श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३४ वा

सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - एकदा गोपाल शिवरात्रीच्या उत्सवाच्या वेळी जत्रा पाहण्याच्या कुतूहलाने बैलगाड्यांत बसून अंबिकावनात गेले. राजन ! तेथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले आणि भगवान शंकरांचे व भगवती अंबिकादेवीचे भक्तीभावाने अनेक प्रकारच्या पूजासाहित्याने पूजन केले. तेथे त्यांनी आदरपूर्वक गाई, सोने, वस्त्रे, मध आणि मधुर अन्न भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न व्हावेत, म्हणून ब्राह्मणांना दान दिले. नंदसुनंद इत्यादी गोपांनी त्यादिवशी शिवरात्रीचा उपवास होता, म्हणून फक्त पाणी पि‍ऊन ते रात्रीच्या वेळी सरस्वती नदीच्या तीरावर झोपी गेले. (१-४)

त्या वनामध्ये एक अत्यंत भयानक असा अतिशय भुकेलेला अजगर दैवयोगाने तेथे आला आणि झोपी गेलेल्या नंदांना गिळू लागला. अजगराने गिळायला लागताच नंद ओरडू लागले- " बाळा कृष्णा ! कृष्णा ! धाव, धाव ! पहा पुत्रा ! हा अजगर मला गिळून टाकू लागला आहे. मला तुझाच आधार आहे. मला या संकटातून वाचव." नंदांचे ओरडणे ऐकून गोप एकदम उठून उभे राहिले आणि अजगराच्या तोंडात त्यांना पाहून घाबरले. त्याचवेळी पेटलेल्या कोलितांनी ते त्या अजगराला मारू लागले. परंतु कोलितांनी भाजूनसुद्धा अजगराने त्यांना सोडले नाही. इतक्यात भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण तेथे पोहोचले आणि त्यांनी आपल्या चरणाने अजगराला स्पर्श केला. भगवंतांच्या पवित्र चरणाचा स्पर्श होताच अजगराचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याच क्षणी अजगराचे शरीर सोडून त्याने विद्याधरांनी पूजावे, असे सुंदर रूप घेतले. त्या देदीप्यमान पुरुषाने सोन्याचा हार घातला होता. भगवंतांना प्रणाम करून तो जेव्हा हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्यांनी त्याला विचारले. "तू कोण आहेस ? अतिशय सौं‍दर्याने झळकणारा तू दिसण्यात अद्‌भुत आहेस. ही किळसवाणी अजगरयोनी तुला कशी काय प्राप्त झाली ? इच्छेविरुद्धच तुला या योनीत यावे लागले असेल." (५-११)

अजगराच्या शरीरातून निघालेला पुरुष म्हणाला - भगवन ! मी पूर्वी सुदर्शन नावाचा एक विद्याधर होतो. मी अत्यंत सुंदर तर होतोच, शिवाय माझ्याजवळ संपत्तीही पुष्कळ होती. त्यामुळे मी विमानात बसून दिशा-दिशांना फिरत असे. एके दिवशी मी अंगिरा गोत्राच्या कुरूप ऋषींना पाहिले. मला माझ्या सौं‍दर्याचा गर्व असल्याने मी त्यांना हसलो. माझ्या या कुचेष्टेमुळे रागावून त्यांनी मला अजगर योनीत जाण्याचा शाप दिला. हे माझ्याच पापाचे फळ होते. माझ्यावर कृपा करण्यासाठीच त्या कृपाळू ऋषींनी मला शाप दिला होता; कारण त्या शापामुळेच आज चराचराचे गुरु असलेल्या आपण स्वतः आपल्या चरणाने मला स्पर्श केला. त्यामुळे माझे सर्व पाप नाहीसे झाले. सर्व पापांचा नाश करणार्‍या हे प्रभो ! जे लोक जन्म-मृत्यूरूप संसाराला भिऊन आपल्या चरणांना शरण जातात, त्यांना आपण सर्व भयांपासून मुक्त करता. आपल्या श्रीचरणस्पर्शाने मी शापातून मुक्त झालो आहे. आता आपल्या लोकी जाण्यासाठी मी आपला निरोप घेतो. हे भक्तवत्सला ! महायोगेश्वर पुरुषोत्तमा ! मी आपल्याला शरण आलो आहे. इंद्रादी समस्त लोकेश्वरांच्या परमेश्वरा ! स्वयंप्रकाशा ! मला अनुमती द्यावी. हे अच्युता ! आपल्या केवळ दर्शनानेच मी ब्राह्मणांच्या शापातून तत्काळ मुक्त झालो. जो मनुष्य आपल्या नामांचे उच्चारण करतो, तो स्वतःला आणि सर्व श्रोत्यांनासुद्धा ताबडतोब पवित्र करतो. तर मग आपल्या श्रीचरणांचा साक्षात स्पर्श झालेल्या माझ्याबद्दल काय सांगावे ? सुदर्शनाने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. नंतर त्यांची आज्ञा घेऊन तो स्वर्गात गेला आणि नंदानाही या संकटातून सोडवले. राजन ! व्रजवासियांनी जेव्हा श्रीकृष्णांचा हा अद्‌भुत प्रभाव पाहिला तेव्हा ते विस्मयचकित झाले. त्या क्षेत्रातील धार्मिक विधि पूर्ण करून अतिशय आदरपूर्वक श्रीकृष्णांच्या या लीलेविषयीच बोलत ते पुन्हा व्रजामध्ये परतले. (१२-१९)

एके दिवशी अलौकिक कर्म करणारे श्रीकृष्ण आणि बलराम रात्रीच्या वेळी गोपींसह वनामध्ये विहार करीत होते. निर्मळ वस्त्रे परिधान करून, गळ्यांमध्ये फुलांचे हार घातलेले, शरीराला सुगंधी चंदन लावलेले व सुंदर अलंकार धारण केलेले असे जे राम-कृष्ण त्यांच्या गुणांचे गोपी प्रेमाने आणि आनंदाने गोड स्वरात गायन करीत होत्या. तिन्हीसांज झाली होती. आकाशात चंद्र-तारे उगवू लागले होते. मोगर्‍याच्या सुगंधाने धुंद होऊन भुंगे इकडे तिकडे फिरत होते. आणि कमलपुष्पांचा सुगंध घेऊन वारा वाहात होता. त्यावेळी त्या सर्वांचा आनंद लुटत राम-कृष्णांनी मिळून स्वरांच्या चढ-उतारांसह अतिशय सुंदर राग आळविला. जगातील सर्व प्राण्यांच्या मनाला आणि कानांना तो भरभरून आनंद देत होता. त्यांचे हे गायन ऐकून गोपी बेभान झाल्या. परीक्षिता ! त्यांना आपल्या शरीराचीसुद्धा शुद्ध राहिली नाही आणि त्यावरून निसटणारी वस्त्रे आणि वेण्यातून गळणारी फुले याचेही त्यांना भान नव्हते. (२०-२४)

हे दोघे भाऊ ज्यावेळी अशा प्रकारे स्वैरपणे विहार करीत होते आणि धुंद होऊन गात होते, त्याचवेळी तेथे शंखचूड नावाचा एक यक्ष आला. तो कुबेराचा सेवक होता. परीक्षिता ! दोन्ही भावांच्या देखत निःसंकोचपणे त्या गोपींना घेऊन तो उत्तरेकडे निघून गेला. ज्यांचे स्वामी श्रीकृष्ण आहेत, त्या गोपी त्यावेळी मोठ्याने ओरडू लागल्या. एखाद्या चोराने गाईंना पळवावे, त्याप्रमाणे हा यक्ष आपल्या प्रिय गोपींना घेऊन चालला आहे आणि त्या ’हे कृष्ण ! हे राम ! ’ म्हणून मोठ्याने हाका मारीत आहेत, असे पाहून ते दोघेजण त्याचवेळी त्याच्यापाठोपाठ धावले. ’भिऊ नका !’ असे म्हणून धीर देत, हातामध्ये सागवानाची झाडे घेऊन, अतिशय वेगाने, एका क्षणात ते त्या नीच यक्षाजवळ जाऊन पोहोचले. काळ आणि मृत्यू यांच्या समान असणारे हे दोघे आल्याचे पाहताच घाबरलेला तो मूर्ख, गोपींना तेथेच सोडून प्राण वाचविण्यासाठी पळू लागला. तेव्हा गोपींचे रक्षण करण्यासाठी बलराम तेथेच थांबले; परंतु श्रीकृष्ण मात्र जेथे जेथे तो जाई, तेथे तेथे त्याचा पाठलाग करीत पळत गेले. त्याच्या मस्तकावरील चूडामणी त्यांना काढून घ्यायचा होता. जवळ जाताच भगवंतांनी त्याला पकडले आणि त्या दुष्टाच्या मस्तकावर जोराने एक ठोसा लगावून चूडामणीसह त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. अशा प्रकारे श्रीकृष्ण शंखचूडाला मारून तो चमकदार मणी घेऊन परत आले आणि तो, सर्व गोपींच्या देखतच मोठ्या प्रेमाने त्यांनी बलराम दादांना दिला. (२५-३२)

अध्याय चौत्तिसावा समाप्त

GO TOP