श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४१ वा

श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात-अक्रूर अशी स्तुती करीत असतानाच एखाद्या नटाने एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात यावे, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्यरूपाचे दर्शन घडविले आणि पुन्हा ते आवरून घेतले. भगवंतांचे ते दिव्यरूप अंतर्धान पावलेले पाहून तो पाण्याबाहेर आला आणि लगबगीने सर्व आवश्यक नित्यकर्मे पार पाडून चकित अवस्थेत रथाकडे परतला. श्रीकृष्णांनी त्याला विचारले, "काका ! आपण पृथ्वी, आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्‍भूत वस्तू पाहिलीत काय ? कारण आपल्याकडे पाहिल्यावर असेच वाटते." (१-३)

अक्रूर म्हणाला- प्रभो ! पृथ्वी, आकाश किंवा पाण्यामध्ये जितके म्हणून अद्‍भुत पदार्थ आहेत, ते सर्व विश्वस्वरूप आपल्यामध्येच आहेत. जर मी आपल्यालाच पाहात आहे, तर अशी कोणती अद्‍भूत वस्तू असणार आहे की, जी मी पाहिली नाही ? भगवन ! जेवढ्या म्हणून अद्‍भूत वस्तू आहेत, त्या पॄथ्वीवर असोत, पाण्यात असोत, किंवा आकाशात असोत त्या सगळ्या ज्यांच्यामध्ये आहेत, त्या आपल्यालाच मी पाहिल्यावर त्याखेरीज अद्‍भूत वस्तू मी कोणती पाहणार ? गांदिनीपुत्र अक्रूराने असे म्हणून रथ हाकला आणि त्याने श्रीकृष्ण आणि बलरामांना दिवस मावळतेवेळी मथुरापुरीत आणले. परीक्षिता ! वाटेत ठिकठिकाणी लागणार्‍या गावातील लोक भेटण्यासाठी येत आणि वसुदेवपुत्रांना पाहून इतके आनंदमग्न होऊन जात की, ते आपली दृष्टी बाजूला करू शकत नसत. नंद इत्यादी गोप अगोदरच तेथे जाऊन पोहोचले होते आणि मथुरेच्या बाहेर उपवनात त्यांची वाट पाहात होते. त्या सर्वांच्याजवळ जाऊन विनम्रपणे उभे असलेल्या अकृराचा हात आपल्या हातात घेऊन जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी हसत हसत म्हटले- " काका ! आपण अगोदर रथासह पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा आणि आपल्या घरी जा. आम्ही येथे थांबून नंतर नगर पाहू. " (४-१०)

अक्रूर म्हणाला- प्रभो ! मी आपणा दोघांखेरीज मथुरेत जाऊ शकत नाही. स्वामी ! मी आपला भक्त आहे. हे भक्तवत्सल प्रभो ! आपण मला एकट्याला सोडू नका. भगवन ! या. आपण माझ्याबरोबर चला. हे परम हितैषी भगवन ! आपण स्वतः बलराम, गोपाल, तसेच नंद इत्यादी आप्तांसह येऊन माझे घर सनाथ करा. आम्हां गृहस्थांची घरे आपल्या चरणधुळीने पावन करा. नंतर आम्ही आपले चरण धुऊ. त्या आपल्या चरणोदकाने अग्नी, देवता, पितर असे सर्वजण तृप्त होतील. प्रभो ! आपले पाद्यपूजन करूनच बली महान पुण्यश्लोक ठरला. इतकेच नव्हे तर अनन्य भक्तांना मिळणारे अतुलनीय ऐश्वर्य आणि मोक्ष त्याला प्राप्त झाला. आपले चरण धुतलेले पाणी हेच पवित्र गंगोदक होय. त्याने तिन्ही लोक पवित्र केले. त्याच्याच स्पर्शाने सगराच्या पुत्रांना सद्‌गती प्राप्त झाली आणि तेच जल शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केले. हे यदुश्रेष्ठा ! हे देवाधिदेवा ! हे जगताचे स्वामी ! आपल्या गुणांचे आणि लीलांचे श्रवण व कीर्तन मंगलकारक आहे. उत्तम पुरुष आपल्या गुणांचे कीर्तन करीत असतात. हे नारायणा ! मी आपणास नमस्कार करतो. (११-१६)

श्रीभगवान म्हणाले - काका ! मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन, पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या आप्तेष्टांना सुखी करीन. (१७)

श्रीशुकदेव म्हणतात- भगवंतांनी असे म्हटल्यानंतर थोडासा खिन्न झालेला अक्रूर नगरात गेला आणि त्याने कंसाला त्याचे काम केल्याचे निवेदन केले आणि तो आपल्या घरी गेला. नंतर तिसर्‍या प्रहरी, बलराम आणि गोपालांसह भगवान श्रीकृष्णांनी मथुरा पाहाण्यासाठी त्या नगरात प्रवेश केला. भगवंतांनी पाहिले की, नगराच्या तटांना स्फटिकांची उंच उंच गोपुरे असून घरांना सुद्धा स्फटिकांची दारे लावलेली आहेत. त्यांना सोन्याचे मोठमोठे दरवाजे आणि सोन्याचीच तोरणे लावलेली आहेत. नगरात तांब्या-पितळेची धान्यांची कोठारे, पागा इत्यादी आहेत. चोहोबाजूंच्या खंदकामुळे कोठूनही त्या नगरात प्रवेश करणे कठीण आहे. जागोजागी असलेल्या फळबागांनी व रमणीय फुलबागांनी ती नगरी शोभिवंत दिसत आहे. सुवर्णाने सजविलेले चौक, धनिकांचे महाल, त्यांच्या सभोवतालचे बगीचे, कारागिरांचे बाजार व लोकांची निवासस्थाने नगराची शोभा वाढवीत आहेत. वैडूर्य, हिरे, स्फटिक, नील, पोवळी, मोती आणि पाचू इत्यादींनी मढविलेले सज्जे, चबुतरे, झरोके आणि फरशा झगमगत आहेत. त्यांच्यावर बसलेले मोर, कबूतर इत्यादी पक्षी निरनिराळ्या बोली बोलत आहेत. सडका, बाजार, गल्ल्या आणि चौकांमध्ये पुष्कळ सुगंधी पाणी शिंपडलेले आहे. ठिकठिकाणी फुले, जवाचे अंकुर, लाह्या आणि तांदूळ पसरलेले आहेत. घरांच्या दरवाजांपाशी दही आणि चंदनचर्चित असे पाण्याने भरलेले कलश ठेवले आहेत. तसेच ते दरवाजे फुले, दीपमाळा, पाने, घडांसह केळी आणि सुपारीची झाडे, झेंडे आणि रेशमी पताकांनी उत्तम रीतीने सजविले आहेत. (१८-२३)

हे राजा ! वसुदेवनंदन श्रीकृष्ण आणि बलराम काही मित्रांसह राजमार्गाने मथुरा नगरीत प्रवेश करीत, त्यावेळी नगरातील स्त्रिया अतिशय उत्सुकतेने त्यांना पाहाण्यासाठी लगबगीने गच्च्यांवर चढून उभ्या राहिल्या. त्या गडबडीमध्ये काहींनी आपली वस्त्रे आणि दागिने उलट-सुलट परिधान केले. काहींनी चुकून कुंडले, बांगड्या इत्यादी दोन-दोन घाल्यण्या‍ऐवजी विसरून एक-एकच घातले. काहीजणींनी एकाच कानामध्ये तानवडे घातले तर कोणी एकाच पायाला पैंजण बांधले. कुणी एकाच डोळ्यात काजळ घातले. काही स्त्रिया भोजन करता करता हातातील घास तसाच टाकून निघाल्या . सर्वांची मने आनंदाने भरून आली होती. काहीजणी अंगाल तेल लावीत होत्या, त्या स्नान न करताच निघाल्या. ज्या झोपी गेल्या होत्या, त्या गडबड ऐकून उठून तशाच निघाल्या. ज्या माता मुलांना दूध पाजीत होत्या, त्या त्यांना खाली ठेवून निघाल्या. कमलनयन भगवान श्रीकृष्ण मदमस्त गजराजासारखे डौलाने चालत होते. लक्ष्मीलासुद्धा आनंदित करणार्‍या आपल्या रूपाने नगरातील नारींच्या डोळ्यांना त्यांनी तृप्त केले आणि आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेने त्यांची मने आकर्षित करून घेतली. मथुरेतील स्त्रियांचे मन वारंवार श्रीकृष्णांच्या अद्‍भूत लीला ऐकूनच त्यांना पाहाण्यासाठी व्याकूळ झाले होते. आज त्यांनी त्यांना पाहिले. आणि श्रीकृष्णांनीसुद्धा आपल्या मंद स्मितहास्ययुक्त दृष्टीचा अमृतवर्षाव करून त्यांचा सन्मान केला. परीक्षिता ! त्या स्त्रिया आपल्या डोळ्यांच्याद्वारे भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन गेल्या आणि त्यांच्या आनंदमय स्वरूपाला त्यांनी आलिंगन दिले. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि पुष्कळ दिवसांची त्यांची विरहव्याधी शांत झाली. महालांच्या गच्च्यांवर चढून मथुरेतील स्त्रिया बलराम आणि श्रीकृष्णांवर पुष्पवर्षाव करू लागल्या. त्यावेळी त्या स्त्रियांची मुखकमले प्रेमाने प्रफुल्लित झाली होती. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांनी ठिकठिकाणी दही, अक्षता, पाण्याने भरलेले घट, फुलांचे हार, चंदन आणि भेटवस्तूंनी राम-कृष्णांची आनंदमय होऊन पूजा केली. राम-कृष्णांना पाहून नगरवासी म्हणू लागले, गोपींनी असे काय तप केले आहे की, जेणेकरून, मनुष्यमात्राला परमानंद देणार्‍या या दोघांना त्या नेहमी पाहात असत. (२४-३१)

त्याच वेळी कपडे रंगविण्याचेही काम करणारा एक धोबी येत असलेला श्रीकृष्णांनी पाहिला व त्याच्याकडे त्यांनी धुतलेले अतिशय उत्तम कपडे मागितले. बंधो ! आमच्या अंगाला व्यवस्थित बसतील, असे कपडे ते घालण्यास पात्र असणार्‍या आम्हांला दे. तू आम्हांला वस्त्रे दिलीस, तर तुझे परम कल्याण होईल, यात बिलकूल शंका नाही. सर्व दृष्टींनी परिपूर्ण असूनही भगवंतांनी वस्त्रांची मागणी केली; परंतु राजा कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक रागावून तुच्छतेने म्हणाला, हे उद्दामांनो ! " दर्‍या-खोर्‍यात आणि जंगलात राहाणरे तुम्ही नेहमी असेच कपडे घालता काय ? मग आजच तुम्हांला राजाचे कपडे कशाला पाहिजेत ? तर मूर्खांनो ! लवकर येथून निघून जा ! जगण्याची इच्छा असेल तर पुन्हा अशा तर्‍हेने मागू नका. तुमच्यासारख्या उन्मतांना राजाचे शिपाई कैद करतात, त्यांना मारहाण करतात, आणि त्यांच्याजवळ जे काही असेल, ते हिसकावून घेतात." जेव्हा तो धोबी अशी बडबड करू लागला, तेव्हा श्रीकृष्णांनी हातानेच त्याचे मस्तक उडवले. हे पाहून धोब्याच्या हाताखाली काम करणारे सर्वजण, कपड्यांची गाठोडी तेथेच टाकून, इकडे तिकडे पळून गेले. ती वस्त्रे श्रीकृष्णांनी घेतली. मग श्रीकृष्ण आणि बलरामांनी आपल्या मनाजोगती वस्त्रे परिधान केली. आणि उरलेल्यांपैकी पुष्कळशी वस्त्रे गोपाळांना दिली. उरलेले कपडे जमिनीवर टाकून दिले. (३२-३९)

ते थोडेसे पुढे गेले, तेव्हा त्यांना एक शिंपी भेटला. भगवंतांचे अनुपम सौं‍दर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला. त्या रंगी-बेरंगी सुंदर वस्त्रांतून त्याने त्यांना शोभणारा वेष तयार करून दिले. अनेक प्रकारच्या वेषांनी एक सावळा व दुसरा गोरा असे ते दोघेही आणखीनच शोभू लागले. उत्सवाच्या वेळी उत्तम सजवलेली शुभ्र आणि सावळ्या रंगांची हत्तीची पिल्ले शोभावीत तसे. भगवान श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला या लोकी भरपूर संपत्ती, शक्ती, ऐश्वर्य, आपले स्मरण आणि अतींद्रिय शक्ती दिल्या. तसेच मृत्यूनंतर आपले सारूप्यही दिले. (४०-४२)

नंतर ते दोघे सुदामा माळ्याच्या घरी गेले. दोघा भावांना पाहाताच त्याने उठून जमिनीवर डोके टेकवून त्यांना प्रणाम केला. नंतर त्यांना आसनावर बसवून त्याने त्यांचे पाय धुतले आणि गोपालांसह त्यांची अर्घ्य, फुलांचे हार, पाने, चंदन इत्यादी सामग्रीने विधिपूर्वक पूजा केली. आणि तो म्हणाला, " हे प्रभो ! आपणा दोघांच्या आगमनाने आमचा जन्म सफळ झाला. कुळ पवित्र झाले . तसेच आज पितर, देव आणि ऋषी आमच्यावर संतुष्ट झाले, असे मी मानतो. आपण दोघेजण संपूर्ण जगताचे परम कारण आहात. आपण या संसाराचा अभ्युदय आणि मोक्ष यासाठीच या पृथ्वीवर आपल्या शक्तींसह अवतीर्ण झाला आहात. आपण जरी भजन करणार्‍यांनाच भजता, तरीसुद्धा आपल्या दृष्टीत विषमता नाही. कारण आपण सर्व जगताचे सुहृद आणि आत्मा आहात. आपण चराचरामध्ये समरूपाने राहाता. मी आपला दास आहे. आपण दोघांनी मला आज्ञा करावी की, मी आपली काय सेवा करू ? भगवन ! आपण जीवाला आज्ञा देऊन एखाद्या कार्यासाठी त्याची नियुक्ती करता, हा आपला त्याच्यावर मोठाच अनुग्रह आहे" हे राजेंद्रा ! भगवंतांचे मनोगत जाणून सुदाम्याने मोठ्या प्रेमाने अतिशय सुंदर सुंदर सुगंधित पुष्पांनी गुंफलेले हार त्यांच्या गळ्यात घातले. गोपाल आणि बलरामांसह भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या सुंदर-सुंदर हारांनी अलंकृत झाले, तेव्हा त्या वरदायक प्रभूंनी प्रसन्न होऊन विनम्र आणि शरण आलेल्या सुदाम्याला वर दिले. सुदाम्यानेही त्यांच्याकडे हाच वर मागितला की सर्वस्वरूप अशा त्यांच्या ठायी आपली दृढ भक्ती असावी, त्यांच्या भक्तांशी मैत्री असावी आणि सर्व प्राण्यांबद्दल अत्यंत दया असावी. (४३-५१)

हे वर त्याला देऊन शिवाय वंशपरंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी, शौर्य, आयुष्य, कीर्ती आणि सौंदर्य हेही दिले. नंतर श्रीकृष्ण बलरामांसह पुढे गेले. (५२)

अध्याय एकेचाळिसावा समाप्त

GO TOP