श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५८ वा

भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - लाक्षागृहात न जळता परत आलेल्या पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले. त्यांच्याबरोबर सात्यकी इत्यादि यादवही होते. सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आलेले पाहून सर्व वीर पांडव एकदम उठून उभे राहिले. जसे, प्राणवायूचा संचार झाल्याबरोबर सर्व इंद्रिये उठतात. वीर पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आलिंगन दिले. त्यांच्याशी झालेल्या अंगस्पर्शाने त्यांची सर्व पापे धुऊन गेली. भगवंतांचे प्रेमपूर्ण स्मितहास्याने सुशोभित असे मुखारविंद पाहून ते आनंदमग्न झाले. श्रीकृष्णांनी युधिष्ठिर आणि भीमसेनाच्या चरणांना वंदन केले. अर्जुनाला आलिंगन दिले. नकुलाने आणि सहदेवाने भगवंतांच्या चरणांना वंदन केले. जेव्हा भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान झाले, तेव्हा सर्वांगसुंदरी नववधू द्रौपदी, लाजत लाजत हळू हळू श्रीकृष्णांजवळ आली व तिने त्यांना नमस्कार केला. तसेच पांडवांनी वीर सात्यकीचासुद्धा सत्कार करून त्याला वंदन केले. तो दुसर्‍या एका आसनावर बसला. इतर यादवांचाही सत्कार केल्यावर ते सुद्धा श्रीकृष्णांच्या चारी बाजूंना आसनावर बसले. यानंतर श्रीकृष्णांनी आत्या कुंतीजवळा जाऊन तिच्या चरणांना वंदन केले. तिने अत्यंत स्नेहाने त्यांना हृदयाशी धरले. त्यावेळी तिच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. कुंतीने श्रीकृष्णांना बांधवांची खुशाली विचारली आणि भगवंतांनीसुद्धा त्याचे यथोचित उत्तर देऊन तिला तिच्या सुनेची व तिची स्वत:ची खुशाली विचारली. त्यावेळी प्रेमविव्हल झालेल्या कुंतीचा गळा दाटून आला होता, डोळ्यांतून अश्रू वाहात होते. भगवंतांनी विचारल्यावर तिला आपले पूर्वीचे पुष्कळ क्लेश आठवले आणि ज्यांचे दर्शन सर्व क्लेशांचा अंत करण्यासाठीच होते, त्या श्रीकृष्णांना ती म्हणू लागली. (१-८)

" हे कृष्णा ! ज्यावेळी तू आम्हांला आपले संबंधी समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशाली समजून घेण्यासाठी बंधू अक्रूराला पाठविलेस, त्याचवेळी आमचे कल्याण झाले. आम्हां अनाथांना तू सनाथ केलेस. तू संपूर्ण विश्वाचा हितैषी आणि आत्मा आहेस. तुझ्याजवळ आपपरभाव नाही. असे असूनही जे तुझे सदैव स्मरण करतात. त्यांच्या हृदयात तू येऊन बसतोस आणि त्यांना होणारे क्लेश मिटवतोस." (९-१०)

युधिष्ठिर म्हणाला- " हे सर्वेश्वर श्रीकृष्णा ! आम्ही कोणते पुण्य केले होते, कळत नाही. योगेश्वरसुद्धा अत्यंत प्रयासाने ज्यांचे दर्शन घेतात, त्या आपण आम्हा सामान्यांना अनायासे दर्शन दिलेत." नंतर युधिष्ठिराने भगवंतांना काही दिवस तेथेच राहण्याची प्रार्थना केली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थातील लोकांच्या डोळ्यांना आनंद देत पावसाळ्याचे चार महिने तेथे सुखाने राहिले. एकदा वीर अर्जुन कवच अंगावर चढवून गांडीव धनुष्य आणि अक्षय बाणांचे दोन भाते घेऊन श्रीकृष्णांसह वानरध्वज असलेल्या रथात बसून पुष्कळ हिंस्त्र प्राणी असलेल्य निबिड अरण्यात शिकारीसाठी गेला. तेथे त्याने बाणांनी वाघ, डुकरे, रेडे, काळवीट, चित्ते, गौरेडे, गेंडे, हरीण, ससे, साळी इत्यादि प्राणी मारले. त्यांपैकी पवित्र पशू, पर्वकाळ आलेला पाहून, सेवकांनी राजा युधिष्ठिराकडे नेले. इकडे अर्जुन शिकार करून दमल्यामुळे व तहान लागल्यामुळे यमुनेवर गेला. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही महारथी यमुनेच्या पाण्यात हात-पाय धुऊन नदीचे निर्मल पाणी प्याले. इतक्यात तेथे तपश्चर्या करीत असलेली सुंदर कन्या त्यांनी पाहिली. त्या श्रेष्ठ सुंदरीच्या मांड्या, दात आणि चेहरा अतिशय सुंदर होता. मित्राने पाठविल्यावरून अर्जुनाने जाऊन तिला विचारले. " हे सुंदरी ! तू कोण आहेस ? कुणाची कन्या आहेस ? कोठून आलीस ? आणि येथे काय करू इच्छितेस ? मला वाटते की, तू पतीची इच्छा करीत आहेस. हे कल्याणी ! तू तुझा सर्व वृत्तांत सांग." (११-१९)

कालिंदी म्हणाली- " मी सूर्यदेवाची कन्या आहे. सर्वश्रेष्ठ, वर देणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत, म्हणून ही कठोर तपश्चर्या मी करीत आहे. हे वीर अर्जुना ! लक्ष्मीचे आश्रय असणार्‍या भगवानांखेरीज आणखी कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही. अनाथांचे आश्रय असणारे ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होवोत. माझे नाव कालिंदी आहे. माझ्या पित्याने यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी राहते. " अर्जुनाने श्रीकृष्णांना हा सर्व वृत्तांत सांगितला. त्यांना हे आधीच माहित होते. त्यांनी कालिंदीला रथात बसवून धर्मराजाकडे आणले. (२०-२३)

यानंतर पांडवांनी विनंती केल्यावरून श्रीकृष्णांनी पांडवांना राहण्यासाठी म्हणून एक अत्यंत अद्‍भूत आणि विलक्षण नगर विश्वकर्म्याकडून तयार करवून दिले. यावेळी पांडवांना आनंद देण्यासाठी भगवान त्यांचेकडे राहात असता, अग्निदेवाला खांडववन देण्यासाठी ते अर्जुनाचे सारथी झाले. खांडववन मिळाल्याने प्रसन्न झालेल्या अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य, चार पांढरे घोडे, एक रथ, अक्षय बाणांचे दोन भाते आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारे एक कवच दिले. खांडववन जळत असताना अर्जुनाने मय दानवाला अग्नीपासून वाचविले होते. म्हणून त्याने अर्जुनाशी मैत्री करून त्याच्यासाठी एक सभागृह तयार करून दिले. त्याच सभागृहात दुर्योधनाला पाण्याचे ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास झाला होता. (२४-२७)

काही दिवसांनंतर अर्जुनाचा आणि इतर संबंधितांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण, सात्यकी इत्यादींसह पुन्हा द्वारकेला परतले. तेथे आल्यानंतर त्यांनी विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर संबंधितांना परम मंगल आणि परमानंदाची प्राप्ती करुन देण्यासाठी कालिंदीचे पाणिग्रहण केले. (२८-२९)

विंद आणि अनुविंद हे दोघे अवंती देशाचे राजे होते. ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते. त्यांची बहीण मित्रविंदा हिची स्वयंवरामध्ये श्रीकृष्णांना वरण्याची इच्छा होती. परंतु त्यांनी तिला विरोध केला. परिक्षिता ! श्रीकृष्णाची आत्या राजाधिदेवी हिची मित्रविंदा ही कन्य होती. राजांच्या भर सभेतून भगवान श्रीकृष्ण तिला आपल्या सामर्थ्यावर घेऊन गेले. (३०-३१)

परीक्षिता ! कोसलदेशाचा राजा नग्नजित हा अत्यंत धार्मिक होता. त्याची सत्या नावाची मुलगी होती. नग्नजिताची कन्या असल्याने नाग्नजिती या नावानेही ती ओळखली जात होती. राजाच्या अटीनुसार, सात तीक्ष्ण शिंगांच्या, अजिंक्य, वीरांचा वासही सहन न करणार्‍या, दुष्ट बैलांवर विजय मिळवल्याशिवाय राजे त्या कन्येशी विवाह करू शकत नव्हते. यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला की जो पुरूष त्या बैलांवर प्रभुत्व मिळवील, त्यालाच सत्या मिळेल; तेव्हा ते मोठी सेना घेऊन कौसल्यापुराला गेले. कोसलनरेशाने आनंदाने उठून त्यांचे स्वागत केले आणि आसन देऊन मौल्यवान पूजासामग्रीने त्यांची पूजा केली. तेव्हा श्रीकृष्णांनीसुद्धा त्याचे अभिनंदन केले. राजकन्येने वर म्हणून आपल्याला प्रिय असणारे श्रीकृष्ण आलेले पाहून मनोमन अशी इच्छा केली की, "जर मी व्रतांचे पालन करून यांचेच चिंतन केले असेल, तर हेच माझे पती व्हावे आणि यांनी ही माझी पवित्र लालसा पूर्ण करावी. लक्ष्मी, ब्रह्मदेव, शंकर आणि लोकपाल ज्यांच्या चरणकमलांची धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात, आणि जे आपणच स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी अनेक लीलावतार धारण करतात, ते प्रभू माझ्या कोणत्या सत्कर्माने प्रसन्न होणार आहेत? "नग्नजिताने श्रीकृष्णांची विधिपूर्वक पूजा करून प्रार्थना केली की, " हे जगत्पाते नारायणा ! आपण आपल्या स्वरुपभूत आनंदानेच परिपूर्ण आहात आणि मी एक तुच्छ मनुष्य आहे ! मी आपली काय सेवा करू ? " (३२-३८)

श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! नग्नजिताने दिलेल्या आसनावर बसून त्यांनी केलेल्या पूजेने संतुष्ट झालेले भगवान हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले. (३९)

श्रीभगवान म्हणाले- राजन ! आपल्या धर्माप्रमाणे वागणार्‍या क्षत्रियाच्या याचनेची विद्वानांनी निंदा केली आहे. तरीसुद्धा मी आपल्याशी मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या कन्येला मागणी घालतो. या बदल्यात काहीही शुल्क देण्याची आमच्यामध्ये प्रथा नाही. (४०)

राजा म्हणाला- " प्रभो ! आपण सर्व गुणांचे निवासस्थान आहात. आपल्या वक्ष:स्थळावर लक्ष्मी नित्यवास करते. माझ्या कन्येसाठी आपल्याहून श्रेष्ठ असा दुसरा कोणता वर असू शकेल बरे? परंतु हे यदुश्रेष्ठा, आम्ही पूर्वीच याविषयी एक पण केला आहे. कन्येसाठी योग्य वर शोधण्याकरिता पुरूषांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठीच आम्ही असे केले आहे. हे वीरश्रेष्ठा ! आमचे हे सात बैल माजलेले असून कोणालाही न आवरणारे आहेत. पुष्कळशा राजकुमारांना यांनी घायाळ करून त्यांचा पराभव केला आहे. हे श्रीकृष्णा ! आपणच जर यांना वेसण घातलीत, तर हे लक्ष्मीपते ! आपणच आमच्या कन्येसाठी योग्य वर ठराल. " नग्नजिताचा हा पण ऐकून श्रीकृष्णांनी कंबर कसली आणि सात रुपे घेऊन जाता जाता त्या बैलांना वेसण घातली. त्यामुळे बैलांची मस्ती जिरली आणि त्यांचे बळ खच्ची झाले. आता भगवान श्रीकृष्ण त्यांना दोरीने बांधून, एखादे मूल लाकडी बैलांना ओढते, तसे त्या बैलांना ओढू लागले. राजाला अतिशय आश्चर्य वाटले. प्रसन्न होऊन त्याने श्रीकृष्णांना आपली कन्या दिली. आणि सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा आपल्याला अनुरुप अशा सत्येचे विधिपूर्वक पाणिग्रहण केले. आपल्या कन्येला प्रिय असे भगवान श्रीकृष्ण पती मिळाल्याचे पाहून राण्यांना अतिशय आनंद झाला आणि सगळीकडे मोठा उत्सव साजरा होऊ लागला. शंख, ढोल, नगारे वाजू लागले. सगळीकडे गाणे-बजावणे सुरू झाले. ब्राह्मण आशीर्वाद देऊ लागले. सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि दागुन्यांनी नटून-थटून नगरातील स्त्री-पुरूष आनंदोत्सव साजरा करू लागले. राजाने दहा हजार गाई आणि सुंदर वस्त्रे परिधान करुन गळ्यात सुवर्णहार घातलेल्या तीन हजार तरूण दासी वरदक्षिणा म्हणून दिल्या. त्याचबरोबर नऊ हजार हत्ती, नऊ लाख रथ, नऊ कोटी घोडे आणि नऊ अब्ज सेवकसुद्धा वरदक्षिणा म्हणून दिले. नग्नजिताने त्या दांपत्याची रथात बसवून विशाल सेनेसह पाठवणी केली. त्यावेळी वात्सल्याने त्याचे हृदय भरून आले होते. (४१-५२)

यादवांनी आणि नग्नजिताच्या बैलांनी या आधी ज्या राजांचे बळ धुळीस मिळविले होते, त्या राजांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला, तेव्हा ते सहन न होऊन सत्याला घेऊन जात असताना त्या राजांनी वाटेत श्रीकृष्णांना वेढा घातला. आणि ते त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. त्यावेळी अर्जुनाने आपल्या मित्राचे प्रिय करण्यासाठी गांडीव धनुष्य हातात घेऊन, सिंह ज्याप्रमाणे क्षुद्र पशूंना पळवून लावतो. त्याप्रमाणे त्या राजांना त्याने पिटाळून लावले. त्यानंतर यदुश्रेष्ठ देवकीनंदन ती वरदक्षिणा आणि सत्या यांना घेऊन द्वारकेत आले आणि तिच्यासह आनंदात राहू लागले. (५३-५५)

श्रीकृष्णांनी केकय देशातील आत्या श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्येशी विवाह केला. तिच्या संतर्दन इत्यादि भावांनी स्वत:च तिला श्रीकृष्णांना दिले होते. मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती. ती अत्यंत सुलक्षणी होती. गरुडाने ज्याप्रमाणे स्वर्गातून अमृत पळविले, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी स्वयंवरामध्ये एकट्यानेच तिचे हरण केले. (५६-५७)

भगवान श्रीकॄष्णांच्या अशा आणखीही हजारो स्त्रिया होत्या. भौ‍मासुराला मारून त्याच्या बंदिगृहातून त्यांनी त्या सुंदरींना सोडवून आणले होते. (५८)

अध्याय अठ्ठावन्नावा समाप्त

GO TOP