श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५४ वा

शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव व श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात - अशा प्रकारे क्रोधाविष्ठ झालेले सर्व राजे अंगावर चिलखत घालून आपापल्या वाहनांवर स्वार झाले आणि धनुष्ये घेऊन, आपापल्या सेनेसह श्रीकृष्णांवर धावले. राजन ! यादवांच्या सेनापतींनी जेव्हा पाहिले की, शत्रू आपल्यावर चढाई करीत आहेत, तेव्हा त्यांनीसुद्धा आपापल्य धनुष्याचा टणत्कार केला आणि तोंड फिरवून ते त्यांच्या समोर उभे राहिले. जरासंधाच्या सेनेतील काहीजण घोड्यांवर, काहीजण हत्तींवर तर काहीजण रथांत बसलेले होते. धनुर्विद्येत निष्णात असणारे ते यादवांवर बाणांचा असा वर्षा करू लागले की, जसा ढगांनी डोंगरावर पाडलेला मुसळधार पाऊस. रुक्मिणीने आपल्या पतीची सेना बाणवर्षावाने आच्छादिली गेलेली पाहिली, तेव्हा लाजून, भयभीत नेत्रांनी, तिने भगवान श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहिले. भगवान हसून म्हणाले, "सुंदरी ! भिऊ नकोस ! तुझ्या सेनेकडून आत्ताच शत्रूच्या सेनेचा नाश होईल." इकडे गद, संकर्षण इत्यादि यदुवंशी वीरांना शत्रूचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी शत्रूंचे हत्ती, घोडे व रथ यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्यांच्या बाणांनी रथ, घोडे आणि हत्तींवर बसलेल्या शत्रुपक्षाच्या वीरांची कुंडले, किरीट व पगड्यांनी सुसोभित झालेली कोट्यावधी मस्तके, खड्ग, गदा आणि धनुष्ययुक्त हात, मनगटे, मांड्या तसेच पाय तुटून जमिनीवर पडू लागले. अशाच प्रकारे घोडे, खेचरे, हत्ती, उंट, गाढवे आणि माणसांची मस्तकेसुद्धा तुटून रणभूमीवर पडू लागली. शेवटी विजयाची अपेक्षा करणार्‍या यादवांनी शत्रूच्या सेनेचा धुव्वा उडविला. जरासंध इत्यादी सर्व राजे युद्धाकडे पाठ फिरवून निघाले. (१-९)

आपल्या भावी पत्‍नीला पळविल्यामुळे दु:खी झालेल्या निस्तेज, निरुत्साही, तोंड वाळलेल्या शिशुपालाजवळ जाऊन त्याला ते म्हणाले. " हे पुरुषसिंहा ! ही उदासीनता सोडून दे; कारण हे राजन ! प्राण्यांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मनासारखीच होईल किंवा मनाविरुद्ध होईलच याची खात्री देता येत नाही. कठपुतळी ज्याप्रमाणे सूत्राधाराच्या इच्छेनुसार नाचत असते, त्याप्रमाणे हा जीवसुद्धा भगवंतांच्या इच्छेनुसारच सुख-दु:खासंबंधी प्रयत्‍न करीत असतो. तेवीस तेवीस अक्षौहिणी सेनेसह माझा श्रीकृष्णाने सतरा वेळा पराभव केला. मी मात्र एकदाच त्यांच्यावर विजय मिळविला. तरीसुद्धा या घटनेबद्दल मी कधी शोक करीत नाही की आनंदीत होत नाही. कारण मला हे माहीत आहे की, प्रारब्धानुसार कालच या जगाला नाचवीत असतो. आम्ही सर्वजण मोठमोठ्या वीर सेनापतींचे सुद्धा अधिपती असून श्रीकृष्णाच्या आधिपत्याखाली असलेल्या यादवांनी थोड्याशा सेनेनिशीच आमचा पराजय केला. यावेळी शत्रूंचा विजय झाला, कारण काल त्यांना अनुकूल होता. जेव्हा तो आम्हांला अनुकूल होईल, तेव्हा आम्हीसुद्धा त्यांना जिंकू." जेव्हा मित्रांनी त्याला अशाप्रकारे समजावले, तेव्हा तो आपल्या अनुयायांसह आपल्या राजधानीला परत गेला आणि त्याचे वाचलेले मित्रराजेसुद्धा आपापल्या नगरांकडे गेले. (१०-१७)

पण कृष्णद्वेष्ट्या रुक्मीला मात्र बहिणीचा श्रीकृष्णांशी राक्षसविवाह सहन झाला नाही. त्यामुळे बलवान रुक्मीने एक अक्षौहिणी सेनेसह श्रीकृष्णांचा पाठलाग केला. महाबाहू रुक्मी खवळला. कवच अंगात घालून आणि धनुष्य घेऊन त्याने सर्व राजांच्या समोर प्रतिज्ञा केली." आपणा सर्वांसमक्ष मी प्रतिज्ञा करतो की, जर युद्धात श्रीकृष्णाला मारून मी रुक्मिणीला परत आणले नाही, तर कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही." असे म्हणून तो रथावर आरूढ झाला आणि सारथ्याला म्हणाला, "जेथे कृष्ण असेल, तेथे घोड्यांना ताबडतोब पिटाळ. आज मला त्याच्याबरोबर युद्ध करायचे आहे. आज मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी त्या दुष्ट गवळ्याच्या शौर्याचा गर्व धुळीला मिळवीन. कारण माझ्या बहिणीला तो बळजबरीने घेऊन गेला आहे. " भगवंतांचा प्रभाव न ओळखणारा तो मूर्ख अशी बडबड करीत फक्त एकच रथ घेऊन श्रीकृष्णांना " थांब ! थांब ! " म्हणून आव्हान देऊ लागला. त्याने धनुष्याची दोरी ताकदीने ओढून श्रीकृष्णांना तीन बाण मारले आणि तो म्हणाला, "यदूंच्या कुलकलंका ! जरा थांब. कावळ्याने हविर्द्रव्य पळवावे, त्याप्रमाणे तू माझ्या बहिणीची चोरी करून कुठे पळून चाललास ? अरे मूर्खा ! तू मायावी आणि कपटयुद्धात कुशल आहेस. आज मी तुझा गर्व पार धुळीला मिळवतो. माझे बाण जोपर्यंत तुला जमिनीवर आडवे करीत नाहीत, तोवरच या मुलीला सोडून दे." तेव्हा श्रीकृष्णांनी किंचीत हसून त्याचे धनुष्य तोडून टाकले आणि त्याच्यावर सहा बाण सोडले. तसेच त्याच्या चार घोड्यांवर आठ बाण आणि सारथ्यावर दोन बाण सोडले. शिवाय तीन बाणांनी ध्वज तोडून टाकला. तेव्हा रुक्मीने दुसरे धनुष्य घेऊन श्रीकृष्णांवर पाच बाण सोडले. ते बाण लागल्यावर त्यांनी त्याचे तेही धनुष्य तोडून टाकले. नंतर रुक्मीने आणखी एक धनुष्य घेतले, परंतु अच्युतांनी तेही तोडून टाकले. रुक्मीने परिघ, पट्टिश, शूल, ढाल, तलवार, शक्ती, तोमर इत्यादी जी जी शस्त्रास्त्रे हातात घेतली, ती ती सर्व भगवंतांनी तोडून टाकली. तेव्हा संतापून रुक्मीने हातात तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने रथातून खाली उडी टाकली आणि पतंग जसा दिव्यावर झेप घेतो, त्याप्रमाणे त्याने त्यांच्यावर झेप घेतली. रुक्मी चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी त्याच्या ढाल-तलवारीचे तुकडे तुकडे केले आणि त्याला मारण्यासाठी म्हणून तीक्ष्ण तलवार हातात घेतली. आपले भावी पती भावाला मारू पाहात आहेत, हे पाहून रुक्मिणी भीतीने व्याकूळ झाली आणि पतींच्या चरणांवर लोटांगण घालून काकुळतीने म्हणाली. "हे देवदेवा ! हे जगत्पाते ! हे योगेश्वरा ! आपले स्वरूप कोणी जाणू शकत नाही. हे महापरक्रमी ! हे कल्याणस्वरूप ! आपण माझ्या भावाला मारू नये." (१८-३३)

श्रीशुक म्हणतात- रुक्मिणी भीतीने थरथर कापत होती. शोकामुळे तिचा चेहरा सुकला होता, गळा दाटून आला होता. भीतीमुळे सोन्याचा हार तिच्या गळ्यातून खाली पडला होता. अशा अवस्थेत तिने भगवंतांचे चरण पकडले. तेव्हा भगवंतांचे हृदय करुणेने द्रवले आणि त्यांनी रुक्मीला मारण्याचा विचार सोडून दिला. तरीसुद्धा मारण्याचा प्रयत्‍न करणार्‍या त्याला श्रीकृष्णांनी दुपट्ट्याने बांधून व त्याच्या दाढी-मिशांचे पाट काढून त्याला विद्रूप केले. तोपर्यंत यदुवीरांनी शत्रूच्या अद्‌भूत सेनेला हत्ती जसे कमळांचे ताटवे चुरगाळून टाकतो, त्याप्रमाणे छिन्नविछन्न करून टाकले. नंतर ते लोक तेथून माघारी फिरून श्रीकृष्णांच्याजवळ आले आणि पाहातात तर दुपट्ट्याने बांधलेला रुक्मी अर्धमेल्या अवस्थेत पडला आहे. त्याला पाहून भगवान बलरामांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला मोकळे केले. नंतर ते श्रीकृष्णांना म्हणाले. " हे कृष्णा ! तू हे चांगले केले नाहीस. असे करणे आम्हांला शोभत नाही. आपल्या नातलगाच्या दाढी-मिशा छाटून त्याला कुरूप करणे, हा तर एक प्रकारे त्याचा वधच होय." त्यानंतर रुक्मिणीला उद्देशून ते म्हाणाले- " हे पतिव्रते ! तुझ्या भावाला विद्रूप केले, म्हणून आमच्यावर तू रागावू नकोस. कारण जीवाला सुख-दु:ख देणारा दुसरा-तिसरा कोणी नसून त्याला स्वत:च्याच कर्माचे फळ भोगावे लागते." नंतर श्रीकृष्णाला म्हणाले- " कृष्णा ! आपल्या नातेवाईकाने वध करण्यायोग्य अपराध केला, तरीसुद्धा आपल्याकडून त्याचा वध होणे योग्य नाही. त्याला सोडून दिले पाहिजे. स्वत:च्या अपराधामुळे तो अगोदरच मेल्यासारखा झालेला असतो. मेलेल्याला पुन्हा काय मारणार ?" पुन्हा रुक्मिणीला म्हणाले- " हे पतिव्रते ! ब्रह्मदेवांनी क्षत्रियांचा धर्मच असा केला आहे की, भावानेसुद्धा आपल्या भावाला मारावे. म्हणून हा क्षात्रधर्म अत्यंत कठोर आहे. " नंतर श्रीकृष्णांना म्हणाले- " जे अभिमानी लोक संपत्तीच्या गर्वाने आंधळे झालेले असतात, ते राज्य, पृथ्वी, पैसा, स्त्री, मान, तेज किंवा अन्य कोणत्याही कारणाने आपल्या बांधवांचासुद्धा तिरस्कार करतात." (३४-४१)

पुन्हा ते रुक्मिणीला म्हणाले- " तुझा भाऊ सर्व प्राण्यांचा द्वेष करणारा आहे. त्याच्या कल्याणासाठीच आम्ही हा दंड त्याला दिला आहे; त्याला तू अज्ञानी लोकांप्रमाणे अनुचित मानीत असलीस, तर हा तुझ्या बुद्धीचा दोष आहे. हे देवी ! जे लोक भगवंतांच्या मायेने मोहित होऊन देहालाच आत्मा मानतात, त्यांनाच हा आपला मित्र, हा शत्रू आणि हा त्रयस्थ असा मोह होतो. देह धारण करणार्‍या सर्वांचा मायातीत आत्मा एकच आहे. पाणी, घडा या उपाधिभेदाने जसे सूर्य, चंद्र इत्यादी आणि आकाश एकच असून अनेक वाटतात, त्याचप्रमाणे मूर्ख लोक शरीरभेदाने आत्मा भिन्न आहे, असे मानतात. या शरीराला उत्पत्ती आणि नाश आहे. पंचमहाभूते, पंचप्राण, तन्मात्रा आणि त्रिगुण हे याचे स्वरूप आहे. देहाची अज्ञानामुळेच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केली गेलेली आहे आणि या कल्पनेनेच प्राणी जन्म-मृत्युच्या फेर्‍यात अडकतो. हे साध्वी ! डोळे आणि रूप ही दोन्हीही सूर्यामुळे प्रकाशित होतात. सूर्य हेच त्यांचे कारण आहे. म्हणून सूर्यापासून डोळे आणि रूपाचा कधी वियोग होत नाही की संयोग होत नाही. त्याचप्रमाणे सर्व जगाची सत्ता आत्मसत्तेमुळे प्रत्ययास येते, सर्व जगाचा प्रकाशक आत्माच आहे. तर मग आत्म्याशी दुसर्‍या असत् पदार्थांचा संयोग किंवा वियोग कसा होऊ शकेल ? जन्म घेणे, असणे, वाढणे, बदलणे, क्षीण होणे आणि मरणे हे सर्व विकार शरीराचेच असतात; आत्म्याचे नव्हेत. जसे कृष्णपक्षामध्ये कलांचा क्षय होतो, चंद्राचा नाही; परंतु अमावस्येच्या दिवशी लोक व्यवहारात चंद्राचाच क्षय झाला असे म्हणतात. त्याचप्रमाणे जन्म-मृत्यू इत्यादी सर्व विकार शरीराचेच असतात. परंतु भ्रमाने लोक त्याला आत्म्याचेच समजतात. जसा झोपलेला मनुष्य स्वप्नात कोणताही पदार्थ अस्तित्वात नसतानाही, भोगणारा, भोगली जाणारी वस्तू आणि भोगरूप फळांचा अनुभव घेतो. त्याचप्रमाणे अज्ञानी लोक खोट्या प्रपंचाचा खरा समजून अनुभव घेतात. म्हणून हे सुहास्यवदने ! अज्ञानामुळे होणार्‍या या शोकाचा त्याग कर. हा शोक अंत:करणाला उदास करतो, मोहित करतो. म्हणून तत्त्वज्ञानाने याला पूर्णपणे सोडून देऊन तू आपल्या स्वरूपात स्थिर हो. " (४२-४९)

श्रीशुक म्हणतात- बलरामांनी जेव्हा रुक्मिणीची अशी समजूत घातली, तेव्हा रुक्मिणीने मनातील कटुता काढून टाकून विवेकबुद्धीने मनाचे समाधान केले. शत्रूंनी ज्याचे सैन्य आणि तेज नाहीसे केले होते, त्या रुक्मीचे फक्त प्राणच वाचले होते. त्याचे मनोरथ धुळीला मिळाले. आपल्याला विद्रूप केले गेले, ही आठवण तो विसरू शकत नव्हता. म्हणून त्याने आपल्याला राहाण्यासाठी भोजकट नावाची एक मोठी नगरी वसविली. त्याने अगोदरच प्रतिज्ञा केली होती की, "दुर्बुद्धी कृष्णाला मारल्याशिवाय आणि आपल्या धाकट्या बहिणीला परत आणल्याशिवाय आपण कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही. " म्हणून रागाने तो तेथेच राहू लागला. (५०-५२)

परीक्षिता ! अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सर्व राजांना जिंकून रुक्मिणीला द्वारकेमध्ये आणून विधिपूर्वक तिचे पाणिग्रहण केले. हे राजन ! द्वारकेतील लोकांना यदुपती श्रीकृष्णांबद्दल अनन्य प्रेम होते. त्यामुळे तेथे घरोघर मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला. तेथील आनंदित झालेल्या स्त्री-पुरुषांनी रत्‍नांची चमकणारी कुंडले घातली होती. त्यांनी सुंदर पोषाख परिधान केलेल्या वधू-वरांना अनेक नजराणे अहेर म्हणून दिले. त्यावेळी द्वारकेत कोठे कोठे ध्वज उंच ठिकाणी फडकत होते. ठिकठिकाणी रंगीबेरंगी माळा, वस्त्रे आणि रत्‍नांची तोरणे बांधलेली होती. घरांच्या दारांवर मंगल वस्तू लावल्या होत्या. पाण्याने भरलेल्या कलशांनी, अगुरू आणि धुपाच्या सुगंधाने व दीपमाळांमुळे ती नगरी विलक्षण शोभून दिसत होती. अत्यंत जिवलग राजांना आमंत्रित केले होते. त्यांच्या उन्मत्त हत्तींच्या मदाच्या झिरपण्याने द्वारकेतील सडका भिजल्या होत्या. प्रत्येक दरवाजावर केळीचे खांब आणि सुपारीची झाडे लावलेली असल्याने ती नगरी विलक्षण सुंदर दिसत होती. त्या उत्सवात इकडे तिकडे घाईघाईने धावणार्‍या कुरू, सृंजय, कैकेय, विदर्भ, यदू आणि कुंती या वंशाचे लोक एकमेकांसमवेत आनंदोत्सव साजरा करीत होते. जिकडे तिकडे रुक्मिणीहरणाचा प्रसंग ऐकून व त्याचेच गुणगान ऐकून राजे आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. महाराज ! रुक्मिणीरूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासी स्त्री-पुरुषांना अत्यंत आनंद झाला. (५३-६०)

अध्याय चौपन्नावा समाप्त

GO TOP