|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३८ वा
अक्रूराचे व्रजगमन - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - महाबुद्धिमान अक्रूरसुद्धा त्या रात्री मथुरेत राहून सकाळी रथात बसून नंदांच्या गोकुळाकडे निघाला. भाग्यवान अक्रूराची कमलनयन भगवंतांच्या ठिकाणी परम भक्ती होती. त्यामुळे गोकुळात जाताना तो असा विचार करू लागला. "मी असे कोणते शुभ कर्म केले होते, अशी कोणती दीर्घ तपश्चर्या केली होती किंवा कोणत्या सत्पात्र व्यक्तीला असे कोणते दान दिले होते की, ज्याचे फळ म्हणून आज मला भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होणार ! विषयासक्त अशा मला भगवंतांचे दर्शन अतिशय दुर्लभ वाटते. जसे शूद्र जातीतील माणसाला वेदपठण दुर्लभ असते. परंतु तसेच काही नाही. मला अधमालासुद्धा भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होईलच; जसे काळरूप नदीतून वाहात जाणारा एखादा एखादेवेळी संसार पार करू शकतो. आज माझी सारी पापे नष्ट झाली. आज माझा जन्म सफळ झाला; कारण योग्यांच्यासुद्धा ध्यानाचा विषय असणार्या भगवंतांच्या चरणकमलांना मी आज प्रत्यक्ष नमस्कार करणार आहे. अहो ! कंसाने आज माझ्यावर मोठीच कृपा केली आहे. त्याने पाठविल्यानेच मी या भूतलावर अवतीर्ण झालेल्या स्वतः भगवंतांच्या चरणकमलांचे दर्शन घेईन. त्यांच्या नखमंडलाच्या केवळ कांतीचे ध्यान करूनही पूर्वीचे ऋषी या अज्ञानरूप अपार अंधकारराशीला पार करू शकले. ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव ज्यांची उपासना करतात, लक्ष्मीदेवी आणि प्रेमी भक्तांसह मोठमोठे ज्ञानी लोकसुद्धा ज्यांची आराधना करतात, जे गाई चारण्यासठी गोपालांबरोबर वनामध्ये भ्रमण करतात आणि जे गोपींच्या वक्षःस्थळावर लागलेल्या केशराने रंगून जातात, त्या श्रीचरणांचे आज मला दर्शन होणार ! त्या मुकुंदांचे गाल व नाक देखणे आहे. त्यांचे लालसर कमलासारखे नेत्र स्मितपूर्वक पाहतात. त्यांचे ते कुरळ्या केसांनी शोभणारे मुखकमल मला आज खात्रीने पाहायला मिळणार ! कारण आज ही हरणे माझ्या उजव्या बाजूने जात आहेत. पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वेच्छेने मनुष्यावतार घेतला आहे. सौंदर्याच्या खाणीचेच आज मला दर्शन होणार ! सहजपणे माझ्या दृष्टीला मिळणारा हा लाभ नव्हे का? जे अहंकार न बाळगता या कार्यकारणरूप जगाचे फक्त द्रष्टे आहेत, त्यांच्या ठिकाणी असणार्या स्वरूपसाक्षात्कार अज्ञानामुळे वाटणारा भेदभ्रम मुळीच असत नाही. ते आपल्या योगमायेनेच केवळ संकल्प करून प्राण, इंद्रिये, बुद्धी इत्यादींसह आपल्या स्वरूपभूत जीवांची निर्मिती करतात आणि त्यांच्याबरोबर गोकुळातील घराघरांतून निरनिराळ्या प्रकारच्या लीला करीत असल्यासारखे भासतात. सर्व पापांचा नाश करणारे त्यांचे परम मंगल गुण, कर्म आणि जन्म यांनी युक्त असलेली वाणीच जगाला जीवन देते, सौंदर्य देते आणि पवित्र करते. परंतु, जी वाणी हे वर्णन करीत नाही, ती प्रेताच्या साजशृंगारासारखीच व्यर्थ होय. तेच भगवान स्वतः यदुवंशामध्ये आपणच घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणार्या श्रेष्ठ देवतांचे कल्याण करण्यासाठी अवतीर्ण झाले आहेत. तेच भगवान आपली कीर्ती पसरवीत आज व्रजामध्ये निवास करीत आहेत. सर्व देवसुद्धा त्यांच्या संपूर्ण मंगलमय यशाचे गान करीत असतात. ते महापुरुषांचे आश्रय आणि गुरू आहेत. त्यांचे सौंदर्य तिन्ही लोकांना मोहित करणारे आहे. दृष्टी असणार्यांचा ते परम आनंद आहेत; लक्ष्मीलासुद्धा हवेहवेसे वाटणारे रूप धारण केले आहे. त्यांचे मला आज खात्रीने दर्शन होणार ! कारण आज सकाळपासूनच मला शुभशकुन होत आहेत. (१-१४) जेव्हा मी त्यांना पाहीन, तेव्हा सर्वश्रेष्ठ पुरुष बलराम तसेच श्रीकृष्णांच्या चरणांना नमस्कार करण्यासाठी लगेच रथातून खाली उडी टाकीन. योगी आत्मसाक्षात्कारासाठी ज्यांना आपल्या हृदयामध्ये धारण करतात, त्यांना मी आज प्रत्यक्ष पाहून त्यांच्या चरणांवर लोटांगण घालणार आहे. त्या दोघांच्याबरोबरच त्यांच्या वनवासी मित्रांनासुद्धा वंदन करणार. जेव्हा मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवीन, तेव्हा ते आपले करकमल माझ्या मस्तकावर ठेवतील ना ? जे कालरूपी सापाच्या आवेशाने घाबरून जाऊन त्यांना शरण जातात, त्या लोकांना या करकमलांनीच तर अभयदान दिले आहे. इंद्राने आणि दैत्यराज बलीने भगवंतांच्या याच करकमलांमध्ये भेटवस्तू समर्पित करून तिन्ही लोकांचे प्रभुत्व प्राप्त करून घेतले. ज्या करकमलांमधून कमलपुष्पासारखा सुगंध येतो, त्या याच करकमलांनी स्वतःच्या स्पर्शाने रासलीलेच्या वेळी व्रजयुवतींचा थकवा घालविला होता. कंसाने मला दूत म्हणून पाठविले असले, तरी अच्युत मला शत्रू समजणार नाहीत. कारण ते सगळ्या विश्वाचे साक्षी आहेत; म्हणून माझ्या अंतःकरणाच्या आत-बाहेर निर्मल ज्ञानदृष्टी ते पाहात असतात. मी त्यांच्या चरणाजवळ हात जोडून विनम्रभावाने उभा राहीन. तेव्हा स्मितहास्य करीत ते दयार्द्र दृष्टीने माझ्याकडे पाहातील. त्यावेळी माझे जन्मोजन्मींचे सगळे पाप त्याचवेळी नष्ट होऊन जाईल आणि मी निःशंकपणे परमानंदामध्ये मग्न होऊन जाईन. मी त्यांच्या नात्यातील असून त्यांचा अत्यंत हितचिंतक आहे. त्यांच्याखेरीज माझे दुसरे दैवत नाही. म्हणून ते आपल्या पुष्ट बाहूंनी मला हृदयाशी धरतील. त्याचवेळी माझा देह तीर्थस्वरूप होईल आणि माझी कर्माची बंधने तुटून जातील. ते मला जेव्हा आलिंगन देतील आणि मी हात जोडून मस्तक लववून त्यांच्यासमोर उभा राहीन आणि जेव्हा ते मला ’अक्रूर काका’ म्हणून हाक मारतील, तेव्हा माझे जीवन धन्य होईल. श्रीकृष्णांनी ज्याला आपले म्हटले नाही, त्याच्या त्या जन्माचा धिक्कार असो. त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अत्यंत जवळचा नाही. त्यांचा कोणी नावडता नाही, कोणी शत्रू नाही की त्यांच्या उपेक्षेला पात्र असाही कोणी नाही तरीसुद्धा कल्पवृक्ष ज्याप्रमाणे आपल्या जवळ येऊन याचना करणार्याला त्याने मागितलेली वस्तू देतो, त्याचप्रमाणे भगवानसुद्धा जो त्यांना जसा भजतो, त्याला ते तसाच भजतात. मी विनम्र भावाने मस्तक लववून जेव्हा बलरामदादांच्या समोर उभा राहीन तेव्हा हसत हसत ते मला आपल्या हृदयाशी धरून, माझे दोन्ही हात पकडून मला घरात घेऊन जातील. तेथे माझा सर्व प्रकारे पाहुणचार करतील. त्यानंतर मला विचारतील की, "आमच्या घरच्यांच्याबरोबर कंस कसा वागतो ?" (१५-२३) श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! श्वफल्काचा मुलगा अक्रूर वाटेत याच चिंतनात बुडून गेला असतानाच रथाने गोकुळात पोहोचला. तेव्हा सूर्य अस्ताचलाला गेला होता. ज्यांच्या चरणकमलांची पवित्र धूळ सर्व लोकपाल आपल्या किरीटांवर धारण करतात, त्यांच्या चरणचिन्हांचे अक्रूराने गोकुळात दर्शन घेतले. कमल, यव, अंकुश इत्यादी असाधारण चिन्हांमुळे त्यांची ओळख पटत होती आणि त्यांनीच पृथ्वीची शोभा वाढवली होती. त्या चरणचिन्हांचे दर्शन होताच अक्रूराच्या हृदयात आनंद मावेनासा झाला. प्रेमावेगाने त्याच्या अंगावर रोमांच आले. अश्रूंनी डोळे डबडबले. तेव्हा रथातून उडी मारून तो त्या धुळीत लोळू लागला आणि म्हणाला- "अहाहा ! हा तर आमच्या प्रभूंच्या चरणांच्या धुळीचा प्रसाद आहे." (२४-२६) कंसाचा संदेश घेतल्यापासून श्रीहरींची चिन्हे, दर्शन, गुणश्रवण इत्यादींपर्यंत अक्रूराच्या चित्ताची जशी अवस्था झाली, तशी होणे हाच मनुष्याच्या देह धारण करण्याचा श्रेष्ठ लाभ आहे. म्हणून माणसाने दंभ, भय आणि शोक यांचा त्याग करून मनात नित्य असाच भाव बाळगावा. (२७) अक्रूराने व्रजात पोहोचल्यावर श्रीकृष्ण आणि बलराम या दोन्ही भावांना गाईंची धार काढण्यासाठी गेलेले पाहिले. श्यामसुंदर श्रीकृष्णांनी पीतांबर आणि बलरामांनी नीलांबर धारण केले होते. त्यांचे डोळे शरत्कालीन कमळाप्रमाणे सुंदर दिसत होते. त्यांनी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केला होता. एक सावळा आणि दुसरा गोरा असे ते दोघेही सौंदर्याची खाण होते. पुष्ट बाहू, सुंदर वदन असलेले ते अतिशय मनोहर दिसत होते आणि हत्तीच्या पिल्लाप्रमाणे त्यांची डौलदार चाल होती. ते महात्मे ध्वज, वज्र, अंकुश आणि कमलाचे चिन्ह असलेल्या पायांनी व्रजभूमी सुशोभीत करीत. त्यांचे स्मितहास्यपूर्वक पाहाणे दयार्द्र होते. त्यांची लीला उदात्त आणि सुंदर होती. गळ्यांत वनमाला आणि मण्यांचे हार झगमगत होते. त्यांनी स्नान करून निर्मळ वस्त्रे परिधान केली होती आणि शरीराला सुगंधी उटणे लावले होते. जगाचे आदिकारण, जगाचे स्वामी, पुरुषोत्तम जगाच्या रक्षणासाठी आपल्या संपूर्ण अंशांनी बलराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपामध्ये अवतीर्ण होऊन आपल्या अंगकांतीने दिशांचा अंधकार दूर करीत आहेत. ते असे दिसत होते की, जणू काही सोन्याने मढलेला पाचूचा आणि चांदीचा पर्वतच. त्यांना पाहाताच अक्रूराने प्रेमावेगाने अधीर होऊन रथातून खाली उडी मारली आणि राम-कृष्णांच्या चरणांना साष्टांग दंडवत घातले. हे राजा ! भगवंतांच्या दर्शनाने त्याला इतका आनंद झाला की, त्याचे डोळे पाण्याने भरून आले. सर्व शरीर पुलकित झाले. त्याचा गळा दाटून आल्याने तो आपले नावसुद्धा सांगू शकला नाही. शरणागतवत्सल श्रीकृष्णांनी त्याच्या मनातील भाव जाणून प्रेमाने आपल्या चक्रांकित हाताने त्याला जवळ ओढून हॄदयाशी धरले. यानंतर उदार मनाच्या श्रीबलरामांनी नमस्कार करणार्या त्याला आलिंगन दिले आणि त्याचा एक हात श्रीकृष्णांनी तर दुसरा बलरामांनी पकडून दोन्ही भाऊ त्याला घरी घेऊन गेले. (२८-३७) श्रीकृष्णांनी त्याचे चांगले स्वागत करून व खुशाली विचारून उच्च आसनावर बसविले आणि विधिपूर्वक पाय धुऊन मधुपर्कपूजा केली. यानंतर भगवंतांनी अतिथी म्हणून आलेल्या अक्रूराला एक गाय भेट दिली आणि त्याचे पाय चेपून त्याचा थकवा दूर केला. नंतर अतिशय आदराने पवित्र अशा मिष्टान्नाचे भोजन दिले. भोजन झाल्यानंतर धर्माचे मर्म जाणणार्या बलरामांनी प्रेमाने मुखशुद्धीसाठी विडा देऊन सुगंधी माळ घालून त्याला अतिशय आनंदित केले. अशा प्रकारे सत्कार झाल्यानंतर त्याच्याजवळ जाऊन नंद राजांनी विचारले, "अक्रूर महोदय ! निर्दयी कंस जिवंत असताना आपण तेथे दिवस कसे घालविता ? कसायाने पाळलेल्या बोकडांसारखीच आपली अवस्था असणार ! ज्या इंद्रियलोलुप पापी माणसाने आपल्या विलाप करणार्या बहिणीच्या कोवळ्या मुलांना ठार मारले, त्याचीच प्रजा असलेल्या आपले कुशल असेल, हा विचार तरी आम्ही कसे करू शकतो ?" अक्रूराने नंदांना त्यांची खुशाली अगोदरच विचारली होती. त्यांनीही जेव्हा अशा प्रकारे मधुर वाणीने अक्रूराची चौकशी केली आणि त्याचा सन्मान केला, तेव्हा प्रवासामुळे अक्रूराच्या शरीराला आलेला शीण दूर झाला. (३८-४३) अध्याय अडतिसावा समाप्त |