श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३९ वा

श्रीकृष्ण-बलरामांचे मथुरागमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - रामकृष्णांनी अक्रूराचे चांगल्या तर्‍हेने आदरातिथ्य केले. तो आरामात पलंगावर बसला. येताना वाटेत ज्या ज्या इच्छा त्याने मनात बाळगल्या होत्या, त्या सर्व पूर्ण झाल्या. राजा ! लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेले भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही, असे काय आहे? तरीसुद्धा भगवत्परायण भक्तजन कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीत. (१-२)

संध्याकाळचे भोजन झाल्यानंतर देवकीनंदन भगवान श्रीकृष्णांनी अक्रूराला कंसाचे नातलगांशी वागणे कसे असते, हे विचारून त्याच्या पुढील कार्यक्रमाविषयी विचारले. (३)

श्रीकृष्ण म्हणाले- काका ! आपले मन पवित्र आहे. आपण आलात, आपले स्वागत असो. मी आपले कल्याण इच्छितो. मथुरेतील आमच्या आप्तस्वकीयांचे कुशल आणि आरोग्य बरे आहे ना ? अहो ! आमचा फक्त नावाचा मामा कंस म्हणजे आमच्या कुलाची व्याधीच आहे. ती वाढत असेपर्यंत आम्ही आमचे आप्तेष्ट आणि त्यांची मुले- बाळे यांच्या खुशालीविषयी काय विचारावे? काका ! किती ही खेदाची गोष्ट आहे ! माझ्यामुळेच माझ्या निरपराध आणि सदाचरणी माता-पित्यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या. माझ्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकले गेले आणि माझ्यामुळेच त्यांची मुले मारली गेली. पुष्कळ दिवसांपासून माझी इच्छा होती की, आपल्यापैकी कोणाची तरी माझी भेट व्हावी. सुदैवाने आज ती इच्छा पूर्ण झाली. काका ! आता आपण मला हे सांगा की, आपण येथे येण्याचे कारण काय? (४-७)

श्रीशुक म्हणतात- भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अक्रूराला असा प्रश्न केला, तेव्हा कंसाने यादवांशी वैर आणि वसुदेवांना मारण्याचा त्याचा उद्योगसुद्धा त्याने त्यांना सांगितला. अक्रूराने कंसाचा संदेश, ज्या उद्देशाने त्याने आपल्याला दूत म्हणून पाठविले होते तो त्याचा उद्देश आणि नारदांनी वसुदेवांपासून श्रीकृष्णांचा जन्म घेण्याचा वृत्तांत जो कंसाला सांगितला होता तो, असा सर्व वृत्तांत सांगितला. शत्रुपक्षाचा निःपात करणारे श्रीकृष्ण आणि बलराम, अक्रूराचे हे म्हणणे ऐकून हसू लागले आणि त्यानंतर त्यांनी नंदबाबांना कंसराजाची आज्ञा सांगितली. तेव्हा नंदांनीही सर्व गोपांना आज्ञा केली की, " सगळे दूध एकत्र करा. नजराणे घ्या आणि छकडे जोडा. उद्याच आपण मथुरेला जाणार आहोत आणि तेथे जाऊन राजा कंसाला दूध, दही वगैरे देऊ. तेथे एक मोठा उत्सव होत आहे. तो पाहाण्यासाठी देशातील पुष्कळ लोक एकत्र येणार आहेत. आम्हीसुद्धा तो पाहू ! " कोतवालामार्फत नंदांनी आपल्या गोकुळात अशी दवंडी पिटविली. (८-१२)

आपल्या राम-कृष्णांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी अक्रूर व्रजामध्ये आला आहे, हे ऐकून गोपी अतिशय व्याकूळ झाल्या. भगवान श्रीकृष्ण मथुरेला जाणर ही बातमी ऐकूनच काही गोपी शोकाकुल झाल्या. त्यांच्या उष्ण श्वासांमुळे त्यांची मुखकमले म्लान झाली. काहींची अशी दशा झाली की, त्यांची वस्त्रे ढळली, हातातील काकणे गळून पडली आणि वेण्या सैल झाल्या तरी याचाही त्यांना पत्ता लागला नाही. भगवंतांच्या चिंतनाने काहींच्या चित्तवृत्तींचा लय झाला. जणू त्या समाधिस्त झाल्या आणि त्यांना स्वतःचेही भान राहिले नाही. काही गोपी श्रीकृष्णांचे प्रेम, स्मितहास्य आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचना असलेले बोलणे आठवून देहभान विसरल्या. भगवंतांचे आकर्षक चालणे, हाव-भाव, प्रेमपूर्ण स्मितहास्ययुक्त पाहाणे, सर्व शोक मिटविणारी थट्टा आणि अलौकिक लीला हे सर्व आठवून त्यांच्या विरहाच्या भीतीने त्या व्याकूळ झाल्या. त्यांचे जीवनच श्रीकृष्णमय झालेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सार्‍याजणी एकत्र येऊन गटागटाने आपापसात म्हणू लागल्या. (१३-१८)

गोपी म्हणाल्या - हे विधात्या ! हे विश्व घडवतोस खरे, परंतु तुझ्या हृदयात दयेचा लवलेश नाही. प्रथम तू मैत्रीने आणि प्रेमाने जीवांना एकमेकांशी जोडतोस, परंतु त्यांच्या इच्छा पूर्ण होण्या‍आधीच तू विनाकारणच त्यांची एकमेकांपासून ताटातूट करतोस. तुझा हा खेळ लहान पोरांसारखाच नव्हे का ? हे विधात्या ! आधी आम्हांला मुकुंदांचे मुखकमल दाखविलेस. किती सुंदर आहे ते ! काळे कुरळे केस ज्याच्यावर भुरभुरत आहेत, सुंदर गाल आणि उभार नाक यांनी शोभणारे आणि स्मितहास्याच्या लकेरीने सगळा शोक दूर करणारे असे ते मुखकमळ आता मात्र आमच्या दृष्टी‍आड करीत आहेस ! केवढा हा तुझा दुष्टपणा ! तूच क्रूर आहेस. मात्र अक्रूर नाव घेऊन येथे आलास आणि तूच आम्हांला दिलेले हे डोळे मूर्खासारखे आमच्यापासून काढून घेत आहेस. यांच्याद्वारेच आम्ही श्रीकृष्णांच्या एकेका अंगामध्ये तुमच्या सृष्टीचे संपूर्ण सौंदर्य निरखून पाहात होतो. (१९-२१)

काय आमचे दुर्दैव ! हे नंदनंदन एका क्षणात प्रेम सोडून देऊन, ज्या आम्ही आपले घर-दार, सगे-सोयरे, पती-पुत्र इत्यादींना सोडून यांच्या दासी झालो आणि ज्या यांच्यासाठीच आज शोकाकुल होत आहोत, त्या आमच्याकडे आज पाहातसुद्धा नाहीत. कारण यांना ’नवे ते हवे ’ ना ! आजच्या रात्रीनंतर येणारा उद्याचा प्रातःकाल मथुरेतील स्त्रियांसाठी निश्चितच अतिशय आनंददायक असेल. त्यांची पुष्कळ दिवसांची इच्छा उद्या पूर्ण होणार ! कारण जेव्हा व्रजराज श्यामसुंदर मथुरेत प्रवेश करतील, तेव्हा त्यांना त्यांचे कटाक्षातून प्रगट होणार्‍या स्मितरूप मधुरसाने युक्त श्रीमुख मनसोक्त पाहाता येईल ! आमचे नंदकुमार धैर्यवान असून जरी वडिल माणसांच्या आज्ञेत वागणारे असले, तरी मथुरेतील युवती आपल्या मधाप्रमाणे मधाळ वचनांनी त्यांचे चित्त आपल्याकडे वेधून घेतील आणि हेही त्यांचे लज्जायुक्त स्मितहास्य आणि विलास पाहून तेथेच रमतील. मग ते आम्हां गावढळ गवळणींकडे परतून कशाला येतील बरे ? आज रमारमण, गुणसागर, देवकीनंदनांच्या दर्शनाने मथुरेतील दाशार्ह भोज, अंधक आणि वृष्णिवंशी यादवांचे डोळे निश्चितच धन्य होतील ! त्याचबरोबर जे लोक येथून मथुरेला जाताना वाटेत त्यांना पाहातील, ते सुद्धा तृप्त होतील. (२२-२५)

पहा सख्यांनो ! इकडे आम्ही गोपी इतक्या दुःखित होत आहोत आणि हा अक्रूर आमच्या परम प्रियतम श्यामसुंदरांना आमच्या डोळ्यां‍आड लांब घेऊन निघाला आहे. शिवाय दोन गोष्टी सांगून आम्हांला धीरही देत नाही. अशा या अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव अक्रूर असायलाच नको होते ! सख्यांनो ! जराही दयामाया नसलेले हे श्रीकृष्णही रथात बसलेसुद्धा ! वेडे गोपगणही छकड्यांतून त्यांच्याबरोबर जाण्याची किती घाई करीत आहेत ! आणि आमच्यातील जाणती वृद्ध मंडळीही तिकडे कानाडोळा करीत आहेत. आज दैवच आमच्यावर उलटले आहे, हेच खरे ! चला ! आपणच जाऊन माधवांना अडवू. आपल्या घरांतील वृद्ध किंवा नातलग आपले काय करणार आहेत ? अर्ध्या क्षणासाठीसुद्धा सोडण्यास कठीण अशी मुकुंदांची सोबत आमच्या दुर्भाग्याने आज आमच्यापासून हिरावून घेऊन आम्हांला व्याकूळ करून सोडले आहे. सख्यांनो ! ज्यांचे प्रेमपूर्ण मनोहर स्मितहास्य, गूढ अशा गोड गोड गोष्टी, प्रेमाने लीलेने पाहाणे, आणि दिलेली आलिंगने यांमुळे आपल्या त्या रासक्रीडेच्या रात्री, एका क्षणात संपल्या असे आपल्याला वाटले. आता त्यांच्याखेरीज ही अपार विरहव्यथा आम्ही कशी नाहीशी करावी बरे ? दररोज सायंकाळी गोपालांनी वेढलेले ते बलरामांसह गाई चारून वनातून परत येत, त्यावेळी त्यांचे काळेभोर कुरळे केस आणि गळ्यातील पुष्पहार गाईंच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीने माखलेले असत. बासरी वाजवीत आणि स्मितहास्ययुक्त कटाक्ष टाकीत ते आमची हृदये विद्ध करीत. त्यांच्याखेरीज आम्ही कशा जिवंत राहू बरे ? (२६-३०)

श्रीशुक म्हणतात- असे बोलणार्‍या अत्यंत विरहव्याकूळ गोपी लाज-लज्जा सोडून ’हे गोविंदा ! हे दामोदरा ! हे माधवा !’ म्हणत गळा काढून रडू लागल्या. अशा प्रकारे रडण्यातच गोपींची सारी रात्र गेली. सूर्योदय झाला. संध्यावंदन वगैरे नित्यकर्मे आटोपून अक्रूर रथावर स्वार होऊन रथ हाकू लागला. नंद वगैरे गोपसुद्धा दूध, दही इत्यादींनी भरलेली मडकी आणि पुष्कळ भेटवस्तू घेऊन छकड्यात बसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. याचवेळी प्रेमरंगात रंगलेल्या गोपी प्राणप्रिय श्रीकृष्णांजवळ गेल्या, तेव्हा त्यांनी वळून आपल्याकडे पाहिल्यामुळे त्या काहीशा आनंदित झाल्या. नंतर त्यांच्याकडून काही निरोप मिळेल, या आशेने तेथेच उभ्या राहिल्या. आपण निघाल्यामुळे गोपी शोकसंतप्त झालेल्या पाहून त्यांनी दूतामार्फत "मी येईन" असा प्रेमाचा संदेश पाठवून त्यांना धीर दिला. जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकांमुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती, तोपर्यंत त्या चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या; मात्र त्यांची मने नंदलालामागोमाग चालली होती. श्रीकृष्णांच्या परत फिरण्याची आशा मावळली, तेव्हा त्या घरी परतल्या. आता आपल्या प्रियतमाच्या लीलांचे गायन करीत त्या दिवस कंठू लागल्या आणि अशा प्रकारे आपला शोक हलका करू लागल्या. (३१-३७)

हे राजा ! इकडे भगवान श्रीकृष्णसुद्धा बलराम आणि अक्रूर यांच्यासह वायूसमान वेग असणार्‍या रथात बसून पापनाशिनी यमुना नदीच्या तीरावर जाऊन पोहोचले. तेथे ते हात-तोंड धुऊन पाचूसारखे निळे आणि अमृताप्रमाणे गोड यमुना नदीचे पाणी प्याले. नंतर बलरामांसह भगवान वनरा‍ईत जाऊन रथात बसले. दोघा भावांना रथात बसवून अक्रूर त्यांचा निरोप घेऊन यमुनेच्या डोहावर येऊन विधीपूर्वक स्नान करू लागला. त्या पाण्यात बुडी मारून तो वेदमंत्रजप करू लागला. त्याचवेळी पाण्यात तेच श्रीकृष्ण आणि बलराम एकत्र बसलेले त्याला दिसले. " रथात बसलेले वसुदेवाचे पुत्र इथे पाण्यात कसे काय? आणि येथे आहेत तर कदाचित रथात नसतील, " असा विचार करून त्याने पाण्यातून डोके वर काढून पाहिले. तेथेही ते पहिल्याप्रमाणेच बसले होते. त्यांना पाण्यात पाहिले, तो आपला भ्रम असावा, असे वाटून त्याने पुन्हा बुडी मारली. परंतु पुन्हा त्याला असे दिसले की, तेथे साक्षात श्रीशेष विराजमान आहेत आणि सिद्ध, चारण, गंधर्व तसेच असुर मस्तक लववून त्यांची स्तुती करीत आहेत. त्यांना हजार मस्तके असून त्यांच्या प्रत्येक फण्यावर मुगुट शोभून दिसत आहे. कमळाच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या उज्ज्वल शरीरावर त्यांनी नीलांबर परिधान केले आहे. त्यामुळे हजारो शिखरांनी युक्त अशा कैलासाप्रमाणे ते दिसत होते. त्यांच्याच अंगावर घनश्याम पहुडले आहेत. त्यांनी रेशमी पीतांबर परिधान केला आहे. ते अत्यंत शांत व चतुर्भुज असून त्यांचे तांबड्या कमळाच्या पाकळीसारखे लालसर डोळे आहेत. त्यांचे मुख मनोहर आणि प्रसन्न असून त्यांचे पाहाणे मधुर हास्याने शोभणारे आहे. भुवया सुंदर असून नाक अपरे आहे. त्यांचे कान, गाल आणि लालसर ओठ शोभिवंत दिसत आहेत. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आणि पुष्ट आहेत. खांदे उंच असून वक्षःस्थळावर लक्ष्मीदेवी आहे. गळा शंखाप्रमाणे असून नाभी खोल आहे. तीन वळ्यांनी शोभणारे उदर पिंपळपानाप्रमाणे शोभत आहे. कंबर आणि नितंब स्थूल, हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा, सुंदर गुडघे आणि पिंडर्‍या आहेत. घोटे उंच असून लाल लाल नखांतून किरणे बाहेर पडत आहेत. चरणकमळ दहा बोटांच्या पाकळ्यांनी शोभून दिसत आहे. अत्यंत बहुमूल्य रत्‍नजडित असा मुगुट, कडी, बाजूबंद, करदोटा, यज्ञोपवीत, हार, नूपुरे आणि कुंडले यांनी ते अलंकृत आहेत. एका हातात कमळ शोभत आहे आणि इतर तीन हातांमध्ये शंख, चक्र व गदा आहे. वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह, गळ्यात कौस्तुभमणी आणि वनमाला शोभत आहे. नंद-सुनंद इत्यादी पार्षद आपले ’स्वामी’; सनकादी ऋषी ’परब्रह्म’; ब्रह्मदेव, महादेव इत्यादी देव ’सर्वेश्वर’; मरीची इत्यादी नऊ ब्राह्मण ’प्रजापती’ आणि प्रल्हाद, नारद, वसू इत्यादी भगवंतांचे श्रेष्ठ भक्त त्यांना ’भगवान’ समजून त्या त्या भावांनुसार निर्दोष वेदवाणीने त्यांची स्तुती करीत आहेत. त्याचबरोबर लक्ष्मी, पुष्टी, सरस्वती, कांती, कीर्ती आणि तुष्टी (म्हणजेच ऐश्वर्य, बल, ज्ञान, श्री,यश आणि वैराग्य या षडैश्वर्ययुक्त) इला(पृथ्वीशक्ती), ऊर्जा (लीलाशक्ती), विद्या-अविद्या (जीवांना मोक्ष आणि बंधन यांना कारणरूप असणारी बहिरंग शक्ती) ह्लादिनी, संवित (अंतरंग शक्ती) आणि माया या शक्ती मूर्तिमंत होऊन त्यांची सेवा करीत आहेत. (३८-५५)

हे सर्व पाहून अक्रूराला परमानंद झाला. मनात परम भक्तीचा उदय झाला. सारे शरीर पुलकित झाले. प्रेमभावाचा उद्रेक झाल्यामुळे त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. आता अक्रूराने धीर धरून भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला आणि हात जोडून हळू हळू सद्‍गदित वाणीने तो भगवंतांची स्तुती करू लागला. (५६-५७)

अध्याय एकोणचाळिसावा समाप्त

GO TOP