श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३५ वा

युगलगीत -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्ण वनात जात, तेव्हा गोपींचे चित्तसुद्धा त्यांच्याबरोबरच जात असे. श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत त्या आपले दिवस कष्टाने घालवीत. (१)

गोपी म्हणत- सख्यांनो ! श्रीकृष्ण जेव्हा आपला डावा गाल डाव्या हाताच्या बाजूकडे वळवून भुवया नाचवीत, बासरी तोंडाला लावून आपली सुकुमार बोटे त्यांच्या छिद्रांवर फिरवून मधुर तान छेडतात, तेव्हा आकाशात पतींसह विमानात बसून आलेल्या सिद्धपत्‍न्या ती तान ऐकून प्रथम आश्चर्यचकित होतात. नंतर त्यांचे चित्त कामबाणांनी विद्ध होते. त्यामुळे लज्जित झालेल्या त्या पाहाता पाहाता बेभान होतात. इतक्या की त्यांना वस्त्रांचीही शुद्ध राहात नाही. (अशा कॄष्णांचा विरह आम्ही कसा बरे सहन करावा? ) (२-३)

अग सख्यांनो ! हे आश्चर्य तर ऐका ! हे नंदनंदन जेव्हा दुःखितांनाही आनंद देणारा वेणू वाजवू लागतात, तेव्हा त्यांचे हास्य हाच त्यांच्या छातीवर रुळणारा हार बनतो आणि चंचल लक्ष्मी तेथे स्तब्ध होऊन राहते. त्या वेणूनादाने चित्त आकर्षित झालेले व्रजातील बैल, गाई आणि हरीण यांचे कळप मुग्ध होऊन जातात. दातांनी चावत असलेला गवताचा घास त्यांच्या तोंडातच असतो, दोन्ही कान टवकारून ते असे उभे राहातात की, जणू काही ते झोपी तरी गेले आहेत किंवा भिंतीवर काढलेली ती चित्रे तरी आहेत. (४-५)

गडे ! ते नंदलाल जेव्हा मस्तकावर मोरपंखांचा मुकुट घालून रंगीत धातूंनी आपले शरीर रंगवितात आणि पानांनी असे सजवून घेतात की, जसा एखादा पहिलवान असावा आणि नंतर जेव्हा बलराम आणि गोपालांसह बासरी वाजवून गाईंना साद घालतात, त्यावेळी त्या नादाने नद्यांचे वाहाणे थांबते. त्यांना असे वाटते की, श्रीकृष्णांच्या चरणांची धूळ वार्‍याने उडवून आपल्याकडे आणावी. परंतु त्यासुद्धा आमच्यासारख्याच अभागिनी आहेत. जसे श्रीकृष्णांना आलिंगन देतेवेळी आमचे हात थरथरतात आणि नंतर जड होतात, त्याचप्रमाणे त्यासुद्धा तरंगरूप हात प्रेमाने वर उचलू पाहातात, परंतु पुन्हा असहाय होऊन स्थिर राहातात. (६-७)

गोपाल ज्यांच्या लीलांचे गायन करीत असतात, ते आदिपुरुषासारखे स्थिर ऐश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनामध्ये विहार करीत असताना बासरी वाजवून पर्वतावर चरणार्‍या गाईंना त्यांच्या नावांनी साद घालतात, त्यावेळी वनातील वृक्ष आणि वेली आपल्या अंतरंगात भगवान विष्णूंचे अस्तित्व सूचित करीत फुलांनी आणि फळांनी बहरून येतात, त्यांच्या भाराने फांद्या वाकून जमिनीवर टेकतात. प्रेमाने त्यांचा रोम-अन-रोम प्रफुल्लित होतो आणि ते मधाच्या धारांचा वर्षाव करू लागतात. (८-९)

विश्वातील सुंदरांहून सुंदर असणर्‍या मनमोहनांनी कपाळावर केशरी गंधाचा सुंदर तिलक लावलेला असून गळ्यामध्ये वनमाला धारण केली आहे. तीतून येणारा तुळशीचा दिव्य गंध आणि मधुर मध यांनी धुंद होऊन भुंग्यांच्या झुंडी उच्च स्वराने मधुर गुंजारव करीत असतात. त्या गुणगुणण्याचा आदर करीत त्यांच्या स्वरात स्वर मिळवून जेव्हा ते आपली बासरी वाजवू लागतात, त्यावेळी ते मधुर संगीत ऐकून सरोवरात राहाणार्‍या सारस, हंस वगैरे पक्ष्यांचे चित्तसुद्धा मोहून जाते. ते श्यामसुंदरांजवळ येऊन बसतात आणि डोळे बंद करून, गुपचुप चित्त एकाग्र करून, ते संगीत ऐकू लागतात. (१०-११)

हे व्रजदेवींनो ! श्यामसुंदर जेव्हा फुलांची कुंडले कानांत घालून बलरामांसह आनंदाने पर्वतशिखरावर उभे राहून, सगळ्या जगाला आनंदित करीत बासरीच्या मधुर आवाजाने सगळे विश्व भरून टाकतात, त्यावेळी मेघ बासरीच्या तानांबरोबर त्यांच्या वेणूवादनात व्यत्यय न येईल, अशा बेताने हळू हळू गर्जना करून त्यांना साथ देतात. शिवाय स्वतः सारखाच वर्ण असलेल्या घनश्यामांना ऊन लागू नये म्हणून ते त्यांच्या मस्तकावर सावली धरतात, त्यांचे छत्र होतात. तसेच बारीक तुषारांच्या रूपाने जणू दिव्य पुष्पांचा वर्षाव करतात. (१२-१३)

हे यशोदामाते ! तुझा पुत्र गोपाळांबरोबर खेळ खेळण्यात निपुण आहे. तसेच अनेक प्रकारे बासरी वाजविणे ते स्वतःच शिकले आहेत. जेव्हा तोंडल्यांसारख्या लाल ओठांवर बासरी ठेवून ते अनेक रागरागिणी वाजवू लागतात, त्यावेळी ते ऐकून ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी सर्वज्ञ असणारे मोठमोठे देवसुद्धा त्या रागरागिणी ओळखू शकत नाहीत. ते इतके मोहित होऊन जातात की, त्यांचे चित्त वेणुवादनात तल्लीन होऊन जाते, मस्तक नम्र होते आणि ते आपली शुद्ध हरवून बसतात. (१४-१५)

ज्यांच्या तळव्यांवर ध्वज, वज्र, कमळ, अंकुश इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सुंदर चिन्हे आहेत, अशा आपल्या चरणकमलांनी ते गाईच्या खुरांनी खोदल्या गेलेल्या व्रजभूमीचे दुःख नाहीसे करतात. तसेच गजराजाप्रमाणे चालत जेव्हा ते बासरी वाजवतात तेव्हा त्यांचा तो बासरीचा आवाज ऐकून, ते मोहक चालणे आणि त्यांचे ते विलासपूर्ण पाहाणे आमच्या हृदयात प्रेमभाव वाढवितात. आम्ही त्यावेळी इतक्या मोहित होऊन जातो की, झाडांसारखी आमची स्थिती होते. त्यावेळी आम्हांला केसांची किंवा वस्त्रांची शुद्धही राहात नाही. (१६-१७)

जिचा वास त्यांना अतिशय प्रिय आहे, अशी तुळशीची माळ गळ्यात घालून जेव्हा ते मण्यांच्या माळेने गाई मोजता मोजता एखाद्या प्रिय मित्राच्या गळ्यात हात टाकून बासरीही वाजवितात, त्यावेळी बासरीच्या त्या मधुर स्वरांनी चित्त हरवलेल्या काळविटांच्या माद्या आम्हा गोपींप्रमाणे घराची अभिलाषा सोडून गुणसागर, नंदनंदनालाच वेढून राहातात. (१८-१९)

हे पुण्यशील यशोदामाते ! तुझा बाळ कुंदांचा हार गळ्यात घालून व कौतुकास्पद वेष धारण करून गोपालांसह गाईंच्याबरोबर यमुनेच्या काठी आपल्या मित्रांना आनंद देत खेळू लागतो, त्यावेळी तेथे मलय पर्वतावरील चंदनाने सुगंधित झालेला मंद मंद वारा पाहून तो तुझ्या लाडक्याची सेवा करतो आणि गंधर्व इत्यादी उपदेवता, भाटांप्रमाणे गाऊन-वाजवून त्याला संतुष्ट करतात. तसेच अनेक प्रकारचे नजराणे देऊन त्याला सगळीकडून वेढून त्याची सेवा करतात. (२०-२१)

व्रजातील गाईंवर गोवर्धनधरांचे अतिशय प्रेम आहे; म्हणून तर त्यांनी गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. संध्याकाळ झाली आहे. आता ते सगळ्या गोधनाला वळवून घेऊन येतच असतील. वाटेत ब्रह्मदेवादी वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध त्यांच्या चरणांना प्रणाम करत असतील. आता बासरी वाजवीत ते येऊ लागले आहेत. आणि गोपाल त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत. पहा ना ! गाईंच्या खुरांनी उडालेली धूळ वनमालेवर बसली आहे. ते दिवसभर फिरून फिरून दमले असले तरीसुद्धा त्या श्रमांच्या सौं‍दर्यानेही आमच्या डोळ्यांना किती आनंद देत आहेत बरे ! हे देवकीपुत्र कृष्णचंद्र आम्हां प्रियजनांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठीच आमच्याकडे येत आहेत. (२२-२३)

सखे ! ते पहा ! त्यांचे सुंदर डोळे काहीसे इकडेतिकडे पाहात आहेत. गळ्यात वनमाला डोलत आहे. सोन्याच्या कुंडलांच्या कांतीने त्यांचे कोमल गाल शोभिवंत दिसत आहेत. त्यामुळेच पिकलेल्या बोराप्रमाणे मुखकमल पिवळसर दिसत आहे. आपल्या बांधवांना व इष्टमित्रांना मान देणारे श्रीकृष्ण आपल्या गजराजासारख्या डौलदार चालीने या संध्याकाळच्या वेळी व्रजातच असलेल्या गाईंचा आणि आमचा, दिवसभरातील असह्य विरहताप नाहीसा करण्यासाठी, दिवसाची उष्णता दूर करणार्‍या चंद्राप्रमाणे जवळ येऊ लागले आहेत. (२४-२५)

श्रीशुकाचार्य म्हणतात- राजा ! कृष्णमय झालेल्या भाग्यवान गोपी जेव्हा श्रीकृष्ण दिवसा वनात जात, तेव्हा त्या त्यांचेच चिंतन करीत आणि त्यांच्याच लीलांचे गायन करीत त्यातच रममाण होऊन जात. (२६)

अध्याय पस्तिसावा समाप्त

GO TOP