला भाऊ रुक्मीसुद्धा माझा द्वेष करीत आहेत. हे कल्याणी ! सामर्थ्याने मदांध झालेल्या, गर्विष्ठ अशा त्या दुष्टांचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी तुझे अपहरण करून तुला आणले. आम्ही खरोखरच देह व घरदार यांविषयी उदासीन आहोत. स्त्री, संतान आणि धन यांची आम्हांला आकांक्षा नाही. आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत. आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्णकाम आहोत. (१०-२०)

श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्याकारणाने रुक्मिणीला ’आपणच यांना सर्वाधिक प्रिय आहे.’ असा झालेला गर्व नाहीसा करण्यासाठीच भगवंत एवढे बोलले आणि गप्प राहिले. आपले प्रियतम त्रिलोकेश्वर भगवंतांचे पूर्वी कधीच न ऐकलेले हे अप्रिय बोल जेव्हा रुक्मिणीने ऐकले, तेव्हा ती भ्याली. तिचे हृदय धडधडू लागले. चिंतेच्या अथांग सागरात ती गटांगळ्या खाऊ लागली. अखेर ती रडू लागली. नखांच्या लालिम्यामुळे सुंदर दिसणार्‍या पायाच्या नखाने ती जमीन उकरू लागली. डोळ्यांतील काजळाने काळे झालेले अश्रू केशराने रंगलेली वक्ष:स्थळे धुऊ लागले. ती मान खाली घालून उभी राहिली. अत्यंत दु:खाने तिच्या तोंडून शब्द फुटेना. आत्यंतिक व्यथा, भय आणि शोकामुळे तिची विचारशक्ती लोप पावली, वियोगाच्या शंकेने ती इतकी दुबळी झाली की, तिच्या मनगटातील बांगड्या ओघळू लागल्या. हातातील चवरी गळून पडली. बुद्धी व्याकूळ झाल्याने तिला एकाएकी घेरी येऊ लागली. आणि वार्‍याने केळ उन्मळून पडावी, त्याप्रमाणे केस विस्कटून ती जमिनीवर कोसळली. भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आले की, विनोदाचे मर्म लक्षात न आलेल्या रुक्मिणीची माझ्यावरील अत्यंत प्रेमामुळे अशी अवस्था झाली आहे. स्वभावत:च दयाळू असणार्‍या श्रीकृष्णांचे मन तिच्याबद्दलच्या करुणेने भरून आले. (त्यावेळी) चार हात धारण केलेले भगवान चटकन पलंगावरून खाली उतरले आणि रुक्मिणीला त्यांनी उठविले. तिचे मोकळे झालेले केस सावरले आणि आपल्या कमलकराने तिचे तोंड कुरवाळले. हे राजा ! भगवंतांनी तिच्या डोळ्यांतील अश्रू आणि दु:खाश्रूंनी भिजलेले स्तन पुसून आपल्याबद्दल अनन्य प्रेमभाव असणार्‍या तिला बाहूंनी आलिंगन दिले. समजूत घालण्यात कुशल असणार्‍या भक्तवत्सल प्रभूंनी रुक्मिणी विनोदाने गोंधळून जाऊन बेचैन झालेली पाहून ’ तिची अशी थट्टा करायला नको होती,’ असे वाटून त्यांनी तिची समजूत घातली. (२१-२८)

श्रीकृष्ण म्हणाले- हे विदर्भनंदिनी ! माझे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. तू माझ्याशीच एकनिष्ठ आहेस, हे मला माहित आहे. हे प्रिये ! तू काय म्हणतेस, ते ऐकण्यासाठीच मी तुझी थट्टा केली होती. ज्यावरील ओठ प्रणयकोपाने थरथरत आहेत असे, रागामुळे डोळ्यांना कडा लाल झालेले आणि भुवया उंचावलेले, तुझे सुंदर मुखकमल पाहण्यासाठीच मी हे बोललो. हे घाबरट प्रिये ! गृहस्थांनी आपल्या प्रिय पत्‍नीबरोबर हास्यविनोद करीत काही घटका आनंदात घालविणे, हाच त्यांचा मोठा विरंगुळा होय. (२९-३१)

श्रीशुक म्हणतात- राजन ! श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजाविले, तेव्हा ते चेष्टेचे बोलणे होते, हे लक्षात येऊन आपले प्रियतम आपल्याला सोडून देतील, ही तिची भीती दूर झाली. परिक्षिता ! सलज्ज हास्य आणि प्रेमपूर्ण मधुर कटाक्षाने श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहात ती त्या पुरुषोत्तमांना म्हणाली. (३२-३३)

रुक्मिणी म्हणाली- हे कमलनयना ! ऐश्वर्य इत्यादी सर्व गुणांनी युक्त अशा अनंत भगवानांना अनुरूप अशी मी नाही, हे आपले म्हणणे बरोबर आहे. आपल्या अखंड महिम्यात राहाणारे व ब्रह्मदेवादिकांचे अधिपती आपण कोठे आणि केवळ अज्ञानी लोकच जिची सेवा करतात, अशी मी गुणमय प्रकृती कोठे? हे त्रिविक्रमा ! आपण राजे लोकांच्या भीतीने समुद्रात येऊन लपला आहात हे आपले म्हणणेही बरोबर आहे. परंतु हे राजे म्हणजे तीन गुण. आपण जणू त्यांच्याच भीतीने अंत:करणरूप समुद्रामध्ये चैतन्यघन अनुभूतिस्वरूप आत्म्याच्या रूपामध्ये विराजमान असता. आपले राजांशी वैर आहे हेही खरेच ! पण ते राजे म्हणजे ही क्षुद्र इंद्रिये ! यांच्याशी आपले वैर आहेच ! आणि, हे प्रभो ! आपणास राजसिंहासन नाही हेही योग्यच आहे; कारण आपल्या भक्तांनीसुद्धा राजपद म्हणजे अज्ञानांधकार समजून त्याचा त्याग केला आहे. तर मग आपण त्याचा स्वीकार कसा कराल ? आपण म्हणता की, आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरूषांप्रमाणे आपण वागतसुद्धा नाही, हेही खरेच ! कारण मुनी आपल्या पादपद्मांचा मकरंदरस सेवन करतात. त्याचा मार्गसुद्धा अस्पष्ट असतो आणि विषयांमध्ये गुरफटलेल्या नरपशूंना त्याची कल्पनाही करता येत नाही. आणि हे अनंता ! आपल्याला अनुसरणार्‍या आपल्या भक्तांच्या क्रियाही जर अलौकिक असतात, तर मग सर्व शक्ती आणि ऐश्वर्यांचे आश्रय असणार्‍या, आपल्या क्रिया अलौकिक असतील, यात काय आश्चर्य ! आपण स्वत:ला निष्किंचन म्हणवता, तेही बरोबर आहे. कारण आपल्याखेरीज दुसरी कोणतीच वस्तू या विश्वात नाही, म्हणून आपल्याला निष्किंचन म्हणायचे ! शिवाय ज्या ब्रह्मदेव इत्यादी देवांची पूजा सर्व लोक करतात, तेच देव आपली पूजा करतात. सर्वलोकपूज्य अशा त्यांना आपण प्रिय आहात आणि ते आपल्याला प्रिय आहेत. धनाढ्य लोक आपल्याला भजत नाहीत, हे आपले म्हणणेही योग्यच आहे. जे लोक धनाच्या अभिमानाने आंधळे होऊन इंद्रियांना तृप्त करण्याच्या मागेच लागलेले असतात, ते आपले भजन करत नाहीत हे खरेच. कारण आपणच मृत्युरूप आहात, हे ते जाणत नाहीत. आपणच चतुर्विध पुरूषार्थ आणि त्यांचे आनंदरूप फलस्वरूप आहात. अशा आपल्याला प्राप्त करण्यासाठी विचारवंत सर्वस्वाचा त्याग करतात. भगवन ! त्याच विवेकी पुरूषांचा आपल्याशी सेव्यसेवक संबंध असणे उचित आहे. जे लोक स्त्री-पुरूषसंबंधाने प्राप्त होणर्‍या सुख-दु:खाला वश होतात, त्यांच्याशी आपला संबंध कसा योग्य ठरेल ? भिक्षा मागून उदर-निर्वाह करणार्‍यांनी आपली प्रशंसा केली नाही, तर क्षमाशील संन्यासी महात्म्यांनी आपला महिमा वर्णिला आहे. मी अदूरदर्शीपणाने नव्हे तर समजून उमजून आपल्याला वरले आहे. कारण आपण सार्‍या जगताचे आत्मा आहात आणि आपल्या प्रेमी जनांना आपण आत्मदानही करीत असता. मी जाणून-बुजूनच त्या ब्रह्मदेव, देवराज इंद्र इत्यादींचा त्याग केला. कारण आपल्या भुवयांच्या इशार्‍यावर उत्पन्न होणार्‍या काळाच्या वेगाने त्यांच्या आशा-आक्षांकांवर पाणी पडते. मग इतरांची काय कथा ? (३४-३९)

हे गदाग्रजा ! आपण राजांच्या भीतीने समुद्रात निवास करू लागलात, हे आपले म्हणणे तर्कसंगत वाटत नाही. कारण आपण केवळ आपल्या शार्ड्ग्.धनुष्याच्या टणत्काराने माझ्या विवाहासाठी आलेल्या सर्व राजांना पळवून लावून मला पळवून आणलेत. जसा सिंह आपल्या आरोळीने वनातील पशूंना पिटाळून लावून आपला भाग घेऊन येतो. हे कमलनयना ! जे माझ्या मागे लागतात, त्यांना साधारणपणे कष्टच भोगावे लागतात. असे आपण कसे म्हणता ? प्राचीन काळी अंग, पृथू, भरत, ययाती, गय इत्यादी राजराजेश्वर आपापले एकछत्री साम्राज्य सोडून ज्या आपल्याला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले होते; त्यांना आपले अनुयायी होण्यामुळे काही कष्ट झाले काय ? आपण म्हणता की, मी एखाद्या राजकुमाराला वरावे. पण भगवन ! सर्व गुणांचे आश्रयस्थान असणार्‍या संतांनी स्तविलेल्या, लोकांना पाप-तापापासून मुक्त करणार्‍या, लक्ष्मीचे निवासस्थान असणार्‍या आपल्या चरणकमलांचा सुगंध एकदा घेतल्यावर आपला स्वार्थ-परमार्थ जाणणारी कोणती मनुष्य-स्त्री ते सोडून नेहमी मोठ्या भयांनी ग्रासलेल्यांचा स्वीकार करील ? हे प्रभो ! इह-परलोकातील सर्व आशा पूर्ण करणार्‍या, तसेच सर्वांचे आत्मा असणार्‍या व मला अनुरूप अशाच जगदीश्वरांना मी वरले आहे. मला माझ्या कर्मांनुसार वेगवेगळ्या योनीत भटकावे लागले तरी नेहमी आपले भजन करणार्‍यांचा मिथ्या संसारभ्रम नाहीसा करणार्‍या व त्यांना आपले स्वरूपसुद्धा देऊन टाकणार्‍या अशा आपल्या चरणांनाच मी शरण असावे. हे अच्युता ! हे शत्रुनाशना ! घरांमध्ये स्त्रियांची गाढवाप्रमाणे ओझी वाहणारे, बैलांप्रमाणे कामाला जुंपलेले, कुत्र्यांप्रमाणे तिरस्कार सहन करणारे, बोक्यांप्रमाणे हिंसक, दासाप्रमाणे सेवा करणारे, आपण सांगितलेले शिशुपाल इत्यादी राजे आहेत. जिच्या कानांवर शंकर, ब्रह्मदेव इत्यादी देवेश्वरांच्या सभेत गायन केल्या जाणार्‍या आपल्या कथा आल्या नसतील, तिलाच ते राजे लखलाभ होवोत. (४०-४४)

वरून कातडे, दाढी-मिशा, रोम, नखे आणि केसांनी झाकलेले व आत मांस, हाडे, रक्त, किडे, मल-मूत्र, कफ, पित्त आणि वायू यांनी भरलेले, म्हणूनच जिवंत असून प्रेतासारख्या असणार्‍या या शरीराला, जिला आपल्या चरणारविंदाच्या मकरंदाचा सुगंध हुंगावयास मिळाला नाही, अशीच मूर्ख स्त्री आपला प्रिय पती समजून भजते. हे कमलनयना ! आपण आत्माराम असल्याने माझ्याकडे आपली दृष्टी जात नसली, तरी आपल्या चरणकमलांवर माझे दृढ प्रेम असावे. जेव्हा आपण या जगाच्या अभिवृद्धीसाठी उत्कट रजोगुणाचा स्वीकार करून माझ्याकडे पाहता, तोसुद्धा आपला मोठा अनुग्रहच आहे, असे मी मानते. हे मधुसुदना ! एखाद्या अनुरूप वराला माळ घाल, असे आपण म्हणालात. तुमचे हे म्हणणे मला खोटे वाटत नाही. कारण कधी कधी एखाद्या पुरूषाने जिंकल्यानंतर सुद्धा काशिराजाची कन्या अंबा हिच्याप्रमाणे एखादीचे दुसर्‍या पुरूषावर प्रेम असू शकते. कुलटा स्त्रीचे मन तर विवाह झाल्यानंतरही नवनवीन पुरूषांकडे ओढ घेते. बुद्धिमान पुरूषाने अशा स्त्रीला आपल्याजवळ ठेवू नये. तिला स्वीकारणारा पुरूष इहलोक आणि परलोक असे दोन्हीही घालवून बसतो. (४५-४८)

श्रीकृष्ण म्हणाले- साध्वी ! राजकुमारी ! तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली. तू माझ्या म्हणण्याचा जो जो अर्थ लावलास, तो अक्षरश: खरा आहे. हे सुंदरी ! तू माझी अनन्य भक्त आहेस. तू माझ्याकडून ज्याची इच्छा धरशील, त्या तुझ्या इच्छा नेहेमीच पूर्ण होतील. शिवाय माझ्यासंबंधीच्या कामना सांसारिक बंधनात टाकणार्‍या नसतात. हे पुण्यशीले ! मी तुझे पतिप्रेम आणि पातिव्रत्य चांगल्या तर्‍हेने पारखले. कारण मी अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्‍न केला असतानाही तुझी बुद्धी माझ्यापासून दूर गेली नाही. हे प्रिये ! मी मोक्ष देणारा आहे. असे असून जे सकाम पुरूष अनेक प्रकारची व्रते आणि तपश्चर्या करून दांपत्यसुखाची अभिलाषा करतात, ते माझ्या मायेने मोहित झाले आहेत, असे समजावे. हे मानिनी ! मोक्ष व सर्व प्रकारच्या संपत्तींचा स्वामी परमात्मा अशा मला प्राप्त करूनसुद्धा जे लोक फक्त संपत्तीचीच अभिलाषा धरतात, माझी नव्हे, ते अभागीच होत. कारण विषयसुख नरकामध्येही मिळू शकते. परंतु त्या लोकांचे मन विषयांमध्येच गुंतलेले असते. म्हणूनच त्यांना नरकात जाणे सुद्धा चांगले वाटते. हे गृहस्वामिनी ! तू आतापर्यंत संसार-बंधनातून मुक्त करणार्‍या माझीच निरंतर सेवा केली आहेस. ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे. संसारमुक्त माणसे असे कधीच करू शकत नाहीत. ज्या स्त्रियांचे चित्त वाईट कामनांनी भरलेले असते आणि ज्या आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठीच निरनिराळ्या प्रकारची कपटकारस्थाने करीत असतात, त्यांना तर असे करणे खूपच अवघड आहे. हे मानिनी ! मला आपल्या घरामध्ये तुझ्यासारखी प्रेम करणारी पत्‍नी दुसरी कोणीही दिसत नाही; कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहासाठी आलेल्या राजांची उपेक्षा करून ब्राह्मणाकरवी तू मला एक गुप्त संदेश पाठविला होतास. तुझे हरण करतेवेळी मी तुझ्या भावाला युद्धात जिंकून त्याला विद्रूप केले होते आणि अनिरुद्धाच्या विवाहप्रसंगी द्यूत खेळतेवेळी बलरामाने तर त्याचा वध केला. परंतु आमच्याशी वियोग होईल, या भीतीने तू गुपचूपपणे सर्व दु:ख सहन केलेस. मल एका शब्दानेसुद्धा तू बोलली नाहीस. ह्या गुणामुळेच तू मला जिंकलेस. (भगवान त्रिकालदर्शी असल्यामुळे त्यांनी हा वधाचा भविष्यकालीन उल्लेख केला असावा) माझ्या प्राप्तीसाठी तू दूताकरवी आपला गुप्त संदेश पाठविला होतास. परंतु माझ्या येण्याला उशीर होत आहे असे दिसले, तेव्हा तुला हे सर्व जग असार वाटू लागले. त्यावेळी तू आपले शरीर दुसर्‍या कोणासाठीही योग्य नाही, असे समजून ते सोडण्याचा निश्चय केलास. तुझा हा प्रेमभाव तुझ्या ठिकाणीच राहू दे. आम्ही याची परतफेड करू शकत नाही. फक्त त्याचे कौतुक करतो. (४९-५७)

श्रीशुक म्हणतात- जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे असे प्रेमालाप करीत रुक्मिणीबरोबर रममाण झाले. जगाला उपदेश करणारे सर्वव्यापक भगवान श्रीकृष्ण याचप्रमाणे अन्य पत्‍न्यांच्या महामांमध्येसुद्धा गृहस्थाप्रमाणे गृहस्थाश्रमाला उचित अशा धर्माचे आचरण करीत. (५८-५९)

अध्याय साठावा समाप्त

GO TOP