श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५७ वा

स्यमंतक हरण, शतधन्व्याचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा द्वारकेत बोलावणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- लाक्षागृहाला लावलेल्या आगीमुळे पांडवांचा केसही वाकडा झाला नाही, हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते, तरीसुद्धा कुंती आणि पांडव जळून मेले आहेत, हे कळल्यावर कुळाची रीत पाळण्यासाठी ते बलरामांसह हस्तिनापुराला गेले. तेथे जाऊन भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी आणि द्रोणाचार्यांना भेटून त्यांचे सांत्वन करून, सहानुभूती दाखवून ते त्यांना म्हणाले- " अरेरे ! फार वाईट झाले. ! " (१-२)

ही संधी साधून अक्रूर आणि कृतवर्मा शतधन्व्याला म्हणाले- " तू सत्राजिताकडून मणी का घेत नाहीस ? ज्याने आपली सुंदर कन्या तुला देण्याचे वचन दिले होते, त्यानेच आता आम्हांला झिडकरून श्रीकृष्णांना ती दिली. तर सत्राजितालासुद्धा भावामागोमाग यमपुरीत का पाठवू नये? " शतधन्वा मुळचा दुष्ट होता आणि आता तर त्याचा मृत्यूही जवळ आला होता. त्या दोघांनी असा बुद्धिभेद केल्यामुळे त्याने लोभाने, झोपलेल्या स्थितीत सत्राजिताला ठार केले. यावेळी त्याच्या स्त्रिया अनाथाप्रमाणे रडू-ओरडू लागल्या. परंतु तिकडे लक्ष न देता कसाई जशी पशूंची हत्या करतो, त्याप्रमाणे शतधन्वा सत्राजिताला मारून व मणी घेऊन तेथून पसार झाला. (३-६)

वडिलांना मारलेले पाहून सत्यभामा शोकाकुल झाली आणि " बाबा ! बाबा ! माझा घात झाला !" म्हणून विलाप करू लागली. मधून मधून ती बेशुद्धही पडत होती. नंतर पित्याचे शव तेलाच्या कढईत ठेवून ती हस्तिनापुरला गेली. अत्यंत दु:खी अंत:करणाने श्रीकृष्णांना तिने आपल्या वडिलांच्या हत्येची बातमी सांगितली. वास्तविक हे सर्व त्यांना अगोदरच माहीत होते. राजा ! श्रीकृष्ण व बलराम ते ऐकून सामान्य मनुष्यासारखे अश्रू गाळू लागले. आणि म्हणू लागले, "अरेरे ! आमच्यावर दु:खाचा केवढा मोठा डोंगर कोसळला ! " यानंतर भगवान, सत्यभामा आणि बलराम यांच्यासह द्वारकेला परत आले आणि शतधन्व्याला मारून त्याच्याकडून मणी काढून घेण्याचा विचार करू लागले. (७-१०)

श्रीकृष्णाचे मनोगत शतधन्व्याला समजले, तेव्हा तो अतिशय घाबरला आणि आपले प्राण वाचविण्यासाठी त्याने कृतवर्म्याकडे मदत मागितली, तेव्हा कृतवर्मा म्हणाला. " श्रीकृष्ण आणि बलराम सर्वशक्तिमान आहेत. मी त्यांच्याशी वैर करून कोणाचे भले होणार आहे ? त्यांचा द्वेष केल्याने कंस राज्य घालवून आपल्या अनुयायांसह मारला गेला. तसाच जरासंध सतरा वेळा युद्धात हार पत्करून रथाशिवायच राजधानीकडे परत गेला." जेव्हा कृतवर्म्याने त्याला असे वाटेला लावले, तेव्हा शतधन्व्याने अक्रूराला साहाय्य करण्याची विनंती केली. तोही म्हणाला, "त्या समर्थांचे बळ जाणणारा कोण त्यांच्याशी वैर करील? जे लीलेने या विश्वाची रचना, संरक्षण आणि संहार करतात, तसेच ते केव्हा काय करू इच्छितात, ही गोष्ट त्यांच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मदेव इत्यादी विश्व-विधातेसुद्धा समजू शकत नाहीत, सात वर्षांचे असतानाच ज्यांनी एका हातानेच गोवर्धन पर्वत जमिनीतून उखडला आणि लहान मुलाने पावसाळी छत्री धरावी त्याप्रमाणे उचलून धरला. मी तर त्या अचाट कर्मे करणार्‍या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करतो. ते अनंत, अनादी, निष्क्रिय आणि आत्मस्वरूप आहेत. मी त्यांना नम्स्कार करतो. " अक्रूराने त्याला असे वाटेला लावले, तेव्हा शतधन्व्याने तो स्यमंतकमणी अक्रूराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि आपण चारशे कोस सलगपणे चालणार्‍या घोड्यावर स्वार होऊन तेथून मोठ्या वेगाने निघून गेला. (११-१८)

राजन ! गरुडचिन्ह असलेला ध्वज ज्याच्यावर फडकत होता आनि अतिशय वेगवान घोडे ज्याला जोडले होते, त्या रथावर आरूढ होऊन राम-कृष्ण सासर्‍याला मारणार्‍या शतधन्व्याचा पाठलाग करू लागले. मिथिलेच्या जवळ एका उपवनात शतधन्व्याचा घोडा जमिनीवर कोसळला. त्यामुळे तो घोड्याला तेथेच टाकून पायीच पळू लागला. तो अत्यंत भयभीत झाला होता. श्रीकृष्णसुद्धा रागाने त्याचा पाठलाग करू लागले. शतधन्वा पायीच पळत होता. म्हणून भगवंतांनीसुद्धा पायीच त्याचा पाठलाग करून तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले आणि त्याच्या अंगावरील कपड्यांत स्यमंतकमण्याचा शोध घेतला. परंतु मणी सापडला नाही, तेव्हा श्रीकृष्ण वडिल बंधूकडे येऊन म्हणाले, "आम्ही शतधन्व्याला उगीचच मारले. कारण त्याच्याजवळ स्यमंतकमणी नव्हता ! " तेव्हा बलराम म्हणाले, "शतधन्व्याने स्यमंतकमणी कोणाजवळ तरी ठेवला आहे, यात शंका नाही. आता तू द्वारकेला जा आणि त्याचा शोध घे. मला विदेहराजाची भेट घ्यावयाची आहे. कारण तो माझा अतिशय प्रिय मित्र आहे." परीक्षिता ! असे म्हणून बलराम मिथिला नगरीमध्ये गेले. पूजनीय बलरामांना येताना पाहून मिथिलाधिपतीचे हृदय आनंदाने भरून आले. त्याने ताबडतोब आसनावरून उठून पूजासाहित्याने त्यांची यथासांग पूजा केली. यानंतर बलराम काही वर्षे मिथिला नगरीतच राहिले. महात्मा जनकाने अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने त्यांना ठेवून घेतले. यानंतर योग्य वेळी धृतराष्ट्र-पुत्र सुयोघनाने बलरामांकडून गदायुद्धाचे शिक्षण घेतले. प्रिय पत्‍नी सत्यभामेचे आवडते कार्य करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि त्यांनी शतधन्व्याला मारले, परंतु स्यमंतकमणी त्याच्याजवळ मिळाला नाही, असे त्यांनी सत्यभामेला सांगितले. त्यानंतर त्यांनी बांधवांसह आपले सासरे सत्राजित यांच्या सर्व और्ध्वदैहिक क्रिया करविल्या. (१९-२८)

अक्रूर आणि कृतवर्मा यांनी शतधन्व्याला सत्राजिताच्या वधासाठी उद्युक्त केले होते. म्हणून श्रीकृष्णांनी शतधन्व्याला मारलेले ऐकून ते अत्यंत भयभीत होऊन द्वारकेतून पळून गेले. परीक्षिता ! काही लोक म्हणतात की, अक्रूर द्वारकेतून निघून गेल्यानंतर द्वारकेत राहणार्‍यांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागले. दैविक आणि भौतिक कारणांनी तेथील नागरिकांना वारंवार शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागले. परंतु जे असे म्हणतात, ते या अगोदर सांगितलेल्या गोष्टी विसरून जातात. ज्या श्रीकृष्णांच्यामध्ये सर्व मुनी निवास करतात, त्यांचे निवासस्थान असलेल्या द्वारकेत उपद्रव होईल, हे कधीतरी शक्य आहे काय ? त्यावेळी नगरातील वृद्ध नागरिक म्हणाले- " एकदा काशीनरेशाच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता. तेव्हा त्यांनी आपल्या राज्यात आलेल्या अक्रूराचा पिता श्वफल्क याला आपली कन्या गांदिनी दिली. तेव्हा त्या राज्यात पाऊस पडला. अक्रूरसुद्धा श्वफल्काचाच पुत्र आहे आणि त्याचाही तसाच प्रभाव आहे. म्हणून तो जेथे राहातो, तेथे भरपूर पाऊस पडतो. आणि तेथे कोणत्याही प्रकारचे कष्ट, रोगराई इत्यादी उपद्रव होत नाहीत."

परीक्षिता ! त्या लोकांचे म्हणणे ऐकून भगवंतांनी विचार केला की, "या उपद्रवाचे एवढे एकच कारण नाही." हे माहीत असूनसुद्धा भगवंतांनी दूत पाठवून अक्रूराला शोधून आणून त्याला म्हटले. भगवंतांनी त्याचा मोठा सत्कार केला आणि गोड-गोड बोलून त्याच्याशी संभाषण केले. नंतर सर्वांचे अंत:करण जाणणारे भगवान हसत हसत अक्रूराला म्हणाले. " हे दानशूर काका ! संपत्ती देणारा स्यमंतकमणी शतधन्व्याने आपल्याजवळ ठेवला आहे, ही गोष्ट आम्हांला अगोदरच माहीत होती. सत्राजिताला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मुलीची मुलेच त्यांना तिलांजली देऊन पिंडदान करतील, त्याचे ऋणही फेडतील आणि त्यातून जे काही शिल्लक राहील, त्याचे उत्तराधिकारी होतील. अशारीतीने जरी तो मणी माझ्याकडेच असला पाहिजे, तरीसुद्धा तो तुमच्याजवळच ठेवा. कारण आपण व्रतनिष्ठ आहात. शिवाय तो मणी इतरांना सांभाळणे कठीण आहे. परंतु माझ्या थोरल्या बंधूंना त्या मण्यासंबंधी माझ्यावर विश्वास नाही. म्हणून हे अक्रूरा ! आपण तो मणी दाखवून आमच्या बांधवांची शंका दूर करून त्यांना समाधान द्या. त्या मण्याच्या सामर्थ्यावर आपण आजकाल लागोपाठ सोन्याची वेदी बनवून यज्ञ करीत आहात." श्रीकृष्णांनी अशाप्रकारे त्याची समजूत घातली, तेव्हा अक्रूराने वस्त्रात लपवून ठेवलेला तो सूर्यासारखा प्रकाशमान मणी बाहेर काढला आणि श्रीकृष्णांना दिला. श्रीकृष्णांनी तो स्यमंतक मणी आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावर आलेला आळ दूर केला आणि तो मणी अक्रूराला परत दिला. (२९-४१)

सर्वशक्तिमान, सर्वव्यापक, भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमांनी परिपूर्ण असे हे आख्यान सगळी पापे दूर करणारे व परम मंगलमय आहे. जो हे वाचतो, ऐकतो किंवा याचे स्मरण करतो, तो सर्व प्रकारची अपकीर्ती आणि पापांपासून मुक्त होऊन शांती प्राप्त करून घेतो. (४२)

अध्याय सत्तावन्नावा समाप्त

GO TOP