|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ५१ वा
कालयवनाचे भस्म व मुचुकुंदाची कथा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्ण मथुरा नगरीच्या मुख्य दरवाजातून उगवणार्या चंद्राप्रमाणे बाहेर पडले. त्यांचे श्यामल शरीर अत्यंत देखणे होते. त्यांनी रेशमी पीतांबर परिधान केला होता. त्यांच्या वक्षःस्थळावर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसत होते. गळ्यात कौस्तुभमणी झगमगत् होता. लांब व पिळदार असे चार हात होते. ताज्या कमळाप्रमाणे तांबूस नेत्र होते. नित्य आनंद ओसंडून वाहणारे, सुंदर गालांनी युक्त, चमकणारी मकराकृती कुंडले असलेले त्यांचे सुंदर मुखकमल पवित्र हास्याने शोभत होते. त्यांना पाहून कालयवनाचाही निश्चय झाला की, हाच पुरुष वासुदेव होय. कारण नारदांनी जी जी लक्षणे सांगितली होती - वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह, चार भुजा, कमलपुष्पाप्रमाणे नेत्र, गळ्यात वनमाला आणि अपार सौंदर्य, हे सर्व याच्याशी जुळणारे आहे. म्हणून हा दुसरा कोणी असू शकत नाही. यावेळी हा कोणतेही शस्त्र हातात न घेता पायीच निघाला आहे. तेव्हा आपण सुद्धा त्याच्याशी शस्त्राविनाच लढावे. (१-५) असा निश्चय करुन कालयवन श्रीकृष्णांच्या दिशेने धावत सुटला. त्यावेळी ते तोंड फिरवून रणभूमीवरून पळून जाऊ लागले आणि त्या योग्यांनाही दुर्लभ अशा प्रभूंना पकडण्यासाठी कालयवन त्यांच्या मागे मागे धावू लागाले. पावलोपावली स्वतः हातात सापडल्याचे भासवीत भगवान त्या यवनराजाला पुष्कळ लांब एका पर्वताच्या गुहेत घेऊन गेले. पाठीमागून (पळत येणारा ) कालयवन वारंवार हरकत घेत, "यदुवंशामध्ये जन्मलेल्या तुला पळून जाणे शोभत नाही", असे त्यांना टाकून बोलत त्यांच्या मागे मागे पळत होता. परंतु अजून त्याची पापे नष्ट झाली नव्हती, त्यामुळे भगवंतांना तो प्राप्त करून घेऊ शकला नाही. त्याच्या निंदेकडे लक्ष न देता भगवान त्या पर्वताच्या गुहेत शिरले. त्यांच्या पाठोपाठ कालयवनही गेला. तेथे त्याने एक दुसराच मनुष्य झोपल्याचे पाहिले. त्याला पाहून कालयवनाने विचार केला की, "हा मला इतक्या लांब घेऊन येऊन आता साळसुदपणाने झोपला आहे", तो श्रीकृष्ण आहे, असे वाटून त्या मूर्खाने त्याला जोरात एक लाथ मारली. तो पुरुष तेथे पुष्कळ दिवसांपासून झोपला होता. लाथेच्या तडाख्याने तो जागा झाला आणि हळू हळू त्याने आपले डोळे उघडले तो कालयवन उभा असल्याचे त्याला दिसले. परीक्षिता ! रागावलेल्या त्याची दृष्टी पडताच कालयवनाच्या शरीरातील अग्नी प्रज्वलित होऊन तो क्षणभरात जळून भस्मसात झाला. (६-१२) राजाने विचारले - ब्रह्मन ! ज्याच्या केवळ दृष्टिक्षेपाने कालयवन जळून भस्म झाला, तो पुरुष कोण होता ? तो कोणाचा पुत्र होता ? त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती होती ? तो पर्वताच्या गुहेत जाऊन का झोपला होता ? (१३) श्रीशुक म्हाणाले - तो इक्ष्वाकुवंशातील मांधात्याचा पुत्र मुचुकुंद होता. तो ब्राह्मणभक्त, सत्यप्रतिज्ञ महापुरुष होता. एकदा असुरांना भ्यालेल्या इंद्रादी देवांनी आपल्या रक्षणासाठी राजा मुचुकुंदाला प्रार्थना केली. तेव्हा त्यांचे पुष्कळ काळपर्यंत त्यांचे रक्षण केले. पुष्कळ दिवसांनंतर देवतांना जेव्हा कार्तिकेय सेनापती म्हणून मिळाले, तेव्हा ते मुचुकुंदाला म्हणाले- " राजन ! आमच्या रक्षणासाठी आपण पुष्कळ श्रम घेतले. आता विश्रांती घ्यावी. हे श्रेष्ठ वीरा ! आमचे रक्षण करता यावे म्हणून आपण मनुष्यलोकातील आपले निष्कंटक राज्य सोडून दिले. तसेच जीवनातील सर्व भोगांचाही त्याग केलात. आता आपले पुत्र, राण्या, बांधव आणि अमात्य, मंत्री, त्याचप्रमाणे त्यावेळच्या प्रजेपैकी कोणीही जिवंत नाही. सर्वांना काळाने गिळून टाकले. सर्व बलवानांपेक्षाही काळ बलवान आहे. तो स्वतः परम समर्थ, अविनाशी आणि भगवत्स्वरूप आहे. गवळी जसा जनावरांना आपल्या ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे काळ सहजपणे सगळ्या प्रजेला आपल्या अधीन ठेवतो. राजा ! आपले कल्याण असो. मोक्षाखेरीज आमच्याकडून कोणताही वर मागून घ्या. कारण मोक्ष देण्याचे सामर्थ्य फक्त अविनाशी भगवान विष्णूंपाशीच आहे. असे सांगितल्यावर परम यशस्वी मुचुकुंदाने देवांना नमस्कार केला आणि झोपेचा वर घेऊन, तो पर्वताच्या गुहेत जाऊन झोपला. त्यावेळी देवांनी सांगितले होते की, " हे राजा ! झोप घेत असताना जर एखाद्या अजाण माणसाने तुला मध्येच जागे केले, तर तो तुझ्या दृष्टीस पडताच त्याच क्षणी भस्म होऊन जाईल." (१४-२२) परीक्षिता ! कालयवनाला भस्मसात करून यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांनी बुद्धिमान मुचुकुंदाला दर्शन दिले. वर्षाकालीन मेघाप्रमाणे सावळे रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळी रेशमी पीतांबर परिधान केला होता, वक्षःस्थळावर श्रीवत्स चिन्ह होते आणि तेजस्वी कौस्तुभमण्याने ते शोभत होते. मकराकृती कुंडले कानात झगमगत होती. प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त नजर लोकांना आकर्षित करीत होती. अत्यंत देखणे तारुण्य, मदोन्मत्त सिंहाप्रमाणे निर्भय चाल ! अत्यंत बुद्धिमान राजा त्यांच्या तेजाने हतप्रभ झाला. तेजामुळे जवळ जाण्यासही कठीण अशा त्यांना भीतभीतच विचारले. (२३-२७) मुचुकुंद म्हणाला - " आपण कोण आहात ? काट्या कुट्यांनी भरलेल्या या निबिड जंगलात आपल्या कमलाप्रमाणे कोमल असणार्या चरणांनी का बरे फिरत आहात ? आणि या पर्वताच्या गुहेत येण्याचा आपला हेतू कोणता ? आपण सर्व तेजस्वी पुरुषांचे मूर्तिमंत तेज किंवा भगवान अग्निदेव किंवा सूर्य, चंद्र, देवराज इंद्र किंवा दुसरे कोणी लोकपाल आहात काय ? मला वाटते की, आपण तीन मुख्य देवांपैकी पुरुषोत्तम आहात; कारण दिवा ज्याप्रमाणे अंधार नाहीसा करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या अंगकांतीने या गुहेतील अंधार घालविला आहे. हे पुरुषश्रेष्त्ठ ! आपल्याला योग्य वाटत असेल, तर आम्हांला आपले जन्म, कर्म आणि गोत्र सांगा. कारण आम्ही ते ऐकण्यासाठी अंतःकरणापासून उत्सुक आहोत. हे पुरुषोत्तमा ! आम्ही इक्ष्वाकुवंशी क्षत्रिय आहोत. हे प्रभो, माझे नाव मुचुकुंद असून युवनाश्वनंदन मान्धात्याचा मी पुत्र होय. पुष्कळ दिवसांचे जाग्रण झाल्याने मी थकलो होतो. माझ्या सर्व इंद्रियांची शक्ती झोपेने हिरावून घेतली होती. म्हणून या निर्जन ठिकाणी मनसोक्त झोप घेत होतो. आताच मला कोणी तरी उठविले. (२८-३३) खात्रीने त्याच्या पापानेच त्याला जाळून टाकले. त्यानंतर शत्रूंचा नाश करणार्या, परम सुंदर अशा आपण मला दर्शन दिलेत. हे महाभागा ! सर्व प्राण्यांना आपण आदरणीय आहात. आपल्या असह्य तेजाने माझी शक्ती क्षीण झाली आहे. मी आपल्याला फार वेळ पाहू शकत नाही. राजा मुचुकुंद असे म्हणाला, तेव्हा सर्व प्राण्यांचे जीवनदाते भगवान हसत हसत मेघध्वनीप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले. (३४-३६) श्रीभगवान म्हणाले - मुचुकुंदा ! माझे जन्म, कर्मे आणि नामे हजारो आहेत. ती अनंत असल्याने मीही त्यांची गणती करू शकत नाही. एखादा पुरुष आपल्या अनेक जन्मांमध्ये पृथ्वीवरील धुळीचे कण मोजू शकेल, परंतु माझे जन्म, गुण, कर्मे आणि नामे यांची कधीच गणती करू शकणार नाही. हे राजा ! श्रेष्ठ ऋषीसुद्धा माझ्या तिन्ही कालांतील जन्म आणि कर्मांचे वर्णन करीत असतात, परंतु त्यांना त्यांचा अंत लागत नाही. असे असूनही राजा ! मी आपला वर्तमान जन्म, कर्मे आणि नामे तुला सांगतो, ऐक ! धर्माचे रक्षण आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या असुरांचा संहार करण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवांनी मला प्रार्थना केली होती. त्यानुसार मी यदुवंशामध्ये वसुदेवांच्या घरी अवतार ग्रहण केला आहे. मी वसुदेवांचा पुत्र असल्यामुळे लोक मला वासुदेव म्हणतात. आतापर्यंत मी कंसाच्या रूपाने जन्म घेतलेल्या कालनेमी, प्रलंब इत्यादी साधुद्रोही असुरांचा संहार केला आहे. राजन ! आणि हा कालयवन तुझी तीक्ष्ण दृष्टी पडताच भस्म झाला. तोच मी, तुझ्यावर कृपा करण्यासाठी या गुहेत आलो आहे. तू भक्तवत्सल अशा माझी यापूर्वी फार आराधना केली आहेस. म्हणून हे राजर्षे ! वर माग. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन. जो पुरुष मला शरण येतो, त्याला पुन्हा शोक करावा लागत नाही. (३७-४४) श्रीशुक म्हणतात - भगवान श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणाले, तेव्हा गर्गांच्या वाणीचे राजा मुचुकुंदाला स्मरण झाले आणि ते भगवान नारायण आहेत, हे जाणून अतिशय आनंदाने त्याने भगवंताच्या चरणांना प्रणाम केला आणि स्तुती केली.(४५) मुचुकुंद म्हणाला - हे प्रभो ! जगातील सर्व प्राणी आपल्या मायेने अत्यंत मोहीत होऊन राहिले आहेत. ते आपल्याला न भजल्याने अनर्थ होतो, हे जाणूनही आपले भजन करीत नाहीत. ते सुखासाठी सर्व दुःखांचे मूळ असलेल्या घरादारांत आसक्त होतात. अशा तर्हेने स्त्रिया आणि पुरुष परमार्थाला मुकतात. हे पुण्यशील प्रभो ! या कर्मभूमीत दुर्लभ असा निर्दोष मनुष्यजन्म कसाबसा अनायासे मिळूनही दुर्बुद्धी मनुष्य, पशूप्रमाणे संसाररूप अंधार्या विहिरीत पडून राहा्तो आणि भगवंताच्या चरणकमलांची उपासना करीत नाही. हे भगवान ! मी राजा होतो. राज्यलक्ष्मीच्या गर्वाने उन्मत्त झालेल्या या शरीरालाच आत्मा मानणार्या आणि पुत्र, पत्नी, खजिना तसेच पृथ्वीच्या लोभामध्येच गुंतलेल्या व त्यांचीच अखंड चिंता करणार्या माझ्या जीवनाचा हा अमूल्य समय अगदीच व्यर्थ गेला. मातीचा घडा किंवा भिंतीप्रमाणे असलेले हे शरीर, यालाच मी राजा समजलो होतो. अशा प्रकारे मदांध होऊन मी आपली पर्वा न करता रथ, हत्ती, घोडे, पायदळ आणि सेनापती यांना बरोबर घेऊन या पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत राहिलो. निरनिराळ्या कामांच्या चिंतेत पाहून बेसावध असलेल्या, विषयासक्त माणसाला नित्य सावध असणारे कालरुप आपण अचानक पकडता. जसा भुकेने व्याकुळ झालेला साप जीभ हालवीत बेसावध उंदराला पकडतो. जो आधी सोन्याचा रथावर किंवा मोठमोठ्या हत्तींवर बसून जात असे आणि स्वतःला राजा म्हणवीत असे, तेच शरीर नंतर आपल्या अटळ काळामुळे विष्ठा, किडे किंवा राखेचा ढीग बनते. हे प्रभो ! ज्याने सर्व दिशांवर विजय प्राप्त केला आहे आणि ज्याच्याशी लढणारा जगात कोणीही राहिला नाही, जो श्रेष्ठ सिंहासनावर बसतो आणि बरोबरीचे राजे ज्याच्या चरणांवर नम्र होतात, तोच पुरुष जेव्हा स्त्रियांकडे विषयमुख भोगण्यासाठी जातो, तेव्हा तो त्यांच्या हातचे खेळणे बनतो. एखादा मनुष्य विषयभोगांचा त्याग करून पुन्हा आपण सम्राट व्हावे, या इच्छेने दानादि पुण्ये, तपश्चर्या किंवा सत्कर्मे करतो, परंतु ज्याची तृष्णा वाढलेली असते, तो कधीच सुखी होऊ शकत नाही. हे भगवंता ! जन्म मृत्युरूप संसाराच्या चक्रात भटकणार्या जीवाची त्या चक्रातून बाहेर पडण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो आणि जेव्हा सत्संग प्राप्त होतो, त्याचवेळी संतांचे आश्रय, कार्य कारणरूप जगताचे एकमात्र स्वामी असलेल्या आपल्या ठिकाणी जीवाची बुद्धी स्थिर होते. भगवन ! मी तर असे समजतो की, आपण माझ्यावर कृपेचा वर्षाव केला आहे. कारण अनासक्त लोकसुद्धा फक्त त्याचीच प्रार्थना करीत असतात. हे भगवान ! मोक्ष देणार्या आपली आराधना करून कोणता शहाणा मनुष्य़ आपल्याला बांधणार्या संसारातील विषयांचा वर मागेल बरे ! (४६-५६) म्हणून हे प्रभो ! सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्याशी संबंध ठेवणार्या सर्व कामना सोडून मी फक्त, मायेशी किंचितही संबंध नसलेल्या, गुणातीत, अद्वितीय, चित्स्वरूप, परमपुरुष अशा आपणांस शरण आलो आहे. भगवन ! अनादि काळापासून मी या जगात आपल्या कर्मफळांच्या भोगाने त्रस्त झालो आहे. पुन्हा त्यांच्या वासनांनी तप्त झालो आहे. माझ्या इंद्रियरूप सहा शत्रूंची हाव कधीही संपत नाही. त्यामुळे मला क्षणभरसुद्धा शांती मिळत नाही. म्हणून आत्मज्ञान करुन देणार्या हे प्रभो ! आता मी आपल्या निर्भय, सत्यरूप आणि शोकरहित चरणकमलांना शरण आलो आहे. आपण माझे रक्षण करा. (५७-५८) श्रीकृष्ण म्हणाले - हे सार्वभौम महाराजा ! तुझी बुद्धी, अतिशय पवित्र आणि उच्च कोटीची आहे. मी तुला वर देण्याचे वारंवार प्रलोभन दाखविले, तरीसुद्धा ती कामनांनी चळली नाही, मी तुला जे वर देण्याचे प्रलोभन दाखविले, ते फक्त तुझ्या निश्चयाची परीक्षा घेण्यासाठी ! माझे जे अनन्य भक्त असतात, त्यांची बुद्धी कामनांमुळे कधीही सैरभैर होत नाही. जे लोक माझे भक्त नाहीत, ते प्राणायम इत्यादी साधनांनी मनाला वश करण्याचा कितीही प्रयत्न करोत, त्यांच्या वासना क्षीण होत नाहीत आणि हे राजन ! त्यांचे मन विषयांसाठी पुन्हा उचल खाते. तू आपले मन माझे ठिकाणी लाव आणि खुशाल पृथ्वीवर राहा. तुझी अखंड भक्ती नेहमी माझ्या ठिकाणी राहो. क्षत्रियधर्माचे आचरण करतेवेळी तू शिकार इत्यादी करताना जो पुष्कळ प्राण्यांचा वध केलास, त्याचे पाप आता एकाग्रचित्ताने माझी उपासना करीत तपश्चर्येने धुऊन टाक. राजन ! पुढच्या जन्मी तू ब्राह्मणकुळात जन्माला येशील आणि सर्व प्राण्यांचा परम सुहृद होशील आणि मला परमात्म्यालाच प्राप्त होशील. (५९-६४) अध्याय एक्कावन्नावा समाप्त |