श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४७ वा

उद्धव व गोपिंचा संवाद आणि भ्रमरगीत -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - गोपींनी श्रीकृष्णांचा सेवक असलेल्या उद्धवाला पाहिले. त्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते. ताज्या कमलदलाप्रमाणे प्रसन्न नेत्र होते. त्याने पीतांबर धारण केला होता. त्याच्या गळ्यात कमळांची माळ व कानांमध्ये रत्‍नजडित कुंडले झगमगत होती आणि मुखकमल प्रफुल्लित होते. गोपी आपापसात म्हणू लागल्या, "हा पुरुष अतिशय देखणा आहे. परंतु हा आहे कोण ? कोठून आला ? कोणाचा दूत आहे ? याने श्रीकृष्णांसारखी वेषभूषा धारण केली आहे ?" हे सर्व जाणून घेण्यासाठी गोपी उत्सुक झाल्या आणि पवित्रकीर्ती श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रित असणार्‍या उद्धवाला चारी बाजूंनी घेरून पवित्र स्मित करीत उभ्या राहिल्या. हा रमारमणांचा संदेश घेऊन आला आहे, असे जेव्हा त्यांना समजले, तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे, लज्जेने स्मित हास्य करीत त्याच्याकडे पाहून मधुर भाषणाने त्याचा चांगला सत्कार केला आणि एकांतात तो आसनावर बसल्यावर त्याला त्यांनी विचारले, "उद्धवा ! आपण यदुनाथांचे दूत आहात. आपल्या स्वामींनी, त्यांच्या माता-पित्यांना खुशाली कळविण्यासाठी आपल्याला येथे पाठविले आहे, हे आम्हांला कळले. नाहीतर, आता या गोकुळात त्यांना आठवण यावी, अशी दुसरी वस्तू आम्हांला दिसत नाही. बांधवांवरचे प्रेम मुनीलासुद्धा सोडणे कठीण असते. मातापित्यांखेरीज इतरांबरोबर प्रेम-संबंधाचे जे सोंग आणले जाते, ते स्वार्थासाठीच असते. जसे भ्रमरांचे फुलांवर प्रेम असते तसेच पुरुषांचे स्त्रियांवरील प्रेम. धन संपलेल्या माणसाला गणिका, रक्षण करु न शकणार्‍या राजाला प्रजा, शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला आणि दक्षिणा मिळाली की ऋत्विज यजमानाला सोडून देतात. पक्षी फळे नसलेल्या झाडाला, भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला, पशू जळलेल्या जंगलाला आणि जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून जातात. गोपींचे मन, वाणी आणि शरीर श्रीकृष्णांमध्येच तल्लीन झालेले होते. श्रीकृष्णांचा दूत म्हणून जेव्हा उद्धव व्रजभूमीमध्ये आला तेव्हा त्या लोकव्यवहार विसरल्या आणि श्रीकृष्णांनी बालपणापासून किशोर अवस्थेपर्यंत जितक्या म्हणून लीला केल्या होत्या, त्या सर्वांची आठवण कर-करून त्या लीलांचे गायन करु लागल्या. शिवाय संकोच सोडून रडूही लागल्या. एका गोपीला श्रीकृष्ण भेटल्याचे स्मरण झाले. त्यावेळी एक भ्रमराला गुणगुणताना पाहून तिल वाटले की, आपली मनधरणी करण्यासाठी प्रियतमाने याला दूत म्हणून पाठविले आहे. ती त्याला म्हणाली. (१-११)

गोपी म्हणाली - अरे कपटी प्रियकराच्या सख्या मधुकरा ! तू आमच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करू नकोस. कारण श्रीकृष्णांची जी वनमाला आमच्या सवतीच्या वक्षःस्थळाच्या घर्षणाने चुरगळली गेली, तिच्या वक्षाला लावलेले व माळेला लागलेले पिवळे केशर तुझ्या मिशांनासुद्धा लागले आहे. मधुपती श्रीकृष्ण मथुरेतील मानी नायिकांची मनधरणी करु दे आणि त्यांचा जो केशररूप प्रसाद, ज्याचा यादव सभेत उपहास होणार आहे, तो त्यांच्याजवळ राहू दे ! तो तुझ्याकडून येथे पाठविण्याची काय आवश्यकता आहे ? तू फुलांतील मध एकदा घेऊन उडून जातोस, तसेच तेही फक्त एकदाच आपले मोहक अधरामृत पाजून आम्हांला सोडून निघून गेले. बिचारी लक्ष्मी त्यांच्या चरणकमलांची सेवा कशी करते कोण जाणे ! बहुधा श्रीकृष्णाच्या गोड गोड बोलण्याने तिचेसुद्धा चित्त चोरले गेले असावे. (म्हणूनच तिला त्यांचे खरे रूप कळले नाही.) अरे भ्रमरा ! वनात राहणार्‍या आमच्यासमोर तू यदुपती श्रीकृष्णांचे पुष्कळसे गुण का गात आहेस ? ते आम्हांला काही नवीन नाहीत. ज्यांच्याजवळ सदा विजय असतो, त्या श्रीकृष्णांच्या नव्या सख्यांच्या समोर जाऊन त्यांचे गुणगान कर. कारण यावेळी त्यांनी त्यांच्या हृदयाची पीडा शमवली असल्याने त्या त्यांना प्रिय आहेत. तू करीत असलेल्या गुणगानावर प्रसन्न होऊन तू मागशील ती वस्तू त्या तुला देतील. हे भ्रमरा ! त्यांचे कपटपूर्ण मनोहर हास्य आणि भुवयांच्या इशार्‍याने त्यांना वश होणार नाहीत, अशा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पाताळात कोणत्या स्त्रिया आहेत ? स्वतः लक्ष्मीसुद्धा ज्यांच्या चरणरजांची सेवा करीत असते, तिच्यापुढे आमची काय योग्यता? परंतु तू त्यांना सांग की, तुमचे नाव ’उत्तमश्लोक’ आहे, ते दीनांवर दया करण्यामुळे. त्याला मात्र बट्टा लागेल. अरे मधुकरा ! तू माझ्या पायावर डोके टेकवू नकोस. तू मनधरणी करण्यात पटाईत आहेस, हे मी जाणते. दूताने काय केले पाहिजे, हे तू श्रीकृष्णांच्याचकडून शिकून आला आहेस, हे मला माहीत आहे. परंतु ज्यांनी त्यांच्यासाठीच आपल्या पती, पुत्र आणि अन्य नातेवाईकांना सोडले, त्या आम्हांला ते कृतघ्नपणे सोडून निघून गेले. अशा व्यक्तीशी आम्ही कशी तडजोड करावी ? अरे मधुकरा ! त्यांचा जेव्हा रामावतार होता, तेव्हा त्यानी कपिराज बालीला व्याधाप्रमाणे लपून मारले. शूर्पणखा त्यांची कामना करीत होती, परंतु त्यांनी पत्‍नीप्रेमामुळे त्या बिचार्‍या स्त्रीचे कान-नाक कापून तिला कुरूप केले. कावळा जसा बळी घालणार्‍याचा बळी खाऊन पुन्हा त्यालाच त्रास देतो, त्याप्रमाणे बलीकडून वामनरूपाने दान घेऊन पुन्हा त्यालाच वरूणपाशाने बांधून पाताळात ढकलले. म्हणून या काळ्याशी आता मैत्री पुरे झाली. परंतु काय करणार ? आमची इच्छा नसली तरी आम्ही त्यांच्याविषयीच्या गोष्टी टाळू तर शकत नाही ना ! श्रीकृष्णांच्या लीलारूप कर्णामृताच्या एका थेंबाचेही जे फक्त एकदाच प्राशन करतात, त्यांची राग-द्वेषादी सगळी द्वंद्वे समूळ नाहीशी होऊन ते असून नसल्या सारखेच होतात. एवढेच काय, पण पुष्कळसे लोक आपला दुःखमय प्रपंच तत्काळ सोडून अकिंचन होतात आणि सारासार विवेक करणार्‍या हंसाप्रमाणे परमहंसाचे जीवन जगतात. (आमचीही अवस्था अशीच झाली आहे.) जशा काळविटाच्या भोळ्या माद्या हरिणी, कपटी व्याधाच्या मधुर गाण्यांवर विश्वास ठेवल्यामुळे त्याच्या बाणांनी विद्ध होतात, त्याचप्रमाणे आम्ही श्रीकृष्णांच्या प्रेयसी गोपीसुद्धा त्या कपटी कृष्णांचे गोड गोड कपटी बोलणे खरे समजलो आणि त्याच्या नखस्पर्शाने उत्पन्न झालेल्या तीव्र प्रेमव्याधीचा वारंवार अनुभव घेत राहिलो. म्हणून हे उपमंत्र्या ! आता तू त्यांच्याशिवाय दुसरे काहीही सांग ! हे प्रियतमाच्या सख्या ! तू त्यांच्याकडे जाऊन परत आलास वाटते. आमची मनधरणी करण्यासाठीच आमच्या प्रियतमाने तुला पुन्हा पाठिवले काय ? प्रिय भ्रमरा ! तू आम्हांला आदरणीयच आहेस, म्हणून तुला जे पाहिजे ते माग. अरे ! ज्यांच्याकडे एकदा गेल्यानंतर परत येणे अतिशय कठीण, अशा आम्हांला येथून तेथे नेऊन काय करणार आहेस ? बाबा रे ! त्यांच्याजवळ, त्यांच्या वक्षःस्थळावर त्यांची प्रिय पत्‍नी लक्ष्मी नेहमी राहात असते ना ? हे मधुकरा ! आम्हांला हे सांग की, आर्यपुत्र सध्या मथुरेत आहेत ना ? आई-बाबा, नातलग आणि गोपाळांची कधी त्यांना आठवण येते का ? आणि आम्हा दासींविषयी ते कधी काही सांगतात काय ? आणि अगुरूसारखे सुगंधी करकमल ते कधी आमच्या मस्तकावर ठेवतील काय ? (१२-२१)

श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्णांच्या दर्शनाला लालचावलेल्या गोपींचे हे म्हणणे ऐकून उद्धवाने त्यांना त्यांच्या प्रियतमाचा संदेश सांगून, त्यांचे सांत्वन करीत म्हटले. (२२)

उद्धव म्हणाला - गोपींनो ! तुम्ही कृतकृत्य आहात. सार्‍या जगाला तुम्ही पूजनीय आहात; कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अशा प्रकारे आपले मन समर्पित केले आहे. दान, व्रत, तप, होम, जप, वेदाध्ययन, ध्यान, धारणा, समाधी आणि कल्याणाच्या विविध उपायांच्याद्वारा भगवंतांची भक्ती प्राप्त व्हावी, एवढाच उद्देश असतो. तुमची पवित्रकीर्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी मुनींनासुद्धा दुर्लभ अशी सर्वोत्तम भक्ती आहे आणि तिचा आदर्श तुम्ही लोकांपुढे ठेवला आहे, ही मोठी भाग्याचीच गोष्ट आहे. ही किती भाग्याची गोष्ट आहे की, तुम्ही पुत्र, पती, शरीर, स्वजन आणि घरे सोडून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना वरले आहे. हे भाग्यशाली गोपींनो ! श्रीकृष्णांच्या वियोगात तुमची त्यांच्या ठिकाणी जी एकान्तभक्ती जडली, तिचे दर्शन मला झाले, ही माझ्यावर तुमची मोठी कृपाच होय. मी स्वामींचे गुप्त काम करणारा दूत आहे. देवींनो ! प्रियतम श्रीकृष्णांनी तुम्हांला आनंद देण्यासाठी एक संदेश पाठिवला आहे. तोच घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे, तो ऐका ! (२३-२८)

श्रीकृष्णांनी सांगितले आहे- तुमचा माझ्याशी पूर्णपणे कधीही वियोग होऊ शकत नाही. सर्व भौतिक पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते व्यापून आहेत, त्याचप्रमाणे मी मन, प्राण, पंचमहाभूते,इंद्रिये आणि त्यांच्या विषयांचा आश्रय आहे. मीच आपल्या मायेच्या द्वारे पंचमहाभूते, इंद्रिये आणित्यांच्या विषयांच्या रूपाने स्वतःमध्ये स्वतःलाच उत्पन्न करतो, पाळतो आणि विलीन करतो. मायेपासून वेगळा असलेला आत्मा विशुद्ध ज्ञानस्वरूप असून त्रिगुणांशी त्याचा संबंध नाही. तथापि सुषुप्ती, स्वप्न व जागृती या मायेच्या तीन वृत्तींमुळे तो प्रत्ययाला येतो. जागा झालेला मनुष्य स्वप्नात दिसलेले पदार्थ ज्या मनाने खोटे आहेत, हे जाणतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष दिसणारे पदार्थही खोटे आहेत, असा त्याच मनाने निश्चय करून निरलसपणे इंद्रियांना विषयांपासून आवरावे. सर्व नद्या ज्याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांनी वाहात जाऊन समुद्रालाच मिळतात, त्याचप्रमाणे ज्ञानी माणसांचा वेदाभ्यास, योग, आत्मानात्मविवेक, त्याग, तपश्चर्या, इंद्रियसंयम, सत्य इत्यादी सर्वांचे खरे फळ मनाचा निग्रह करुन परमात्म्याला मिळणे, हेच आहे. (२९-३३)

गोपींनो ! मी तुम्हांला प्रिय असूनही तुमच्या दृष्टीपासून दूर राहातो. याचे कारण तुम्ही नेहमी माझे ध्यान करीत राहाण्यामुळे मनाने अगदी माझ्याजवळ राहाण्याचा तुम्हांला अनुभव यावा, म्हणून. कारण स्त्रियांचे चित्त आपल्या दूरदेशी असलेल्या प्रियतमाच्या ठायी जितके गुंतून राहाते, तितके जवळ डोळ्यांसमोर राहाणार्‍याच्या ठिकाणी लागत नाही. कोणतीही वृत्ती मनात उठू न देता संपूर्ण मनमाझ्या ठिकाणी लावून जेव्हा तुम्ही माझे स्मरणकराल, तेव्हा लवकरच कायमच्या मला प्राप्त व्हाल.हे कल्याणींनो ! ज्यावेळी मी वृंदावनामध्ये पौर्णिमेच्यारात्री रासक्रीडा केली होती, त्यावेळी ज्या गोपी स्वजनांनी येऊ न दिल्यामुळे व्रजातच राहिल्या व माझ्याबरोबर रासक्रिडेत सामील होऊ शकल्या नाहीत, त्या माझ्या लीलांचे स्मरण केल्यानेच मला प्राप्त झाल्या होत्या. (३४-३७)

श्रीशुक म्हणतात - आपल्या प्रियतमाचा हा संदेश ऐकून गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांच्या संदेशामुळे त्यांना श्रीकृष्णांचे स्वरूप आणि लीलेचे स्मरण होऊ लागले. त्या उद्धवाला म्हणाल्या. (३८)

गोपी म्हणाल्या - यादवांचा शत्रू पापी कंस आपल्या अनुयायांसह मारला गेला, ही अत्यंत आनंदाची गोष्ट झाली. तसेच श्रीकृष्णांच्या आप्तेष्टांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आणि ते सर्वजण आता अच्युतांसह खुशाल आहेत, ही सुद्धा काही कमी आनंदाची गोष्ट नाही. हे साधो ! एक गोष्ट तुम्ही आम्हांला सांगा. ज्याप्रमाणे आम्ही आमचे प्रेमयुक्त लज्जापूर्ण स्मितहास्य आणि त्यांच्याकडे मनसोक्त पाहाणे, या उपचारांनी त्यांची पूजा करीत होतो व तेही आमच्यावर प्रेम करीत होते, त्याच रीतीने मथुरेतील स्त्रियांवरही ते प्रेम करतात का ? तोपर्यंत दुसरी म्हणाली- "अग सखी ! आमचे श्यामसुंदर प्रेमाची मोहिनी घालण्यात निष्णात आहेत आणि श्रेष्ठ स्त्रियाही त्यांच्यावर प्रेम करतात. तर मग जेव्हा नगरातील स्त्रिया गोड गोड बोलण्याने आणि विलासांनी त्यांची पूजा करतील, तेव्हा ते त्यांच्यात का बरे रममाण होणार नाहीत ?" दुसरी एकजण म्हणाली- "हे साधो ! जेव्हा कधी नागरी स्त्रियांच्या समूहात काही गप्पा चालतात आणि आमचे प्रिय श्रीकृष्ण स्वच्छंदपणे, त्यांच्यात सामील होतात, तेव्हा कधीतरी प्रसंगवशात आम्हा ग्रामीण गवळणींचीसुद्धा ते आठवण काढतात काय ?" आणखी एकीने विचारले- "जेव्हा कमळे आणि कुंदफुले उमलली होती, सगळीकडे चांदणे पसरले होते आणि त्यामुळे वृंदावन रमणीय दिसत होते, त्या रात्री त्यांनी रासमंडल तयार करून आमच्याबरोबर नृत्य केले होते. त्यावेळी आमच्या पायांतील नूपुरे वाजत होती. आम्ही सगळ्याजणी त्यांच्याच सुंदर सुंदर लीलांचे गायन करीत होतो आणि ते आमच्याबरोबर विहार करीत होते. त्या रात्रींची ते कधी आठवण काढतात का ?" आणखी कुणी म्हणाली- "आम्ही सगळ्याजणी त्यांच्या विरहाग्नीमध्ये पोळत आहोत. इंद्र ज्याप्रमाणे पाऊस पाडून वनाला जिवदान देतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णसुद्धा कधीतरी आपल्या करस्पर्श इत्यादींनी आम्हांला जीवनदान देण्यासाठी येथे येतील काय ?" तो पर्यंत आणखी एक गोपी म्हणाली- "अग ! आता तर त्यांनी शत्रूंना मारून राज्य मिळवले आहे. आता ते राजकुमारींशी विवाह करुन सर्व आप्तेष्टांबरोबर आनंदाने राहतील. आता इकडे कशाला येतील बरे ?" दुसरी गोपी म्हणाली- "महात्मा श्रीकृष्ण स्वतः लक्ष्मीपती आहेत. त्यांना कसलीच कामना नाही. ते कृतकृत्य आहेत. आम्ही वनवासी गौळणी किंवा दुसर्‍या राजकुमारी यांच्याशी त्यांना काय करायचे आहे ?" "संसारात कोणतीही आशा न धरणे हेच सगळ्यांत मोठे सुख आहे." असे पिंगला हिने वेश्या असूनही योग्य तेच सांगितले. हे माहीत असूनही आम्ही श्रीकृष्णांच्या भेटण्याची आशा सोडून देऊ शकत नाही. ज्यांची किर्ती महात्मे गातात, त्यांनी एकांतात आमच्याशी ज्या प्रेमाच्या गोष्टी केल्या, त्या विसरणे, कोणाला शक्य आहे ? पहा ना ! त्यांची इच्छा नसतानासुद्धा त्यांना वरणारी स्वतः लक्ष्मी एक क्षणभरसुद्धा त्यांना सोडून दूर जात नाही. उद्धव महोदय ! बलरामांसह श्रीकृष्ण जेथे विहार करीत, तीच ही नदी, तोच हा पर्वत आणि तेच हे वनप्रदेश. ज्यांना ते चारण्यासाठी नेत, त्याच गाई. आणि त्यांच्या वेणूचे ते स्वर अजूनही येथे घुमत आहेत. येथील प्रत्येक जागी त्यांच्या परम सुंदर चरणकमलांची चिन्हे उमटली आहेत. ती आम्हांला वारंवार नंदनंदनांचीच आठवण करुन देतात. त्यांना आम्ही विसरूच शकत नाही. त्यांची ती सुंदर चाल, उन्मुक्त हास्य, विलासपूर्ण पाहाणे आणि मधुर वाणी ! या सर्वांनी आमचे चित्त हिरावून घेतले आहे. त्यांना आम्ही कशा विसरु ? हे स्वामी ! हे लक्ष्मीनाथ ! हे व्रजनाथ ! आमची संकटे दूर केलीत. हे गोविंदा ! दुःखसागरात बुडालेल्या या गोकुळाला तुम्हीच वाचवा." (३९-५२)

श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्णांचा संदेश ऐकून गोपींच्या विरहाची व्यथा शांत झाली. कारण इंद्रियातीत श्रीकृष्णच आपला आत्मा आहे, हे त्यांना कळले. आता त्यांनी उद्धवाचा सत्कार केला. गोपींचा शोक मिटविण्यासाठी उद्धव काही महिने तेथे राहिला. श्रीकृष्णांच्या अनेक लीला आणि गोष्टी वारंवार सांगून तो व्रजवासियांना आनंदित करीत असे. जितके दिवसपर्यंत नंदांच्या व्रजामध्ये उद्धव राहिला, तितके ते दिवस श्रीकृष्णांशी संबंधित गोष्टींमुळे व्रजवासियांना क्षणासारखे वाटले. भगवंतांचा भक्त उद्धव नदी, वन, पर्वत, दर्‍या आणि फुलांनी लहडलेले वृक्ष पाहून तेथे श्रीकृष्णांनी कोणती लीला केली होती, असे विचारून विचारून व्रजवासियांना श्रीकृष्णांचेच स्मरण करून देऊन त्या स्मरणात त्यांच्यासह स्वतः रमत असे. (५३-५६)

उद्धवाने गोपींची अशा प्रकारची श्रीकृष्णांमध्येच तन्मयता झाल्याचे पाहून त्याचेही मन कृष्णविषयक प्रेमाने अतिशय भरून गेले. गोपींना नमस्कार करीत तो असे म्हणाला. (५७)

"फक्त या गोपींचेच शरीर धारण करणे या पृथ्वीवर सार्थकी लागले, कारण सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणीच यांचे प्रगाढ प्रेम आहे. प्रेमाच्या या स्थितीची मुमुक्षू पुरुष आणि आम्ही भक्तसुद्धा अपेक्षा करतो. ज्यांना भगवान श्रीकृष्णांच्या कथांची गोडी लागली, त्यांना ब्रह्मदेवासारख्या श्रेष्ठ जन्माची तरी काय आवश्यकता ? कोठे ह्या आचारहीन, रानात राहाणार्‍या स्त्रिया आणि कोठे सच्चिदानंदघन भगवान श्रीकृष्णांचे ठायी त्यांचे हे अनन्य प्रेम ! जसे एखाद्याने अजाणतेपणाने अमृतप्राशन केले तरी ते पिणार्‍याला अमर करते, त्याप्रमाणे जर कोणी भगवंतांचे स्वरूप न जाणताही त्यांच्यावर निरंतर प्रेम केले, तर ते स्वतः त्याचे परम कल्याण करतात. रासलीलेच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी या गोपींच्या गळ्यात हात टाकून यांना जो कृपा-प्रसाद दिला, तसा परम प्रेम करणार्‍या लक्ष्मीलासुद्धा दिला नाही किंवा कमलासारख्या सुगंध आणि कांतीने युक्त अशा देवांगनांनासुद्धा मिळाला नाही; तर मग अन्य स्त्रियांची काय कथा ! मी या वृंदावनामध्ये एखादे झुडूप, वेल किंवा वनस्पती झालो, तरी ते मी माझे भाग्यच समजेन. कारण त्यामुळे मला या व्रजांगनांची चरणधूळ सेवन करण्यास मिळेल. ज्यांनी सोडण्यास कठीण असा स्वजनांचा मोह आणि शिष्टाचार सोडून भगवंतांचे पद प्राप्त करून घेतले की, जे वेदांनाही अद्यापि सापडलेले नाही. (५८-६१)

स्वतः लक्ष्मीने व ब्रह्मदेव, शंकर इत्यादी पूर्णकाम देवांनी ज्यांची पूजा केली, योगेश्वर आपल्या हृदयामध्ये ज्यांचे (सदैव) चिंतन करीत असतात, त्याच भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंदांना गोपींनी रासलीलेच्यावेळी आपल्या वक्षःस्थळावर ठेवून घेतले आणि त्यांनाच आलिंगन देऊन आपल्या हृदयाचा ताप शांत केला. नंदांच्या व्रजात राहाणार्‍या गोपांगनांच्या चरणधुळीला मी वारंवार नमस्कार करतो. ज्या गोपींनी श्रीकृष्णांच्या कथांसंबंधी जे काही गायन केले, ते तिन्ही लोकांना पवित्र करीत आहे. (६२-६३)

श्रीशुक म्हणतात - नंतर उद्धव गोपी, नंद आणि यशोदा यांची अनुमती घेऊन आणि गोपाळांचा निरोप घेऊन मथुरेला जाण्यासाठी रथावर स्वार झाला. तो निघालेला पाहून नंद इत्यादी गोपगण हातात पुष्कळशा भेटवस्तू घेऊन त्याच्याजवळ आले आणि डोळ्यांत अश्रू आणून मोठ्या प्रेमाने म्हणाले. "आमच्या मनाच्या वृत्ती श्रीकृष्णांच्या चरण-कमलांच्या आश्रयाने राहोत. आमच्या वाणी त्यांच्याच नामांचे उच्चारण करोत आणि शरीरे त्यांनाच प्रणाम इत्यादी करीत राहोत. भगवंतांच्या इच्छेने आमच्या कर्मानुसार आम्हांला कोणत्याही योनीमध्ये जन्म येवो, मात्र तेथे आम्ही शुभ आचरण करावे, दान करावे आणि त्यांचे फळ म्हणून भगवान श्रीकृष्णांचे ठायीच आमचे प्रेम असावे." परीक्षिता ! गोपींना अशा प्रकारे कृष्णाप्रमाणेच समजून उद्धवाचा सन्मान केला. नंतर श्रीकृष्णांनी रक्षण केलेल्या मथुरेला तो परतला. तेथे पोहोचल्यावर त्याने भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि व्रजवासियांची प्रगाढ भक्ती त्यांना कथन केली. त्यानंतर नंदांनी दिलेल्या भेटवस्तू त्याने वसुदेव, बलराम आणि राजा उग्रसेनाला दिल्या. (६४-६९)

अध्याय सत्तेचाळिसावा समाप्त

GO TOP