श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३१ वा

गोपी गीत -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

गोपी गाऊ लागल्या - प्रियतम ! तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा अधिक वाढला आहे. म्हणूनच तर लक्ष्मी कायमची येथे येऊन राहिली आहे; प्रियतमा ! पहा ! ज्यांनी तुमच्यासाठीच आपले प्राण धारण केले आहेत, त्या गोपी दिशादिशांमध्ये तुम्हांला शोधीत आहेत. हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी ! आम्ही वेतन न घेणार्‍या तुमच्या दासी आहोत. शरत्कालीन जलाशयामध्ये सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरवणार्‍या नेत्रांनी तुम्ही आम्हांला घायाळ केले आहे. आमचे मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर ! नेत्रांनी मारणे हा वध नाही काय ? हे पुरुषोत्तमा ! यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू, अजगराच्या रूपाने खाणारा अघासुर, इंद्राने केलेला वर्षाव, तुफान, विजा, दावानल, वत्सासुर आणि व्योमासुर इत्यादींनी उत्पन्न केलेल्या सर्व प्रकारच्या भयांपासून तुम्ही वारंवार आमचे रक्षण केले आहे. तुम्ही केवळ यशोदनंदनच नाही, तर सर्व प्राण्यांच्या अंतरांत राहाणारे त्यांचे साक्षी आहात, हे सखया ! ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे विश्वाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही यदुवंशात अवतीर्ण झाला आहात. (१-४)

हे यदुवंशशिरोमणे ! जे लोक जन्म-मृत्युरूप संसाराच्या चक्राला भिऊन तुमच्या चरणांना शरण येतात, त्यांना निर्भय करणारे, सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारे आणि लक्ष्मीचे पाणिग्रहण करणारे आपले करकमल, हे नाथ ! आमच्या मस्तकावर ठेवा. व्रजवासियांचे दुःख दूर करणारे हे वीरश्रेष्ठ ! ज्यांच्या स्मिताने भक्तांचा गर्व मावळतो, अशा आमच्या प्रिय सख्या ! या तुमच्या दासींचा स्वीकार करा. आपले सुंदर मुखकमळ आम्हा अबलांना दाखवा. शरणागतांची पापे नाहीशी करणारे, गुरांच्या मागून जाणारे, लक्ष्मीचे निवासस्थान, कालियाच्या फणांवर ठेवलेले असे तुमचे चरणकमल तुम्ही आमच्या वक्षःस्थळावर ठेवून आमच्या हृदयातील आग शांत करा. हे कमलनयना ! सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त, विद्वानांनाही मोहविणार्‍या तुमच्या गोड वाणीने या तुमच्या दासीही मोहित होत असतात. हे वीरा ! आपल्या अधरामृताने आम्हांला तृप्त करा. प्रभो ! तुमच्या कथासुद्धा अमृतस्वरूपच आहेत. विरहाने व्याकूळ झालेल्यांचे ते जीवनसर्वस्व आहे. त्या सगळे पाप-ताप मिटवून श्रवणानेसुद्धा कल्याण करतात. तुमच्या त्या सुंदर कथांचे जे विस्ताराने वर्णन करतात, तेच वास्तविक सर्वांत मोठे दानशूर होत ! हे प्रियतमा ! तुमचे प्रेमपूर्ण हास्य आणि कटाक्ष तसेच तुमच्या लीलांचे ध्यान हे सुद्धा अत्यंत मंगलदायक आहे. पण तुम्ही एकांतात ज्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या गोष्टी केल्या, त्या आठवून हे कपटनाटकसूत्रधारा ! आमच्या मनाची कालवाकालव होत आहे. (५-१०)

हे नाथ ! गुरे चारण्यासाठी तुम्ही जेव्हा वाड्यातून बाहेर जाता, तेव्हा तुमच्या कमलापेक्षाही कोमल पायांना काटे-सराटे लागून ते दुखत असतील, असा विचार मनात येताच हे मनमोहना ! आम्हांला अतिशय दुःख होते. दिवस मावळल्यानंतर जेव्हा तुम्ही वनातून घरी येता, तेव्हा तुमच्या मुखावर काळे कुरळे केस रुळत असतात. जणू भ्रमरयुक्त कमळच. शिवाय गाईंच्या खुरांनी उडालेली दाट धूळही त्यावर पडलेली असते. हे वीरा ! तुम्ही आपले ते सौंदर्य आम्हांला दाखवून आमच्या मनात वारंवार प्रेम उत्पन्न करीत असता. हे प्रियतमा ! तुमचे चरणकमल शरणागत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. स्वतः लक्ष्मी त्यांची सेवा करते आणि पृथ्वीचे तर ते भूषणच आहे. संकटकाळी फक्त त्याचेच चिंतन करणे योग्य आहे. आपले ते परम कल्याणस्वरूप चरणकमल आमच्या वक्षःस्थळावर ठेवून आमच्या हृदयाची व्यथा शांत करा. तुमचे अधरामृत प्रेम वाढविणारे असून सगळा शोक नाहीसा करणारे आहे. गाणारी ही बासरी चांगल्या तर्‍हेने त्याचा आस्वाद घेते. ज्यांनी एकवेळ त्याचे पान केले, त्यांना पुन्हा प्रापंचिक विषयांची आठवणही होत नाही. हे वीरा ! आपले तेच अधरामृत आम्हांला द्या. हे प्रियतमा ! दिवसा जेव्हा तुम्ही वनामध्ये विहार करण्यासाठी जाता, तेव्हा तुम्ही न दिसल्यामुळे आम्हांला एक एक क्षण युगासारखा वाटतो आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी माघारी येता, तेव्हा कुरळ्या केसांनी शोभणारे तुमचे सुंदर मुख आम्ही पाहू लागतो, त्यावेळी डोळ्यांच्या पापण्या बनवून दर्शनात व्यत्यय आणणारा हा विधाता मूर्ख आहे, असे आम्हांला वाटते. हे अच्युता ! आम्ही आपले पति-पुत्र, बंधु-बांधव आणि कुळाचा त्याग करून तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही तुमची एक-एक क्रिया जाणतो, संकेत समजतो. तुमच्या मधुर गीताच्या मोहिनीने आम्ही येथे आलो आहोत, हे तुम्हांला माहीत आहे. असे असताना हे कपटी ! अशा रात्रीच्या वेळी आलेल्या अबलांना तुमच्याखेरीज आणखी कोण वार्‍यावर सोडील ! एकांतात तुम्ही मिलनाची आकांक्षा, प्रेमभाव, जागृत करणार्‍या गोष्टी करीत होतात. थट्टा-मस्करी करीत प्रेमपूर्ण दृष्टीने आमच्याकडे पाहात होतात आणि आम्ही लक्ष्मीचे निवासस्थान असणारे तुमचे विशाल वक्षःस्थळ पाहात असू. तेव्हापासून आपल्या भेटीची आमची लालसा वाढत चालली असून आमचे मन त्याच विचारांनी मोहित होत आहे. हे प्रियतमा ! तुमचे हे स्वरूप व्रजवनवासियांची सर्व दुःखे नाहीसे करणारे आणि विश्वाचे पूर्ण कल्याण करणारे आहे. आमच्या मनात फक्त तुमच्या विषयीच्याच लालसेने जी व्याधी उत्पन्न झाली आहे, तीवर असे काही थोडेसे औषध द्या की, जे तुमच्याच असलेल्या आमचा हृदयरोग समूळ नाहीसा करील. हे प्रियतमा ! तुमचे कमळापेक्षाही कोमल सुंदर चरण आम्ही आमच्या कठोर स्तनांवर भीत-भीतच अतिशय हळुवारपणे ठेवीत असतो. पण रात्रीच्या वेळी त्याच चरणांनी तुम्ही घनदाट जंगलामध्ये भटकत आहात. काटे, दगड वगैरे लागून त्यांना पीडा होत नाही काय ? आम्हांला तर नुसत्या त्या कल्पनेनेच चक्कर येऊ लागली आहे ! कारण आमचे जीवनच तुम्ही आहात. (११-१९)

अध्याय एकतिसावा समाप्त

GO TOP