|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २८ वा
नंदांना वरुणलोकातून सोडवून आणणे - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - नंदांनी एकादशीला उपवास करून भगवंतांची पूजा केली आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचे स्नान करण्यासाठी यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. ही असुरांची वेळ आहे, हे लक्षात न आल्यामुळे ते रात्रीच्या वेळीच यमुनेच्या पाण्यात उतरले. त्यावेळी वरुणाचा सेवक असलेल्या एका असुराने त्यांना पकडले आणि वरुणाकडे नेले. नंदबाबा न आढळल्याने गोप "कृष्णा ! बलरामा !" अशा हाका मारून ’नंदमहाराज कुठे दिसत नाहीत,’ असे म्हणून रडू लागले. हे राजा ! श्रीकृष्णांनी जेव्हा त्यांचे रडणे ऐकले आणि आपल्या वडिलांना वरुणाकडे नेल्याचे त्यांना समजले, तेव्हा ते वरुणाकडे गेले. कारण प्रभू स्वकीयांना अभय देणारे आहेत ना ! श्रीकृष्ण आपल्याकडे आलेले पाहताच त्यांच्या दर्शनाने अत्यानंद झालेल्या पश्चिम दिक्पाल वरुणाने त्यांची भव्य पूजा केली आणि म्हटले - (१-४) वरुण म्हणाला - प्रभो ! आज माझे शरीर धारणेचे सार्थक झाले. आज मला सर्व पुरुषार्थ प्राप्त झाले; कारण भगवन् ! आपल्या चरणकमलांच्या सेवेची ज्यांना सुसंधी मिळते ते भवसागरातून तरून जातात. आपण परब्रह्म परमात्मा भगवान आहात. लोकसृष्टी निर्माण करणारी माया आपल्या ठिकाणी नाही, असे वेद प्रतिपादन करतात. मी आपणास नमस्कार करीत आहे. प्रभो ! माझा हा सेवक मूर्ख आहे. त्याला काय करावे, हे कळत नाही. तोच आपल्या वडिलांना नकळत घेऊन आला. आपण त्याबद्दल त्याला क्षमा करावी. हे पितृभक्त गोविंदा ! आपण आपल्या वडिलांना घेऊन जावे. हे सर्वसाक्षी श्रीकृष्णा ! आपण मज दासावरसुद्धा कृपा करावी. (५-८) श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! ईश्वरांचे सुद्धा ईश्वर असणार्या श्रीकृष्णांना वरुणाने अशा प्रकारे स्तुती करून प्रसन्न केले. यानंतर भगवान आपल्या वडिलांना घेऊन व्रजात परत आले आणि त्यांनी सर्वांना आनंदीत केले. नंदांनी लोकपाल वरुणाचे पूर्वी कधी न पाहिलेले ऐश्वर्य पाहिले. तसेच तेथील लोक श्रीकृष्णांच्या चरणांवर नतमस्तक होत आहेत, हेही पाहिले. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. घरी आल्यावर त्यांनी आपल्या बांधवांना ही हकीकत सांगितली. हे परीक्षिता ! हे ऐकून गोपांनी श्रीकृष्ण स्वतः भगवान आहेत हे जाणले. त्यांनी मनातल्या मनात अत्यंत उत्सुकतेने असा विचार केला की, हे देवाधिदेव आपल्या ब्रह्मरूप स्वधामाला आपल्यालासुद्धा नेतील काय ? सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या गोपांची ही इच्छा जाणली आणि त्यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी कृपायुक्त होऊन असा विचार केला. या जगामध्ये जीव अज्ञानाने शरीरालाच आत्मा मानून अनेक गोष्टींची इच्छा धरतो आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे करतो. त्यामुळे फळ म्हणून तो श्रेष्ठ-कनिष्ठ योनींमध्ये भटकतो आणि आपल्या खर्या स्वरूपाला ओळखत नाही. (९-१३) अशा प्रकारे विचार करून परमदयाळू भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपांना मायेच्या पलीकडे असलेले आपले परमधाम दाखविले. भगवंतांनी प्रथम त्यांना ज्याचे स्वरूप सत्य, ज्ञान, अनंत, सनातन आणि ज्योतिःस्वरूप आहे, तसेच समाधिनिष्ठ पुरुषच जे पाहू शकतात, त्या ब्रह्माचा साक्षात्कार करविला. भगवंतांनी अक्रूराला ज्या जलाशयात आपले स्वरूप दाखविले होते, त्याच ब्रह्मस्वरूप ब्रह्मह्रदामध्ये भगवान त्या गोपांना घेऊन गेले. तेथे त्यांनी त्यात बुडी मारली. तेव्हा भगवंतांनी त्यांना त्यातून काढून आपल्या परमधामाचे दर्शन करविले. (१४-१६) तो लोक पाहून नंद इत्यादि गोप परमानंदात निमग्न झाले. तेथे सर्व वेद श्रीकृष्णांची स्तुती करीत आहेत, हे पाहून ते सर्वजण अत्यंत आश्चर्यचकित झाले. (१७) अध्याय अठ्ठाविसावा समाप्त |