श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३३ वा

महारास -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - भगवंतांची ही मधुर वाणी ऐकून गोपींचा विरहजन्य ताप संपला आणि त्यांचे प्रेम मिळाल्याने गोपींचे मनोरथ पूर्ण झाले. भगवान श्रीकृष्णांच्या प्रेयसी आणि सेविका गोपी एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या होत्या. त्या स्त्री-रत्‍नांच्याबरोबर भगवंतांनी रासक्रीडा सुरू केली. योगेश्वर भगवान दोन दोन गोपींच्या मध्ये प्रगट झाले आणि त्यांच्या गळ्यांत त्यांनी आपला हात टाकला. प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की, श्रीकृष्ण केवळ आपल्याच जवळ आहेत. अशा प्रकारे अनेक गोपींच्या समूहात श्रीकृष्णांचा रासोत्सव सुरू झाला. त्यावेळी आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली होती. रासोत्सवाच्या दर्शानाच्या उत्सुकतेमुळे स्वतःला विसरलेले सर्व देव आपापल्या पत्‍नींसह तेथे येऊन पोहोचले. स्वर्गातील दुंदुभी वाजू लागल्या. स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. गंधर्वगण आपापल्या पत्‍नींसह भगवंतांच्या निर्मल यशाचे गायन करू लागले. सर्व गोपी रासमंडलामध्ये आपल्या प्रियतमासह नृत्य करू लागल्या. त्यांच्या बांगड्या, पैंजण आणि कमरपट्ट्याचे घुंगरू या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. तेथे व्रजसुंदरींच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण अगणित पिवळ्याधमक सुवर्णमण्यांमधे तेजस्वी मोठा नीलमणी चमकावा तसे दिसत होते. नृत्याच्या वेळी गोपी निरनिराळ्या तर्‍हेच्या पायांच्या हालचाली व हातांचे हावभाव करीत. मधून मधून स्मितपूर्वक भुवयांचे विलास करीत. कंबर लचकावीत. कधी त्यांच्या छातीवरील दुपट्टे हेलकावे घेत तर कधी कुंडले गालांवर आपटत. चेहर्‍यावर घामाचे थेंब तरारले होते आणि वेण्या सैल झाल्या होत्या. तशाच कमरेच्या दुपट्ट्याच्या गाठीही सैलसर झाल्या होत्या. याचवेळी त्या गातही होत्या. मेघमंडलांत विजा शोभाव्या, तशा श्रीकृष्णांच्या सान्निध्यात त्या शोभत होत्या. त्या प्रेममग्न गोपिका नाचत-नाचत उंच स्वरात रागदारीत मधुर गायन करीत होत्या. श्रीकृष्णांच्या स्पर्शामुळे त्या अधिकच आनंदमग्न झाल्या होत्या. त्यांच्या गायनाने हे सर्व जग अजूनही गुंजन करीत आहे. एक गोपी भगवंतांच्या बरोबर त्यांच्या स्वरात स्वर मिळवून गात होती. ती त्यांच्यापेक्षाही वरच्या स्वरात गाऊ लागली. तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी तिला " वाहवा ! वाहवा ! " म्हणून शाबासकी दिली. दुसरीने तोच राग ध्रुपद तालात गा‍इला. त्याचेसुद्धा भगवंतांनी अतिशय कौतुक केले. एक गोपी नृत्य करता करता थकून गेली. तिच्या मनगटातून बांगड्या आणि वेणीतून मोगर्‍याची फुले गळू लागली. तेव्हा तिने शेजारीच उभे असलेल्या मुरलीमनोहरांचा खांदा आपल्या हाताने धरून ठेवला. एकीने श्रीकृष्णांनी खांद्यावर ठेवलेल्या, मुळातच कमलाप्रमाणे सुगंधी असलेल्या व त्यावर चंदनाची उटी लावलेल्या हाताचा वास घेतला. त्यामुळे रोमांचित होऊन तिने त्या हाताचे चुंबन घेतले. नाचताना एका गोपीचे कुंडल हालत होते, त्याच्या कांतीने तिचा गाल चमकत होता. तिने आपला गाल श्रीकृष्णांच्या गालाला लावला. तेव्हा भगवंतांनी आपल्या तोंडातून चावलेला विडा तिच्या तोंडात दिला. एक गोपी पैंजणांचा आणि कमरपट्ट्याच्या घुंगरांचा नाद करीत नाचत आणि गात होती. ती जेव्हा थकून गेली, तेव्हा तिने आपल्या शेजारीच उभे असलेल्या श्यामसुंदरांचा मंगल हात आपल्या दोन्ही स्तनांवर ठेवून घेतला. (१-१४)

लक्ष्मीचाच केवळ पती असणार्‍या श्रीकृष्णांना आपला प्रियतम करून घेऊन, गोपी गायन करीत त्यांच्याबरोबर विहार करू लागल्या. यावेळी श्रीकृष्णांनी त्यांच्या गळ्यांत आपले हात घातले होते. कानावरील कमळे, गालावर रुळणारे कुरळे केस आणि घामाचे बिंदू यांनी ज्यांची मुखकमले शोभत आहेत, अशा गोपी भ्रमर गायक असणार्‍या रासमंडलामध्ये श्रीकृष्णांच्याबरोबर नृत्य करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या बांगड्या, पैंजण आणि अन्य वाद्ये वाजत होती. तसेच त्यांच्या वेण्यांमध्ये गुंफलेली फुले इतस्ततः विखरून पडत होती. लहान मुलाने आपल्याच प्रतिबिंबाशी खेळावे त्याचप्रमाणे रममाण आपलीच प्रतिबिंबे असणार्‍या त्यांना कधी छातीशी धरीत, कधी हाताने कुरवाळीत, कधी प्रेमपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहात तर कधी लीलेने मोठ्याने हसत. अशा प्रकारे त्यांनी व्रजसुंदरींबरोबर क्रीडा केली. परीक्षिता ! भगवंतांच्या अंगाच्या स्पर्शाने झालेल्या आनंदाने गोपी भान विसरल्या. फुलांचे हार तुटले. दागिने अस्ताव्यस्त झाले. त्या आपले विस्कटलेले केस, वस्त्रे आणि चोळ्यासुद्धा सांभाळण्यास असमर्थ झाल्या. श्रीकृष्णांची ही रासक्रीडा पाहून स्वर्गातील देवांगनासुद्धा काम-मोहित झाल्या आणि नक्षत्रांसह चंद्रसुद्धा चकित झाला. जरी भगवान स्वतःतच रमणारे असले, तरीसुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या, तेवढीच रूपे सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला. हे राजा ! जेव्हा पुष्कळ वेळपर्यंत विहार केल्यामुळे गोपी थकून गेल्या, तेव्हा करुणामय श्रीकृष्णांनी प्रेमाने आपल्या सुखद करकमलांनी त्यांच्या चेहर्‍यावरून हात फिरवून त्यांचा शीण दूर केला. भगवंतांच्या नखस्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्यांच्यावर सोन्याची कुंडले झगमगत होती आणि कुरळे केस भिरभिरत होते, अशा आपल्या गालांच्या सौं‍दर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेने श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूंच्या पवित्र लीलांचे गायन करू लागल्या. यानंतर जसा थकलेला हत्ती किनारे पाडत हत्तिणींबरोबर पाण्यात शिरून क्रीडा करतो, त्याचप्रमाणे (गुणातीत असल्यामुळे) लोकमर्यादा आणि वेदमर्यादा यांची पर्वा न करणार्‍या भगवंतांनी थकवा दूर करण्यासाठी गोपींसह यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. त्यावेळी भगवंतांच्या गळ्यातील वनमाला गोपींचे अंग घासल्याने थोडीशी चुरगाळली होती आणि त्यांच्या वक्षःस्थळाच्या केशराचा रंगही लागला होता. तिच्या चारी बाजूंनी गुणगुणणारे भुंगे त्यांच्या पाठोपाठ चालले होते. जणू गंधर्वराज त्यांच्या कीर्तीचे गायन करीत पाठोपाठ चालले आहेत. परीक्षिता ! यमुनेच्या पाण्यात गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षांनी भगवंतांच्याकडे पाहात हसत हसत त्यांच्यावर इकडून-तिकडून खूप पाणी उडविले. विमानात बसलेल्या देवता फुलांचा वर्षाव करून त्यांची स्तुती करू लागल्या. अशाप्रकारे यमुनेच्या पाण्यात आत्माराम श्रीकृष्णांनी गजराजाप्रमाणे विहार केला. यानंतर गोपी आणि भुंग्यांच्या थव्यांनी वेढलेले भगवान यमुनातीरावरील उपवनात गेले. ते अत्यंत रमणीय होते. त्याच्या चारी बाजूंनी पाण्यात आणि जमिनीवर उमललेल्या फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहात होता. तेथे जसा मदोन्मत्त हत्ती हत्तिणींच्या कळपासह फिरतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्या वनात विहार करू लागले. जिच्यामध्ये अनेक रात्री एकत्रित झाल्या होत्या, अशी ती शरद ऋतूतील रात्र चंद्राच्या चांदण्याने सुंदर झाली होती. शरद ऋतूसंबंधी ज्या रसांचे वर्णन काव्यात वाचायला मिळते, त्यानुसारच ती रात्र होती. त्या रात्री सत्यसंकल्प श्रीकृष्णांनी आपल्या प्रेयसी गोपींसह शुद्ध सत्त्वमय रासक्रीडा करीत अनेक प्रकारे विहार केला. (१५-२६)

राजाने विचारले - जगाचे स्वामी भगवान यांनी आपला अंश श्रीबलरामांसह धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण केला होता. ब्रह्मन ! ते धर्ममर्यादेचा उपदेश करणारे, स्वतः आचरण करणारे आणि त्या सर्वांचे रक्षण करणारे होते. असे असता त्यांनी स्वतः परस्त्रियांना स्पर्श करण्याचे धर्मविरोधी वर्तन कसे केले ? भगवान श्रीकृष्णांना कोणतीही इच्छा नव्हती, असे असतानाही त्यांनी कोणत्या उद्देशाने हे अयोग्य कर्म केले ? हे ब्रह्मचारी मुनीश्वर ! कृपा करून आपण माझा हा संशय दूर करा. (२७-२९)

श्रीशुक म्हणतात - अलौकिक पुरुषांची कधी कधी धर्माचे उल्लंघन आणि लौकिक दृष्ट्या अविचारी कृत्ये दिसतात. परंतु ही त्या तेजस्वी पुरुषांना दोषास्पद ठरत नाहीत. जसे, अग्नी सगळे खातो, परंतु त्यामुळे तो अपवित्र होत नाही. ज्या लोकांच्या अंगी असे सामर्थ्य नसते, त्यांनी मनानेसुद्धा अशा गोष्टी करता कामा नयेत. एखाद्याने मूर्खपणामुळे असे कृत्य केलेच, तर त्याचा नाश होतो. जसे भगवान शंकर हालाहल विष प्याले, म्हणून दुसरा कोणी पि‍ईल, तर तो जळून जाईल. म्हणून जे थोर आहेत, त्यांचा उपदेश नेहमी सत्य असतो. आणि आचरण काही वेळा सत्य असते; म्हणून बुद्धिमान माणसाने त्यांचे जे आचरण त्यांच्या उपदेशानुसार असेल, तेवढेच आपल्या जीवनात उतरविले पाहिजे. परीक्षिता ! अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी ’कर्ताभाव’ नसतो. शुभकर्म करण्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नसतो आणि अशुभ कर्म करण्याने त्यांचे काही नुकसान होत नाही. असे जर आहे, तर मग जे पशू, पक्षी, मनुष्य, देव इत्यादी सर्व चराचर जीवांचे स्वामी आहेत, त्यांच्याशी मानवाच्या बाबतीतील शुभ आणि अशुभ यांचा संबंध कसा जोडता येईल ? ज्यांच्या चरणकमलांच्या परागांचे सेवन करून भक्तजन तृप्त होतात, ज्यांच्याशी जोडले गेलेले योगी त्याच्या प्रभावाने आपली सर्व कर्मबंधने तोडून टाकतात आणि ज्यांचे तत्त्व जाणणारे ज्ञानी पुरुष स्वच्छंदपणे वागूनही कर्मबंधनात अडकत नाहीत, तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपले स्वरूप प्रगट करतात, त्यांना कर्मबंधन कोठून असणार ? गोपी, त्यांचे पती आणि सर्व जीव यांच्या अंतःकरणामध्ये जे आत्मरुपाने विराजमान आहेत, जे सर्वांचे साक्षी आहेत, त्यांची देह धारण करणे ही केवळ लीला आहे. भगवान (प्रपंचसुखांत रमलेल्या) जीवांवर कृपा करण्यासाठीच स्वतःला मनुष्यरूपाने प्रगट करतात आणि तशाच क्रीडा करतात की, ज्या ऐकून जीवांनी भगवत्परायण व्हावे. व्रजवासी गोपांना श्रीकृष्णांबद्दल मुळीच मत्सर वाटला नाही. कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की, आपल्या पत्‍न्या आपल्याजवळच आहेत. ब्राह्ममुहूर्त आला. (पहाट झाली.) आपल्या घरी परत जाण्याची गोपींची जरी इच्छा नव्हती, तरी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणार्‍या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. (३०-३९)

परीक्षिता ! जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपींबरोबरची ही रास-लीला श्रद्धेने वारंवार श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो, त्याला भगवंतांच्या चरणांविषयी परम भक्तीची प्राप्ती होते आणि तो तत्काळ कामभावनेपासून स्वतःची सुटका करून घेतो. (४०)

अध्याय तेहतिसावा समाप्त

GO TOP