श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २७ वा

श्रीकृष्णांना अभिषेक -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकाचार्य म्हणतात - श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरून मुसळधार पावसापासून गोकुळाचे रक्षण केले, तेव्हा त्यांच्याकडे गोलोकातून कामधेनू आणि स्वर्गातून इंद्र आला. भगवंतांची अवहेलना केल्यामुळे इंद्र अतिशय लज्जित झाला होता. म्हणून त्याने एकांत स्थानी भगवम्तांकडे जाऊअ आपल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या मुकुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. परम तेजस्वी भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पाहून - ऐकून आपणच तिन्ही लोकांचा स्वामी असल्याचा इंद्राचा गर्व नाहीसा झाला. आता तो हात जोडून त्यांची स्तुती करू लागला. (१-३)

इंद्र म्हणाला - "भगवन ! आपले स्वरूप परम शांत, ज्ञानमय, रजोगुण-तमोगुणरहित तसेच विशुद्ध सत्त्वमय आहे. गुणांमुळे प्रवाहरूपाने भासणारा हा मायामय प्रपंच सर्वज्ञ अशा आपल्या ठिकाणी नाही. कारण तो अज्ञानामुळे उत्पन्न होणारा आहे. देहसंबंधामुळे उत्पन्न होणारे व दुसर्‍या देहाच्या उत्पत्तीला कारण असणारे लोभादी दोष अज्ञानी लोकांच्या ठिकाणीच असतात. सर्वज्ञ अशा आपल्यामध्ये ते कोठून असणार ? तरीसुद्धा धर्माचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठीच आपण शासन करीत असता. आपण जगाचे पिता, गुरू, स्वामी आणि शासन करणारे दुस्तर असे काल आहात. आपण लोककल्याणासाठी स्वेच्छेने लीलाशरीर प्रगट करून स्वतःलाच ईश्वर समजणार्‍यांचा मान नष्ट करीत अनेक प्रकारच्या लीला करीत असता. माझ्यासारखे जे अज्ञानी आणि स्वतःला जगाचा ईश्वर मानणारे आहेत, त्यांना जेव्हा कळते की, भितीच्या प्रसंगी सुद्धा आपण निर्भय असता, तेव्हा ते आपली घमेंड सोडून देतात आणि गर्वरहित होऊन आपल्या भक्तीच्या मार्गाचा आश्रय घेतात. हे प्रभो ! आपली लीला ही दुष्टांनाही उपदेश देण्यासाठी असते. प्रभो ! ऐश्वर्याच्या मदामध्ये दंग होऊन मी आपला अपराध केला आहे, कारण आपला प्रभाव मला माहीत नव्हता. हे परमेश्वरा ! आपण मूर्ख असणार्‍या माझ्या अपराधाची मला क्षमा करावी आणि पुन्हा मला अशी दुर्बुद्धी होऊ नये. हे इंद्रियातीत परमात्मन ! जे असुर सेनापती केवळ आपलेच पोट भरणारे आणि पृथ्वीला भारभूत झाले आहेत, त्यांच्या वधासाठी आणि आपल्या चरणांचे दास असणार्‍यांच्या उत्कर्षासाठी आपला येथे अवतार झाला आहे. भगवन ! आपण पुरुषोत्तम असून सर्वात्मा वासुदेव आहात. आपण यदुवंशीयांचे स्वामी आणि सर्वांचे चित्त आकर्षित करणारे आहात. मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे. आपण आपल्या इच्छेनुसार शरीराचा स्वीकार केला आहे. आपले हे शरीरसुद्धा विशुद्ध ज्ञानस्वरूप आहे. आपण सर्व काही आहात, सर्वांचे कारण आहात आणि सर्वांचे आत्मा आहात. मी आपणस वारंवार नमस्कार करीत आहे. भगवन ! मी अभिमानी आणि अतिशय क्रोधीसुद्धा आहे. म्हणूनच माझा यज्ञ केला नाही, असे पाहून मी मुसळधार पाऊस आणि तुफान यांच्याद्वारे सर्व व्रजमंडल नष्ट करण्याचे योजिले. परंतु प्रभो ! आपण माझ्यावर अतिशय कृपा केलीत. माझे प्रयत्‍न व्यर्थ झाल्याकारणाने माझी घमेंड मुळापासून उखडली गेली. आपण माझे स्वामी आहात. गुरू आहात आणि आत्मा आहात. मी आपल्याला शरण आलो आहे (४-१३)

श्रीशुकदेव म्हणतात - जेव्हा देवराज इंद्राने भगवान श्रीकृष्णांची अशी स्तुती केली, तेव्हा हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने ते त्याला म्हणाले - (१४)

श्रीभगवान म्हणाले - इंद्रा ! तू ऐश्वर्याने फार माजला होतास. म्हणूनच तुझ्यावर कृपा करून तुला माझे नित्य स्मरण राहण्यासाठी मी तुझा यज्ञ भंग केला. जो ऐश्वर्य आणि संपत्तीच्या मदाने आंधळा होतो, त्याला हे दिसत नाही की, मी परमेश्वर हातात दंड घेऊन त्याच्या शासनासाठी उभा आहे. मी ज्याच्यावर कृपा करू इच्छितो त्याचे ऐश्वर्य नाहीसे करतो. हे इंद्रा ! तुझे कल्याण असो. आता जा आणि माझ्या आज्ञेप्रमाणे वाग. तसेच कधीही गर्व न करता सावधपणे आपल्या अधिकाराचे पालन कर. (१५-१७)

नंतर मनस्विनी कामधेनूने आपल्या वासरांसह गोपवेषधारी परमेश्वर श्रीकृष्णांना वंदन केले आणि म्हणाली - हे श्रीकृष्णा ! आपण महायोगी आहात. आपण स्वतः विश्वरूप असून विश्वाचे स्वामी असलेल्या आपल्यामुळेच आम्ही सनाथ झालो आहोत. हे जगाचे स्वामी ! आपण आमचे परम दैवत आहात. आमचे आपणच इंद्र आहात. म्हणून आपणच गाय, ब्राह्मण, देव आणि साधुजनांच्या रक्षणासाठी आपचे इंद्र व्हा ! ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने आम्ही गाई आपल्याला आमचा इंद्र मानून अभिषेक करू. हे विश्वात्मन ! आपण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठीच अवतात धारण केला आहे. (१८-२१)

श्रीशुक म्हणतात - कामधेनूने भगवान श्रीकृष्णांना असे म्हणून आपल्या दुधाने आणि देवमातांच्या प्रेरणेने देवराज इंद्राने ऐरावताच्या सोंडेतून आणलेल्या आकाशगंगेच्या पाण्याने देवर्षींसह यदुनाथ श्रीकृष्णांना अभिषेक केला आणि त्यांना ’गोविंद’ नाव ठेवले. त्यावेळी तेथे नारद, तुंबरू इत्यादि गंधर्व, विद्याधर, सिद्ध आणि चारण आले होते, ते जगाचे पाप-ताप नाहीसे करणार्‍या भगवंतांच्या यशाचे गायन करू लागले आणि अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. प्रमुख देवता भगवंतांची स्तुती करून त्यांच्यावर नंदनवनातील दिव्य फुलांचा वर्षाव करू लागल्या. तिन्ही लोकांमध्ये परमानंद ओसंडून वाहू लागला आणि गाईंच्या सडातून इतके दूध गळू लागले की, पृथ्वी ओलीचिंब झाली. नद्यांना वेगवेगळ्या रसांचा पूर आला. वृक्षांमधून मधाच्या धारा वाहू लागल्या. नांगरणी-पेरणी न करताही जमिनीतून अनेक प्रकारच्या औषधी, अन्न उत्पन्न झाले. पर्वतात दडून असलेली रत्‍ने बाहेर दिसू लागली. परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांना अभिषेक झाल्यानंतर जे जीव स्वभावतःच क्रूर होते, ते सुद्धा क्रूरपणा विसरले. अशा प्रकारे इंद्राने गायी आणि गोकुळाचे स्वामी श्रीगोविंदांना अभिषेक केला आणि त्यांची संमती घेऊन देव, गंधर्व इत्यादींसह तो स्वर्गाकडे निघून गेला (२२-२८)

अध्याय सत्ताविसावा समाप्त

GO TOP