श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४५ वा

श्रीकृष्ण-बलरामांचे उपनयन आणि गुरुकुलप्रवेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्णांच्या लक्षात आले की माता-पित्यांना माझ्या भगवद्‌भवाचे ज्ञान झाले आहे. त्यामुळे यांना पुत्रस्नेहाचे सुख मिळणार नाही, असा विचार करून त्यांनी, लोकांना मोहित करणारी आपली योगमाया त्यांच्यावर पसरली. यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण थोरल्या बंधूसह आई-वडिलांकडे गेले आणि आदरपूर्वक विनम्रपणे "आई ! बाबा !" अशी हाक मारून त्यांना आनंदित करीत म्हणू लागले. "बाबा ! आई ! आम्ही आपले पुत्र असून आणि आमच्यासाठी आपण नेहमी उत्कंठित असूनसुद्धा आपण आमच्या बाल्य, पौगंड आणि किशोर या अवस्थांचे सुख आमच्याकडून मिळवू शकला नाहीत. आम्हांलासुद्धा दुर्दैवाने आपल्या जवळ राहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले नाही. त्यामुळे आईवडिलांच्या घरी असणार्‍या मुलांना लाड करून घेण्याचे जे सुख मिळते, ते आम्हांला मिळू शकले नाही. माता-पिताच या शरीराला जन्म देऊन त्याचे लालनपालन करतात. तेव्हा कुठे ते शरीर पुरुषार्थप्राप्तीचे साधन बनते. म्हणून एखाद्याने शंभर वर्षे जिवंत राहून जरी माता-पित्यांची सेवा केली, तरी तो त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. सामर्थ्य असूनही जो पुत्र आपल्या आई-वडिलांची शरीराने आणि धनाने सेवा करीत नाही, त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्याच शरीराचे मांस खाऊ घालतात. सामर्थ्य असूनही जो मनुष्य आपले म्हातारे माता-पिता, पतिव्रता पत्‍नी, लहान मुले, गुरु, ब्राह्मण आणि शरणागत यांचे पालनपोषण करीत नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय. आपली सेवा न करण्यामुळे आमचे इतके दिवस वाया गेले. कारण नेहमी कंसाच्या भीतीने आम्ही आपली सेवा करण्यास असमर्थ होतो. आई ! बाबा ! आपण दोघांनी तुमची सेवा न करणार्‍या आम्हांला क्षमा करावी. दुष्ट कंसाने आपल्याला अतिशय कष्ट दिले. परंतु आम्ही परतंत्र असल्यामुळे आपली काही सेवा करू शकलो नाही." (१-९)

श्रीशुक म्हणतात- मायेने मनुष्य बनलेल्या विश्वात्मा श्रीहरींची ही वाणी ऐकून, मोहित होऊन, देवकी-वसुदेवांनी त्यांना उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि छातीशी कवटाळून परमानंद प्राप्त करून घेतला. राजन ! स्नेहपाशाने बांधले जाऊन ते पूर्णतः मोहित झाले आणि अश्रुधारांनी त्यांना भिजवू लागले. अश्रूंनी कंठ दाटून आल्यामुळे ते काहीही बोलू शकले नाहीत. (१०-११)

अशा प्रकारे भगवान देवकीनंदानांनी आई-वडिलांचे सांत्वन करून आपले मातामह उग्रसेन यांना यादवांचा राजा केले. आणि त्यांना म्हटले- "महाराज ! आम्ही आपली प्रजा आहोत. आपण आम्हांला आज्ञा करावी. ययातीच शाप असल्यामुळे यदुवंशी राजसिंहासनावर बसू शकत नाहीत. (आपण यदुवंशी असूनही माझ्या आज्ञेमुळे आपल्याला काही दोष लागणार नाही.) मीच सेवक होऊन आपली सेवा करीत आहे, हे पाहून देवतासुद्धा मस्तक लववून आपल्याला नजराणे देतील, मग अन्य राजांबद्दल काय सांगावे? जे कंसाच्या भीतीने व्याकूळ होऊन देशोधडीला लागले होते, त्या यदू, वृष्णी, अंधक, मधू, दाशार्ह, कुकुर इत्यादी वंशात जन्मलेल्या आपल्या नातेवाइकांचा शोध घेऊन श्रीकृष्णांनी त्यांना तेथून परत बोलाविले. घरापासून दूर परक्या जागी राहावे लागल्याने त्यांना अतिशय दुःख भोगावे लागले होते. विश्वविधात्या भगवंतांनी सांत्वन करून त्यांचा सत्कार केला, त्यांना खूप धन-संपत्ती देऊन तृप्त केले आणि आपापल्या ठिकाणी पुन्हा स्थानापन्न केले. आता सर्वजण राम-कृष्णांच्या बाहुबलाखाली सुरक्षित होते. त्यांच्या कृपेने त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले होते. ते कृतार्थ झाले होते. आता ते आपापल्या घरांमध्ये आनंदाने राहू लागले. श्रीकृष्णांचे मुखकमल नेहमी प्रफुल्लित असे. त्यांचे सौंदर्य अपार होते. दयाद्र हास्ययुक्त नजरेने पाहाणार्‍या त्या मुखाचे दररोज दर्शन घेऊन ते आनंदमग्न होत. मथुरेतील म्हातारे लोकसुद्धा तरुणांप्रमाणे अत्यंत बलवान आणि उत्साही झाले होते, कारण ते आपल्या डोळ्यांची ओंजळ करून वारंवार भगवंतांच्या मुखारविंदाच्या अमृतमय मकरंदरसाचे पान करीत असत. (१२-१९)

हे राजेन्द्रा, नंतर भगवान देवकीनंदन आणि बलराम हे दोघेही नंदबाबांच्याजवळ आले आणि त्यांच्या गळ्याला मिठी मारून म्हणू लागले. बाबा ! आपण दोघांनी अत्यंत प्रेमाने आणि लाडाने आमचे पालन-पोषण केले. कारण आपल्या मुलांवर आई-बाप स्वतःच्या शरीरापेक्षाही अधिक प्रेम करतात, यात काहीच संशय नाही. पालन-पोषण करू शकत नसल्यामुळे स्वजनांनी ज्यांचा त्याग केला, त्या बालकांचे जे आपल्या मुलांप्रमाणे पालन-पोषण करतात, तेच त्यांचे खरे आई-बाप होत. बाबा ! आपण आता व्रजामध्ये परत जा. येथील सुहृद संबंधितांना सुखी करून आमच्यावरील वात्सल्यामुळे दुःखी झालेल्या तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आम्ही येऊ. भगवान श्रीकृष्णांनी नंदादी गोपांची अशी समजूत घालून व त्यांना अत्यंत आदरपूर्वक वस्त्रे, अलंकार, भांडी इत्यादी देऊन त्यांचा सत्कार केला. भगवंतांचे म्हणणे ऐकून नंदबाबांनी प्रेमाने सद्‍गदित होऊन दोन्ही मुलांना छातीशी धरले. नंतर अश्रूपूर्ण नेत्रांनी गोपांसह ते गोकुळात गेले. (२०-२५)

हे राजन ! नंतर वसुदेवांनी पुरोहित व अन्य ब्राह्मणांकरवी दोन्ही मुलांचे विधिपूर्वक मौजीबंधन करविले. नंतर त्यांनी वस्त्रालंकारांनी ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांना पुष्कळ दक्षिणा दिली. तसेच गळ्यांत सोन्याच्या व रेशमी वस्त्रांच्या माळा घातलेल्या सवत्स गाई दान दिल्या. महाबुद्धिमान वसुदेवांनी रामकृष्णांच्या जन्मनक्षत्राचे वेळी जितक्या गाई देण्याचा संकल्प केला होता व अगोदर कंसाने ज्या अन्यायाने हिरावून घेतल्या होत्या, त्याची आठवण ठेवून त्यांनी ब्राह्मणांना त्या दान दिल्या. अशा प्रकारे यदुवंशाचे पुरोहित गर्गाचार्य यांच्याकरवी यज्ञोपवीत संस्कार झाल्यावर राम-कृष्ण द्विज झाले. आता त्यांनी ब्रह्मचर्यव्रताचा स्वीकार करून त्याचे उत्तम पालन केले. ते जगाचे स्वामी होते. सर्वज्ञ होते. सर्व विद्यांची उत्पत्ती त्यांच्यापासूनच झाली आहे. त्यांचे निर्मल ज्ञान स्वतःसिद्ध होते. तरीसुद्धा मनुष्यासारख्या वागण्यामुळे त्यांनी ते लपवून ठेवले होते. (२६-३०)

आता ते दोघेजण गुरुकुलात निवास करण्याच्या इच्छेने अवंतिपुरात राहाणार्‍या काश्य गोत्राच्या सांदीपनी मुनींच्याकडे गेले. ते दोघे संयमशील भाऊ विधीपूर्वक गुरुजींच्याजवळ राहून गुरुंची उत्तम सेवा कशी करावी, याचा आदर्श लोकांसमोर ठेवीट अतिशय भक्तिभावाने देव समजून त्यांची सेवा करू लागले. ते करीत असलेल्या शुद्ध भावनेने युक्त अशा सेवेने गुरुवर्य सांदीपनी अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना सहा अंगे आणि उपनिषदांसहित सर्व वेदांचे शिक्षण दिले. याखेरीज मंत्र आणि देवतांच्या ज्ञानासह धनुर्वेद, मनुस्मृती इत्यादी धर्मशास्त्रे, मीमांसा इत्यादी वेदांचे तात्पर्य सांगणारी शास्त्रे, तर्कविद्या, त्याचबरोबर संधी, विग्रह, यान आसन, द्वैध आणि आश्रय या सहा भेदांनी युक्त अशा राजनीतीचेसुद्धा शिक्षण दिले. परीक्षिता ! सर्व विद्यांचे प्रवर्तक असलेले ते दोघे पुरुषश्रेष्ठ गुरुजींनी फक्त एक वेळ सांगताच सर्व विद्यांत पारंगत झाले. परीक्षिता ! केवळ चौसष्ट दिवसांत त्यांनी तत्परतेने चौसष्ट कलांचे ज्ञान मिळविले. अशा प्रकारे अध्ययन संपल्यावर त्यांनी सांदीपनी मुनींना गुरुदक्षिणेविषयी प्रार्थना केली. महाराज ! सांदीपनी मुनींनी त्यांचा अद्‌भूत महिमा आणि अलौकिक बुद्धिमत्ता पाहून आपल्या पत्‍नीचा सल्ला घेऊन प्रभासक्षेत्रामध्ये बुडून मरण पावलेला पुत्र आणून देण्याची गुरुदक्षिणा मागितली. अपूर्व पराक्रमी असे ते दोघेही महारथी "ठीक आहे" असे म्हणून रथावर आरूढ होऊन प्रभासक्षेत्री गेले. तेथे समुद्रतटावर ते क्षणभर बसले. हे परमेश्वर आहेत असे जाणून समुद्राने त्यांच्यासाठी पूजा-सामग्री आणली. भगवान समुद्राला म्हणाले, "समुद्रा ! तू आपल्या मोठमोठ्या लाटांनी येथून ज्या गुरुपुत्राला वाहात घेऊन गेलास, त्याला ताबडतोब दे." (३१-३९)

समुद्र म्हणाला- "हे देवा श्रीकृष्णा ! त्याला मी नेले नाही. माझ्या पाण्यात पंचजन नावाचा एक मोठा दैत्य शंखाच्या रूपाने राहात आहे. त्यानेच तो बालक नक्की चोरून नेला असला पाहिजे." ते ऐकून भगवान ताबडतोब पाण्यात शिरले आणि त्यांनी शंखासुराला मारले. परंतु त्याच्या पोटात तो बालक दिसला नाही. (४०-४१)

तेव्हा त्याच्या शरीराचा शंख घेऊन भगवान रथाकडे परतले. तेथून बलरामांसह यमराजाच्या आवडत्या ’संयमनी ’ नगरीत जाऊन त्यांनी आपला शंख वाजविला. सर्व प्रजेवर नियंत्रण असणारा यम शंखाचा आवाज ऐकून तेथे आला आणि अत्यंत भक्तिभावाने त्याने विधिपूर्वक त्यांची थाटामाटात पूजा केली. नंतर सर्व प्राण्यांच्या हृदयात विराजमान असलेल्या श्रीकृष्णांना त्याने विनयाने म्हटले, "स्वलीलेनेच मनुष्य झालेल्या हे सर्वव्यापक परमेश्वरा ! मी आपणा दोघांची काय देवा करू ?" (४२-४४)

श्रीभगवान म्हणाले- "यमराज ! स्वतःच्या कर्मबंधनानुसार माझा गुरुपुत्र येथे आणला गेला आहे. तू माझ्या आज्ञेने त्याला माझ्याकडे घेऊन ये." "जशी आपली आज्ञा" असे म्हणून यमाने गुरुपुत्र आणून दिला. तेव्हा राम-कृष्णांनी तो मुलगा गुरुदेवांच्या स्वाधीन करून म्हटले की, "आपणास आणखी काही पाहिजे असले तर मागावे." (४५-४६)

गुरुजी म्हणाले- "मुलांनो ! तुम्ही दोघांनी उत्तम गुरुदक्षिणा दिलीत. आता आणखी काय पाहिजे ? तुमच्यासारख्यांच्या गुरुचे कोणते मनोरथ अपूर्ण राहू शकतील बरे ? वीरांनो ! तुम्ही दोघेही आता आपल्या घरी जा. लोकांना पवित्र करणारी कीर्ती तुम्हांला प्राप्त होवो ! तुम्ही शिकून घेतलेली विद्या इहपरलोकी नित्य नूतन राहो." परीक्षिता ! अशा रीतीने गुरुजींनी अनुमती दिल्यावर वायूप्रमाणे वेग आणि मेघाप्रमाणे आवाज असणार्‍या रथावर आरूढ होऊन दोघे बंधू मथुरेला परतले. पुष्कळ दिवस राम-कृष्णांना न पाहिल्याने दुःखी झालेली प्रजा ते आल्याचे पाहून आनंदित झाली. हरवलेले धन परत मिळाल्यावर व्हावी, तशी. (४७-५०)

अध्याय पंचेचाळिसावा समाप्त

GO TOP