श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५० वा

जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - अस्ती आणि प्राप्ती अशा कंसाच्या दोन राण्या होत्या. पतीच्या मृत्युने दुःखी झालेल्या त्या वडिलांच्या घरी गेल्या. मगधराज जरासंध हे त्यांचे वडील. त्यांनी दुःखी अंतःकरणाने त्यांना आपल्या वैधव्याचे कारण सांगितले. परीक्षिता ! ही अप्रिय बातमी ऐकून जरासंधाला दुःख झाले. परंतु नंतर त्याने क्रोधाने पृथ्वी यादवरहित करण्याचा निश्चय करून युद्धाची जंगी तयारी केली. तेवीस अक्षौहिणी सेनेसह यदूंची राजधानी असलेल्या मथुरेला त्याने चारी बाजूंनी वेढा दिला. (१-४)

श्रीकृष्णांनी पाहिले की, जरासंधाची सेना म्हणजे जणू खवळलेला समुद्रच ! त्याने आपल्या राजधानीला वेढा दिला असून आपले लोक भयभीत झाले आहेत. भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा भार उतरविण्यासाठीच मनुष्यावतार धारण केला होता. देशकालानुसार आपल्या अवताराचा उद्देश काय आहे याचा आता त्यांनी विचार केला. त्यांनी विचार केला की, जरासंधाने आपले मांडलिक असलेल्या सर्व राजांच्या पायदळ, घोडदळ, रथी आणि हत्तींनी युक्त अशा अनेक अक्षौहिणी सेना एकत्र केल्या आहेत. पृथ्वीला भार झालेल्या यांचा नाश करावा. परंतु जरासंधाला यावेळी मारता कामा नये, कारण तो जिवंत राहिल्यास पुन्हा असुरांची पुष्कळशी सेना घेऊन येईल. माझा अवतार पृथ्वीचा भार हलक करणे, सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा संहार करणे यासाठीच आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी वेळोवेळी मी अनेक शरीरे धारण करतो. (५-१०)

श्रीकृष्ण असा विचार करीत होते, तेवढ्यात सूर्याप्रमाणे तेजस्वी दोन रथ आकाशातून खाली उतरले. त्यांमध्ये युद्धाची सर्व सामग्री आणि दोन सारथी होते. त्याच वेळी भगवंताची दिव्य आणि सनातन आयुधेसुद्धा आपणहून तेथे आली. ती पाहून श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले, दादा ! यावेळी आपण रक्षण करीत असलेल्या यादवांवर मोठे संकट आले आहे. पहा ! हा आपला रथ आला आहे आणि ही आवडती आयुधे. आता आपण या रथावर आरूढ होऊन शत्रुसेनेचा संहार करा आणि आपल्या स्वजनांना या संकटापासून वाचवा. कारण हे भगवन ! साधूंचे कल्याण करण्यासाठी आपण अवतार धारण केला आहे. म्हणून आता आपण हा तेवीस अक्षौहिणी सेनारूप पृथ्वीचा प्रचंड भार नष्ट करा. श्रीकृष्ण आणि बलरामांनी असा निश्चय करून कवचे धारण केली व रथात बसून ते मथुरेतून निघाले. त्यावेळी त्यांनी आपापली आयुधे आणि थोडीशी सेनाही बरोबर घेतली. दारुक सारथी असलेल्या श्रीकृष्णांनी नगराबाहेर आल्यावर आपला पांचजन्य शंख वाजविला. तो नाद ऐकून शत्रुसेनेच्या हृदयात धडकी भरली. त्यांना पाहून मगधराज म्हणाला - "हे पुरुषधम कृष्णा ! तू अजून लहान आहेस. लपून छपून वावरणार्‍या तुझ्या एकट्याशी लढण्याची मला लाज वाटते. अरे मूर्खा ! तू तर आपल्या मामाचीच हत्या केली आहेस. म्हणूनही मी तुझ्याबरोबर लढू इच्छित नाही. जा, माझ्या समोरून निघून जा. हे बलरामा ! युद्धात मेल्याने स्वर्ग मिळतो, अशी जर तुझी श्रद्धा असेल, तर हिंमत दाखवून तू माझ्याशी लढ. आणि माझ्या बाणांनी छिन्नविछिन्न झालेले शरीरे येथे सोडून स्वर्गात जा किंवा शक्ती असेल तर मला मार." (११-१९)

श्रीभगवान म्हणाले, हे मगधराजा ! जे शूर असतात, ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवीत नाहीत; ते शौर्यच दाखवितात. पहा ! आता तुझा मृत्यु जवळ आला आहे. मरताना रोगी जसा बरळतो, तशी तुझी ही बडबड आहे. आम्ही तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. (२०)

श्रीशुक म्हणतात - जसा वारा ढगांनी सूर्याला आणि धुराने आगीला झाकून टाकतो, त्याचप्रमाणे जरासंधाने राम कृष्णांसमोर येऊन, आपल्या अत्यंत बलवान आणि अपार सेनेद्वारा त्यांना चारी बाजूंनी वेढले. इतके की, त्यांची सेना, रथ, ध्वज, घोडे आणि सारथीही दिसेनासे झाले. मथुरेतील स्त्रिया महालांच्या गच्च्या, वाडे आणि गोपुरांवर चढून युद्ध पाहात होत्या. युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा गरुड चिह्नांकित आणि बलरामांचा ताड चिह्नांकित ध्वज असलेले रथ त्यांना दिसले नाहीत, तेव्हा त्या शोकावेगाने मूर्च्छित होऊन पडल्या. श्रीकृष्णांनी शत्रुसेनेचे वीर आपल्या सेनेवर, जसे ढग पाण्याच्या थेंबांचा पाऊस पाडतात, त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव करीत आहेत आणि त्यामुळे आपल्या सेनेला अत्यंत पीडा होत आहे असे पाहिले, तेव्हा देव-दैत्यांना पूज्य असलेल्या शार्ङ्‍गधनुष्याचा टणत्कार केला. यानंतर ते भात्यातून बाण काढून, ते धनुष्याला लावून आणि धनुष्याची दोरी ओढून बाणांचा वर्षाव करू लागले. त्यावेळी त्यांचे ते धनुष्य इतक्या वेगाने फिरत होते, की जणू वेगाने फिरणारे जळते कोलीतच. अशाप्रकारे श्रीकृष्ण जरासंधाच्या हत्ती, घोडे, रथ आणि पायदल अशा चतुरंग सेनेचा संहार करू लागले. यामुळे मस्तके छिन्नविछिन्न झालेले हत्ती मरून पडू लागले. बाणांच्या वर्षावाने अनेक घोड्यांची डोकी धडापासून वेगळी झाली. रथदळांतील घोडे, ध्वज, सारथी आणि रथी नष्ट झाले आणि पायदळांतील सैनिकांचे हात, जांघा, मस्तके इत्यादी तुटून तेही खाली पडले. अत्यंत तेजस्वी अशा भगवान बलरामांनी त्या युद्धात मुसळाच्या प्रहाराने पुष्कळशा उन्मत्त शत्रूंना मारून व माणसे, हत्ती, घोडे यांना घायाळ करून त्यांच्या अंगांतून निघालेल्या रक्ताच्या शेकडो नद्या वाहविल्या. त्या नद्यांमध्ये माणसांचे तुटलेले हात हेच साप, माणसांची मस्तके हीच कासवे, मेलेले हत्ती ही बेटे आणि घोडे हे मगर होते. हात आणि जांघा माशांप्रमाणे, माणसांचे केस शेवाळाप्रमाणे, धनुष्ये तरंगांप्रमाणे दिसत होती. बहुमुल्य रत्‍ने आणि अलंकार दगड व वाळूप्रमाणे दिसत होते. त्या नद्या पाहून भित्री माणसे घाबरत होती आणि वीरांचा आपापसात उत्साह वाढत होता. परीक्षिता ! जरासंधाची ती सेना समुद्राप्रमाणे दुर्गम, भयावह आणि अपार होती. परंतु जगदीश्वर वसुदेवपुत्रांनी ती नष्ट करून टाकली. सेनेचा नाश करणे हा त्यांच्या दृष्टीने एक खेळच होता. जे अनंत गुणसागर भगवान लीलेने तिन्ही लोकांची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करतात, त्यांना शत्रूच्या सेनेचा असा नाश करणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही; परंतु जेव्हा ते मनुष्यावताराने अशी कृती करतात, तेव्हा तिचे वर्णन करणे योग्यच नाही का ? (२१-३०)

अशा प्रकारे जरासंधाची सर्व सेना मारली गेली. रथसुद्धा मोडून पडला. फक्त शरीरात प्राण शिल्लक राहिले. तेव्हा जसा एक सिंह दुसर्‍या सिंहाला पकडतो, तसे बलरामांनी वेगाने महाबली जरासंधाला पकडले. जरासंधाने शत्रुपक्षातील पुष्कळशा राजांचा वध केला होता. परंतु आज त्याला बलराम वरुणपाशाने आणि दोराने बांधीत होते. याला सोडून दिले, तर हा आणखी सेना आणील व तिचाही नाश करता येईल, असा विचार करून श्रीकृष्णानी बलरामांना अडवले. मोठे मोठे वीर जरासंधाचा सन्मान करीत. राम कृष्णांनी दया दाखवून आपल्याला सोडून दिले, याची त्याला लाज वाटली; त्याने तपश्वर्या करण्याचा निश्वय केला. परंतु वाटेत इतर राजांनी त्याला अडवून धर्मोपदेश, राजनीती व लौकिक दृष्टांत देऊन समजाविले की, यदूंकडून तुमचा पराभव हा केवळ प्रारब्धामुळेच झालेला आहे. सर्व मरण पावल्यावर बलरामांनी जरासंधाची उपेक्षा करून त्याला सोडून दिले. त्यामुळे अतिशय उदास होऊन तो मगधदेशी निघून गेला. (३१-३५)

भगवान श्रीकृष्णांच्या सेनेमध्ये कोणाचेच नुकसान झाले नाही आणि समुद्राप्रमाणे असणार्‍या जरासंधाच्या तेवीस अक्षौहिणी सेनेवर मात्र त्यांनी सहजगत्या विजय प्राप्त केला. त्यावेळी देवतांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले. जरासंधाच्या पराजयामुळे मथुरावासी भयमुक्त झाले होते आणि श्रीकृष्णांच्या विजयामुळे त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले होते. श्रीकृष्ण त्यांना येऊन भेटले, त्यावेळी सूत, मगध आणि बंदीजन त्यांच्या विजयाची गीते गात होते. श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश करताच शंख, नगारे, भेरी, तुतारी, वीणा, बासरी, मृदंग इत्यादी अनेक प्रकारची मंगल वाद्ये वाजू लागली. मथुरेतील रस्त्यांवर चंदनाचे सडे घातले होते. नागरिक आनंदोत्सव साजरा करीत होते. संपूर्ण नगर पताकांनी सजविले गेले होते. ब्राह्मणांचे वेदघोष घुमत होते आणि जिकडे तिकडे मंगलसूचक तोरणे बांधलेली दिसत होती. ज्यावेळी श्रीकृष्ण नगरात प्रवेश होते, त्यावेळी नगरातील स्त्रिया प्रेम आणि उत्कंठेने भरलेल्या नेत्रांनी त्यांना न्याहाळीत होत्या आणि फुले, दही, अक्षता, अंकुर यांचा त्यांच्यावर वर्षाव करीत होत्या. श्रीकृष्णांनी रणभूमीवरून अपरंपार धन आणि वीरांचे अलंकार दिले. (३६-४१)

अशा प्रकारे सतरा वेळा, दरवेळी तेवीस अक्षौहिणी सेना एकत्रित करून मगधराज जरासंधाने श्रीकृष्णांच्या छत्राखाली असलेल्या यादवांशी युद्ध केले. परंतु श्रीकृष्णांच्या प्रभावामुळे यादवांनी प्रत्येक वेळी सर्व सेना नष्ट केली. जेव्हा सर्व सेना नष्ट होत असे, त्यावेळी यादवांनी सोडून दिलेला जरासंध आपल्या राजधानीकडे परतत असे. (४२-४३)

जेव्हा अठरावे युद्ध होणार होते, त्याचवेळी नारदांनी पाठविलेला वीर कालयवन राम - कृष्णांच्या दृष्टीस पडला. युद्धामध्ये कालयवनासमोर उभा राहील असा दुसरा कोणताही वीर त्यावेळी जगात नव्ह्ता. यादव आपल्यासारखेच बलवान आहेत, हे ऐकून त्याने तीन कोटी म्लेंच्छ सेना आणून मथुरा नगरीला वेढा दिला. (४४-४५)

ते पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांनी विचार केला की, अहो ! यावेळी यादवांवर तर जरासंध आणि कालयवन या दोघांकडून एकाचवेळी संकट आले आहे. आज या अतिशय बलशाली यवनाने येऊन आम्हाला घेरले आहे. आणि जरासंधसुद्धा आज, उद्या किंवा परवा येईलच. जर आम्ही दोघेही याच्याबरोबर लढू लागलो आणि त्याचवेळी बलवान जरासंध येऊन पोहोचला, तर तो आमच्या बांधवांना मारील किंवा कैद करुन आपल्या नगरात घेऊन जाईल. म्हणून आज आम्ही अशा ठिकाणी एक नगर बांधू की, ज्यामध्ये कोणाही मनुष्याला प्रवेश करणे अवघड जाईल. नंतर आपल्या बांधवाना तेथे पोहोचवून या यवनाचा वध करवू. बलरामांशी अशा प्रकारे सल्लमसलत करुन श्रीकृष्णांनी समुद्राच्या आत मनुष्यांना जाण्यास कठीण असे एक नगर बनविले. त्यातील सर्वच वस्तू अद्‌भुत होत्या आणि त्या नगराची लांबी रुंदी शहाण्णव मैल होती. त्या नगरात सर्वत्र विश्वकर्म्याचे वास्तुज्ञान आणि शिल्पलकलेचे नैपुण्य प्रगट झाले होते. वास्तुशास्त्रानुसार सर्वत्र विश्वकर्म्याचे वास्तुज्ञान आणि शिल्पकलेचे नैपुण्य प्रगट झाले होते. वास्तुशास्त्रानुसार तेथे सडका, चौक आनि व्यापारी पेठा यांची रचना केली होती. देववृक्ष आणि वेली असलेली उद्याने व वैशिष्ट्यपूर्ण उपवनांनी युक्त असे ते नगर होते. सोन्याची शिखरे असलेले, स्फटिकांच्या गच्च्या आणि गगनचुंबी गोपुरे यांनी ते सुंदर दिसत होते. तेथे धान्य ठेवण्यासाठी चांदी पितळेची गोदामे होते. तेथील महाल सोन्याचे होते व त्यांवर सुवर्णकलश बसविलेले होते. त्यांची शिखरे रत्‍नांची होती आणि फरशी मोठमोठ्या पाचूंची बनविलेली होती. तसेच त्या नगरात वास्तुदेवतेचे मंदिर आणि सज्जेसुद्धा होते. चारही वर्णांचे लोक तेथे राहाणार होते. तसेच तेथे यादवप्रमुखांचे महालही उठून दिसत होते. (४६-५४)

इंद्राने त्यावेळी श्रीकृष्णांसाठी पारिजात वृक्ष आणि सुधर्मा सभा पाठविली. तेथे बसलेल्या मनुष्याला मर्त्यलोकातील दुःखांचा स्पर्श होत नसे. ज्यांचा एक एक कान काळा होता, असे मनोवेगाने धावणारे पांढरे घोडे वरुणाने पाठविले. धनपती कुबेराने आठ निधी पाठविले आनि अन्य लोकपालांनीसुद्धा स्वतःकडील महत्वाच्या संपत्ती भगवंतांकडे पाठविल्या. परीक्षिता ! लोकपालांना आपापली कामे करण्यासाठी श्रीकृष्णांनी जे जे दिले होते, ते ते सर्व श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतीर्ण झाले, तेव्हा त्यांनी त्यांना अर्पण केले. आपल्या योगमायेने श्रीकृष्णांनी सर्व संबंधितांना द्वारकेमध्ये नेऊन पोहोचचिले. उरलेल्या प्रजेच्या रक्षणासाठी बलरामांना मथुरापुरीत ठेवून त्यांच्या सल्ल्याने गळ्यात कमळांची माळ घालून, कोणतेही शस्त्र हातात न घेता ते स्वतः नगराच्या प्रमुख दरवाजातून बाहेर पडले.

अध्याय पन्नासावा समाप्त

GO TOP