|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २६ वा
श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदांशी वार्तालाप - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - श्रीकृष्णांची अशी अलौकिक कृत्ये पाहून गोपांना अतिशय आश्चर्य वाटले. त्यांच्या शक्तीची त्यांना कल्पना नसल्यामुळे ते एकत्र येऊन म्हणू लागले, "या मुळाची ही कृत्ये अतिशय आश्चर्यजनक आहेत. आमच्यासारख्या खेडवळ लोकांमध्ये याने जन्म घेणे ही त्याला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. त्याला हे कसे योग्य आहे ? जसे हत्तीने सोंडेने कमळ उपटून वर धरावे, तसा या सात वर्षांच्या बालकाने एकाच हाताने गिरिराज उखळून सहजपणे कसा काय हातावर तोलला ? जेव्या हा पाळण्यात होता, त्यावेळी भयंकर राक्षसी पूतना आली असता याने डोळे मिटूनच, काळाने शरीराचे आयुष्य प्यावे, तसे तिच्या स्तनातील दूध प्राणांसह प्राशन केले. जेव्हा हा फक्त तीन महिन्यांचा होता आणि छ्कड्याखाली झोपा होता, तेव्हा रडत-रडतच हा वर पाय हालवत असता त्याच्या ठोकरण्याने तो छकडा उलटून पडला. जेव्हा तृणावर्त दैत्याने वावटळीच्या रूपाने, हा बसला असतानाच याला उचलून आकाशात नेले होते, तेव्हा हा फक्त एक वर्षाचा होता. त्यावेळी याने त्या तृणावर्त दैत्याचा गळा घोटून त्याला ठार मारले. एकदा लोणी चोरल्यामुळे आईने त्याला उखळाला बांधले होते, तेव्हा याने दोन्ही अर्जुन वृक्षांच्यामधून रांगत जाता जाता ते वृक्ष उखडून टाकले. गोपाल आणि बलराम यांच्यासह हा जेव्हा वासरे चारण्यासाठी वनामध्ये गेला होता, तेव्हा याला मारण्यासाठी एक दैत्य बगळ्याच्या रूपाने आला आणि याने दोन्ही हातांनी त्याचे दोन्ही जबडे पकडून त्याला गवताच्या काडीप्रमाणे चिरून टाकले. जेव्हा याला मारण्याच्या हेतूने एक दैत्य वासराच्या रूपामध्ये वासरांच्या कळपात घुसला होता, त्यावेळी याने त्या दैत्याला मारून कवठांच्या झाडावर आपटून ती झाडेही उखडून टाकली. याने बलरामासह गाढव्या रूपात राहणार्या धेनुकासुराला व त्याच्या बांधवांना मारून टाकले आणि पिकलेल्या फळांनी परिपूर्ण असे ताडवन सर्वांसाठी उपयोगी बनविले. यानेच बलशाली बलरामाकडून क्रूर प्रंबासुराला मारले. तसेच दावानलातून गुरांची आणि गोपालांची सुटका केली. यमुनेच्या डोहात वास्तव्य करणार्या विषारी कालियाचे गर्वाहरण करून बळजबरीने त्याला डोहातून हाकलून लावले आणि यमुनेचे पाणी विषरहित केले. नंदबाबा ! तुमच्या मुलावर आम्हा सर्व व्रजवासियांचे अत्यंत प्रेम आहे आणि याचेसुद्धा आमच्यावर स्वाभाविक प्रेम आहे. याचे कारण काय ? कुठे हा सात वर्षांचा बालक आणि कुठे ते एवढा मोठा पर्वत उचलून धरणे ! व्रजराज ! म्हणूनच तुमच्या या पुत्रासंबंधी आम्हांला काही कळेनासे झाले आहे (१-१४) नंद म्हणाले - गोपांनो ! महर्षी गर्गांनी या बालकाला पाहून याच्याविषयी जे म्हटले होते, ते ऐका, म्हणजे मुलाविषयीची तुमची शंका दूर होईल. "तुझा हा मुलगा प्रत्येक युगामध्ये शरीर धारण करतो. वेगवेगळ्या युगांमध्ये याचे शुभ्र, लाल आणि पिवळा हे रंग होते. यावेळी हा काळा झाला आहे. हा तुझा पुत्र आधी कधीतरी वसुदेवाच्या घरीसुद्धा जन्माला आला होता. म्हणून हे रहस्य माहीत असणारे लोक याला श्रीमान वासुदेव असेही म्हणतात. तुझ्या मुलागी गुण आणि कर्मांना अनुरूप अशी आणखी पुष्कळशी नावे आणि रूपे आहेत. ती मी जाणतो, परंतु इतरांना माहीत नाहीत. सर्व गोप आणि गोपी गोकुळाला आनंद देणारा हा तुमचे कल्याण करील. याच्या साहाय्याने तुम्ही सर्व संकटांमधून सहजपणे निभावून जाल. हे व्रजराज ! पूर्वी एकदा पृथ्वीवर कोणी राजा राहिला नव्हता. डाकूंनी चारी बाजूंनी लुटालूट चालविली होती. तेव्हा तुझ्या या पुत्राने सज्जनांचे रक्षण केले आणि याच्यापासून शक्ती प्राप्त करून घेऊन त्या लोकांनी लुटारूंवर विजय मिळविला. जे मानव तुझ्या या मुलावर प्रेम करतील, ते भाग्यवान होत ! ज्याप्रमाणे विष्णुभक्तांना असुर जिंकू शकत नाहीत, त्याचप्रमाणे याच्यावर प्रेम करणार्यांना शत्रू जिंकू शकत नाहीत. नंदबाबा ! गुण, ऐश्वर्य, सौंदर्य, कीर्ति आणि प्रभाव या सर्व बाबतीत तुझा हा बालक भगवान् नारायणांच्या समानच आहे. म्हणून तुम्हांला याच्या कृत्यांचे आश्चर्य वाटायला नको." असे मला सांगून गर्गाचार्य आपल्या घरी निघून गेले. तेव्हापासून मी सुखद कृत्ये करणार्या या मुलाला भगवान नारायणांचाच अंश मानतो. व्रजवासियांनी जेव्हा नंदांच्या तोंडून गर्गाचार्याचे हे कथन ऐकले, तेव्हा त्यांचा विस्मय नाहीसा झाला. कारण आता त्यांनी अपरिमित तेजस्वी अशा श्रीकृष्णांचा प्रभाव पूर्णपणे पाहिला आणि ऐकला होता. त्यामुळे मोठ्या आनंदाने त्यांनी नंद आणि श्रीकृष्णांची मनोमन पूजा केली. (१५-२४) आपला यज्ञ न केल्याकारणाने जेव्हा इंद्र क्रोधाने विजा, गारा आणि तुफानी वारा यांच्यासह मुसळधार पाऊस पाडू लागला, तेव्हा स्त्रिया, जनावरे व गवळी अत्यंत दुःखी झाले होते. आपलाच आधार असणार्या व्रजवासियांची ही अवस्था पाहून भगवंतांचे हृदय करुणेने भरून आले. परंतु लगेच मंद हास्य करीत, एखाद्या मुलाने पावसाळी छत्रीचे फूल धरावे, त्याप्रमाणे त्यांनी एकाच हाताने पर्वत उपटून उचलून धरला आणि गोकुळाचे रक्षण केले. इंद्राची घमेंड धुळीला मिळविणारे तेच भवगान गोविंद आमच्यावर प्रसन्न होवोत. (२५) अध्याय सव्विसावा समाप्त |