श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५६ वा

स्यमंतक मण्याची कथा, जांबवती आणि सत्यभामा ह्यांच्याशी श्रीकृष्णांचा विवाह -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- सत्राजिताने श्रीकृष्णावर खोटाच आळ घेतला होता; त्या अपराधाचे परिमार्जन करण्यासाठी त्याने स्वत: स्यमंतकमण्यासह आपली कन्या श्रीकृष्णांना दिली. (१)

राजाने विचारले- ब्रह्मन ! सत्राजिताने श्रीकृष्णांचा कोणता अपराध केला होता ? त्याला स्यमंतकमणी कोठून मिळाला होता ? आणि त्याने आपली कन्या त्यांना का दिली ? (२)

श्रीशुक म्हणाले- भक्त असलेल्या सत्राजिताचा सूर्य हा परम मित्र होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला स्यमंतक मणी दिला होता. तो मणी गळ्यात घातला असता सत्राजित सूर्यासारखा चमकू लागला. परीक्षिता ! सत्राजित द्वारकेत आला, तेव्हा मण्याच्या अत्यंत तेजामुळे लोक त्याला ओळखू शकले नाहीत. त्याला लांबूनच पाहून त्याच्या तेजाने लोकांचे डोळे दिपून गेले. लोकांना तो सूर्यच वाटला. द्यूत खेळत असलेल्या भगवंतांना त्यांनी जाऊन ही गोष्ट सांगितली. लोक म्हणाले. " हे शंख-चक्रगदाधारी नारायणा ! कमलनयन दामोदरा ! यदुनंदन गोविंदा ! आपणांस नमस्कार असो. हे जगदीश्वरा ! आपल्या चमकणार्‍या किरणांनी लोकांचे डोळे दिपवीत हा प्रखरकिरण सूर्य आपल्या दर्शनासाठी येत आहे. प्रभो ! सर्व श्रेष्ठ देव त्रैलोक्यामध्ये आपल्याला प्राप्त करण्याचा मार्ग शोधीत असतात. परंतु आपण यदुवंशात गुप्तपणे राहिला आहात, हे जाणून आज स्वत: सूर्यनारायण आपल्या दर्शनासाठी येत आहे. " (३-८)

श्रीशुक म्हणतात - अज्ञानी लोकांचे हे बोलणे ऐकून कमलनयन भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, " अहो ! हे सूर्यदेव नाहीत. हा मण्यामुळे चमकणारा सत्राजित आहे." यानंतर सत्राजित आपल्या मंगल उत्सव चालू असलेल्या समृद्ध घरामध्ये आला. ब्राह्मणांकरवी त्याने तो मणी देवघरात स्थापन केला. परीक्षिता तो मणी दररोज आठ भार सोने देत असे. आणि जेथे त्याचे पूजन होत असे, तेथे दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, सर्पभय, मानसिक आणि शारीरिक व्यथा तसेच निरनिराळ्या मायांचा उपद्रव इत्यादी काहीही अशुभ घडत नसे. एकदा प्रसंवशात श्रीकृष्ण त्याला म्हणाले, " सत्राजिता ! तू तुझ्याजवळचा मणी राजा उग्रसेन यांना दे. " परंतु तो लोभी असल्यामुळे त्याने तो मणी दिला नाही. यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन होईल, याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. एके दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेन याने तो अतिशय प्रकाशमान मणी आपल्या गळ्यात घातला आणि घोड्यावर स्वार होऊन तो शिकारीसाठी वनात गेला. तेथे एका सिंहाने घोड्यासह प्रसेनाला मारून तो मणी काढून घेतला. तो आता पर्वतात शिरणार इतक्यात जांबवानाने त्या मण्यासाठी त्याला मारले. तो मणी आपल्या गुहेमध्ये नेऊन त्याने तो मुलाला खेळावयास दिला. आपला भाऊ परत न आल्याचे पाहून सत्राजिताला अतिशय दु:ख झाले." गळ्यात मणी घालून वनात गेलेल्या माझ्या भावाला श्रीकृष्णानेच मारले असावे." सत्राजिताचे हे म्हणणे ऐकून लोकही आपापसात तेच कुजबुजू लागले. श्रीकृष्णांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा आपल्याला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यासाठी, ते नगरातील काही पुरुषांना बरोबर घेऊन प्रसेनाला शोधण्यासाठी वनात गेले. तेथे शोध घेत असता लोकांना दिसले की, जंगलामध्ये सिंहाने प्रसेन आणि त्याच्या घोड्याला मारले आहे. आणि पुढे जाऊन पाहातात, तर पर्वतावर एका अस्वलाने सिंहालाही मारून टाकले आहे. (९-१८)

भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना बाहेरच बसवून आपण एकट्यानेच त्या घोर अंधकाराने भरलेल्या अस्वलाच्या भयंकर गुहेत प्रवेश केला. मुलाला खेळण्यासाठी दिलेला तो मौल्यवान मणी पाहून त्याच्याकडून काढून घेण्याच्या उद्देशाने ते मुलाजवळ जाऊन उभे राहिले. त्या गुहेत एका अपरिचित माणसाला आल्याचे पाहून मुलाची दाई घाबरून ओरडू लागली. ते ऐकून महाबलवान ऋक्षराज जांबवान रागावून तेथे धावत आला. परीक्षिता ! जांबवानाला तो सामान्य मनुष्य वाटल्यामुळे त्याचा राग आला. त्याचे सामर्थ्य त्याला माहित नव्हते. त्यामुळे तो आपल्या स्वामींशीच युद्ध करू लागला. मांसाच्या तुकड्यासाठी ज्याप्रमाणे दोन ससाणे आपापसात लढतात, त्याचप्रमाणे विजयाच्या इच्छेने श्रीकृष्ण आणि जांबवान आपापसात घनघोर युद्ध करू लागले. अगोदर शस्त्रांनी, नंतर मोठमोठ्या दगडांनी, नंतर झाडांनी आणि शेवटी बाहूंनी ते युद्ध करू लागले. वज्रप्रहाराप्रमाणे कठोर ठोसे एकमेकांना मारीत ते दोघे अठ्ठावीस दिवसपर्यंत विश्रांती न घेता, रात्रंदिवस लढत होते. शेवटी श्रीकृष्णांच्या ठोशांमुळे जांबवानाची हाडे खिळखिळी झाली. त्याचा उत्साह मावळला. शरीर घामाने डबडबले. तेव्हा त्याने अत्यंत आश्चर्यचकित होऊन भगवान श्रीकृष्णांना म्हटले. " हे प्रभो ! मी आता जाणले की, आपणच सर्व प्राण्यांचे स्वामी, रक्षणकर्ते, पुराणपुरुष भगवान विष्णू आहात. आपणच सर्वांचे प्राण, इंद्रियबल, मनोबल आणि शरीरबल आहात. विश्वाची उत्पत्ती करणार्‍यांचीही उत्पत्ती करणारे आपणच आहात. उत्पन्न केलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा सत्तारूपाने आपणच विराजमान आहात. काळाचे जितके म्हणून अवयव आहेत, त्या सर्वांचे नियमन करणारे काळ आपणच आहात आणि शरीरभेदामुळे वेगवेगळे भासणार्‍या अंतरात्म्यांचे परम आत्मासुद्धा आपणच आहात. हे प्रभो ! जेव्हा आपण जरासे रागावून क्रुद्ध नजरेने समुद्राकडे पाहिले होते, त्यावेळी समुद्रात राहाणार्‍या मोठमोठ्या सुसरी व मासे घाबरले आणि समुद्राने आपल्याला वाट करून दिली. तेव्हा आपण त्याच्यावर आपल्या कीर्तीचाच पूल बांधला. लंका जाळली आणि राक्षसांची मस्तके आपल्या बाणांनी छिन्नविच्छिन्न करून जमिनीवर पाडली. तेच माझे श्रीराम आपण असून आज श्रीकृष्णांच्या रूपाने येथे आला आहात. " परीक्षिता ! जेव्हा ऋक्षराज जांबवानाने भगवंतांना ओळखले, तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी आपला कल्याणकारी हात त्याच्या शरीरावरून फिरविला आणि नंतर परम कृपेने, प्रेमपूर्ण गंभीर वाणीने, आपल्या त्या भक्त जांबवानाला म्हटले. " ऋक्षराज ! आम्ही मण्यासाठी तुझ्या गुहेत आलो आहोत. या मण्यामुळे माझ्यावर आलेला खोटा आळ मी पुसून टाकू इच्छितो." भगवंतांनी असे म्हटल्यावर जांबवानाने मोठ्या आनंदाने त्यांचा सन्मान करण्यासाठी आपली कन्या जांबवती मण्यासह त्यांना अर्पण केली. (१९-३२)

गुहेत गेलेले श्रीकृष्ण बारा दिवस झाले तरी गुहेच्या बाहेर आले नाहीत, असे पाहून बाहेर थांबलेले लोक अत्यंत दु:खी होऊन द्वारकेला परत आले. तेथे जेव्हा माता देवकी, रुक्मिणी, वसुदेव तसेच इतर संबंधित आणि कुटुंबियांना श्रीकृष्ण गुहेच्या बाहेर आले नाहीत हे समजले, तेव्हा त्यांना अतिशय दु:ख झाले. सर्व द्वारकावासी दु:खी होऊन सत्राजिताला शिव्याशाप देऊ लागले आणि श्रीकृष्ण परत यावेत, म्हणून महामाया दुर्गादेवीला शरण जाऊन तिची उपासना करू लागले. त्यांच्या उपासनेने दुर्गादेवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने त्याचवेळी तेथे नववधू जांबवतीसह कार्यसिद्धी केलेले श्रीकॄष्ण सर्वांना आनंदित करीत प्रगट झाले. भगवान श्रीकृष्ण पत्‍नीसह गळ्यात मणी धारण करून आलेले पाहून सर्व द्वारकावासी परमानंदात मग्न झाले. कारण ते जणू मेलेलेच जिवंत होऊन परत आल्यासारखे त्यांना वाटले. (३३-३७)

त्यानंतर भगवंतांनी सत्राजिताला राजसभेमध्ये महाराज उग्रसेनांकडे बोलावले आणि मणी कसा परत मिळाला, त्याची सर्व हकीकत सांगून त्यांनी तो मणी सत्राजिताकडे सोपविला. सत्राजित अत्यंत खजिल झाला. मणी त्याने परत घेतला. परंतु त्याची मान खाली झाली. आपण केलेल्या अपराधाबद्दल त्याला अत्यंत पश्चात्तप होत होता. कसातरी तो आपल्या घरी जाऊन पोहोचला. (३८-३९)

त्याच्या मनात नेहमी स्वत:चा अपराधच येऊ लागला. बलवानाबरोबर वैर केल्यामुळे तो अत्यंत भयभीत झाला होता. तो विचार करत होता की, "मी आपल्या अपराधाचे परिमार्जन कसे करावे ? श्रीकृष्ण आपल्यावर कसे प्रसन्न होतील ? काय केल्याने माझे कल्याण होईल आणि लोक माझी निर्भत्सना करणार नाहीत. मी खरोखरच अदूरदर्शी, क्षुद्र आहे. धनाच्या लोभाने मी मूर्खपणा करून बसलो. आता मी स्त्रियांमध्ये रत्‍नासमान असणारी माझी कन्या सत्यभामा आणि हा स्यमंतकमणी, हे दोन्हीही श्रीकृष्णांना देईन. हा उपाय अत्यंत चांगला आहे. यामुळे माझ्या अपराधाचे परिमार्जन होऊ शकेल. याशिवाय दुसरा उपाय नाही. सत्राजिताने विवेकबुद्धीने असा निश्चय करून तो अमलात आणण्यासाठी तो स्वत:च उद्योगाला लागला आणि त्याने आपली सुंदर कन्या व स्यमंतकमणी श्रीकृष्णांना अर्पण केले. सत्यभामा शील, सौंदर्य, औदार्य इत्यादी गुणांनी युक्त होती. बर्‍याच जणांनी तिला मागणीही घातली होती. परंतु आता श्रीकृष्णांनी विधिपूर्वक तिचे पाणिग्रहण केले. परीक्षिता ! भगवान श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले. "आम्ही स्यमंतकमणी घेणार नाही. तू सूर्याचा भक्त आहेस. म्हणून तो तुझ्याजवळच राहू दे. आम्ही फक्त त्याच्यापासून मिळणार्‍या फळाचा म्हणजे सोन्याचा स्वीकार करू." (४०-४५)

अध्याय छप्पन्नावा समाप्त

GO TOP