श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४२ वा

कुब्जेवर कृपा, धनुष्यभंग आणि कंसाची भीती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात- यानंतर श्रीकृष्ण जेव्हा राजमार्गावरून पुढे चालले होते, तेव्हा त्यांनी एका युवतीला पाहिले. ती दिसायला सुंदर होती, परंतु शरीराने कुबडी होती. ती हातामध्ये उटण्यांचा डबा घेऊन चालली होती. भक्तांना आनंद देणारे श्रीकृष्ण हसत हसत तिला म्हणाले- "हे सुंदरी ! तू कोण आहेस ? हे उटणे कोणासाठी घेऊन चालली आहेस ? हे आम्हांला नीट सांग. बाई ग ! ही सुगंधी उटी तू आम्हांला दे. त्यामुळे लवकरच तुझे कल्याण होईल." (१-२)

सैरंध्री म्हणाली- " हे परम सुंदरा ! मी कंसाची त्रिविका नावाची उटणे लावणारी आवडती दासी आहे. माझे उटणे भोजराज कंसाला अतिशय आवडते; परंतु आपणा दोघांखेरीज याला पात्र असा दुसरा कोण आहे बरे !" भगवंतांचे सौंदर्य, कोमलता, मधुरता, मंद हास्य, प्रेमालाप आणि पाहाणे यांमुळे प्रभावित होऊन तिने ते उटणे त्या दोन्ही भावांना भरपूर लावले. (३-४)

तेव्हा स्वतःच्या शरीराच्या रंगाखेरीज वेगळ्या रंगाचे उटणे अंगाला लावल्यामुळे ते फारच सुंदर दिसू लागले. भगवान त्या कुब्जेवर प्रसन्न झाले. आपल्या दर्शनाचे प्रत्यक्ष फळ दाखविण्यासाठी त्यांनी तीन ठिकाणी वाकड्या परंतु सुंदर चेहर्‍याच्या कुब्जेला सरळ करण्याचा विचार केला. भगवंतांनी आपल्या पायांनी कुब्जेची पावले दाबून धरली आणि दोन बोटांनी हनुवटी धरून तिचे शरीर किंचितसे वर उचलले. तत्क्षणी तिचे सर्व अंग सरळ झाले. मुकुंदांच्या स्पर्शाने ती विशाल नितंब आणि स्तनांनी युक्त अशी एक उत्तम युवती झाली. (५-८)

रूप, गुण आणि औदार्याने संपन्न झालेल्या तिच्या मनात भगवंतांशी मिलन व्हावे, अशी इच्छा उत्पन्न झाली. त्यांच्या शेल्याचे टोक पकडून हसत हसत ती त्यांना म्हणाली. "हे वीरा ! या. आपण घरी जाऊ. मी आपणास येथे सोडू इच्छित नाही; कारण आपण माझे चित्त विचलित केले आहे. हे पुरुषोत्तमा ! या दासीवर प्रसन्न व्हा." जेव्हा बलरामांच्या देखत कुब्जेने अशी विनवणी केली तेव्हा श्रीकृष्ण बरोबरीच्या गोपालांकडे पाहात, हसत हसत तिला म्हणाले "हे सुंदरी ! तुझे घर हे माणसांची काळजी मिटवणारे आहे. मी माझे कार्य पूर्ण करून तुझ्या घरी येईन. आमच्यासारख्या बेघर वाटसरूंना तुमच्यासारख्यांचाच तर आधार आहे." अशा प्रकारे गोड गोड बोलून त्यांनी तिला निरोप दिला. ते जेव्हा बाजारपेठेत पोहोचले, तेव्हा तेथील व्यापार्‍यांनी त्यांचे आणि बलरामांचे विडे, फुलांचे हार, चंदन आणि निरनिराळे नजराणे देऊन पूजन केले. त्यांच्या दर्शनाने हॄदयात प्रेमाचा आवेग उत्पन्न झालेल्या स्त्रियांचे भान हरपत असे. त्यांची वस्त्रे , अंबाडे आणि हातातील काकणे शिथिल होत असत आणि त्या एखाद्या चित्रातील मूर्ती वाटत. (९-१४)

यानंतर नगरातील लोकांना धनुष्ययज्ञाचे ठिकाण विचारीत श्रीकृष्ण तेथे जाऊन पोहोचले. तेथे त्यांनी इंद्रधनुष्याप्रमाणे असलेले एक अद्‌भूत धनुष्य पाहिले. (१५)

त्या मौल्यवान धनुष्याची पूजा केली होती आणि पुष्कळसे सैनिक त्याच्या रक्षणाकरिता ठेवले होते. रक्षकांनी मनाई करूनही श्रीकृष्णांनी बळजबरीने ते धनुष्य उचलले. सगळ्यांच्या देखतच त्यांनी ते धनुष्य डाव्या हाताने सहज उचलून त्यला दोरी लावली आणि एका क्षणात दोरी ओढून बलवान उन्मत्त हत्तीने ऊस मोडावा, तसे ते मधोमध मोडले. जेव्हा धनुष्य मोडले, तेव्हा त्या आवाजाने आकाश , पृथ्वी आणि दिशा दुमदुमून गेल्या. तो आवाज ऐकून कंसदुद्धा भयभीत झाला. यावर धनुष्याचे रक्षण करणारे अविचारी रक्षक साथीदारांसह त्यांच्यावर अतिशय चिडले आणि त्यांनी त्यांना पकडण्याच्या इराद्याने " पकडा ! बांधा ! " म्हणत वेढा घातला. त्यांचा दुष्ट हेतू जाणून बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा रागावले आणि त्यांनी त्यांची पिटाई केली. त्याच तुकड्यांनी त्यांनी, कंसाने जी सेना पाठविली होती, तिचासुद्धा संहार केला. यानंतर ते यज्ञशाळेच्या मुख्य दरवाजातून बाहेर आले आणि आनंदाने मथुरानगरीचे वैभव पाहात फिरू लागले. या दोन्ही भावांच्या अद्‌भूत पराक्रमाची गोष्ट जेव्हा नगरवसियांनी ऐकली आणि त्यांचे तेज, साहस तसेच अनुपम रूप पाहिले, तेव्हा हे दोघेजण कोणीतरी श्रेष्ठ देव असावेत असे त्यांना वाटले. अशा प्रकारे ते दोघे स्वच्छंदपणे फिरत असता सूर्यास्त झाला. नंतर गोपालांसमवेत राम-कृष्ण नगराच्या बाहेर जेथे छकडे होते तेथे परत आले. लक्ष्मी आपणास मिळावी, असे इच्छिणार्‍या इतरांचा त्याग करून लक्ष्मीने ज्यांना आपले निवासस्थान बनविले, त्याच पुरुषभूषण श्रीकृष्णांचे अंगोपांगांचे सौंदर्य मथुरावासी पाहात होते. भगवान इकडे येतेवेळी व्रजातील गोपी विरहातुर होऊन मथुरावासियांबद्दल जे जे काही बोलल्या होत्या, ते ते सर्व मथुरेत खरे ठरले. (१६-२४)

नंतर राम-कृष्णांनी हात-पाय धुऊन दुधाची खीर इत्यादी पदार्थांनी भोजन केले आणि कंसाचे मनोगत जाणून घेऊन त्या रात्री ते तिथेच आरामात झोपी गेले. (२५)

जेव्हा कंसाने असे ऐकले की, कृष्ण-रामांनी धनुष्य तोडले, त्याचे रक्षक आणि त्यांच्या मदतीसाठी पाठविलेल्या सेनेचासुद्धा संहार केला आणि हे सर्व म्हणजे त्यांचा एक खेळ होता, तेव्हा तो अतिशय घाबरला. त्या दुर्बुद्धीला रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही. जागेपणी आणि स्वप्नातसुद्धा त्याला मृत्यूचे सूचक पुष्कळसे अपशकून झाले. जागेपणी त्याला असे दिसले की, त्याच्या शरीराचे प्रतिबिंब असूनही त्याला मस्तक नसे. मध्ये बोट वगैरे नसूनही चंद्र इत्यादी त्याला दोन दोन दिसत. सावली दुभंगलेली दिसे आणि कानात बोटे घालूनही घूं घूं असा आवाज ऐकू येत असे. झाडे सोनेरी दिसत होती आणि धुळीत स्वतःच्या पायांचे ठसे दिसत नव्हते. कंसाला स्वप्नात दिसले की, तो प्रेतांना मिठी मारीत आहे, गाढवावर बसून चालला आहे आणि विषप्राशन करीत आहे. त्याचे सर्व शरीर तेलाने माखले आहे, गळ्यात जास्वंदीच्या फुलांची माळ आहे आणि तो नग्न होऊन कुठेतरी एकटाच जात आहे. स्वप्नात आणि जागेपणी त्याने अशा प्रकारचे पुष्कळसे अपशकुन पाहिले. त्यामुळे मृत्यूच्या भीतीने चिंताग्रस्त होऊन त्याची झोप उडाली. (२६-३१)

परीक्षिता ! जेव्हा रात्र संपली आणि सूर्यनारायण पूर्व समुद्राच्या वर आले, तेव्हा राजा कंसाने मल्लक्रीडामहोत्सवास प्रारंभ केला. राजाच्या कर्मचार्‍यांनी आखाडा चांगल्या रीतीने सजविला. नगारे, तुतार्‍या वाजू लागल्या. बैठकीच्या जागा फुलांचे गजरे, झेंडे, वस्त्रे आणि पानाफुलांच्या तोरणांनी सजविल्या गेल्या. त्यावर ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी नागरिक आणि गावातील लोक, असे सर्वजण नियोजित ठिकाणी बसले. राजेही आपापल्या आसनांवर जाऊन बसले. आपल्या मंत्र्यांसह कंस, मांडलिक राजांच्या मध्ये राजसिंहासनावर जाऊन बसला. अपशकून झालेले असल्याने यावेळीसुद्धा तो मनातून घाबरलेलाच होता. तेव्हा पहिलवानांच्या दंड थोपटण्यापाठोपाठ वाद्ये वाजू लागली आणि गर्विष्ठ पहिलवान खूप सजून आपापल्या उस्तादांसह आखाड्यात येऊन उतरले. चाणूर, मुष्टिक, कूट, शल आणि तोशल हे पहिलवान वाद्यांच्या सुमधुर आवाजाने उत्साहित होऊन आखाड्यामध्ये येऊन बसले. त्याचवेळी भोजराज कंसाने बोलाविलेले नंद इत्यादी गोप राजाला नजराणे देऊन एका मंचावर जाऊन बसले. (३२-३८)

अध्याय बेचाळिसावा समाप्त

GO TOP