|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५३ वा
रुक्मिणीहरण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - रुक्मिणीचा हा संदेश ऐकून श्रीकृष्ण ब्राह्मणाचा हात हातात घेऊन हसत हसत म्हणाले, श्रीभगवान म्हणाले- माझेही मन तिच्यातच लागून राहिल्यामुळे मला रात्री झोपसुद्धा लागत नाही. माझ्या द्वेषामुळे रुक्मीने माझ्याशी तिच्या विवाहाला विरोध केला आहे, हे मला माहीत आहे. परंतु मी त्या नीच क्षत्रियांना पराभूत करून माझ्यावर प्रेम करणार्या त्या सुंदर राजकुमारीला लाकडातून अग्निज्वाळा आणावी, तशी घेऊन येईन. (२-३) श्रीशुक म्हणतात- रुक्मिणीचा विवाहमुहूर्त जाणून श्रीकृष्णांनी सारथ्याला आज्ञा केली की, "दारुका ! ताबडतोब रथ जोड." शैब्य, सुग्रीव, मेगपुष्प आणि बलाहक नावाचे चार घोडे रथाला जुंपून तो रथ तेथे आणून, दारुक हात जोडून भगवंताच्या समोर उभा राहिला. श्रीकृष्णांनी ब्राह्मणाला अगोदर रथात बसवून नंतर आपणही बसले व त्या वेगवान घोड्यांच्या साह्याने एका रात्रीत काठेवाडातून विदर्भ देशाला जाऊन पोहोचले. (४-५) पुत्रप्रेमामुळे कुंडिननरेश भीष्मक, आपली कन्या शिशुपालाला देण्यासाठी विवाहाच्या उत्सवाची तयारी करीत होता. नगरातील राजमार्ग, चौक, झाडून साफ केले गेले होते. त्यांच्यावर सडा संमार्जन केले होते. रंगी बेरंगी ध्वज आणि पताका लावलेल्या होत्या. तोरणे बांधली गेली होती. (७-८) तेथील स्त्री-पुरुष पुष्पमाळा, अत्तरे, दागिने आणि निर्मल वस्त्रांनी नटले होते. तेथील वैभवसंपन्न महालांतून धुपाचा सुगंध दरवळत होता. परीक्षिता ! राजा भीष्मकाने देव, पितर आणि ब्राह्मणांचे विधिपूर्वक पूजन करून, पुण्याहवाचन करून ब्राह्मणांना भोजन घातले. शुभ्र दंतपंक्ती असणार्या राजकुमारीला मंगल स्नान घालून हातात लग्नकंकण बांधले. दोन नवीन वस्त्रे नेसविली आणि अंगावर उत्तमोत्तम अलंकार घातले. श्रेष्ठ ब्राह्मणांनी साम, ऋक् आणि यजुर्वेदातील मंत्रांनी तिच्यासाठी रक्षणकवच तयार केले. तसेच अथर्ववेदाच्या विद्वान पुरोहितांनी ग्रहशांतीसाठी हवन केले. शास्त्र जाणणार्या राजाने सोने, चांदी, वस्त्रे, तिळगूळ आणि गाई ब्राह्मणांना दान दिल्या. (९-१३) याचप्रकारे चेदिनरेश दमघोषानेसुद्धा आपला पुत्र शिशुपाल याचे मंत्रज्ञ ब्राह्मणांकडून विवाहासंबंधीचे मंगलविधी करविले. त्यानंतर तो मदरस वाहात असणार्या हत्तींचे दळ, सोन्याच्या हारांनी सजविलेले रथ, पायदळ आणि घोडेस्वारांची सेना बरोबर घेऊन कुंडिनपुरला जाऊन पोहोचला. विदर्भराज भीष्मकाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करून प्रथेनुसार त्यांचे पूजन केले. त्यानंतर, अगोदरच त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी आनंदाने त्यांची निवासाची व्यवस्था केली. त्यांच्याबरोबर शिशुपालाचे शाल्व, जरासंध, दंतवक्त्र, विदूरथ, पौंड्रक इत्यादी हजारो मित्रराजे आले होते. ते सर्वजण राम-कृष्णांचे शत्रू होते आणि रुक्मिणी शिशुपालालाच मिळावी, ह्यासाठी आले होते, त्यांनी अगोदरच निश्वय केला होता की, श्रीकृष्ण बलरामादी यादवांना आपल्याबरोबर आणून कन्येचे हरण करण्याचा प्रयत्न करील, तर सर्वांनी मिळून त्यांच्याशी लढाई करायची. त्या राजांनी याचसाठी आपापाली संपूर्ण सेना आणि वाहने बरोबर आणली होती. (१४-१९) शत्रुपक्षाच्या राजांच्या या तयारीची माहिती भगवान बलरामांना मिळाली आणि बंधू श्रीकृष्ण एकटाच राजकुमारीचे हरण करण्यासाठी गेला आहे, असेही जेव्हा त्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना तेथे लढाई होण्याची दाट शंका आली. बंधुप्रेमामुळे त्यांचे हृदय भरुन आले त्यामुळे ते लगेच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ अशी चतुरंग सेना बरोबर घेऊन कुंडिनपुराकडे गेले. (२०-२१) इकडे सुंदरी रुक्मिणी श्रीकृष्णांच्या आगमनाची प्रतिक्षा करीत होती. परंतु ब्राह्मणसुद्धा अजून परतला नाही, हे पाहून ती चिंतातुर झाली. " अहो ! माझ्या अभागिनीच्या विवाहाला आता फक्त एक रात्र शिल्लक राहिली, परंतु कमलनयन भगवान अजूनही आले नाहीत, याचे कारण कळत नाही. एवढेच काय, माझा संदेश घेऊन गेलेला ब्राह्मणसुद्धा अजून परतला नाही. विशुद्धस्वरुप श्रीकृष्ण माझ्यामध्ये काही दोष दिसल्यामुळेच माझे पाणिग्रहण करण्याचे ठरवूनही खात्रीने येथे आले नसतील. मीच अभागिनी आहे. त्यामुळेच विधाता आणि भगवान शंकरसुद्धा मला अनुकूल नाहीत, असे दिसते. रुद्रपत्नी गिरिराजकुमारी सती पार्वती देवीही माझ्यावर प्रसन्न नसावी." जिचे मन भगवंतांनी हिरावून घेतले होते, त्यांचाच विचार करता करता, "अजून वेळ आहे" असे म्हणून तिने आपले अश्रूंनी भरलेले डोळे मिटून घेतले. परीक्षिता ! श्रीकृष्णांच्या आगमनाची अशा प्रकारे वाट पाहणार्या रुक्मिणीची डावी मांडी, हात आणि डोळा फडफडू लागला. ही चिन्हे मनासारखे घडणार असल्याची सुचक होती. इतक्यात श्रीकृष्णांनी पाठविलेला तोच ब्राह्मण आला व त्याने राजकुमारीची अंतःपुरात भेट घेतली. ब्राह्मणाचा चेहरा प्रफुल्लित व निश्चिंत आहे असे पाहून लक्षणांवरून कार्यसिद्धी ओळखून प्रसन्नतेने स्मित करीत तिने ब्राह्मणाला विचारले. ब्राह्मणाने सांगितले की, " श्रीकृष्ण येथे आलेले असून त्यांनी तुम्हांला घेऊन जाण्याची सत्यप्रतिज्ञा केली आहे." ते आल्याचे कळताच रुक्मिणीचे हृदय आनंदाने भरून आले. त्याच्या मोबदल्यात त्याला देण्याजोगी कोणतीही गोष्ट न दिसल्याने तिने फक्त नमस्कार केला. लक्ष्मीचा ब्राह्मणाला नमस्कार म्हणजे जगातील सर्व संपत्ती त्याला देणेच नव्हे का ? (२२-३१) राम - कृष्ण आपल्या कन्येचा विवाह पाहाण्याच्या उत्सुकतेने आले आहेत, हे ऐकून भीष्मक मंगल वाद्ये वाजवीत, पूजेची सामग्री घेऊन, त्यांना सामोरा गेला. त्यानंतर मधुपर्क करून उत्तम वस्त्रे व उत्तमोत्तम भेटवस्तू देऊन विधिपूर्वक त्याने त्यांची पूजा केली. नंतर बुद्धीमान भीष्मकाने सेना व परिवारासह त्या दोघांची सर्व सामग्रींनी युक्त अशा निवासस्थानात राहाण्याची व्यवस्था केली आणि त्यांचा यथोचित आदरसत्कार केला. भीष्मकाकडे जे राजे आले होते, त्या सर्वांचे पराक्रम, वय, शौर्य, धन इत्यादी पाहून त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना सर्व वस्तू देऊन त्याने त्यांचा मोठा सत्कार केला. श्रीकृष्ण येथे आले आहेत, असे विदर्भ देशाच्या नागरिकांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते भगवंताच्या निवासस्थानी आले आणि त्यांनी आपल्या डोळ्यांच्या ओंजळींनी त्यांच्या मुखारविंदाच्या सौंदर्याचे आकंठ पान केले. ते आपापसात म्हणू लागले की, "रुक्मिणीच यांची पत्नी होण्यास योग्य आहे, दुसरी कोणी नव्हे आणि परमपवित्र असे हेच रुक्मिणीसाठी योग्य पती आहेत." आम्ही जर काही सत्कर्म केले असेल, तर त्रिलोकविधाता आमच्यावर प्रसन्न होवो आणि अशी कृपा करो की, श्रीकृष्णच रुक्मिणीचे पाणिग्रहण करो" (३२-३८) रुक्मिणीबद्दलच्या प्रेमामुळे जेव्हा नागरिक आपापसात असे बोलत होते, त्याचवेळी रुक्मिणी अंतःपुरातून बाहेर येऊन सैनिकांच्या पहार्यात देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघाली. श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मनःपूर्वक चिंतन करीत ती भवानीच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी पायीच निघाली. तिने मौन धारण केले होते आणि तिच्या माता व मैत्रिणी बरोबर होत्या. हातात शस्त्रास्त्रे घेतलेले शूर राजसैनिक, कवच अंगावर घालून, त्यांचे रक्षण करीत होते. त्यावेळी मृदंग, शंख, ढोल, तुतार्या आणि भेरी वाजत होत्या. (३९-४१) पुष्कळाशा ब्राह्मणपत्न्या, चंदन इत्यादी सुगंधी द्रव्ये लावून, गजरे घालून आणि वस्त्रालंकारांनी नटून थटून तिच्याबरोबर चालल्या होत्या. तसेच अनेक प्रकारचे नजराणे घेऊन हजारो वारांगना बरोबर चालल्या होत्या. गवई गात चालले होते, वाद्ये वाजविणारे वाद्ये वाजवीत चालले होते आणि सूत, मागध व भट वधूच्या चारी बाजूंनी त्यांची स्तुती गात चालले होते. देवीच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर रुक्मिणीने हात-पाय धुतले. आचमन केले. नंतर अंतर्बाह्य पवित्र होऊन शांत मनाने ती देवीजवळ जाऊन बसली. कर्मकांड जाणणार्या वृद्ध ब्राह्मणस्त्रिया तिच्याबरोबर होत्या. त्यांनी रुक्मिणीला शिवपार्वतींना वंदन करावयास लावले. तेव्हा रुक्मिणीने देवीला प्रार्थना केली, "हे अंबिके ! तुझ्या स्कंद व गणेश या पुत्रांसह मंगल करणार्या तुला मी वारंवार नमस्कार करीत आहे. भगवान श्रीकृष्णच माझे पती व्हावेत, असा मला वर दे." नंतर तिने पाणी, गंध, अक्षता, धूप, वस्त्रे, फुलांच्या माळा, फुले, अलंकार, अनेक प्रकारचे नैवेद्य, भेटवस्तू आणि आरती इत्यादी सामग्रींनी अंबिकादेवीची पूजा केली. त्यानंतर तिने वरील सामग्रीने तसेच मीठ, अनारसे, विडे, मंगळसूत्र, फले आणि ऊस यांनी सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रियांचेसुद्धा पूजन केले. तेव्हा ब्राह्मणस्त्रियांनी तिला आशीर्वादपूर्वक प्रसादमाला दिली आणि वधूनेही ब्राह्मणस्त्रिया व माता अंबिकेला नमस्कार करुन ती प्रसादमाला ग्रहण केली. नंतर मौन सोडून रत्नजडित अंगठीने शोभणार्या हाताने एका दासीचा हात धरून ती मंदिराच्या बाहेर पडली. (४२-५०) भगवंताच्या मायेप्रमाणे, तीही वीरांना मोहित करणारी होती. तिचा कटिप्रदेश सुंदर होता. मुखावर कुंडलांचे तेज झगमगत होते. त्या कुमारीने कमरेवर रत्नांचा कमरपट्टा धारण केला होता. वक्षःस्थळ काहीसे उभार होते, आणि तिची दृष्टी केसांच्या बटांमुळे काहीशी चंचल होत होती. (५१) तिच्या ओठांवर पवित्र हास्य होते. तिची दंतपंक्ती कुंदकळ्यांप्रमाणे शुभ्र होती, परंतु पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल असलेल्या ओठांच्या कांतीने लालसर दिसत होती. तिच्या पायांत नूपुर चमकत होते आणि त्यांचा रुणझुण आवाज होत होता. ती जेव्हा पायीच राजहंसाच्या गतीने चालली होती, तेव्हा तिला पाहून तेथे आलेले, युद्धात कीर्ती मिळवलेले वीरही मोहित झाले. कामदेवांच्या बाणांनी जणू त्यांचे हृदय विदिर्ण करून टाकले होते. अशाप्रकारे चालण्याच्या निमित्ताने रुक्मिणी आपले सौंदर्य श्रीहरींना अर्पण करीत होती. तिला पाहून तसेच मनमोकळे हास्य आणि लाजरी नजर यांनी ज्यांचे चित्त ठिकाणावर राहिले नाही, त्या राजांच्या हातातून शस्त्रास्त्रे गळून पडली व ते स्वतःसुद्धा रथ, हत्ती तसेच घोड्यांवरुन खाली जमिनीवर केव्हा पडले, त्यांना कळलेच नाही. अशा प्रकारे रुक्मिणी श्रीकृष्णांच्या प्राप्तीची पावले हळू हळू पुढे टाकीत होती. तिने आपल्या डाव्या हाताच्या बोटांनी केस बाजूला सारले आणि तिथे आलेल्या राजांकडे लज्जित नजरेने पाहिले. त्याचवेळी तिला श्रीकृष्णांचे दर्शन झाले. रथावर चढू पाहाणार्या त्या राजकन्येला श्रीकृष्णांनी, सर्व शत्रू पाहात असतानाच, गरुडाचे चिन्ह असलेल्या रथात बसविले आणि त्या राजांचा पराभव करून तिला नेले. यानंतर कोल्ह्यांच्या कळपातून सिंह ज्याप्रमाणे आपला भाग घेऊन जातो, त्याचप्रमाणे रुक्मिणीला घेऊन भगवान श्रीकृष्ण, बलराम इत्यादींसह तेथून निघून गेले. जरासंधाच्या पक्षाच्या अभिमानी राजांना त्यावेळी आपला हा केलेला मोठा पराभव आणि कीर्तींचा नाश सहन झाला नाही. ते म्हणू लागले - "अहो ! आम्हा धनुर्धरांच्या यशाचा धिक्कार असो ! या गवळ्यांच्या मुलांनी, सिंहाचा भाग हरिणांनी घेऊन जावा, त्याप्रमाणे आमचे यश हिरावून नेले." (५२-५७) अध्याय त्रेपन्नावा समाप्त |