|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४३ वा
कुवलयापीडाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात- हे परीक्षिता ! श्रीकॄष्ण आणि बलराम स्नानादी नित्यकर्मे करून कुस्तीच्या नगार्याचा आवाज ऐकून ती पाहाण्यासाठी निघाले. आखाड्याच्या दरवाजात जाऊन श्रीकृष्णांनी पाहिले तर तेथे माहुताने कुवलयापीड नावाचा हत्ती उभा केला आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी कंबर कसली, कुरळे केस बांधले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने माहुताला म्हटले, "माहुता ! अरे माहुता ! आम्हा दोघांना जाण्यासाठी वाट दे. बाजूला हो. वेळ लावू नकोस. नाहीतर मी हत्तीसह आताच्या आता तुला यमसदनाला पाठवितो." श्रीकृष्णांनी माहुताला असे धमकावल्यावर तो रागाने लालबुंद झाला आणि त्याने काळ, मृत्यू किंवा यमराजाप्रमाणे भयंकर असणार्या कुवलयापीडाला क्रुद्ध करून श्रीकृष्णांच्या दिशेने सोडले. (१-५) कुवलयापीडाने भगवंतांच्यावर झेप घेऊन त्यांना अत्यंत वेगाने सोंडेत लपेटून घेतले. परंतु भगवंत सोंडेतून बाहेर सटकले आणि सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायांच्या मधोमध जाऊन लपले. ते दृष्टीआड झाल्याचे पाहून कुवलयापीडाला अतिशय राग आला. त्याने आपल्या सोंडेने हुंगून भगवंतांना शोधले आणि पकडलेसुद्धा. परंतु त्यांनी ताकदीने स्वतःस सोडविले. यानंतर भगवंतांनी त्या बलवान हत्तीचे शेपूट पकडून गरुड सापाला जसा फरपटत नेतो, त्याप्रमाणे अगदी सहजपणे त्याला शंभर हात फरपटत नेले. जसे गोल फिरणार्या वासराबरोबर ते लहान असताना फिरत, त्याप्रमाणे त्याचे शेपूट पकडून ते त्याला फिरवू लागले. तो जेव्हा डावीकडे वळून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करी, तेव्हा ते उजवीकडे जात आणि जेव्हा तो उजवीकडे वळे, तेव्हा हे डावीकडे जात. यानंतर त्यांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक ठोसा लगावला आणि त्याला खाली पाडण्यासाठी म्हणून त्याच्या समोरून इकडे तिकडे ते असे पळू लागले की, तो जणू त्यांना आता पकडील किंवा नंतर पकडील. धावता धावता श्रीकृष्णांनी एकदम जमिनीवर पडण्याचे नाटक केले आणि लगेच उठून ते उभे राहिले. त्या वेळी ते जमिनीवर पडले असे वाटून त्याने रागाने आपले दोन्ही दात त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला, पण ते दात जमिनीवर आपटले. कुवलयापीडाची ही चढाई जेव्हा वाया गेली, तेव्हा तो आणखीनच चिडला. माहुतांनी हाकल्यावर तो क्रुद्ध होऊन श्रीकृष्णांवर तुटून पडला. तो आपल्या अंगावर झेप घेत आहे असे पाहून भगवान मधुसूदन त्याच्याजवळ गेले आणि एकाच हाताने त्याची सोंड पकडून त्याला त्यांनी जमिनीवार आपटले. तो पडल्याबरोबर श्रीहरींनी सिंहाप्रमाणे सहज त्याला पायाने दाबून धरून त्याचा दात उपटला आणि त्याच दाताने हत्तीला आणि माहुतांना यमसदनाला पाठविले. (६-१४) मेलेल्या हत्तीला तेथेच टाकून त्याचा दात घेऊन त्यांनी आखाड्याच्या जागी प्रवेश केला. यावेळची त्यांची शोभा काय वर्णावी ! हत्तीचा दात खांद्यावर होता, शरीरावर रक्त आणि हत्तीच्या मदाचे थेंब दिसत होते. आणि मुखकमलावर घामाचे बिंदू झळकत होते. (१५) परीक्षिता ! श्रीकृष्ण आणि बलराम हातामध्ये शस्त्रासारखे गजदन्त घेऊन काही गोपालांबरोबर कुस्तीच्या मैदानापाशी आले. ज्यावेळी श्रीकृष्ण बलरामांसह समारंभ भवनात आले, तेव्हा पहिलवानांना व्रजकठोर, सामान्य लोकांना नररत्न, स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव, गोपांना आप्त, दुष्ट राजांना शासन करणारे, त्यांच्या माता-पित्यांना मुलगा, कंसाला मृत्यू, अज्ञानी लोकांना सामान्य बालक, योग्यांना परम तत्त्व आणि वृष्णिवंशियांना श्रेष्ठ देव आहेत असे वाटले. (सर्वांचा एकाच भगवंतांमध्ये आपापल्या भावानुसार अनुक्रमे रौद्र, अद्भूत, शृंगार, हास्य, वीर, वात्सल्य, भयानक, बीभत्स, शांत आणि भक्ती या दहा रसांचा अनुभव आला. ) राजन ! कंस मोठा धीराचा पुरुष होता, तरीसुद्धा कुवलयापीडाला मारल्याचे पाहून त्याच्या लक्षात आले की, यांना जिंकणे अत्यंत अवघड आहे. त्यावेळी तो अतिशय भयभीत झाला. महापराक्रमी श्रीकृष्ण आणि बलराम फुलांचे हार, वस्त्रे आणि अलंकार यांमुळे सुंदर दिसत होते. असे वाटत होते की, उत्तम वेष धारण करून दोन नटच आले आहेत. त्यांच्या तेजामुळे पाहाणार्यांची मने त्यांच्यावरच खिळून जात. ते दोघेजण आखाड्यात असे शोभून दिसत होते. परीक्षिता ! त्या पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले मथुरेचे नागरिक आणि इतर देशांतील लोक यांचे डोळे अत्यानंदाने भरून आले आणि प्रफुल्लित चेहरे उत्कंठेने भरून आले. त्यांच्या मुखांकडे कितीही पाहिले, तरी लोकांचे डोळे तृप्त होतच नव्हते. जणू काही ते त्यांना डोळ्यांनी पीत, जिभेने चाटीत, नाकाने हुंगीट आणि हातांनी धरून हॄदयाशी कवटाळीत. त्यांचे सौंदर्य, गुण, माधुर्य आणि निर्भयपणा यांनी जणू उपस्थितांना त्यांच्या लीलांचे स्मरण करून दिले आणि ते लोक आपापसात त्यांच्यासंबंधी पाहिलेल्या-ऐकलेल्या गोष्टींबद्दल एकमेकांना सांगू-ऐकू लागले. "हे दोघेजण साक्षात भगवान नारायणांचे अंश या पृथ्वीवर वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाले आहेत. हे सावळे देवकीपासून जन्मले होते. वसुदेवांनी यांना गोकुळात नेले होते. इतके दिवस ते तेथेच नंदांच्या घरी गुप्तपणे राहून मोठे झाले. यांनीच पूताना, तृणावर्त, शंखचूड, केशी, धेनुक आणि यांसारख्या दैत्यांचा वध केला. शिवाय यमलार्जुनांचा उद्धार केला. यांनीच गाई आणि गोपालांना दावानलापासून वाचविले होते. तसेच कालिया नागाचे दमन आणि इंद्राचासुद्धा मानभंग केला होता. यांनीच सात दिवसपर्यंत एकाच हातावर गिरिराज गोवर्धनाला उचलून धरून वादळ, पाऊस, वीज यांपासून गोकुळ वाचविले. यांच्या नेहमीच सहास्य नजरेने पाहाणार्या मुखारविंदाच्या दर्शनाने आनंदित होणार्या गोपी सर्व प्रकारच्या तापांपासून अनायासेच मुक्त होत. असे म्हणतात की, हे यदुवंशाचे रक्षण करतील आणि हा अत्यंत प्रसिद्ध वंश यांच्यामुळे समृद्धी, यश आणि गौरव प्राप्त करील. हे दुसरे याच श्यामसुंदरांचे मोठे भाऊ कमलनयन श्रीबलराम आहेत. यांनीच प्रलंबासुर , वत्सासुर आणि बकासुर इत्यादींना मारले आहे. (१६-३०) उपस्थितांमध्ये जेव्हा ही चर्चा चालू होती आणि तुतारी इत्यादी वाद्ये वाजत होती, त्यावेळी राम-कृष्णांना संबोधून चाणूर म्हणाला. "हे नंदनंदना ! आणि हे रामा ! तुम्ही दोघे वीरांना आदरणीय असून कुस्तीत अतिशय निपुण आहात. हे ऐकुन तुमचे कौशल्य पाहाण्यासाठी राजाने तुम्हांला येथे बोलाविले आहे. जी प्रजा मन-वचन-कर्माने राजाला प्रिय असणारे कार्य करते, तिचे कल्याण होते आणि जी याविरुद्ध वागते, तिचे नुकसान होते. गाय आणि वासरे चारणार्या गवळ्यांची मुले दररोज आनंदाने वनामध्ये कुस्त्या खेळत असतात आणि गायी चारीत असतात, हे सर्वांना माहीत आहे. म्हणून हे वीरांनो, तुम्ही आणि आम्ही मिळून महाराजांना आवडणारी गोष्ट करू. राजा सर्व प्रजेचा प्रतिनिधी असल्यामुळे आपल्या असे करण्याने आपल्यावर प्रसन्न होतील." (३१-३५) यांच्याशी कुस्ती करावी अशी श्रीकृष्णांची इच्छा होतीच. म्हणूनच चाणूराचे म्हणणे ऐकून आणि त्याचे स्वागत करून देशकालानुरुप ते म्हणाले. " चाणूरा ! आम्हीसुद्धा या भोजराज कंसाची वनवासी प्रजा आहोत. त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही नेहमी केली पाहिजे. त्यातच आमचे उत्तम कल्याण आहे. परंतु चाणूरा ! आम्ही लहान आहोत. म्हणून आम्ही आमच्या बरोबरीची ताकद असणार्या मुलांबरोबरच कुस्ती खेळू. कुस्ती ही सारखी शक्ती असणार्यांशीच झाली पाहिजे, त्यामुळे अन्यायाचे समर्थन केल्याचे पाप कुस्ती पाहाणार्या सभासदांना लागणार नाही." (३६-३८) चाणूर म्हणाला- अरे ! तू आणि बलराम दोघेही बाल नाहीत की किशोरही नाहीत. तुम्ही बलवानांमध्येही श्रेष्ठ आहात. तू एक हजार हत्तींचे बळ असणार्या कुवलयापीडाला सहज मारलेस. म्हणून तुम्ही दोघांनी बलवानांबरोबरच लढावे यात अन्याय मुळीच नाही. म्हणून श्रीकृष्णा ! तू माझ्याबरोबर कुस्ती खेळ आणि बलरामाबरोबर मुष्टिक लढेल. (३९-४०) अध्याय त्रेचाळिसावा समाप्त |