श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५२ वा

द्वारकागमन, बलरामांचा विवाह व श्रीकृष्णांकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - अशा प्रकारे श्रीकृष्णांनी इक्ष्वाकुनंदन मुचुकुंदावर कृपा केली. नंतर त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि तो गुहेच्या बाहेर पडला. त्याने बाहेर येऊन पाहिले, तर माणसे, पशू, वेली आणि झाडे पहिल्यापेक्षा पुष्कळच लहान आकाराची झाली. त्यावरून कलियुग आले असे जाणून तो उत्तर दिशेकडे निघून गेला. तो तपश्चर्या, श्रद्धा, धैर्य आणि अनासक्तीने युक्त होता. तसेच संशयापासून मुक्त होता, आपले चित्त श्रीकृष्णांचे ठायी ठेवून तो गंधमादन पर्वतावर गेला. नर नारायणांचे निवासस्थान असलेल्या बदरिकाश्रमात जाऊन अतिशय शांत चित्ताने ऊन थंडी इत्यादी द्वंद्वे सहन करीत तो तपश्चर्येने भगवंतांची आराधना करू लागला. (१-४)

इकडे भगवान पुन्हा मथुरापुरीला परतले. कालयवनाच्या सेनेने अजूनपर्यंत तिला वेढा दिलेलाच होता. आता त्यांनी म्लेंच्छांच्या सेनेचा संहार केला आणि त्यांचे सर्व धन ते द्वारकेला घेऊन गेले. जेव्हा श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार माणसांवर आणि बैलावर लादून ते धन नेले जाऊ लागले, त्यावेळी मगधराज जरासंध पुन्हा तेवीस अक्षौहिणी सेना घेऊन आला. परीक्षिता ! शत्रुसेनेचा प्रचंड वेग पाहून राम-कृष्ण मनुष्यांसारखे त्यांच्या समोरून वेगाने पळू लागले. निर्भय असून सुद्धा जणू काही फार भ्यालो आहोत, असे भासवीत ते दोघे सगळे धन तेथेच सोडून पुष्कळ अंतरपर्यंत कमलदलाप्रमाणे कोमल पायांनीच पळू लागले. महाबली मगधराज ते पळून जात आहेत, असे पाहून मोठ्याने हसू लागला आणि आपल्या रथदळाने वेगाने त्यांचा पाठलाग करू लागला. कारण ईशवररूप त्यांचा प्रभाव व भाव त्याला ज्ञात नव्हता. पुष्कळ लांबपर्यंत पळण्यामुळे थकले आणि अतिश्य उंच अशा प्रवर्षण पर्वतावर चढले. तेथे नेहमीच मेघ पाऊस पाडीत असतात. परीक्षिता ! लपून राहिलेल्या त्यांचा ठावठिकाणा समजाला नाही, तेव्हा जरासंधाने इंधनाने भरलेल्या प्रवर्षण पर्वताला चारी बाजूंनी पेटवून दिले. तेव्हा दोन्ही भावांनी अतिशय वेगाने त्या चव्वेचाळीस कोस उंच पर्वताच्या जळत्या कड्यावरून एकदम खाली जमिनीवर उडी टाकली. राजन ~ जरासंधाला किंवा त्याच्या कोणत्याही सैनिकाला न दिसता ते दोघे यदुश्रेष्ठ तेथून निघून समुद्राने वेढलेल्या आपल्या द्वारकापुरीला परतले. जरासंधाला उगीचच वाटले की राम कृष्ण जळून गेले आणि मग तो आपली प्रचंड सेना माघारी फिरवून मगधदेशाकडे आला. (५-१४)

हे मी तुला अगोदरच सांगितले आहे की, आनर्त देशाचा राजा श्रीमान रैवत याने आपल्या रेवती नावाच्या कन्येचा विवाह ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने बलरामांशी लावून दिला होता. परिक्षिता ! भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा स्वयंवरासाठी आलेल्या शिशुपाल आणि त्याचे पक्षपाती असलेल्या शाल्व इत्यादी राजांना मोठ्या शौर्याने हरवून सगळ्यांचा देखत गरूडाने अमृत हरण केले त्याप्रमाणे विदर्भ देशाच्या राजकुमारी रुक्मिणीचे हरण केले आणि तिच्याशी विवाह केला. लक्ष्मीचा अवतार असलेली रुक्मिणी राजा भीष्मकाची कन्या होती. (१५-१७)

परीक्षिताने विचारले - मुनिवर्य ! आम्ही ऐकले आहे की, भगवान श्रीकृष्णांनी, भीष्मकनंदिनी सुंदरी रुक्मिणीदेवीशी राक्षसविधीने विवाह केला होता. आता मी हे सविस्तर ऐकू इच्छितो की,परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णांनी जरासंध, शाल्व इत्यादी राजांना जिंकून कोणत्या प्रकारे रुक्मिणीचे हरण केले ? हे ब्रह्मर्षे ! कोणता रसिक भक्त, पवित्र, मधुर, पापनाशक व नित्य नवीन वाटणार्‍या श्रीकृष्णकथा ऐकून तृप्त होईल ? (१८-२०)

श्रीशुक म्हणतात - महाराज भीष्मक विदर्भ देशाचा अधिपती होता. त्याला पाच पुत्र आणि एक सुंदर कन्या होती. थोरल्या पुत्राचे नाव रुक्मी होते. आणि धाकट्यांची नावे क्रमशः रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली अशी होती. सुशील रुक्मीणी यांची बहीण होती. रुक्मिणीने राजवाड्यात येणार्‍या अतिथींच्या तोंडून भगवान श्रीकृष्णांचे सौंदर्य, पराक्रम, गुण आणि वैभवाबद्दल प्रशंसा ऐकली, तेव्हा तिने निश्चय केला की, भगवान श्रीकृष्णच आपल्याला अनुरूप पती आहेत. श्रीकृष्णांनीसुद्धा बुद्धी, लक्षणे, उदारता, सौंदर्य, शील आणि इतरही गुणांमध्ये अद्वितीय अशीच रुक्मीणी आहे, हे जाणून स्वतःला अनुरूप अशा तिच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला. आपल्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णांशीच व्हावा, असेच रुक्मिणीच्या बांधवांनासुद्धा वाटत होते. परंतु रुक्मी श्रीकृष्णांचा द्वेष करीत असे. त्याने त्यांना विरोध करून शिशुपाल हाच आपल्या बहिणीसाठी योग्य वर ठरवला. (२१-२५)

सुंदरी रुक्मिणील जेव्हा हे समजले, तेव्हा ती अतिशय उदास झाली. विचारांती तिने एका विश्वासपात्र ब्रह्मणाला श्रीकृष्णांकडे ताबडतोब पाठविले. जेव्हा तो ब्राह्मण द्वारकापुरीत पोहोचला, तेव्हा द्वारपाल त्याला राजमहालात घेऊन गेले. तेथे त्याने आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत असे पाहिले. त्याला पाहताच ब्राह्मणांचे परम भक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या आसनावरून खाली उतरले आणि त्याला आसनावर बसवून जसे देव भगवंतांची पूजा करतात, तशीच त्यांनी त्याची पूजा केली. ब्राह्मणाचे भोजन व विश्रांती झाल्यावर संतांचे आश्रयस्थान असणारे भगवान त्याच्याजवळ गेले आणि आपल्या हातांनी त्याचे पाय चेपीत अत्यंत शांतपणे विचारू लागले. (२६-२९)

श्रीकृष्ण म्हणाले - " हे थोर ब्राह्मणा ! आपले चित्त नेहमी संतुष्ट असते ना ? आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या धर्माचे पालन करण्यात आपल्याला काही अडचण तर येत नाही ना ? जे काही मिळेल त्यातच जर ब्राह्मण संतुष्ट राहिला आणि आपल्या धर्मापासून तो च्युत झाला नाही, तर तो संतोषच त्याच्या सर्व कामना पूर्ण करतो. असंतुष्ट मनुष्य देवांचा राजा झाला तरी त्याला सुखासाठी एका लोकातून दुसर्‍या लोकात वारंवार भटकावे लागेल. परंतु संतुष्ट मनुष्य काहीही नसले तरी सर्व प्रकारच्या तापांपासून मुक्त होऊन सुखाने झोप घेऊ शकतो. सहजपणे प्राप्त झालेल्या वस्तूंमुळे जे संतुष्ट असतात, ज्यांचा स्वभाव संतांसारखा असतो आणि जे सर्व प्राण्यांचे परम हितैषी असतात, जे अहंकाररहित व शांत असतात, त्या ब्राह्मणांना मी सदैव मस्तक लववून नमस्कार करतो. हे ब्रह्मन ! राजाकडून आपल्याला सर्व प्रकारचे सुख मिळते ना ? ज्याच्या राज्यामध्ये प्रजेचे चांगल्या तर्‍हेने पालन होते आणि ती आनंदाने राहते, तो राजा मला प्रिय असतो. हे ब्रह्मन ! आपण कोठून, कोणत्या हेतूने आणि कोणती इच्छा मनात धरून एवढा अवघड मार्ग आक्रमण करून येथे आला आहात ? जर काही विशेष गुपित नसेल, तर आम्हांला सांगा. आम्ही आपले कोणते काम करावे ? लीलेनेच मनुष्यरूप धारण करणार्‍या भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा ब्राह्मणाला असे विचारले, तेव्हा त्याने त्यांना रुक्मिणीच्या विवाहाविषयी सांगितले. (त्याने भगवंतांना रुक्मिणीने दिलेले सातश्लोकी पत्र दिले. नंतर श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून तो ते वाचू लागला (३०-३६)

रुक्मिणींनी म्हटले आहे - " हे त्रिभुवनसुंदरा ! ऐकणार्‍या कानांमार्फत आपले गुण ज्याच्या हृदयात प्रवेश करून त्याचा त्रिविध ताप दूर करतात, तसेच जे आपले रूप डोळे असणार्‍या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देते, असे आपले गुण-सौंदर्य वर्णन ऐकून, हे अच्युता ! संकोच सोडून माझ्या चित्ताने आपल्या ठिकाणी प्रवेश केला आहे. हे मुकुंदा ! पुरुषोत्तमा ! कुल, शील, स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय , द्रव्य अशा कोणत्याही बाबतीत अद्वितीय असलेल्या व सर्वांचे मन मोहविणार्‍या आपल्याला कोणती कुलवती आणि धैर्यशील अशी श्रेष्ठ कन्या विवाहकाली पती म्हणून वरणार नाही ? म्हणून हे प्रभो ! आपल्याला पती म्हणून वरले नाही ? मी माझे सर्वस्व आपल्याला अर्पण केले आहे. आपण येथे येऊन माझा पत्‍नी म्हणून स्वीकार करा. हे कमलनयना ! आपल्यासारख्या वीराचा हा भाग, सिंहाचा वाटा कोल्ह्याने न्यावा, तसा शिशुपालाने येऊन पळवू नये. मी जर यापूर्वी जन्मजन्मांतरी पूर्त ( विहिरी, तलाव इत्यादी खोदणे ), इष्ट ( यज्ञादि करणे ), दान, नियम, व्रते करून तसेच देव, ब्राह्मण आणि गुरू इत्यादींच्या पूजेने भगवान परमेश्वरांची पूर्णपणे आराधना केली असेल, तर भगवान श्रीकृष्णांनी येऊन माझे पाणिग्रहण करावे, शिशुपालादी इतरांनी नव्हे. हे अजिता ! विवाहाच्या आदल्या दिवशी आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्तरूपाने या आणि नंतर सेनापतींसह शिशुपाल व जरासंधाची सेना बळाने उध्वस्त करून टाका आणि आपल्या शौर्याचे मोल देऊन, राक्षसविधीने माझे पाणिग्रहण करा. आपण जर असा विचार करीत असाल की, अंतःपुरात असणार्‍या माझ्याशी बंधूना न मारता विवाह कसा करावा ? तर मी आपणास एक उपाय सांगते. विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते, तीमधून नववधूला नगराबाहेर गिरिजादेवीच्या मंदिरात जावे लागते. हे कमलनयना ! शंकरासारखे मोठ- मोठे देवसुद्धा आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणकमलांच्या धुळीने स्नान करू इच्छितात. मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही, तर व्रते करून शरीराला कृश करून प्राणत्याग करीन. मग आपल्या कृपेसाठी शेकडो जन्म का घ्यावे लागेनात ! (३७-४३)

ब्राह्मण म्हणाला - हे यदुश्रेष्ठा ! रुक्मिणीचा हा अत्यंत गुप्त असा संदेश मी आपल्याकडे आणला आहे. यासंबंधी जे काही करावयाचे असेल, त्याबद्दल विचार करुन ताबडतोब त्यानुसार करा. (४४)

अध्याय बावन्नावा समाप्त

GO TOP