श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २९ वा

रासलीलेचा प्रारंभ -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुक म्हणतात - शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती. मोगरा वगैरे सुगंधी फुले उमलली होती. ते पाहून भगवंतांनी योगमायेचा आश्रय करून, रासक्रीडा करण्याचा संकल्प केला. त्याचवेळी, फार दिवसांनी भेटलेल्या पईने प्रियेच्या मुखाला केशर वगैरे लावून तिचा विरहताप दूर करावा, त्याप्रमाणे चंद्रमा पूर्वदिशेचे मुख आपल्या शीतल किरणरूप करांनी उदयकालीन रंगाने तांबूस करीत व चराचराचा ताप हरीत उदयाला आला. (१-२)

श्रीकृष्ण त्याज्या केशरासारखे लालसर व लक्ष्मीच्या मुखकमलासारखे मनोहर पूर्ण चंद्रबिंब आणि त्याच्या कोमल किरणांनी व्यापलेले वृंदावन पाहिले आणि वेणूवर व्रजसुंदरींना प्रिय असणारे गीत वाजविण्यास सुरुवात केली. श्यामसुंदरांनी ज्यांचे मन आधीच आपल्या अधीन करून घेतले होते, त्या गोपी बासरीचे ते प्रेमवर्धक स्वर ऐकताच एकमेकींना न कळवताच प्रियतम जेथे होता, तिकडे जाण्यास निघाल्या. त्यावेळी भरभर चालण्याने त्यांच्या कानातील कुंडले झोके घेत होती. (३-४)

बासरीचे स्वर ऐकताच ज्या गोपी गाईंची धार काढीत होत्या, त्या अत्यंत उत्सुक होऊन धार काढणे अर्धवट टाकून निघून गेल्या. ज्या दूध तापवीत होत्या, त्या उतू जाणारे दूध तसेच सोडून, आणि ज्या लापशी करीत होत्या, त्या भांडे चुलीवरून खाली न उतरविताच निघाल्या. ज्या जेवावयास वाढत होत्या, त्या वाढण्याचे काम सोडून, ज्या मुलांना पाजवीत होत्या त्या पाजणे सोडून, ज्या पतींची सेवा करीत होत्या त्या सेवा सोडून आणि ज्या स्वतः जेवीत होत्या, त्या भोजन करणे सोडून निघाल्या. काही गोपी आपल्या शरीराला चंदन आणि उटणे लावीत होत्या, तर काही डोळ्यांमध्ये काजळ घालीत होत्या. त्या ते करावयाचे सोडून आणि उलटसुलट वस्त्रालंकार घालून श्रीकृष्णांकडे गेल्या. पतींनी, पित्यांनी, भाऊ आणि जातीबांधवांनी त्यांना अडविले, तरी गोविंदाने चित्त हरण केल्यामुळे त्या इतक्या मोहित झाल्या होत्या की, त्या थांबल्या नाहीत. त्यावेळी काही गोपी घरामध्ये होत्या. त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले. तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले आणि त्या अतिशय तन्मयतेने श्रीकृष्णांचे ध्यान करू लागल्या. आपल्या प्रियतम, श्रीकृष्णांच्या असह्य विरहाच्या तीव्र वेदनांनी त्यांच्या हृदयात इतकी व्यथा निर्माण झाली की, त्यामुले त्यांचे पाप भस्म होऊन गेले आणि ध्यानामध्ये श्रीकृष्णांनी दिलेल्या आलिंगनाच्या सुखाने त्यांचे पुण्यही संपले. (अशा रीतीने पापपुण्य संपल्यामुळे त्यांचे गुणमय देह नाहीसे झाले.) जारबुद्धीने का असेना, त्या परमपुरुषाशी त्यांचे मिलन झाल्यामुळे त्यांचे कर्मबंधन तत्काळ नाहीसे झाले. त्यामुळेच त्यांनी त्रिगुणात्मक देहाचा त्याग केला व त्या दिव्यदेही झाल्या. (५-११)

राजाने विचारले - मुनिवर्य ! श्रीकृष्णांना गोपी फक्त आपला परम प्रियतम मानीत होत्या. त्यांना ते काही ब्रह्म वाटत नव्हते. अशा प्रकारे गुणांमध्येच आसक्त असणार्‍या त्यांच्या बाबतीत गुणांचा प्रवाहरूप असलेल्या या संसाराची निवृत्ती होणे कसे शक्य आहे ? (१२)

श्रीशुक म्हणाले - मी तुला यापूर्वीच सांगितले होते की, चेदिराज शिशुपालाने भगवंतांबद्द्ल द्वेषभाव ठेवूनही त्याला भगवत्स्वरूपाची प्राप्ती झाली. तर मग ज्या गोपी श्रीकृष्णांवर अनन्य प्रेम करतात, त्या त्यांना प्राप्त होतील, यात काय आश्चर्य ! हे राजा, अविनाशी, अनंत, निर्गुण असून त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंते असणार्‍या भगवंतांचे प्रकट होणे, हे माणसांच्या परम कल्याणासाठीच आहे. म्हणून काम, क्रोध, भय, स्नेह, नातेसंबंध किंवा भक्ती यांपैकी कोणत्याही भावनेने भगवंतांशी नित्य जोडले गेलेले जीव त्या भगवम्तांशी एकरूप होतात. तुला योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर, अजन्मा भगवम्तांच्या बाबतील मुळीच आश्चर्य वाटायला नको. कारण त्यांच्या केवळ संकल्पाने स्थावरादिकही मुक्त होतात. त्या गोपी जवळ आलेल्या पाहून वक्त्यांत श्रेष्ठ असणार्‍या भगवंतांनी आपल्या वाक्‌चातुर्याने त्यांना मोहित करीत म्हटले. (१३-१७)

श्रीभगवान म्हणाले - महाभाग्यवान गोपींनो ! तुमचे स्वागत असो. तुम्हांला आवडणारी कोणती गोष्ट मी करू ? व्रजामध्ये सर्व कुशल आहे ना ? यावेळी तुम्ही इकडे का आलात ? सांगा बरे ! हे सुंदरींनो ! आधीच ही रात्र भीतिदायक. त्यात यावेळी हिंस्त्र प्राणी इकडे तिकडे फिरत असतात. तुम्ही घरी परत जा. स्त्रियांनी येथे थांबणे बरे नव्हे. तुम्ही दिसत नाहीत, असे पाहून तुमचे आई-वडील, पति-पुत्र किंवा भाऊ तुम्हांला शोधतील. त्यांना घाबरवून सोडू नका. चंद्राच्या किरणांनी धवल झालेले, यमुनेवरील वार्‍याच्या मंद गतीने हालणार्‍या झाडांच्या पानांनी शोभणारे, फुलांनी बहरलेले हे वन तुम्ही पाहिलेत ना ! तर आता घरी परत जा. हे पतिव्रतांनो ! उशीर करू नका. आपल्या पतींची सेवा करा. तुमच्या घरांतील मुले रडत असतील, त्यांना दूध पाजा. आणि वासरे हंबरत असतील, त्यांना गायांजवळ सोडून गायांच्या धारा काढा. किंवा माझ्यावरीत अत्यंत प्रेमाने पराधीन होऊन तुम्ही येथे आला असाल तर तेही योग्यच आहे. कारण जगातील सर्वच प्राणी माझ्यावर प्रेम करतात. कल्याणी गोपींनो ! पतीची आणि त्याच्या बांधवांची निष्कपटभावाने सेवा करणे आणि मुलाबाळांचे पालन-पोषण करणे हाच स्त्रियांचा श्रेष्ठ धर्म आहे. ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा नसेल, त्यांनी पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारच्या पतीचा त्याग करू नये. मग तो वाईट स्वभावाचा, भाग्यहीन, वृद्ध, मूर्ख, रोगी किंवा निर्धन का असेना ! कुलीन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणे तर सर्वथैव निंद्य आहे. हे कुकर्म स्वर्गप्राप्तीला विघातक, अपकीर्तिकारक, हीन, कष्टप्रद आणि नरकभयाला कारण आहे. गोपींनो ! माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणाने, रूपाच्या दर्शनाने, या सर्वांचे कीर्तन आणि ध्यान केल्याने, माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते, तशी माझ्याजवळ राहून होत नाही. म्हणून तुम्ही घरी परत जा. (१८-२७)

श्रीशुक म्हणतात - भगवान श्रीकृष्णांचे हे स्वतःला न आवडणारे भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या. त्यांच्या आशा धुळीला मिलाल्या. त्यांना अपार चिंता लागून राहिली. शोकामुळे चाललेल्या उष्ण श्वासांमुळे त्यांचे तोंडल्यासारखे लाल ओठ पांढुरके झाले. त्यांनी माना खाली घातल्या आणि पायांच्या नखांनी त्या जमीन उकरू लागल्या. डोळ्यांतून काजळासह वाहणारे अश्रू वक्षःस्थळापर्यंत पोहोचले आणि तेथे लावलेले केशर त्यांनी धुऊन टाकले. त्यांचे हृदय दुःखाने इतके भरून आले की, त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. कृष्णासाठी गोपींनी सर्व कामना सोडून दिल्या होत्या. श्रीकृष्णांवरच त्यांचे अनन्य प्रेम होते. त्यांचे हे निष्ठुर बोल ऐकून त्यांना रडू कोसळले. रडून रडून लाल झालेले डोळे पुसून प्रणयकोपामुळे सद्‍गदित झालेल्या वाणीने त्या प्रियतमाला म्हणू लागल्या, (२८-३०)

गोपी म्हणाल्या - हे प्रभो आपण असे निष्ठुर बोलू नये. आम्ही सर्व काही सोडून फक्त तुमच्या चरणांवरच प्रेम करीत आहोत. तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. तरीही जसे आदिपुरुष मुमुक्षू भक्तांना भजतात, तसेच तुम्ही आमच्यावर प्रेम करा. आमचा त्याग करू नका. हे प्रियतमा ! धर्माचे मर्म तुम्ही जाणता. आपले पती, पुत्र आणि बांधवांची सेवा करणे हा स्त्रियांचा स्वधर्म आहे, असे तुम्ही म्हणालात. तर मग या उपदेशानुसार आम्हांला सर्वांचे परी असणार्‍या तुमचीच सेवा केली पाहिजे. कारण तुम्हीच या उपदेशाचे विषय आहात. तुम्हीच तर शरीर धारण करणार्‍यांचे प्रियतम आत्मा आणि बंधू आहात. आत्मज्ञानी लोक तुमच्यावर प्रेम करतात. कारण तुम्ही नित्य प्रिय असा त्यांचा आत्मा आहात. असे असता अनित्य आणि दुःखद पति-पुत्रांशी आम्हांला काय करायचे आहे ? हे परमेश्वरा ! म्हणून आमच्यावर प्रसन्न व्हा. आणि हे कमलनयना ! पुष्कळ दिवसांपासून तुमच्याच ठिकाणी जोपासलेली आशा धुलीला मिळवू नका. हे मनमोहना ! आजपर्यंत आमचे चित्त घरात रमत असे. म्हणून आमचे हातही घरकामात लागत. परंतु आनंदस्वरूप तुम्ही आमचे ते चित्त सहज चोरून घेतले. त्यामुळे आमचे हे पाय तुमचे चरणकमल सोडून एक पाऊलभर सुद्धा दुसरीकडे जाण्यास तयार नाहीत. तर मग आम्ही व्रजामध्ये कसे जावे ? आणि तेथे जाऊन काय करावे ? हे प्रिय सख्या ! तुमचे मधुर हास्य, प्रेमपूर्ण कटाक्ष आणि मनोहर संगीताने आमच्या हृदयामध्ये तुमच्या विषयीच्या प्रेमाची जी आग धगधगत आहे, ती तुम्ही तुमच्या अधरामृताच्या प्रवाहाने विझवून टाका. नाहीतर, आम्ही तुमच्या विरहव्यथेच्या आगीने आमची भौतिक शरीरे जाळून ध्यानाने तुमच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेऊ. (३१-३५)

हे कमलनयना ! वनवासी लोक तुम्हाला प्रिय आहेत म्हणूनच ज्या चरणकमलांच्या सेवेची संधी लक्ष्मीलासुद्धा क्वचितच मिळते, त्या तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हांला प्राप्त झाला. त्या दिवसापासून दुसर्‍या कोणासमोर एक क्षणभरसुद्धा थांबणास असमर्थ ठरलो आहोत. मग सेवा तर दूरच. स्वामी ! जिचा कृपाकटाक्ष प्राप्त करून घेण्यासाठी इतर देव प्रयत्‍न करीत असतात, ती लक्ष्मी तुमच्या वक्षःस्थळावर स्थान मिळालेले असतानाही तुमच्या चरणांवर वाहिलेल्या तुळशीबरोबर तुमच्या चरणांची धूळ प्राप्त करण्याची अभिलाषा बाळगते. कारण सर्व भक्तांनी तिचेच सेवन केले आहे. म्हणून आम्हीसुद्धा त्याच तुमच्या चरणधुळीला शरण आलो आहोत. हे दुःखनाशना ! आता आमच्यावर कृपा करा. तुमच्या सेवेच्या अभिलाषेने आम्ही घर सोडून तुमच्या चरणांजवळ आलो आहोत. हे पुरुषोत्तमा ! तुमचे मधुर स्मित आणि प्रेमळ नेत्रकटाक्षाने आमच्या हृदयामध्ये मिलनाच्या आकांक्षेची आग भडकली आहे. आम्हांला केवळ आपल्या सेवेची संधी द्या. प्रियतमा ! ज्याच्यावर कुरळे केस भुरभुरत आहेत, असे तुमचे सुंदर मुखकमल, कुंडलांनी शोभणारे गाल, अधरामृत, स्मितहास्ययुक्त कटाक्ष, शरणागतांना अभय देणारे बाहू आणि तुमचे केवळ लक्ष्मीलाच रमविणारे हे वक्षःस्थळ पाहून आम्ही तुमच्या दासी झालो आहोत. प्रिय श्यामसुंदरा ! त्रैलोक्यात तरी अशी कोणती स्त्री असेल की, जी तुमच्या बासरीवरील मधुर पदे आणि दीर्घ तान ऐकून, तसेच गाई, पक्षी, वृक्ष आणि हरीण यांनासुद्धा रोमाम्चित करणारे त्रैलोक्यसुण्दर रूप पाहून आर्यमर्यादेपासून विचलित होणार नाही ! जसे नारायण देवांचे रक्षण करतात, तसेच तुम्ही खात्रीने व्रजमंडलाचे भय आणि दुःख नाहीसे करण्यासाठीच प्रगट झालेले देव आहात. म्हणून दुःखितांचे कनवाळू हे प्रियातमा ! आपल्या या दासींच्या दुःखतप्त वक्षःस्थळावर आणि मस्तकावर तुम्ही आपले कोमल करकमल ठेवा. (३६-४१)

श्रीशुक म्हणतात - योगेश्वरांचे ईश्वर असणार्‍या श्रीकृष्णांनी गोपींची व्यथा ऐकली, तेव्हा त्यांची त्यांना करुणा आली आणि जरी ते आत्माराम असले तरीसुद्धा हसून ते त्यांच्याबरोबर रममाण झाले. प्रियतमाच्या दर्शनाने ज्यांची मुखकमले प्रफुल्लीत झाली आहेत अशा, एकत्र जमलेल्या त्या गोपींबरोबर उत्कृष्ट हावभाव करणारे श्रीकृष्ण जेव्हा खुलून हसत, तेव्हा त्यांच्या कुंदकळ्यांसारखे दातांचे शुभ्र किरण बाहेर पडत. त्यामुळे ते तारकांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे शोभत होते. शेकडो गोपींच्या समूहांचे स्वामी श्रीकृष्ण वैजयंती माळ धारण करून, वृंदावनाला शोभा आणीत विहार करू लागले. त्यावेळी गोपी आपल्या प्रियतमाचे गुणगान करीत; तर श्रीकृष्ण गोपींचे गुण गात. यानंतर श्रीकृष्णांनी गोपींसह, शुभ्र वाळू असणार्‍या यमुनेच्या वाळवंटात जाऊन क्रीडा केली. ते वाळवंट हालल्यामुळे आनंद देणार्‍या कुमुदिनींच्या सुगंधयुक्त वार्‍याने सुवासित झाले होते. हात पसरून आलिंगन देणे, गोपींचे हात, वेणी, मांड्या, कमरपट्टा, स्तन वगैरे अंगांना स्पर्श करणे, विनोद करणे, नखे लावणे,कटाक्ष टाकणे, स्मितहास्य करणे इत्यादि क्रीडांनी गोपींचा दिव्य प्रेमभाव उत्तेजित करीत श्रीकृष्ण त्यांना रमवू लागले. अनासक्त असूनही भगवान श्रीकृष्णांकडून जेव्हा गोपींना असा मान मिळाला, तेव्या त्या जगातील सर्व स्त्रियांमध्ये आपणच श्रेष्ठ आहोत, असे समजू लागल्या. त्यांना आपल्या भाग्याचा गर्व झालेला असून अहंकारही उत्पन्न झाला आहे, असे जाणून त्यांचा गर्व नाहीसा करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण तेथेच अंतर्धान पावले. (४२-४८)

अध्याय एकोणतिसावा समाप्त

GO TOP