|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४४ वा
चाणूर, मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा व कंसाचा उद्धार - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्णांनी चाणूरादिकांना मारण्याचे निश्चित ठरवून स्वतः चाणूराला आणि बलराम मुष्टिकाला जाऊन भिडले. एकमेकांना जिंकण्याच्या हेतूने त्यांनी हातांना हात बांधले आणि पायांत पाय अडकवून ताकदीने ते आपापल्याकडे दुसर्यांना ओढू लागले. त्यांनी कोपरापासूनच्या हातांना हात, गुडघ्यांना गुडघे, डोक्यांना डोकी आणि छातींना छाती टेकवून ते एकमेकांवर आघात करू लागले. गरगर फिरवणे, लांब ढकलणे, मिठीत घेणे, खाली पाडणे, पुढे जाणे, मागे येणे इत्यादी प्रकारांनी ते एकमेकांवर डावपेच करू लागले. तसेच वर उठवणे, उचलणे, चाल करून जाणे किंवा स्तब्ध उभे राहाणे, अशा रीतीने ते शरीरांना इजा पोहोचवू लागले. (१-५) परीक्षिता ! कुस्त्यांची ही दंगल पाहाण्यासाठी नगरातील पुष्कळशा महिलासुद्धा आल्या होत्या. मोठमोठ्या पहिलवानांबरोबर हे लहान अशक्त बालक लढत आहेत, असे पाहून त्या मुलांची दया येऊन त्या गटागटाने आपापसांत चर्चा करू लागल्या. "येथे हे राजसभेतील लोक केवढा अधर्म करीत आहेत पाहा ! राजाच्यासमोरच हे बलवान आणि दुर्बल यांची कुस्ती करू पाहात आहेत. वज्राप्रमाणे कठोर शरीर असणारे व मोठ्या पर्वताप्रमाणे दिसणारे हे मल्ल कोणीकडे; आणि अजून तारूण्यात सुद्धा न आलेले अतिशय कोमल शरीराचे हे किशोर कोणीकडे ! या पाहाणार्या लोकांना धर्माचे उल्लंघन केल्याचे पाप निश्चितच लागणार ! वास्तविक जेथे अधर्म असेल, तेथे कधीच थांबू नये. बुद्धिमान पुरुषाने सभेत उपस्थित असलेल्यांचे दोष जाणल्यास त्या सभेमध्ये जाऊ नये. कारण तेथे जाऊन त्यांचे अवगुण न सांगणे, गप्प बसणे किंवा मी जाणत नाही, असे म्हणणे, या तिन्हीही गोष्टी मनुष्याला दोषाचे भागीदार बनवितात. शत्रूच्या चारी बाजूंनी फिरणार्या श्रीकृष्णांच्या मुखकमलाकडे पाहा तरी ! कमळाच्या पानावर पाण्याचे बिंदू चमकावे त्याप्रमाणेच त्यांच्या चेहर्यावर घामाचे बिंदू चमकर आहेत. मुष्टिकावर रागावल्यामुळे डोळे लाल झालेला बलरामांचा चेहरा तुम्हांला दिसत नाही का ? तरीसुद्धा त्यांच्या अनावर हास्यामुळे तो किती सुंदर दिसत आहे, नाही ? खरे पाहू जाता व्रजभूमी किती धन्य आहे ? कारण हे पुरुषोत्तम तेथे मनुष्याचा वेष घेऊन लपून राहातात. स्वतः भगवान शंकर आणि लक्ष्मी ज्यांच्या चरणांची पूजा करतात, तेच प्रभू तेथे रंगी-बेरंगी रानफुलांची माळ घालून बलरामांसह बासरी वाजवीत, गाई चारीत, निरनिराळे खेळ खेळत आनंदाने विहार करतात. दोन्ही डोळ्यांनी नित्यनिरंतर यांच्या रूप-माधुर्याचे पान करणार्या गोपींनी कोणती तपश्चर्या केली होती, कोण जाणे ! यांचे स्वयंसिद्ध रूप म्हणजे लावण्याचे सारसर्वस्वच ! जगात कोणाचेही रूप यांच्या तोडीचे नाही, तर मग अधिक कोठून असणार ! हे रूप क्षणाक्षणाला नवेच भासते. सर्व यश, सौंदर्य आणि ऐश्वर्य यांचे हे एकमेव आश्रयस्थान आहे. याचे दर्शन तर अतिशय दुर्लभ आहे. व्रजातील गोपी धन्य होत ! नेहमी श्रीकृष्णांमध्येच चित्त लागून राहिल्यामुळे प्रेमपूर्ण हृदयाने व प्रेमाश्रूंनी सद्गदीत झालेल्या कंठाने त्या धार काढताना, दही घुसळताना, धान्य कांडताना, जमीन सावताना, बालकांना झोके देताना, रडणार्या बालकांची समजूत घालताना, त्यांना न्हाऊ-माखू घालताना, घरांची झाडझूड करताना, अशी सगळी कामे करीत असताना श्रीकृष्णांच्या गुणांचेच गायन करीत. हे जेव्हा प्रातःकाळी गाईंना चारण्यासाठी व्रजातून वनामध्ये जातात आणि सायंकाळी त्यांना घेऊन परत येतात, तेव्हा त्यांनी वाजविलेली मधुर बासरी ऐकून गोपी लगबगीने घरातून बाहेर रस्त्यामध्ये येतात. त्यावेळी स्मितहास्य, तसेच दयेने भरलेल्या नजरेने युक्त असे त्यांचे मुखकमल त्यांना पाहायला मिळते. केवढे हे त्यांचे पुण्य ! (६-१६) हे भरतश्रेष्ठा ! त्या स्त्रिया जेव्हा असे बोलत होत्या, त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी शत्रूला मारण्याचा मनोमन निश्चय केला. स्त्रियांची ही भयाकुल बोलणी ऐकून त्यांचे आईवडिल पुत्रस्नेहामुळे शोकाने विव्हळ झाले. कारण आपल्या पुत्रांचे शौर्य त्यांना माहीत नव्हते. श्रीकृष्ण आणि चाणूर हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच करीत एकमेकांशी ज्याप्रमाणे कुस्ती लढत होते, तसेच बलराम आणि मुष्टिकसुद्धा लढत होते. भगवंतांच्या वज्रापेक्षाही कठोर अशा अंगांच्या रगडण्याने चाणूराची अंगे खिळखिळी होऊ लागली. त्याला वारंवार मूर्च्छा येऊ लागली. शेवटी अत्यंत चिडून त्याने ससाण्याप्रमाणे झडप घातली आणि दोन्ही हातांच्या मुठी वळून त्याने भगवान श्रीकृष्णांच्या छातीवर प्रहार केला. ज्याप्रमाणे फुलांच्या गजर्यांच्या मार्याने हत्ती जराही विचलीत होत नाही, त्याप्रमाणे त्याने केलेल्या प्रहाराने भगवान थोडेसुद्धा विचलित झाले नाहीत. त्यांनी चाणूराचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अत्यंत वेगाने पुष्कळ वेळा गरागरा फिरवून जमिनीवर आपटले. त्या वेगानेच त्याचे प्राण निघून गेले. त्याची वेषभूषा अस्ताव्यस्त झाली आणि त्याचे केस व फुलांच्या माळा विस्कटल्या. इंद्रध्वजाप्रमाणे तो खाली पडला. त्याचप्रमाणे मुष्टिकानेसुद्धा अगोदर बलरामांना एक ठोसा लगावला. त्यावर बलवान बलरामांनी त्याला अतिशय जोरात चापट मारली. चापट बसताच तो कापू लागला. अत्यंत व्यथित झालेला तो तोंडातून रक्त ओकीत प्राण जाऊन वादळाने उखडलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर पडला. हे राजन ! योद्ध्यांप्रमाणे श्रेष्ठ असणार्या बलरामांनी यानंतर कूट नावाच्या पहिलवानाला समोर येताच बेफिकीरपणे अगदी सहज डाव्या हाताच्या ठोशाने मारले. भगवान श्रीकृष्णांनी त्याचवेळी पायाने ठोकर मारून शलाचे मस्तक उडवले आणि तोशलाला उभे चिरले. अशा प्रकारे दोघांचेही प्राणोत्क्रमण झाले. जेव्हा चाणूर, मुष्टिक, कूट आणि तोशल हे पाचही पहिलवान मारले गेले, तेव्हा बाकीचे आपले प्राण वाचविण्यासाठी तेथून पळून गेले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण-बलरामांनी आपल्या बरोबरीच्या गोपांना जवळ बोलावून त्यांना भिडून नाचत-गात, ढोलाच्या नादात आपल्या नूपुरांचा आवाज मिसळून ते विजयोत्सव साजरा करू लागले. (१७-२९) राम-कृष्णांच्या ह्या अद्भूत कृत्याने सर्व लोकांना अतिशय आनंद झाला. कंसाखेरीज श्रेष्ठ ब्राह्मण आणि साधुपुरुष "वाहवा ! वाहवा !" म्हणून प्रशंसा करू लागले. मोठमोठे पहिलवान मारले गेले किंवा पळून गेले. हे पाहून भोजराज कंसाने आपली वाद्ये वाजविणे बंद केले आणि आपल्या सेवकांना आज्ञा केली. "अरे ! वसुदेवाच्या या दुराचारी मुलांना नगराच्या बाहेर हाकलून द्या. गोपांचे सर्व धन हिसकावून घ्या आणि दुर्बुद्धी नंदाला कैद करा. अत्यंत कुबुद्धी आणि दुष्ट अशा वसुदेवाला ताबडतोब मारून टाका; तसेच, माझा बाप उग्रसेनही आपल्या अनुयायांसह शत्रूच्याच पक्षाला जाऊन मिळाला आहे. म्हणून त्यालासुद्धा जिवंत ठेवू नका." अशाप्रकारे बडबडणार्या कंसावर अविनाशी श्रीकृष्ण चिडले आणि वेगाने सहजपणे त्या उंच मंचावर उडी मारून चढले. अहंकारी कंसाने जेव्हा पाहिले की, आपला मृत्यू समोर येऊ लागला आहे, तेव्हा त्याने लगेच सिंहासनावरून उठून हातात ढाल-तलवार घेतली. हातात तलवार घेऊन प्रहार करण्यासाठी आकाशात उडणार्या ससाण्याप्रमाणे तो कधी डावीकडे तर कधी उजवीकडे जाऊ लागला, तेवढ्यात गरुडाने सापाला पकडावे तसे असह्य प्रखर तेज असणार्या भगवंतांनी त्याला घट्ट पकडले. याचवेळी कंसाचा मुगुट खाली पडला आणि भगवंतांनी त्याचे केस पकडून त्यलासुद्धा त्या उंच मंचावरून खाली आखाड्यात आपटले. आणि स्वतंत्र व सगळ्या विश्वाचा आश्रय असणार्या पद्मनाभांनी स्वतः त्याच्यावर उडी मारली. त्यामुळे कंसाचा तत्काळ मृत्यू झाला. नंतर जसा सिंह हत्तीला फरपटत नेतो, त्याचप्रमाणे सर्वांच्या देखत श्रीकृष्णांनी कंसाचे प्रेत जमिनीवरून फरपटत नेले. हे नरेंद्रा ! त्यावेळी सगळ्यांच्या तोंडून "हाय ! हाय" असे मोठ्याने उद्गार निघाले. अत्यंत भयभीत होऊन कंस नेहमी श्रीकृष्णांचेच चिंतन करीत असे. तो खाता-पिताना, झोपताना-चालताना, बोलताना, किंवा श्वास घेताना अशा सर्वच वेळी आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतलेल्या भगवान श्रीकृष्णांनाच पाहात होता. त्यामुळेच त्याला दुर्लभ अशी भगवंतांची सारुप्यमुक्ती मिळाली. (३०-३९) कंक, न्यग्रोध इयादी कंसाचे धाकटे आठ भाऊ मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतापून त्यांच्या अंगावर धावले. ते मोठ्या आवेशाने युद्धाच्या तयारीने येत असलेले पाहून बलरामांनी परिघाने, सिंहाने पशूंना मारतो, त्याप्रमाणे त्यांना मारले. त्यावेळी आकाशात दुंदुभी वाजू लागल्या. भगवंतांचे विभूतिस्वरूप असलेले ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव आनंदाने पुष्पवर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. महाराज ! कंस आणि त्याच्या भावाच्या पत्न्या स्वजनांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी झाल्या. त्या डोकी बडवून घेई लागल्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहात होत्या. वीरशय्येवर कायमची झोप घेणार्या आपापल्या पतींना कवटाळून शोकग्रस्त झालेल्या त्या वारंवार अश्रू ढाळीत मोठ्याने आक्रोश करू लागल्या. हे नाथा ! हे प्रियतमा ! हे धर्मज्ञा ! हे करुणामया ! हे अनाथवत्सला ! आपल्या मृत्यूने आमचाही मृत्यू झाल्यासारखाच आहे. आमची घरे आज उजाड झाली. आमची मुले अनाथ झाली. हे पुरुषश्रेष्ठा ! या पुरीचे आपणच स्वामी होता. आपण गेल्याने येथील उत्सव संपले. मांगल्य लयाला गेले. ही मथुरानगरी आमच्याप्रमाणेच अशोभनीय झाली. स्वामी ! आपण निरपराध लोकांना अतिशय छळले. म्हणूनच आपली अशी दशा झाली. जीवांना पीडा देणार्या कोणाचे कल्याण होणार? हे भगवान जगातील सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आहेत, जो यांचे वाईट व्हावे, असे इच्छितो, तो कधीच सुखी होत नाही." (४०-४८) श्रीशुकदेव म्हणतात- जगाचे पोषण करणार्या श्रीकृष्णांनी राण्यांचे सांत्वन केले आणि व्यवस्थित लोकरीतीनुसार मृतांचे क्रिया-कर्म करविले. त्यानंतर श्रीकृष्ण-बलरामांनी माता-पित्यांना बंधनातून सोडविले आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. परंतु आपल्या मुलांनी वंदन केल्यानंतरसुद्धा देवकी आणि वसुदेवांनी, ते जगदीश्वरच आहेत, पुत्र नव्हेत, असे समजून, त्यांना छातीशी कवटाळले नाही. (उलट स्वतःच हात जोडले.) (४९-५१) अध्याय चव्वेचाळिसावा समाप्त |