|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३० वा
श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - भगवान अचानकपणे अंतर्धान पावले, तेव्हा गजराजाविना हत्तिणी जशा दुःखी होतात, तशा व्रजयुवती ते दिसत नाहीत, असे पाहून दुःखाने व्याकूळ झाल्या. श्रीकृष्णांची चाल, प्रेमपूर्ण स्मितहास्य, विलासयुक्त नेत्रकटाक्ष, मनोरम प्रेमालाप, वेगवेगळ्या प्रकारच्या लीला आणि हावभाव यांनी त्यांचे चित्त वेधून घेतले होते. त्यामुळे श्रीकृष्णमय झालेल्या गोपी त्यांच्या वेगवेगळ्या कृतींचे अनुकरण करू लागल्या. आपल्या प्रियतमाच्या चालण्याची लकब, हास्य, पाहणे, बोलणे इत्यादि बाबतीत त्या गोपी त्यांच्या सारख्याच होऊन गेल्या, त्यांच्या शरीरांमध्ये तीच हालचाल, त्याच भाव-भावना उतरल्या. त्या स्वतःला संपूर्णपणे विसरून श्रीकृष्णस्वरूप झाल्या आणि त्यांच्याच लीलाविलासाचे अनुकरण करीत "मीच श्रीकृष्ण आहे" असे म्हणू लागल्या. त्या सर्वजणी एकत्र येऊन उच्च स्वरात त्यांच्याच गुणांचे गायन करीत वेड्यासारख्या एका वनातून दुसर्या वनात त्यांना शोधू लागल्या. श्रीकृष्ण सर्व जड चेतन पदार्थांमध्ये आकाशाप्रमाणे आत-बाहेर व्यापलेले असूनही गोपी मात्र वनस्पतींना त्यांचा ठावठिकाणा विचारू लागल्या. (१-४) "हे पिंपळा ! हे पिंपरे ! हे वटवृक्षा ! नंदनंदन आपल्या प्रेमपूर्ण स्मितहास्याने आणि नेत्रकटाक्षांनी आमचे मन चोरून घेऊन गेले आहेत. तुम्ही त्यांना पाहिलेत काय ? जे कोरांटे ! अशोका ! नागकेशरा ! पुन्नागा ! चाफ्या ! ज्यांच्या केवळ स्मितहास्याने मानिनींचा मान धुळीला मिळतो, ते बलरामांचे धाकटे भाऊ येथे आले होते काय ? हे कल्याण करणार्या तुळशी ! भगवंतांच्या चरणांना तू आवडतेस. म्हणूनच भ्रमर पिंगा घालीत असूनही ते तुझी माळ घालतात. तू आपल्या प्रियतम अच्युताला पाहिलेस काय ? हे मालती ! मल्लिके ! जाई आणि जुई ! प्रिय माधवाला तुम्ही पाहिलेत काय ? आपल्या हातांनी स्पर्श करून तुम्हांला आनंदित करीत ते येथून गेले असणार ! आम्रवृक्षा ! चारा ! फणसा ! आसण्या ! कांचना ! जांभळा ! रुई ! बेला ! बकुळा ! आम्रा ! कदंबा ! दुपारी ! तसेच इतर यमुनेच्या तीरावर असलेल्या परोपकारी वृक्षांनो ! श्रीकृष्णांशिवाय सुन्या झालेल्या आम्हांला त्यांचा मार्ग सांगा. हे पृथ्वीदेवी ! तू अशी कोणती तपश्चर्या केली आहेस की, ज्यामुळे श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शाच्या आनंदाने गवत-वेली इत्यादीच्या रूपाने अंगावर आलेले रोमांच प्रकट करीत आहेस ! तुझा हा आनंद श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शामुळे आहे की, वामनावतारामध्ये त्यांनी तुला चरणाने मोजले होते, त्यामुळे आहे ? की त्याही अगोदर वराहांच्या अंगस्पर्शाने तुझी ही स्थिती झाली नाही ना ? अग गडे हरिणी ! आपल्या शरीरदर्शनाने तुमच्या डोळ्यांना परमानंदाचे दान करीत श्रीकृष्ण आपल्या प्रियेसह येथून तर गेले नाहीत ना ? कारण त्यांच्या कुंदकळ्यांच्या माळेचा सुगंध येथे येऊ लागला आहे. जी माळ त्यांच्या प्रियेच्या अंगस्पर्शाच्यावेळी लागलेल्या स्तनावरील केशराने केशरी झालेली आहे. हे वृक्षांनो ! तुळशीच्या सुगंधाने धुंद झालेले भ्रमर ज्यांचा पाठलाग करीत आहेत, ज्यांच्या एका हातात कमळ असून दुसरा हात प्रियेच्या खांद्यावर ज्यांनी ठेवलेला असेल, ते बलरामाचे धाकटे बंधू विहार करीत येथून गेले असतील. तुम्ही त्यांना वंदन करण्यासाठी झुकलेले असताना त्यांनी आपल्या प्रेमपूर्ण नजरेने तुमच्या वंदनाचा स्वीकार केला असेल ना ? अग सख्यांनो ! या वेलींना विचारा बरे ! वृक्षरूप पतीच्या भुजांनी यांना आलिंगन दिले असले, तरी यांच्या शरीरावर जे कळ्यारूपी रोमांच उभे राहिले आहेत, ते भगवंतांच्या नखांच्या स्पर्शामुलेच आहेत ना !" (५-१३) याप्रमाणे वेड्यासारखे बडबडणार्या गोपी श्रीकृष्णांना धुंडीत असताना व्याकूळ होत होत्या. आता तर त्या भगवन्मय होऊन भगवंतांच्या निरनिराळ्या लीलांचे स्वतः अनुकरण करू लागल्या.एक पूतना झाली तर दुसरी श्रीकृष्ण होऊन तिचे स्तन पिऊ लागली. कुणी छकडा झाली, तर कुणी बाळकृष्ण होऊन रडत त्याला पायाची ठोकर मारून उलटून टाकले. कोणी गोपी बाळकृष्ण झाली तर कुणी तृणावर्त दैत्याचे रूप धारण करून त्याला घेऊन गेली. एखादी गोपी पाय ओढीत पैंजण वाजवीत रांगू लागली. एक कृष्ण झाली तर दुसरी बलराम आणि पुष्कळशा गोपी गोपाळ झाल्या. एक गोपी झाली वत्सासुर, तर दुसरी झाली बकासुर. मग दुसर्या गोपींनी श्रीकृष्ण होऊन वत्सासुर आणि बकासुर झालेल्या गोपींना मारले. जसे श्रीकृष्ण बासरी वाजवून लांब गेलेल्या गाईंना बोलावीत, तशी त्यांच्याप्रमाणे एक गोपी वेणू वाजवून खेळू लागली. तेव्हा बाकीच्या ’वाहवा ! वाहवा !!’ म्हणून तिची प्रशंसा करू लागल्या. एक गोपी स्वतःला श्रीकृष्ण समजून दुसर्या सखीच्या गळ्यात हात टाकून चालू लागे आणिदुसर्या गोपींना म्हणे - "अग ! मी श्रीकृष्ण आहे. तुम्ही माझे हे मनोहर चालणे पहा तर खरे !" एखादी गोपी श्रीकृष्ण होऊन म्हणे - "अरे व्रजवासियांनो ! तुम्ही वादळ-पावसाला भिऊ नका. त्यापासून वाचण्याचा उपाय मी शोधला आहे." असे म्हणून गोवर्धन उचलून डोक्यावर धरीत होती. परीक्षिता ! एक गोपी दुसरीच्या डोक्यावर पाय ठेवून वर चढून म्हणाली - "अरे दुष्ट सर्पा ! तू येथून निघून जा. दुष्टांचे दमन करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे." इतक्यात एक गोपी म्हणाली - "अरे गोपाळांनो ! केवढा भयंकर वणवा पेटला आहे, पाहा ! तुम्ही ताबडतोब डोळे बंद करा. मी सहजपणे तुमचे त्यापासून रक्षण करीन." एका गोपीने दुसरीला फुलांच्या माळेने उखळाला बांधले. आता ती बांधलेली सुंदर गोपी हातांनी तोंड झाकून भ्याल्याची नक्कल करू लागली. (१४-२३) अशा प्रकारे खेळत गोपी वृंदावनातील झाडे, वेली इत्यादींना श्रीकृष्णांचा ठाव-ठिकाणा विचारीत जाऊ लागल्या. त्याचवेळी त्यांनी एके ठिकाणी भगवंतांच्या चरणांचे ठसे पाहिले. त्या आपापसात म्हणू लागल्या, "हे चरणांचे ठसे निश्चितच महात्म्या नंदनंदनांचे आहेत. कारण यामध्ये ध्वज, कमळ, व्रज, अंकुश, जव इत्यादि चिन्हे स्पष्ट दिसत आहेत." त्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत, भगवंतांना शोधीत, गोपी पुढे गेल्या. तेव्हा त्यांना श्रीकृष्णांच्या बरोबर दुसर्या युवतीचीसुद्धा चरणचिन्हे दिसली. ती पाहून त्या व्याकूळ झाल्या आणि म्हणू लागल्या - जशी हत्तीण हत्तीबरोबर जावी, त्याचप्रमाणे नंदकुमारांबरोबर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालणार्या कोणत्या स्त्रीची ही चरणचिन्हे असावीत ! सर्वशक्तिमान, भगवान श्रीकृष्णांची ही खात्रीने ’(आ)राधिका’ असली पाहिजे. म्हणूनच हिच्यावर प्रसन्न होऊन आमच्या गोविंदांनी आम्हांला सोडून हिला एकांतात आणले. सख्यांनो ! श्रीकृष्णांनी आपल्या चरणकमलांनी ज्या ज्या धुळीला स्पर्श केला ती धन्य होय. कारण ब्रह्मदेव, शंकर आणि लक्ष्मीसुद्धा आपले पाप नष्ट करण्यासाठी ती धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात. जी ही एकटीच एकांतात जाऊन श्रीकृष्णांचे अधरामृतपान करीत आहे, त्या गोपीची ही पावले तर आमच्या मनाला फारच पीडा देत आहेत. इथे मात्र तिच्या पाऊलखुणा दिसत नाहीत. कदाचित् प्रियाने प्रियेच्या सुकुमार तळव्यांना गवताची टोके टोचू नयेत म्हणून तिला आपल्या खांद्यावर घेतले असावे. सख्यांनो ! पाहा, येथे कामी श्रीकृष्णांची ही पावले प्रियेला उचलून नेताना झालेल्या ओझ्यामुळे अधिक खोल रुतलेली दिसतात. पाहा ! पाहा ! येथे वल्लभाने फुले तोडता यावीत, म्हणून प्रियेला खाली उतरविले आहे आणि येथे त्या प्रियाने प्रियेसाठी फुले तोडली आहेत. टाचा वर करून फुले तोडल्यामुळे इथे त्यांचे पाय पूर्णपणे उमटलेले नाहीत. येथे त्या कामीने आपल्या कामिनीची वेणी घातली असावी ! आणि ती फुले तिच्या वेणीत गुंफण्यासाठी ते येथे नक्कीच खाली बसले असतील." भगवान श्रीकृष्ण आत्माराम असून अखंड स्वतःमध्येच रमलेले असतात. तरीसुद्धा त्यांनी कामीजनांची दीनता व स्त्रियांची पुरुषांना वश करण्याची वृत्ती दाखविण्यासाठी त्या गोपीबरोबर एकांतामध्ये क्रीडा करण्याची लीला केली असावी. (२४-३५) अशाप्रकारे बेभान होऊन एकमेकींना पाउलखुणा दाखवीत त्या वना-वनात भटकू लागल्या. इकदे श्रीकृष्ण दुसर्या गोपींना वनात सोडून ज्या गोपीला एकांतात घेऊन गेले होते, तिला वाटले की, "आपणच सर्व गोपींमध्ये श्रेष्ठ आहोत. म्हणून तर ज्या गोपी त्यांची इच्छा करतात, त्यांना सोडून ते माझे प्रिय श्रीकृष्ण माझ्याबरोबर राहिले." वनात गेल्यावर ती गोपी गर्विष्ठपणे श्रीकृष्णांना म्हणाली, "प्रियतमा ! माझ्याच्याने आता आणखी चालवत नाही. म्हणून तुम्हांला जेथे जायचे असेल, तेथे मला उचलून न्या." तिने असे सांगितल्यावर ते म्हणाले, "प्रिये, ठीक आहे, तू माझ्या खांद्यावर बस." आणि एकदम अंतर्धान पावले. तेव्हा मात्र ती गोपी पश्चात्ताप करू लागली. "हे नाथा ! हे रमणा ! हे श्रेष्ठा ! हे महाभुजा ! आपण कोठे आहात ? कोठे आहात ? माझ्या सख्या ! मी तुमची दीन दासी आहे. माझ्या जवळ या." भगवंतांच्या जाण्याचा मार्ग शोधीत गोपी तेथे जाऊन पोहोचल्या. तेथे जवळच त्यांना दिसले की, प्रियतमाच्या वियोगाने त्यांची सखी दुःखाने बेशुद्ध होऊन पडली आहे. श्रीकृष्णांच्याकडून जो मान प्राप्त झाला होता, तो तिने त्यांना सांगितला. आणि आपल्याच गर्वामुळे आपला अवमान झाल्याचेही सांगितले. ते ऐकून गोपींच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. (३६-४२) यानंतर, वनामध्ये जेथपर्यंत चंद्राचे चांदणे पडले होते, तेथपर्यंत त्या त्यांना शोधीत गेल्या. परंतु पुढे अंधार आहे, असे पाहून परत फिरल्या. गोपींचे मन श्रीकृष्णमय होऊन गेले होते. त्या त्यांच्याविषयीच बोलत होत्या. त्यांच्या हालचाली केवळ श्रीकृष्णांसाठीच होत्या. किंबहुना त्या कृष्णमय झाल्या होत्या. त्यांच्या गुणांचेच गायन करणार्या त्यांना आपल्या घरांची, इतकेच नव्हे तर शरीराचीही आठवण राहिली नाही. श्रीकृष्णांच्याच चिंतनात बुडून गेलेल्या गोपी यमुनेच्या वाळवंटात परत आल्या आणि त्यांच्या येण्याची वाट पाहात सर्व मिळून श्रीकृष्णांच्याच गुणांचे गायन करू लागल्या. (४३-४५) अध्याय तिसावा समाप्त |