|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ४० वा
अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] अक्रूर म्हणाला- प्रभो ! आपण प्रकृती इत्यादी सर्व कारणांचे कारण आहात. आपणच अविनाशी पुरुषोत्तम नारायण आहात. तसेच ज्यांनी या जगाची निर्मिती केली, त्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती आपल्याच नाभिकमलातून झाली. मी आपल्याला नमस्कार करतो. पृथ्वी, जल, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्व, प्रकृती, पुरुष, मन, इंद्रिये, सर्व इंद्रियांचे विषय आणि त्यांच्या अधिष्ठानभूत देवता हेच सर्व चराचर जगाला कारण आहेत. पण हे सगळे आपलेच अंगस्वरूप आहेत. प्रकृती इत्यादी सर्व पदार्थ अचेतन असल्यामुळे आत्मस्वरूप अशा तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत; ब्रह्मदेवसुद्धा प्रकृतीच्या गुणांनी युक्त आहेत. म्हणून तेसुद्धा आपले गुणांच्या पलीकडे असलेले स्वरूप जाणत नाहीत. साधू, योगी, अध्यात्म, अधिभूत व अधिदैव यांचे साक्षी महापुरुष व नियंत्रक ईश्वराच्या रूपामध्ये आपलीच उपासना करतात. काही कर्मकांडी ब्राह्मण वेदमंत्रांनी अनेक देवतावाचक नावे आणि अनेक रूपे असलेले यज्ञ करतात आणि त्याद्वारा आपलीच उपासना करतात. काही ज्ञानी सर्व कर्मांचा त्याग करून शांत भावात स्थिर राहातात आणि समाधीने ज्ञानस्वरूप अशा आपलीच आराधना करतात. आणखी काही शुद्धचित्त वैष्णव आपणच सांगितलेल्या पांचरात्र इत्यादी विधींनी आपल्याशी तन्मय होऊन आपल्या ’चतुर्व्युह’ इत्यादी अनेक किंवा ’नारायण’ या एकाच स्वरूपाची पूजा करतात. भगवन ! दुसरे काही लोक शैवपंथानुसार आचार्यभेदामुळे अनेक अवांतर भेद असलेल्या शिवस्वरूप अशा आपलीच पूजा करतात. हे प्रभो ! जे लोक दुसर्या देवतांची भक्ती करतात आणि त्या देवतांना आपल्यापेक्षा भिन्न समजतात, ते सर्वजणसुद्धा वास्तविक आपलीच आराधना करतात. कारण आपणच सर्व देवतांच्या रूपांमध्ये आहात आणि सर्वेश्वरसुद्धा आहात. हे प्रभो ! जशा पर्वतात उगम पावणार्या नद्या पावसाच्या पाण्याने भरून सर्व बाजूंनी समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे उपासनामार्ग शेवटी आपल्यालाच येऊन मिळतात. (१-१०) प्रभो ! सत्त्व, रज आणि तम हे आपल्या प्रकृतीचे तीन गुण आहेत. ब्रह्मदेवापासून ते स्थावर वस्तूंपर्यंतचे सर्व चराचर जीव त्या तीन गुणांनीच ओतप्रोत भरलेले आहेत. परंतु आपण सर्वस्वरूप असूनही त्या गुणांनी लिप्त झालेले नाहीत. आपण सर्व वृत्तींचे साक्षी आहात. तीन गुणांचा प्रवाह अज्ञानमूलक असून तो देवता, मनुष्य, पशु-पक्षी इत्यादी सर्व योनींमध्ये व्याप्त आहे. मी आपणांस नमस्कार करतो. अग्नी आपले मुख, पृथ्वी चरण, सूर्य आणि चंद्र नेत्र, आकाश नाभी, दिशा कान, स्वर्ग मस्तक, देवेंद्र भुजा, समुद्र उदर आणि वायू आपल्या प्राणशक्तीच्या रूपामध्ये उपासनेसाठी कल्पिलेला आहे. वृक्ष आणि वनस्पती हे रोम, मेघ डोक्यावरील केस, पर्वत आपली हाडे व नखे, दिवस व रात्र पापण्यांची उघडझाप, प्रजापती जननेंद्रिय आणि पाऊस हेच आपले वीर्य आहे. हे अविनाशी भगवन ! जसे पाण्यामध्ये पुष्कळसे जलचर जीव आणि औंदुंबराच्या फळामध्ये लहान-लहान कीटक असतात. त्याचप्रमाणे उपासनेसाठी स्वीकारलेल्या आपल्या मनोमय पुरुषरूपामध्ये अनेक प्रकारच्या जीवजंतूंनी भरलेले असे लोक आणि त्यांचे लोकपाल कल्पिलेले आहेत. प्रभो ! आपण लीला करण्यासाठी पृथ्वीवर जी जी रूपे धारण करता, ते सर्व अवतार, लोकांचा शोक-मोह धुऊन टाकतात आणि नंतर तेच लोक मोठ्या आनंदाने आपल्या यशाचे गायन करीत असतात. आपण वेद, ऋषी, वनस्पती यांचे रक्षण आणि सत्यव्रताला ज्ञान देण्यासाठी म्हणून मत्स्यरूप धारण करून प्रलयाच्या समुद्रामध्ये स्वच्छंद विहार केला होता. त्या मत्स्यरूपाला मी नमस्कार करतो. आपणच मधु आणि कैटभ नावाच्या असुरांचा संहार करण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला होता. मी आपल्या त्या रूपालासुद्धा नमस्कार करतो. आपणच ते विशाल कूर्माचे रूप धारण करून मंदराचलाला धारण केले होते. आपल्याला मी नमस्कार करतो. आपणच पृथ्वीच्या उद्धाराची लीला करण्यासाठी वराहरूपाचा स्वीकार केला होता. आपणास माझा नमस्कार असो. प्रल्हादासारख्या साधुजनांचे भय मिटविणार्या हे प्रभो ! आपल्या त्या अलौकिक नृसिंह रूपाला मी नमस्कार करतो. आपण वामनरूप घेऊन आपल्या पायाने तीन लोक व्यापले होते. मी आपणास नमस्कार करीत आहे. धर्माचे उल्लंघन करणार्या गर्विष्ठ क्षत्रियरूपी वनाला तोडणार्या परशुरामाला मी नमस्कार करतो. रावणाचा नाश करणार्या श्रीरामांना मी नमस्कार करतो. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्युहरूपात असणार्या भागवंतांच्या देवाला मी नमस्कार करतो. दैत्य आणि दानवांना मोहित करण्यासाठी शुद्ध असे बुद्धरूप घेणार्या आपणास मी नमस्कार करीत आहे. पृथ्वीवरील क्षत्रिय जेव्हा म्लेंच्छांप्रमाणे वर्तन करू लागतील, तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कल्किरूप घेणार्या आपणास मी नमस्कार करतो. (११-२२) भगवन ! हा जीवलोक आपल्या मायेने मोहित झाला आहे. त्यामुळेच ’मी-माझे’ या खोट्या दुराग्रहात फसून कर्ममार्गामध्ये भटकत आहे. हे प्रभो ! मी सुद्धा किती मूर्ख ! स्वप्नात दिसणार्या पदार्थाप्रमाणे भ्रामक असणारे देह-घर, पत्नी-पुत्र, धन-स्वजन इत्यादी खरे समजून त्यांच्या मोहात गुंतून भटकत आहे. (२३-२४) प्रभो ! माझा मूर्खपणा तर पहा ! मी अनित्य वस्तूंना नित्य, अनात्म्याला आत्मा आणि दुःखाला सुख समजलो. अशा प्रकारे मी अज्ञानाने सांसारिक सुख-दुःखांतच रमून गेलो आणि ज्यांच्यावर खरे प्रेम करावे त्या आपल्याला विसरलो. जसे एखाद्या अडाणी माणसाने पाण्यासाठी तळ्याकडे जावे आणि त्याच्यावर त्याच्यामुळेच उत्पन्न झालेले शेवाळ पाहून तेथे पाणी नाही असे समजावे आणि याउलट मृगजळाकडे धाव घ्यावी, तसाच मीसुद्धा आपल्याला सोडून खोट्या सुखाच्या मागे भटकत आहे. माझी बुद्धी विषयवासनायुक्त आहे. माझ्या मनामध्ये अनेक वस्तूंच्या कामना आणि त्या पूर्ण करण्यासाठी कर्म करण्याचे संकल्प उठत असतात. शिवाय निग्रह करण्यास अत्यंत कठीण अशी ही इंद्रिये मनाला बळजबरीने इकडे तिकडे फरपटत नेतात, म्हणून मी या मनाला रोखू शकत नाही. तो मी, अभक्तांना अतिशय दुर्लभ अशा आपल्या चरणकमलांना शरण आलो आहे. हे स्वामी ! हा सुद्धा मी आपला कृपाप्रसादच मानतो. कारण हे पद्मनाभ ! जेव्हा जीवाची संसारातून मुक्त होण्याची वेळ येते, तेव्हाच सत्पुरुषांची उपासना घडून चित्तवृत्ती आपल्या ठायी जडते. प्रभो ! आपण शुद्ध विज्ञानस्वरूप आहात. सर्व अनुभूतींचे आपणच कारण आहात. जीव, ईश्वर आणि प्रकृती आपणच आहात. आपल्या शक्ती अनंत आहेत. आपण स्वतः ब्रह्म आहात. मी आपणांस नमस्कार करीत आहे. प्रभो ! आपणच वासुदेव आणि सर्व जीवांचे आश्रयस्थान संकर्षण आहात. बुद्धी मनाच्या व अधिष्ठात्या (प्रद्युम्न आणि अनिरुद्ध) हृषीकेशा ! मी आपणांस नमस्कार करतो. प्रभो ! शरण आलेल्या माझे रक्षण करा. (२५-३०) अध्याय चाळिसावा समाप्त |