श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३६ वा

अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला व्रजात पाठविणे -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात- ज्यावेळी श्रीकृष्ण व्रजामध्ये प्रवेश करीत होते, त्याचवेळी अरिष्टसुर नावाचा एक दैत्य बैलाचे रूप घेऊन तेथे आला. त्याचे वशिंड आणि शरीर प्रचंड होते. तो खुरांनी जमीन उकरीत व तिला थरथर कापवीत गोठ्यात आला. तो मोठ्याने हंबरत होता आणि खुरांनी जमीन उकरीत होता. तो शेपूट उंचावून शिंगांनी तट इत्यादी ढासळवीत चालला होता. मधून मधून तो मुतत आणि शेण टाकत होता. तो डोळे रोखून पाहात होता. हे राजा ! त्याच्या प्रचंड हंबरण्याने भयभीत झालेल्या स्त्रिया आणि गाई यांचे गर्भपात होत. त्याच्या वशिंडाला पर्वत समजून ढग त्यावर येऊन थांबत. राजा ! त्या तीक्ष्ण शिंगांच्या बैलाला पाहून गोपी आणि गोप सर्वजण भयभीत झाले. गुरे तर इतकी घबरली की, गोठे सोडून ती पळू लागली. सर्व व्रजवासी त्यावेळी "कृष्णा ! कृष्णा ! आम्हांला वाचव." असा आक्रोश करीत श्रीकृष्णांना शरण आले. गोकुळ भयाने व्याकुळ झाले आहे, हे भगवंतांनीही पाहिले. "भिऊ नका" असे म्हणून श्रीकृष्णांनी सर्वांना धीर दिला आणि वृषासुराला युद्धाचे आव्हान दिले, "अरे मूर्खा ! महादुष्टा ! या गाई आणि गवळ्यांना भिववून काय होणार? तुझ्यासारख्या नीच दुष्टांच्या ताकदीचा गर्व नाहीसा करणारा हा मी इथे आहे" असे म्हणून भगवंतांनी दंड थोपटले आणि त्याला चिडवण्यासाठी म्हणून आपल्या एका मित्राच्या खांद्यावर हात टाकून ते उभे राहिले. या आव्हानामुळे संतापून तो खुरांनी जोराने जमीन उकरीत श्रीकृष्णांच्या अंगावर धावला. त्यावेळी त्याने उंचावलेल्या त्याच्या शेपटाच्या धक्क्याने आकाशातील ढग गरगर फिरू लागले. त्याने आपली तीक्ष्ण शिंगे समोर धरली. लाल-लाल डोळ्यांनी श्रीकृष्णांकडे तिरप्या नजरेने रोखून पाहात तो त्यांच्यावर इतक्या वेगाने तुटून पडला की, जणू इंद्राने सोडेलेले वज्रच ! भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दोन्ही हातांनी त्याची दोन्ही शिंगे पकडली आणि जसा एक हत्ती दुसर्‍या हत्तीला मागे रेटतो, त्याप्रमाणे त्यांनी त्याला अठरा हात मागे रेटून जमिनीवर पाडले. भगवंतांनी त्याला याप्रमाणे ढकलल्यानंतर लगेच उठून संतापाने दीर्घ श्वास सोडीत पुन्हा त्याने त्यांच्यावर चढाई केली. त्यावेळी त्याचे सर्व शरीर घामाने डबडबले होते. तो अंगावर येत असलेला पाहून भगवंतांनी त्याची शिंगे पकडली आणि त्याला जमिनीवर पाडले. नंतर त्याला पायांनी दाबून ओला कपडा पिळावा, तसा त्याला पिळला. यानंतर त्याचे शिंग उखडून त्यानेच टोचून टोचून त्याला मारले. त्यामुळे तो तेथेच निपचित पडून राहिला. नंतर तोंडातून रक्त ओकीत आणि विष्ठ-मूत्र सोडीत तो दैत्य पाय झटकू लागला. त्याची बुबुळे उलटी झाली आणि अतिशय कष्टाने त्याने आपले प्राण सोडले. तेव्हा देव भगवंतांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले. श्रीकृष्णांनी जेव्हा बैलाच्या रूपाने आलेल्या अरिष्टसुराला मारले, तेव्हा सर्व गोप त्यांची प्रशंसा करू लागले. नंतर बलरामांसह त्यांनी वाड्यात प्रवेश केला आणि त्यांना पाहून गोपींचे नेत्र आनंदाने भरून गेले. (१-१५)

अद्‌भूत कृत्ये करणार्‍या भगवंतांनी जेव्हा अरिष्टसुराला मारले, तेव्हा देवर्षी नारद कंसाला म्हणाले. "अरे कंसा ! तुझ्या हातातून निसटून आकाशात गेलेली कन्या यशोदेची होती; आणि व्रजामध्ये जे श्रीकृष्ण आहेत, ते देवकीचे पुत्र आहेत. तेथे जे बलराम आहेत, ते रोहिणीचे पुत्र आहेत. तुझ्या भीतीने वसुदेवांनी त्या दोघांना आपला मित्र नंद यांच्याकडे ठेवले आहे. तुझ्या सेवकांचा त्यांनीच वध केला." हे ऐकताच कंसाचे अंग क्रोधाने कापू लागले. वसुदेवांना मारण्यासाठी त्याने लगेच तीक्ष्ण तलवार उचलली, परंतु नारदांनी त्याला अडविले. वसुदेवांची मुलेच आपल्या मृत्यूला कारण होणार आहेत, हे जेव्हा कंसाला समजले, तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव या दोघांनाही लोखंडी बेड्यांनी जखडून टाकून पुन्हा तुरुंगात डांबले. नारद निघून गेल्यावर कंसाने केशीला बोलावून म्हटले, "तू व्रजात जाऊन बलराम आणि कृष्णाला मारून टाक." तो निघून गेला. यानंतर कंसाने मुष्टिक, चाणूर , शल , तोशल इत्यादी मंत्री आणि माहुतांना बोलावून म्हटले, "हे वीरवर चाणूरा आणि मुष्टिका ! तुम्ही मी सांगतो ते ऐका. वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण नंदाच्या व्रजामध्ये राहात आहेत. त्यांच्याच हातून माझा मृत्यू होणार आहे, असे सांगितले जाते. जेव्हा ते येथे येतील, तेव्हा तुम्ही त्यांना कुस्ती खेळण्याचे निमित्त करून मारून टाका. आता तुम्ही आखाड्यात चारी बाजूंनी निरनिराळ्या प्रकारचे रंगमंच तयार करा. नगरवासी आणि ग्रामवासी त्यांवर बसून स्वच्छंदपणे ही कुस्ती पाहू देत. हे चतुर माहुता ! तू आखाड्याच्या फाटकावरच कुवलयापीड हत्तीला उभा कर आणि त्याच्याकडून माझ्या शत्रूंना मारून टाक. येत्या चतुर्दशीला विधिपूर्वक धनुष्ययज्ञाला आरंभ करा आणि त्यावेळी वर देणार्‍या भूतनाथाला पवित्र पशूंचा बळी द्या." (१६-२६)

स्वार्थ साधण्यात कुशल असणार्‍या कंसाने अशी आज्ञा देऊन यदुवंशी अक्रूराला बोलाविले आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले. " हे दानशूर अक्रूरा ! तू मला आदरणीय आहेस. आज माझे मित्राने करण्याजोगे एक काम कर. कारण भोजवंशी आणि वृष्णिवंशी यादवांमध्ये माझा सर्वांत हितचिंतक तुझ्याखेरीज दुसरा कोणी नाही. हे मित्रा ! जसा इंद्र स्वतः समर्थ असूनसुद्धा विष्णूंचा आश्रय घेऊन आपला स्वार्थ साधत असतो, त्याप्रमाणे हे मोठे काम तुझ्याकडूनच होणार असल्याने मी तुझा आश्रय घेत आहे. (२७-२९)

तू नंदराजाच्या व्रजामध्ये जा. तेथे वसुदेवाचे दोन पुत्र आहेत. त्यांना याच रथात बसवून आण. उशीर करू नकोस. मी असे ऐकले आहे की, विष्णूंच्या भरवशावर असणार्‍या देवांनी त्यांच्याकडून माझा मृत्यू व्हावा असे निश्चित केले आहे. म्हणून तू त्या दोघांना घेऊन ये. त्याचबरोबर नजराणे बरोबर घेतलेल्या नंद आणि इतर गोपांनाही घेऊन ये. येथे आणल्यानंतर मी त्यांना माझ्या काळासमान असलेल्या कुवलयापीड हत्तीकडून मारून टाकीन आणि जर कदाचित ते त्या हत्तीच्या तडाख्यातून वाचलेच तर मी आपल्या वज्राप्रमाणे मजबूत आणि चपळ, मुष्टिक व चाणूर या पहिलवानांकडून त्यांना मारीन. ते मारले गेल्यानंतर वसुदेव इत्यादी वृष्णी, भोज आणि दशार्हवंशी त्यांचे बांधव शोकाकुल होतील. मग मी त्यांना स्वतः मारीन तसेच पिता उग्रसेन हे वृद्ध असूनही राज्याचे लोभी आहेत. मी त्यांना, त्यांचे भाऊ देवक आणि अन्य जे जे कोणी माझे शत्रू आहेत, त्या सर्वांना, यमसदनाला पाठवीन. नंतर हे मित्रा ! ही पृथ्वी निष्कंटक होईल. कारण जरासंध आमचे श्वशुर आहेत आणि द्विविद हा प्रिय मित्र आहे. शंबरासुर, नरकासुर आणि बाणासुर यांची तर माझ्याशीच मैत्री आहे. या सर्वांच्या साहाय्याने मी देवांचे पक्षपाती असणार्‍या राजांना मारून पृथ्वीचे राज्य भोगीन. हे लक्षात घेऊन बालक बलराम-कृष्णांना येथे लवकर घेऊन ये. त्यांना फक्त एवढेच सांग की, "त्यांनी धनुष्य यज्ञ आणि मथुरेचे वैभव पाहाण्यासाठी येथे यावे." (३०-३७)

अक्रूर म्हणाला- महाराज ! आपण आपल्यावरील अरिष्ट दूर करू इच्छिता म्हणून आपला हा विचार योग्यच आहे. पण यशापयशाबद्दल समभाव ठेवून माणसाने आपले कर्तव्य करावे. फळ मिळणे हे दैवाच्या अधीन आहे. मनुष्य मोठमोठे मनोरथ करतो, परंतु दैवामुळे ते सफल होत नाहीत. याचमुळे माणसाला कधी आनंद तर कधी दुःख होते. असे असून सुद्धा मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. (३८-३९)

श्रीशुक म्हणतात - कंसाने मंत्री आणि अक्रूरांना अशी आज्ञा करून सर्वांना निरोप दिला. त्यानंतर तो आपल्या महालात आला आणि अक्रूर आपल्या घरी परतला. (४०)

अध्याय छत्तिसावा समाप्त

GO TOP