श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४६ वा

उद्धवाचे व्रजगमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात- उद्धव हा एक वृष्णींचा श्रेष्ठ मंत्री होता. तो साक्षात बृहस्पतींचा शिष्य असून अतिशय बुद्धिमान होता. तसाच तो श्रीकृष्णांचा प्रिय मित्रही होता. शरणागतांची सर्व दुःखे नाहीशी करणारे भगवान श्रीकृष्ण एके दिवशी आपला अनन्य प्रिय भक्त उद्धव याचा हात हातात घेऊन म्हणाले. " हे सौ‍म्य उद्धवा ! तू व्रजामध्ये जा. तेथे जाऊन माझ्या माता-पित्यांना आनंदित कर. तसेच माझा विरह झाल्याने गोपींना जे दुःख झाले, ते त्यांना माझा निरोप सांगून दूर कर. गोपींचे मन-प्राण नित्य माझ्यामध्येच लागून राहिलेले आहेत. त्यांचे जीवन, त्यांचे सर्वस्व, मीच आहे. माझ्यासाठी त्यांनी आपले पती, पुत्र इत्यादींना सोडले आहे. त्यांनी मनानेसुद्धा मलाच आपला प्रियतम मानले आहे. ज्यांनी माझ्यासाठी लौकिक पारलौकिक धर्म सोडून दिले, त्यांचे पालन-पोषण मी करतो. प्रिय उद्धवा ! त्या गोपींचा परम प्रियतम मी येथे दूर आल्यामुळे माझे स्मरण होऊन त्यांची शुद्ध हरपते. माझ्या विरहामुळे माझ्या भेटीची उत्कंठा वाढून त्या व्याकूळ होत असतात. तन्मय झालेल्या माझ्या गोपी , "मी येईन" , असे सांगितल्यामुळेच अत्यंत कष्टाने कसेबसे आपले प्राण धरून आहेत. (१-६)

श्रीशुक म्हणतात- राजा ! श्रीकृष्ण असे म्हणाले, तेव्हा अत्यंत आदरपूर्वक उद्धव आपल्या स्वामींचा संदेश घेऊन रथावर आरूढ होऊन नंदगोकुळाकडे निघाला. उद्धव सूर्यास्ताच्या वेळी नंदांच्या व्रजामध्ये पोहोचला. त्यावेळी परत येणार्‍या गुरांच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीने त्याचा रथ झाकून गेला होता. (७-८)

व्रजभूमीमध्ये माजावर आलेल्या गाईंसाठी माजलेले बैल आपापसात झुंजत होते. त्यांच्या हंबरण्याने व्रजभूमी दुमदुमून गेली होती. नुकत्याच व्यालेल्या गाई भरलेल्या सडांनिशी आपपल्या वासरांकडे धावत निघाल्या होत्या. इकडे तिकडे उड्या मारणार्‍या पांढर्‍या वासरांनी गोकुळ शोभत होते. गायींच्या धारा काढण्याचा आवाज आणि वेणूंचा मधुर आवाज ऐकू येत होता. तेथे सुंदर वस्त्रालंकार घातलेल्या गोपी व गोप श्रीकृष्ण-बलरामांच्या मंगलमय चरित्रांचे गायन करीत होते. त्यामुळे ते गोकुळ अधिक शोभत होते. तेथे गोपांच्या घरांमध्ये अग्नी, सूर्य, अतिथी, गाई, ब्राह्मण आणि देवतापितरांची धूप, दीप, फुले इत्यादींनी पूजा होत होती. त्यामुळे सगळा व्रज मनोरम दिसत होता. चारी बाजूंनी वने फुलांनी लहडलेली होती. पक्षी किलबिलाट करीत होते आणि भुंगे गुणगुणत होते. तेथील जलाशय कमळांच्या ताटव्यांनी व हंस, करडुवा इत्यादी पक्ष्यांनी शोभत होते. (९-१३)

श्रीकृष्णांचा प्रिय भक्त उद्धव जेव्हा व्रजामध्ये आला, तेव्हा त्याची भेट घेऊन नंद अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आलिंगन देऊन त्याचा श्रीकृष्ण समजून सन्मान केला. त्याला पक्वान्नाचे भोजन वाढले. नंतर तो आरामात पलंगावर पहुडला, तेव्हा त्याचे पाय वगैरे चेपून त्याचा प्रवासाचा शीण दूर केला. नंतर नंदांनी त्याला विचारले, "हे भाग्यवान उद्धवा ! आमचा मित्र वसुदेव आता तुरुंगातून मुक्त झाला. तो सुहृद, पुत्र इत्यादींसह खुशाल आहे ना ?" आपणच केलेल्या पापांचे फळ म्हणून पापी कंस अनुयायांसह मारला गेला, हे छान झाले ! कारण तो धार्मिक व सच्छिल यदुवंशियांचा नेहमी द्वेष करीत असे. बरे तर ! उद्धवा ! श्रीकृष्णाला आम्हा लोकांची कधी आठवण येते का ? येथे त्याची आई आहे. हितचिंतक, मित्र असे गोप आहेत. त्यांनाच आपले स्वामी मानणारे हे व्रजातील लोक आहेत, गाई, वृंदावन आणि हा गोवर्धनही आहे. या सर्वांची त्याला कधी आठवण येते का ? (१४-१८)

आपल्या बांधवांना भेटण्यासाठी आमचा गोविंद एकदा तरी इकडे येईल का ? तो जर येथे आला, तर आम्ही त्याचे ते सुंदर नाक असलेले व सुहास्य नजरेने पाहणारे मुखकमल पाहू शकू ! उदारहृदयी श्रीकृष्णाने जे टाळण्याचा आमच्याकडे काहीही उपाय नव्हता, त्या वणवा, तुफान, पाऊस, वृषासुर, अजगर इत्यादी मृत्यूंच्या अनेक प्रसंगातून आमचे रक्षण केले. उद्धवा ! आम्हांला श्रीकृष्णांचे पराक्रम, विलासपूर्व नेत्रकटाक्ष, मनोहर हास्य, मधुर भाषण इत्यादीची आठवण येते, तेव्हा आमची दुसरी कामे थांबतात. श्रीकृष्णाच्या चरणचिन्हांनी विभूषित झालेली नदी, पर्वत, वने, क्रीडांगणे इत्यादी आम्ही पाहू लागतो, तेव्हा आमचे मन तन्मय होऊन जाते. देवांच्या महान कार्यासाठी येथे अवतरलेले राम-कृष्ण हे श्रेष्ठ आहेत, असे मी मानतो. कारण गर्गाचार्यांनी मला तसे सांगितले होते. सिंह जसा पशूंना सहज मारतो, त्याचप्रमाणे त्यांनी दहा हजार हत्तींचे बळ असणारा कंस, त्याचे दोन पहिलवान आणि गजराज कुवलयापीड यांना सहज मारले. हत्तीने एखादी काठी मोडावी, त्याप्रमाणे त्याने तीन ताड लांब असे अत्यंत बळकट धनुष्य तोडले. तसेच एकाच हाताने सात दिवसपर्यंत पर्वत उचलून धरला. ज्यांनी सुरासुरांवर विजय मिळविला होता, त्या प्रलंब, धेनुक, अरिष्ट, तृणावर्त, बक इत्यादी दैत्यांना त्याने सहज मारले. (१९-२६)

श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्णांच्या प्रेमात रंगून गेलेले नंद अशाप्रकारे जेव्हा त्यांच्या एकेका लीलेचे स्मरण करू लागले, तेव्हा त्यांच्या प्रेमाला पूर आला. त्यामुळे ते व्याकूळ झाले आणि उत्कंठा अतिशय वाढल्यामुळे शेवटी स्तब्ध झाले. नंद सांगत असलेल्या श्रीकृष्णाच्या लीला ऐकून यशोदेच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते आणि पुत्र-स्नेहामुळे तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा वाहात होत्या. नंद आणि यशोदा यांचे श्रीकृष्णाबद्दलचे प्रगाढ प्रेम पाहून उद्धव आनंदमग्न होऊन त्यांना म्हणाला. (२७-२९)

उद्धव म्हणाला- हे मान्यवर ! चराचराचे गुरु असणार्‍या नारायणांबद्‍दल आपल्या मनात इतका प्रेमभाव आहे, म्हणून आपण दोघे सर्वांमध्ये अत्यंत भाग्यवान आहात, यात संशय नाही. बलराम आणि श्रीकृष्ण पुराणपुरुष आहेत, ते सार्‍या विश्वाचे उपादानकारण आणि निमित्तकारणही आहेत. पुरुष आणि प्रकृति तेच आहेत. हेच दोघेजण सगळ्यांच्या शरीरांत प्रवेश करुन त्या शरीरांमध्ये राहणार्‍या प्रकृतिहून निराळ्या ज्ञानस्वरुप जीवाचे नियमन करतात. जो जीव मृत्युच्यावेळी आपले शुद्ध मन क्षणभर का होईना, त्यांचे ठिकाणी एकाग्र करतो, तो सर्व कर्मवासनांना धुऊन टाकतो आणि लगेच सूर्याप्रमाणे तेजस्वी असा ब्रह्ममय होऊन मोक्ष प्राप्त करुन घेतो. जे सर्वांचे आत्मा आणि परम कारण आहेत, ते नारायणच दुष्टनिर्दालन व साधुरक्षण करण्यासाठी मनुष्यासारखे शरीर धारण करुन येथे प्रगट झाले आहेत. हे महात्म्यांनो ! त्यांच्या ठिकाणीच असा सुदृढ प्रेमभाव धारण करा. मग आपल्या दोघांना कोणते शुभ कर्म करावयाचे शिल्लक राहणार आहे? भक्तवत्सल यदुकुलश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण थोड्याच दिवसात व्रजामध्ये येतील आणि आपणा दोघा आई-वडिलांना आनंदित करतील. सर्व यादवांचा शत्रु असणार्‍या कंसाला आखाड्यात मारुन, आपल्याजवळ येऊन कृष्णांनी जे म्हटले, ते म्हणणे ते खरे करतील. हे भाग्यशाली मातपित्यांनो ! खेद करु नका. तुम्ही श्रीकृष्णांना आपल्याजवळच पाहाल. कारण, जसा लाकडामध्ये अग्नी नेहमी व्यापून असतो, त्याचप्रमाणे ते सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये नेहमी विराजमान असतात. (३०-३६)

त्यांना अभिमान नसल्याकारणाने त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही. त्यांचा सर्वांमध्ये समभाव असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने कोणी उत्तम नाही की कोणी अधम नाही. एवढेच काय, त्यांच्याशी शत्रुत्व करणाराही त्यांचा शत्रु नाही. त्यांचे कोणी माता-पिता नाहीत किंवा पत्‍नी-पुत्र नाहीत. त्यांना कोणी आपला नाही कि परका नाही. तसाच देह नाही कि जन्मही नाही. या लोकी त्यांना कोणतेही कर्तव्य नाही. तरीसुद्धा ते सज्जनांच्या संरक्षणासाठी, लीला म्हणून देव इत्यादी सात्विक, मत्स्य इत्यादी तामस, तसेच मनुष्य इत्यादी मिश्र योनींत शरीर धारण करतात. भगवान अजन्मा व गुणांपासून अलिप्त असूनही लीला करण्यासाठी सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करुन त्यांच्याद्वारा जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. ज्याप्रमाणे मनुष्य वेगाने गोल फिरतो, तेव्हा सगळी पृथ्वी फिरते असे त्याला वाटते, त्याप्रमाणे सर्व काही करणारे चित्तच असूनही, त्या चित्तामध्ये अहंबुद्धी असल्याकारणाने, भ्रमाने आत्मा स्वतःलाच कर्ता समजू लागतो. भगवान श्रीकृष्ण हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नाहीत, तर ते सर्व प्राण्यांचे आत्मा, पुत्र, पिता, माता आणि स्वामीसुद्धा आहेत. जे काही पाहिले किंवा ऐकले जाते, मग ते भूतकाळ, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळाशी संबंधित असो, स्थावर असो की जंगम, महान असो की लहान, अशी कोणतीच वस्तू नाही की, जी श्रीकृष्णांपासून वेगळी आहे. त्यांच्याव्यतिरिक्त खरे पाहता, कोणतीच वस्तू नाही. वास्तविक सत्य फक्त तेच आहेत. (३७-४३)

परीक्षिता ! उद्धव आणि नंद अशाप्रकारे आपापसात गोष्टी करीत असता रात्र संपून गेली. पहाटे गोपी उठल्या. दिवे लावून त्यांनी वास्तुदेवतेचे पूजन केले आणि नंतर त्या दही घुसळु लागल्या. गोपींच्या हातांतील बांगड्या दोरी ओढताना चमकत होत्या. त्यांचे नितंब, स्तन आणि गळ्यातील हार हालत होते. हालणारी कुंडले, त्यांच्या कुंकुममंडित गालांची लाली वाढवीत होती. त्यांच्या अलंकारांतील रत्‍ने दिव्यांच्या प्रकाशाने अधिकच झगमगत होती. त्यावेळी गोपी, कमलनयन श्रीकृष्णांच्या चरित्रांचे मोठ्याने गायन करीत होत्या. त्यांचे ते गाणे दही घुसळण्याच्या आवाजात मिसळून स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचले. त्या स्वरलहरी सगळीकडे पसरुन सर्व दिशांचे अमंगल नाहीसे करीत. (४४-४६)

जेव्हा भगवान सूर्यनारायणांचा उदय झाला, तेव्हा नंदांच्या दरवाजासमोर एक सोन्याचा रथ उभा असल्याचे व्रजांगनांनी पाहिले. "हा कोणाचा रथ आहे ?" असे त्या एकमेकींना विचारु लागल्या. एक गोपी म्हणाली, "कंसाचा हेतू साध्य करण्यासाठी कमलनयन श्यामसुंदरांना येथून मथुरेला घेऊन जाणारा अक्रूर तर पुन्हा आला नाही ना ?" व्रजवासिनी स्त्रिया अशाप्रकारे आपापसात बोलत होत्या. तेवढ्यात नित्यकर्मे आटोपून उद्धव येऊन पोहोचला. (४७-४९)

अध्याय सेहेचाळिसावा समाप्त

GO TOP