|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४९ वा
अक्रूराचे हस्तिनापुरला गमन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- अक्रूर पुरूवंशी राजांच्या कीर्तीने मंडित असलेल्या हस्तिनापुरला गेला. तो तेथे धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती, बाल्हीक आणि त्याचा पुत्र सोमदत्त, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव व इतर इष्टमित्रांना भेटला. अक्रूर जेव्हा सर्व संबंधितांना आस्थेवाईकपणे भेटला, तेव्हा तेथील लोकांनी मथुरावासी स्वजनांची खुशाली त्याला विचारली. त्याचे उत्तर देऊन अक्रूरानेसुद्धा त्यांच्या खुशालीसंबंधी चौकशी केली. राजाचे पांडवांबरोबरचे वर्तन जाणून घेण्यासाठीच अक्रूर काही महिने तेथे राहिला. खरे पाहू गेले तर, आपल्या दुष्ट पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचे धाडस, शकुनी इत्यादी दुष्टांच्या सल्ल्यानुसार काम करणार्या धृतराष्ट्रामध्ये नव्हते. (१-४) धृतराष्ट्राचे दुर्योधन इत्यादी पुत्र पांडवांचा प्रभाव, शस्त्रकौशल्य, बल, शौर्य आणि विनय इत्यादी सद्गुण पाहून त्यांचा द्वेष करतात. प्रजा पांडवांवरच अधिक प्रेम करते, हेही त्यांना सहन होत नाही. म्हणून त्यांनी पांडवांवर विषप्रयोग इत्यादीकरून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. कुंतीने आणि विदुराने हे सारे अक्रूराला सांगितले. (५-६) अक्रूर जेव्हा कुंतीच्या घरी गेला, तेव्हा ती आपल्या भावाजवळ जाऊन बसली. अक्रूराला पाहून कुंतीच्या मनात आपल्या माहेराची आठवण जागी झाली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली. दादा ! माझे आई-वडील, भाऊ-बहीणी, पुतणे, इतर नातलग स्त्रिया आणि मैत्रिणी माझी आठवण काढतात का ? माझा भाचा भक्तवत्सल आणि शरण आलेल्यांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कमलनयन बलराम यांना आपल्या या आतेभावांची कधी आठवण येते का ? शत्रूंच्या गराड्यात असल्याने मी शोकाकुल आहे. लांडग्यांच्या कळपात हरिणी सापडावी, तशी माझी अवस्था आहे. श्रीकृष्ण कधी येथे येऊन माझे आणि या अनाथ बालकांचे सांत्वन करील काय ?" हे सच्चिदानंदस्वरूप श्रीकृष्णा ! तू महायोगी आहेस, विश्वात्मा आहेस आणि तूच सगळ्या विश्वाचा जीवनदाता आहेस. हे गोविंदा ! आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आले आहे. आमचे रक्षण कर ! हे जग मृत्यूने व्याप्त आहे आणि तुझे चरण मोक्ष देणारे आहेत. जे लोक या जगाला भ्यालेले आहेत, त्यांच्यासाठी शरण जाण्याला तुझ्या चरणांव्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताही आश्रय नाही. हे श्रीकृष्णा ! तू परम शुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस. सर्व योगांचा स्वामी असून तू स्वतः योगसुद्धा आहेस. तुला मी शरण आले आहे. तू माझे रक्षण कर." (७-१३) श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! तुझी पणजी कुंती अशा प्रकारे स्वजनांचे आणि जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन रडू लागली. अक्रूर आणि कीर्तीमान विदुर हे दोघेही सुख-दुःखाला समदृष्टीने पाहात होते. त्यांनी तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या देवतांचे तिला स्मरण करून देऊन तिचे सांत्वन केले. अक्रूर मथुरेला जाण्यासाठी निघाला, तेव्हा राजा धृतराष्ट्राकडे गेला. राजा आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता आणि पांडवांशी त्याचे वर्तन पुत्रांसारखे नव्हते. अक्रूराने सर्वां समक्ष श्रीकृष्णांचा मित्रत्वाचा संदेश त्याला पाठविला. (१४-१६) अक्रूर म्हणाला- कुरूंची कीर्ती वाढविणारे विचित्रवीर्यपुत्र महाराज धृतराष्ट्र ! आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण आता राज्यावर बसला आहात. आपण धर्मानुसार पृथ्वीचे पालन करावे. सदाचरणाने प्रजेला प्रसन्न ठेवावे आणि स्वजनां-बरोबर समान वर्तन ठेवावे. असे करण्याने आपल्याला लोकांमध्ये यश आणि परलोकी सद्गती प्राप्त होईल. आपण जर याच्या विपरीत आचरण कराल, तर या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर नरकात जावे लागेल; म्हणून आपले पुत्र आणि पांडव या दोघांशीही समानतेने वागा. आपल्याला माहीतच आहे की, या जगात कधीही, कोणीही, कोणाहीबरोबर कायमचा राहू शकत नाही. राजन ! हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे. तर मग स्त्री-पुत्रादिकांविषयी काय सांगावे ? जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो. आपल्या कर्मानुसार पाप-पुण्याचे फळसुद्धा एकटाच भोगतो. "आमचे पालन-पोषण करणे हा तुमचा धर्मच आहे" असे म्हणून अधर्माने मिळविलेले मूर्खाचे धन स्वजन लुटतात. जसे पाण्यात राहाणार्या जंतूंचे सर्वस्व असलेले पाणी त्यांचे संबंधितच संपवून टाकतात. जो माणूस, आपले समजून ज्यांचे अधर्मानेही पालनपोषण करतो, तेच प्राण, धन, पुत्र इत्यादी त्या मूर्खाला त्याच्या इच्छा अपुर्या ठेवूनच निघून जातात. खरे म्हणाल तर, जो आपल्या धर्माला विन्मुख आहे, त्याला व्यावहारिक स्वार्थसुद्धा समजत नाही. ज्यांच्यासाठी तो अधर्म आचरतो, ते तर त्याला वार्यावर सोडतातच, शिवाय त्याला कधीच समाधान लाभत नाही आणि शेवटी तो घोर नरकात जातो. म्हणून महाराज ! हा संसार म्हणजे स्वप्न, जादू किंवा मनोराज्यासारखा आहे, असे समजून स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवून समत्वामध्ये स्थिर राहा आणि शांत व्हा. (१७-२५) धृतराष्ट्र म्हणाला - हे उत्तम सल्ला देणारे अक्रूर महोदय ! आपण माझ्या कल्याणाचीच गोष्ट सांगत आहात. मनुष्याला अमृत मिळाले, तर तो जसा तृप्त होत नाही, त्याचप्रमाणे मी सुद्धा आपल्या या उपदेशाने अजूनही तृप्त झालो नाही. असे असूनही, हे साधो ! आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश, माझ्या चंचल चित्तात स्थिर होत नाही. कारण पुत्रांच्या ममतेमुळे माझे मन विषम झाले आहे. जशी स्फटिकमय पर्वतावर चमकलेली वीज दुसर्याच क्षणी दिसेनाशी होते, तीच दशा आपल्या उपदेशाच्या बाबतीत होत आहे. सर्वशक्तिमान भगवान पृथ्वीवरील भार उतरविण्या-साठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. त्यांच्या विधानामध्ये कोण बदल करू शकेल ? (त्यांची जशी इच्छा असेल, तसेच होईल.) भगवंतांच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे. त्या मायेच्या द्वाराच ते या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करतात आणि कर्म व कर्मफलाची वाटणी करतात. या जगच्चक्राच्या निर्वैध चालीमागे त्यांच्या अचिंत्य लीलाशक्ती व्यतिरिक्त दुसरे कोणतेच कारण नाही. त्याच परमैश्वर्यशाली प्रभूंना मी नमस्कार करतो. (२६-२९) श्रीशुक म्हणतात - अशाप्रकारे धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन आणि स्वजन संबंधितांचा निरोप घेऊन अक्रूर मथुरेला परतला. (३०) परीक्षिता ! तेथे त्याने राम-कृष्णांना धृतराष्ट्राचे पांडवांशी असलेले वर्तन सांगितले. कारण त्याला त्यासाठीच हस्तिनापुरला पाठविले होते. (३१) अध्याय एकोणपन्नासावा समाप्त |