श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३७ वा

केशी आणि व्योमासुर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात- कंसाने ज्या केशी नावाच्या दैत्याला पाठविले होते, तो अतिशय मोठ्या घोड्याच्या रूपाने, मनोवेगाने दौडत नंदांच्या व्रजामध्ये आला. तो आपल्या टापांनी जमीन उकरत होता. त्याच्या मानेवरील आयाळीच्या झटकण्याने आकाशातील ढग आणि विमानांची गर्दी विखुरली जाऊ लागली. त्याच्या प्रचंड खिंकाळण्याने सर्वजण भयभीत झाले होते. त्याचे डोळे अतिशय विशाल होते. तोंड म्हणजे जणू काही वृक्षाची ढोलच ! मान अवाढव्य होती. प्रचंड काळ्या ढगांसारखे शरीर होते. श्रीकृष्णांना मारून कंसाचे कल्याण करण्यासाठी तो व्रजाचा थरकाप उडवीत आला. भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की, त्याच्या खिंकाळण्याने आपले गोकुळ भयभीत झाले आहे. आणि त्याच्या शेपटीच्या केसांच्या फटकार्‍यांनी ढग अस्ताव्यस्त होत आहे. तसेच तो लढण्यासाठी आपला शोधही घेत आहे. तेव्हा ते आपणहून समोर आहे आणि सिंहाप्रमाणे गर्जना करून त्यांनी त्याला आव्हान दिले. भगवंत समोर आलेले पाहून तो आणखी चिडला आणि तोंड पसरून त्यांच्याकडे असा धावला की जणू आकाशालाच पिऊन टाकील. त्याचा वेग खरोखर अतिशय प्रचंड होता. त्याच्यावर विजय मिळवणे तर कठीण होतेच, परंतु त्याला पकडणे सुद्धा सोपे नव्हते. भगवंतांच्याकडे जाऊन त्याने त्यांच्यावर लाथा झाडल्या. (१-४)

परंतु भगवंतांनी त्या लाथा चुकवून रागाने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे मागचे दोन पाय पकडले आणि गरुड ज्याप्रमाणे सापाला झटकतो, त्याप्रमाणे स्वतः जराही न हालता त्याला तुच्छतेने चारशे हात लांब फेकून दिले. थोड्याच वेळात केशी सावध होऊन पुन्हा उठून उभा राहिला आणि चिडून आ वासून अतिशय वेगाने श्रीहरींच्या अंगावर धावला. तो जवळ आलेला पाहून भगवंतांनी हसून बिळात जाणार्‍या सापाप्रमाणे आपला डावा हात त्याच्या तोंडात घातला. भगवंतांच्या तापलेल्या लोखंडासारख्या हाताचा स्पर्श होताच केशीचे दात तुटून पडले आणि जसे दुर्लक्ष केल्याने जलोदर रोग वाढतो, त्याप्रमाणे श्रीकृष्णांचा हात त्याच्या पोटात वाढू लागला. श्रीकृष्णांचा हात त्याच्या शरीरात जसजसा वाढू लागला तसा त्याचा श्वासोच्छवासाचा मार्ग बंद झाला. आता तो लाथा झाडू लागला. घामाने त्याचे शरीर डबडबले, डोळ्यातील बुबुळे उलटी झाली आणि तो लीद टाकीत गतप्राण होऊन जमिनीवर पडला. त्याचे निष्प्राण शरीर जमिनीवर आपटताच पिकलेल्या चिबडासारखे फुटले. महाबाहू श्रीकृष्णांनी त्याच्या तोंडातून आपला हात सहज ओढून काढला. विनासायास शत्रूचा नाश केला, याचे देवांना अतिशय आश्चर्य वाटले आणि ते भगवंतांवर फुलांची वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागले. (५-९)

परीक्षिता ! श्रेष्ठ भगवद्‍भक्त देवर्षी नारद अद्‌भुत कर्मे करणार्‍या श्रीकृष्णांकडे आले आणि एकांतात नेऊन त्यांना म्हणाले- " हे श्रीकृष्णा ! आपले स्वरूप हे मन आणि वाणी यांचा विषय होऊ शकत नाही. आपण योगेश्वर आहात. सार्‍या जगाचेही ईश्वर आहात. आपण सर्वांच्या हृदयात निवास करता आणि सगळे आपल्या ठिकाणी निवास करतात. हे प्रभो ! आपण यदुवंशशिरोमणी आहात. जसा एकच अग्नी सर्व लाकडांमध्ये व्यापून असतो तसेच आपण एकटेच सर्व प्राण्यांचा आत्मा आहात. आत्मरूपाने असूनही आपण स्वतःला झाकून ठेवता. पंचकोशरूप गुहेच्या आत राहाता; आपण पुरुषोत्तम , सर्वांचे नियंते, आणि या सर्वांचे साक्षी आहात. प्रभो ! आपण सर्वांचे अधिष्ठान आणि स्वतः मात्र स्वतःचेच अधिष्ठान आहात. सृष्टीच्या प्रारंभी सत्यसंकल्प अशा आपण आपल्या मायेनेच गुणांची निर्मिती करता आणि त्या गुणांचाच स्वीकार करून जगाची उत्पत्ती , स्थिती आणि प्रलय करीत राहाता. तेच आपण राजांच्या रूपात असणार्‍या दैत्य, प्रमथ आणि राक्षसांचा विनाश करण्यासाठी तसेच धर्ममर्यादांचे रक्षण करण्यासाठी अवतीर्ण झाला आहात. आपण सहजपणे घोड्याचे रूप घेऊन राहिलेल्या या केशी दैत्याला मारलेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याच्या केवळ खिंकाळण्याला भिऊन देव आपला स्वर्ग सोडून पळूत जात असत. (१०-१५)

हे प्रभो ! आता मी, परवा आपल्या हातून चाणूर, मुष्टिक, अन्य पहिलवान, कुवलयापीड हत्ती आणि कंस यांनासुद्धा मारलेले पाहीन. त्यानंतर शंखासुर, कालयवन, मुर आणि नरकासुर यांचा वध झाल्याचे पाहीन. आपण स्वर्गातून कल्पवृक्ष उखडून आणाल आणि इंद्राचा पराजय कराल. आपण आपले शौर्य, कृपा, सौंदर्य इत्यादींच्या आधारे वीरकन्यांबरोबर विवाह कराल आणि हे जगदीश्वरा ! आपण द्वारकेत राहून नृगाची पापातून मुक्तता कराल. आपण जांबवानांकडून जांबवती आणि स्यमंतक मणी घेऊन याल. तसेच आपल्या धामातून ब्राह्मणाच्या मृत पुत्रांना परत आणून द्याल. त्यानंतर आपण पौंड्रकाचा वध कराल. काशीपुरी जाळून टाकाल. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल आणि नंतर दंतवक्त्र यांचा वध कराल. प्रभो ! द्वारकेत निवास असताना आपण जे आणखी पुष्कळ पराक्रम कराल की ज्यांचे भविष्यामध्ये पृथ्वीवरील ज्ञानी पुरुष वर्णन करतील, ते सर्व मी पाहीन. यानंतर पृथ्वीवरील भार नाहीसा करण्यासाठी आपण कालरूपाने अर्जुनाचे सारथी व्हाल आणि कित्येक अक्षौहिणी सैन्याचा संहार कराल. हेही मी पाहीन. (१६-२२)

प्रभो ! आपण शुद्ध ज्ञानस्वरूप आहात. आपल्या परमानंदस्वरूपामध्येच आपण राहाता, म्हणून सर्व पदार्थ आपल्याला नेहमीच प्राप्त असतात. आपला संकल्प अमोघ आहे. आपल्या चिन्मय शक्तीसमोर हे संसारचक्र कधी नसतेच. अशा सच्चिदानंदस्वरूप भगवंतांना मी शरण आलो आहे. आपण सर्वांचे नियंते आहात. आपण स्वतः मध्येच राहून आपल्या मायेने विश्वातील सर्व गोष्टी उत्पन्न केल्या आहेत. यावेळी आपली लीला प्रगट करण्यासाठी आपण मनुष्याच्या रूपाने यदू, वृष्णी आणि सात्वतवंशियांचे अग्रणी झाला आहात. प्रभो ! मी आपल्याला नमस्कार करीत आहे. (२३-२४)

श्रीशुक म्हणतात- भगवद्दर्शनाने आनंदित झालेल्या भगवद्‍भक्त देवर्षी नारदांनी अशा प्रकारे भगवंतांची स्तुती करून त्यांना प्रणाम केला. त्यानंतर त्यांची आज्ञा घेऊन ते तेथून निघून गेले. इकडे भगवान श्रीकृष्णांनी केशीला युद्धात मारल्यामुळे आनंदित झालेल्या बालगोपालांसह ते पूर्वीप्रमाणे गाई चारू लागले आणि गोकुळवासियांना आनंद देऊ लागले. एकदा ते सर्व गोपाल पर्वतमाथ्यावर गुरांना चारीत होते. त्यावेळी ते चोर-शिपाई असा लपंडावाचा खेळ खेळत होते. राजन ! त्यांच्यापैकी काहीजण चोर, काहीजण शिपाई तर काहीजण बोकड बनले होते. अशा प्रकारे निर्भय होऊन ते खेळात रममाण झाले होते. त्याचवेळी गवळ्याचा वेष घेऊन महामायावी मयाचा मुलगा व्योमासुर तेथे आला. खेळामध्ये तो बर्‍याच वेळा चोर होई आणि बोकड झालेल्या पुष्कळ मुलांना चोरून नेऊन लपवून ठेवीत असे. तो महान असुर वारंवार त्यांना घेऊन जाऊन एका डोंगराच्या गुहेत ठेवून तिचे दार एका मोठ्या शिलाखंडाने झाकून टाकी. अशा प्रकारे गोपाळांपैकी फक्त चार-पाच शिल्लक राहिले. भक्तरक्षक भगवंतांनी त्याची ही चाल ओळखली. जेव्हा तो गोपालांना घेऊन जात होता, त्याचवेळी सिंह जसा लांडग्याला पकडतो, तसे त्यांनी त्याला बळेच पकडले. बलवान व्योमासुराने एखाद्या पहाडाप्रमाणे आपले खरे रूप प्रगट केले आणि स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्‍न केला. परंतु भगवंतांनी पकडल्यामुळे कळवळणारा तो स्वतःला सोडवून घेऊ शकला नाही. (२५-३२)

तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी जखडून टाकून त्याला जमिनीवर पाडले आणि एखाद्या पशूप्रमाणे त्याचा गळा दाबून त्याला मारले. देवता विमानांत बसून त्यांची ही लीला पाहात होते. नंतर श्रीकृष्णांनी गुहेच्या तोंडाशी लावलेला शिलाखंड फोडला आणि गोपाळांना त्या अडचणीतून बाहेर काढले. तेव्हा देव आणि गोपाळ त्यांची स्तुती करू लागले आणि श्रीकृष्ण आपल्या गोकुळात परत आले. (३३-३४)

अध्याय सदतिसावा समाप्त

GO TOP