|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५५ वा
प्रद्युन्माचा जन्म आणि शंबरासुराचा वध - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- वासुदेवांचा अंश असणार्या कामदेवाला शिवांच्या क्रोधाग्नीने पूर्वी जाळून टाकले होते. आता पुन्हा शरीर धारण करण्यासाठी त्याने वासुदेवांचाच आश्रय घेतला. तोच काम यावेळी श्रीकृष्णांपासून रुक्मिणीच्या ठिकाणी उत्पन्न झाला. तो प्रद्युम्न नावाने प्रसिद्ध झाला. तो कोणत्याही बाबतीत पित्यापेक्षा कमी नव्हता. प्रद्युम्नाला अजून दहा दिवससुद्धा झाले नव्हते, तेवढ्यात, तो आपला शत्रू आहे, हे जाणून इच्छेनुसार रूप घेणारा शंबरासुर त्याला पळवून घेऊन गेला आणि त्याला समुद्रात फेकून देऊन आपल्या घरी परतला. प्रद्युम्नाला समुद्रात एका मोठ्या माशाने गिळून टाकले. एकदा कोळ्यांनी मोठ्या जाळ्यात इतर माशांसह या माशालाही पकडले. त्यांनी तो मासा शंबरासुराला भेट म्हणून दिला. शंबरासुराच्या आचार्यांनी तो अद्भूत मासा पाकगृहात नेऊन कुर्हाडीने तोडला आचार्यांनी माशाच्या पोटात बालक पाहून ते शंबरासुराची दासी मायावतीकडे सोपविले. तिच्या मनात शंका उत्पन्न झाली. तेव्हा नारदांनी येऊन तिला त्या मुलाचे मूळ स्वरूप, उत्पत्ती, माशाच्या पोटात जाणे इत्यादी सर्व सविस्तर सांगितले. ती मायावती म्हणजे कामदेवाची कीर्तीमती पत्नी रतीच होती. ज्या दिवशी शंकरांच्या क्रोधाग्नीने कामदेवाचे शरीर भस्म झाले, त्या दिवसापासून ती त्याचा देह पुन्हा उत्पन्न होण्याची वाट पाहात होती. त्याच रतीला शंबरासुराने आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी नेमले होते. तिला ते मूल म्हणजे कामदेव आहेत असे कळले, तेव्हा ती त्याच्यावर अतिशय प्रेम करू लागली. तो कृष्णकुमार थोड्याच दिवसात तरुण झाला. जेव्हा स्त्रिया त्याच्याकडे पाहात, तेव्हा त्यांच्या मनात प्रेमभाव उद्दीपित होत असे. (१-९) हे राजा ! कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र, गुडघ्यापर्यंत लांब हात आणि मनुष्यलोकात सर्वांत सुंदर शरीर असणार्या त्याच्याकडे लज्जापूर्ण हास्ययुक्त भ्रूविलासाने रती पाहात असे आणि प्रेमाने स्त्री-पुरूषसंबंधी भाव व्यक्त करीत त्याची सेवा करीत असे. श्रीकृष्णनंदन प्रद्युम्नाने तिला म्हटले, " आई ! तुझी बुद्धी अशी कशी बदलली ? तू आईची माया टाकून माझ्याशी कामिनीप्रमाणे वागत आहेस. " (१०-११) रती म्हणाली- " हे प्रभो ! आपण स्वत: भगवान नारायणांचे पुत्र आहात. आपल्याला त्यांच्या घरातून शंबरासुराने पळवून आणले होते. आपण माझे पती कामदेव आहात आणि मी आपली धर्मपत्नी रती आहे. हे स्वामी ! आपण पुरते दहा दिवसांचेसुद्धा नव्हतात, तेव्हा या शंबरासुराने आपल्याला समुद्रात फेकून दिले होते. तेथे एका माशाने आपणांस गिळले आणि त्याच्याच पोटातून आपण येथे आला आहात. हा शंबरासुर शेकडो प्रकारच्या माया जाणतो. त्याला वश करून घेणे किंवा जिंकणे अत्यंत कठीण आहे. आपण आपल्या या शत्रूला मोहन इत्यादी मायांच्याद्वारे नष्ट करा. हे स्वामी ! आपला मुलगा (म्हणजे आपण) हरवल्यामुळे आपली माता पुत्रस्नेहाने व्याकूळ झाली आहे. पिल्लू हरवलेल्या टिटवीसारखी किंवा वासरू हरवलेल्या गायीसारखी दीनवाणी होऊन ती रात्रंदिवस शोक करीत आहे. " असे सांगून मायावतीने महात्म्या प्रद्युम्नाला महामाया नावाची सर्व प्रकारच्या माया नष्ट करणारी विद्या दिली. तेव्हा प्रद्युम्न शंबरासुराकडे जाऊन त्याच्यावर असे असह्य आरोप करू लागला की, त्यामुळे त्याने भांडण काढावे. त्यानंतर त्याने त्याला युद्धासाठी आव्हान दिले. (१२-१७) प्रद्युम्नाच्या कठोर बोलण्याने शंबरासुर पायाने डिवचलेल्या सापासारखा चिडला. त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले. हातामध्ये गदा घेऊन तो बाहेर आला. त्याने आपली गदा वेगाने फिरवून प्रद्युम्नावर फेकली आणि विजेच्या कडकडाटासारखी गर्जना केली. (१८-१९) परीक्षिता ! भगवान प्रद्युम्नाने आपल्यावर येणारी त्याची गदा आपल्या गदेच्या तडाख्याने तटवून अत्यंत क्रोधाने त्याच्यावर आपली गदा फेकली. तेव्हा त्या दैत्याने मयासुराने दिलेल्या आसुरी मायेचा आश्रय घेतला व आकाशात जाऊन तेथूनच प्रद्युम्नावर तो अस्त्रांचा वर्षाव करू लागला. महारथी प्रद्युम्न त्या अस्त्रांच्या वर्षावाने व्यथित झाला, तेव्हा त्याने सर्व मायांचा नायनाट करणार्या सत्वमय महाविद्येचा प्रयोग केला. त्यानंतर शंबरासुराने यक्ष, गंधर्व, पिशाच, नाग आणि राक्षसांच्या शोकडो मायांचा त्याच्यावर प्रयोग केला. परंतु कृष्णकुमाराने त्या सर्वांचा नाश केला. त्यानंतर त्याने एक तीक्ष्ण तलवार हातात घेऊन वेगाने शंबरासुराचे किरीट-कुंडलांनी सुशोभीत आणि लाल दाढी-मिशा असलेले डोके धडापासून वेगळे केले. देव फुलांचा वर्षाव करीत स्तुती करू लागले. त्यानंतर आकाशातून फिरू शकणार्या मायावतीने त्याला आकाशमार्गाने द्वारकेत नेले. (२०-२५) परीक्षिता ! विजेसह असणार्या मेघाप्रमाणे दिसणार्या प्रद्युम्नाने आकाशातून शेकडो रमणी निवास करीत असलेल्या उत्तम अंत:पुरात पत्नीसह प्रवेश केला. प्रद्युम्नाचे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामवर्ण होते. त्याने रेशमी पीतांबर परिधान केला होता. गुडघ्यापर्यंत पोहोचणारे त्याचे हात लांब होते. नेत्र लालसर होते. सुंदर मुखमंडलावर मंद हास्य तरळत होते. त्याच्या मुखकमलावर काळे कुरळे केस भ्रमरांसारखे झेपावत होते. अशा त्याला पाहाताच त्या सगळ्याजणी त्याला श्रीकृष्ण समजून संकोचाने इकडे तिकडे लपून राहिल्या. नंतर हळू हळू त्या स्त्रियांना समजले की, हे श्रीकृष्ण नाहीत; कारण त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. तेव्हा त्या चकित होऊन अत्यंत आनंदाने या सुंदर दांपत्याकडे आल्या. त्याचवेळी डोळ्यांच्या कडा काळसर असलेली, मधुरभाषिणी रुक्मिणी तेथे आली. तिला आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण झाली आणि पुत्रप्रेमाने तिच्या स्तनांतून दूध स्रवू लागले. (२६-३०) रुक्मिणी विचार करू लागली, " हे नररत्न कोण आहे ? हा कमलासारखे डोळे असलेला पुत्र कोणाचा आहे ? कोणत्या भाग्यवान स्त्रीने याला आपल्या गर्भामध्ये धारण केले असेल ? याला ही कोण पत्नी म्हणून मिळाली आहे ? माझासुद्धा लहान मुलगा हरवला होता. त्याला सूतिका गृहातूनच पळवले होते. तो जर कुठे जिवंत असेल, तर त्याचे वय आणि रूप याच्यासारखेच असेल. याला श्यामसुंदरांसारखे रूप, अंगाची ठेवण, चालणे, आवाज, हास्य, पाहाणे हे सारे कोठून प्राप्त झाले ? किंवा हाच तो मुलगा असेल का, ज्याला मी गर्भामध्ये धारण केले होते. कारण मला याच्याबद्दल खूपच प्रेम वाटत आहे आणि माझा डावा हातसुद्धा लवत आहे. " (३१-३४) रुक्मिणी असा विचार करीत होती, त्याचवेळी पवित्रकीर्ती श्रीकृष्ण देवकी-वसुदेवांसह तेथे आले. श्रीकृष्णांना सर्व काही माहीत होते, परंतु ते काही बोलले नाहीत. इतक्यात तेथे येऊन नारदांनी शंबरासुराने प्रद्युम्नाचे हरण करण्यापासूनची सर्व हकीकत सांगितली. नारदांच्या तोंडून या सर्व आश्चर्यकारक घटना ऐकून श्रीकृष्णांच्या अंत:पुरातील स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या आणि पुष्कळ वर्षेपर्यंत हरवल्यानंतर परत आलेल्या प्रद्युम्नाचे, मेल्यानंतर पुन्हा जिवंत होऊन आल्याप्रमाणे कौतुक करू लागल्या. देवकी, वसुदेव, श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी आणि इतर स्त्रिया त्या नवदांपत्याला हृदयाशी घट्ट धरून आनंदित झाल्या. द्वारकेतील लोकांना जेव्हा हे समजले की, हरवलेला प्रद्युम्न परत आला आहे, तेव्हा ते आपापसात म्हणू लागले- ’ अहो ! ही किती भाग्याची गोष्ट आहे की, हा मुलगा जणू मरून परत जिवंत होऊन आला.’ प्रद्युम्न सर्व बाबतीत वडिलांच्या सारखाच असल्यामुळे त्याला पाहून त्याच्या मातांनासुद्धा तो पतीच वाटत असे व त्यांच्या मनात मधुर भाव उत्पन्न होई, यात काही आश्चर्य नाही. कारण प्रद्युम्न हा मुळात स्मरण होताच मन चंचल करणारा काम होता. त्यात तो त्रिभुवनसुंदर श्रीकृष्णांचे प्रतिबिंब होता. तो समोर दिसल्यावर असे होणे स्वाभाविकच होते. तर मग त्यांना पाहून अन्य स्त्रियांची अवस्था काय होईल हे काय सांगावयास पाहिजे ? (३५-४०) अध्याय पंचावन्नावा समाप्त |