श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३२ वा

भगवंतांकडून गोपींचे सांत्वन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता ! अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गाणार्‍या आणि विलाप करणार्‍या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शानाच्या लालसेने मोठमोठ्याने रडू लागल्या. त्याचवेळी त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यांचे मुखकमल स्मितहास्याने खुलले होते. गळ्यात वनमाला होती, पीतांबर धारण केला होता. त्यांचे हे रूप कामदेवालाही मोहविणारे होते. तो प्रियतम आल्याचे पाहून गोपींचे डोळे प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाले. जशी अचेतन शरीरांमध्ये प्राणांचा संचार होताच ती उठावी, त्याप्रमाणे त्या सर्वजणी एकदम उठून उभ्या राहिल्या. कोणी आनंदाने श्रीकृष्णांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये धरला, तर दुसरीने त्यांचा चंदनचर्चित बाहू आपल्या खांद्यावर घेतला. कोणी भगवंतांनी खाल्लेला विडा आपल्या हातात घेतला. तर एका विरहतप्त गोपीने त्यांचे चरणकमल आपल्या वक्षःस्थळांवर ठेवून घेतले. एक गोपी प्रणयकोपाने क्रुद्ध होऊन, भुवया उंचावून, दात ओठ चावीत, आपल्या कटाक्षबाणांनी त्यांना घायाळ करीत, त्यांच्याकडे पाहू लागली. आणखी एक गोपी डोळ्यांच्या पापण्या न मिटता त्यांच्या मुखकमलातील मकरंद पिऊ लागली; परंतु ज्याप्रमांणे संतपुरुष भगवंतांच्या चरणांच्या दर्शनाने कधीही तृप्त होत नाहीत, त्याचप्रमाणे ती तृप्त होत नव्हती. कोणी एक गोपी डोळ्यांतून भगवंतांना हृदयात घेऊन गेली आणि तिने डोळे बंद केले. आता मनोमन भगवंतांना आलिंगन दिल्याने तिचे शरीर पुलकित झाले, रोम-अन-रोम उभे राहिले आणि योग्याप्रमाणे ती परमानंदामध्ये मग्न झाली. परमात्म्याची भेट झाल्यावर ज्याप्रमाणे मुमुक्षू संसार तापातून मुक्त होतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या दर्शनाने सर्व गोपींना परमानंद झाला आणि विरहामुळे झालेले दुःख त्या विसरल्या. परीक्षिता ! ज्याप्रमाणे शक्तींनी युक्त नारायण अधिक शोभावे, त्याप्रमाणे विरहव्यथेतून मुक्त झालेल्या गोपींमध्ये श्रीकृष्ण विशेषच शोभू लागले. (१-१०)

यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या व्रजसुंदरींना आपल्याबरोबर घेऊन यमुनेच्या वाळवंटात प्रवेश केला. त्यावेळी उमललेल्या कुंद आणि मंदाराच्या फुलांचा सुगंध घेऊन सुगंधित वायू वाहात होता आणि त्याच्या वासाने धुंद झालेले भ्रमर इकडे तिकडे गुंजारव करीत होते. शरद-पौर्णिमेच्या चांदण्यामुळे रात्रीच्या अंधाराचा काही पत्ताच नव्हता. सगळीकडे मांगल्य पसरले होते. तेथे यमुना नदीने स्वतः आपल्या लाटांच्या हातांनी कोमल वाळू पसरली होती. श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीशी होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण झाले. जसे वेद कर्मकांडांचे वर्णन करूनही ईश्वर दर्शना‍अभावी अतृप्त असतात, पण ज्ञानकांडाचे प्रतिपादन करून ईश्वर दर्शनाने कृतकृत्य होतात. आता त्यांनी आपल्या वक्षःस्थळावर लागलेल्या कुंकुम-केशराच्या रंगाने रंगलेली उपवस्त्रे आपल्या परमप्रियाला बसण्यासाठी अंथरली. योगेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये ज्यांच्यासाठी आसन केलेले असते, तेच सर्वशक्तिमान भगवान तेथे गोपींच्या ओढण्यांवर बसले. गोपींच्या मध्यभागी त्यांच्याकडून पूजित होऊन भगवान अतिशय शोभून दिसत होते. त्रैलोक्यातील सौंदर्य ज्याच्या ठिकाणी एकवटले होते, असा श्रीविग्रह त्यांनी यावेळी धारण केला होता. भगवान श्रीकृष्ण आपल्या या अलौकिक सौंदर्याच्या द्वारा त्यांचे प्रेम आणि आकांक्षा आणखी उंचावून ठेवीत होते. गोपींनी आपले सलज्ज पाहाणी, स्मितहास्य आणि विलासपूर्ण कटाक्ष यांनी त्यांचा सन्मान केला. कोणी त्यांचे चरणकमल मांडीवर घेऊन चुरले, तर कोणी त्यांचे हात कुरवाळले. जणू हीच त्यांनी केलेली स्तुती ! नंतर काहीशा रागावून त्या म्हणाल्या. (११-१५)

गोपी म्हणाल्या - हे श्रीकृष्णा ! काही लोक प्रेम करणार्‍यांवरच प्रेम करतात आणि काही लोक प्रेम न करणार्‍यांवरसुद्धा प्रेम करतात. परंतु काहीजण तर या दोघांवरही प्रेम करीत नाहीत. तर याविषयी आम्हांला समजावून सांगा. (१६)

श्रीभगवान म्हणाले - सख्यांनो ! जे प्रेम करणार्‍यांवर प्रेम करतात, त्यांचा सर्व उद्योग हा केवळ स्वार्थासाठीच असतो, त्यामध्ये सौहार्द नाही की धर्म नाही. त्यांचे प्रेम फक्त स्वार्थापोटीच आहे; याखेरीज त्यांचा दुसरा कोणताही हेतू नाही. हे सुंदरींनो ! जे लोक प्रेम न करणार्‍यांवरही प्रेम करतात - जसे, स्वभावतःच करुणाशील असलेले सज्जन आणि माता-पिता. त्यांच्या मनात दुसर्‍यांचे हित व्हावे, एवढीच इच्छा असते आणि त्यांच्या व्यवहारामध्ये खरा धर्म असतो. काही लोक प्रेम करणार्‍यांवरही प्रेम करीत नाहीत, मग प्रेम न करणार्‍यांच्यावर कोठून करतील ? असे लोक चार प्रकारचे असतात. एक, जे आपल्या स्वरूपातच रमणारे असतात. दुसरे, जे कृतकृत्य असतात. तिसरे, स्वतःवर कोण प्रेम करतात हे ज्यांना माहीतच नसते आणि चौथे, जाणून-बुजून परोपकारी गुरुतुल्य लोकांचासुद्धा द्रोह करणारे. सख्यांनो ! मी तर प्रेम करणार्‍यांवर सुद्धा प्रेम करीत नाही. कारण त्यांची चित्तवृत्ती माझ्याकडेच नेहमी लागून राहावी म्हणून. जसे एखाद्या निर्धन पुरुषाला कधी पुष्कळसे धन मिळावे आणि नंतर ते नाहीसे व्हावे तेव्हा त्याचे हृदय जसे हरवलेल्या धनाच्या चिंतेने भरून जाते, तसाच मीसुद्धा प्राप्त होऊन पुन्हा लपून राहातो. कारण नाहीशा झालेल्या माझेच भक्तांनी चिंतन करावे म्हणून. गोपींनो ! तुम्ही माझ्यासाठी लोकमर्यादा, वेदोपदेश आणि आपल्या नातलगांनाही सोडले आहे, याविषयी शंका नाही. अशा स्थितीत तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणीच लागून राहावी, यासाठी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करीत मी लपलो होतो. म्हणून हे प्रियांनो ! तुम्ही, तुम्हांला प्रिय असणार्‍या माझ्या, तुमच्यावरील प्रेमात उणीव पाहू नका. घर-संसाराच्या तोडण्यास कठीण बेड्या तुम्ही माझ्यासाठी तोडून मला भजू लागलात, माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वथैव निर्दोष आहे. देवांचे आयुष्य जरी मला मिळाले, तरी तुमच्या या प्रेम, सेवा आणि त्यागाचे ऋण मी फेडू शकणार नाही. म्हणून तुम्हीच मला आपल्या सौजन्याने तुमच्या ऋणातून मुक्त करावे. (१७-२२)

अध्याय बत्तिसावा समाप्त

GO TOP



13