|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २५ वा
गोवर्धन धारण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - परीक्षिता ! आपली पूजा करणे बंद केले आहे, असे इंद्राला समजताच तो श्रीकृष्ण ज्यांचे रक्षणकर्ते आहेत, त्या नंद इत्यादि गोपांवर रागावला. इंद्र स्वतःलाच त्रैलोक्याचा ईश्वर समजत असे. त्याने संतापून प्रलय करणार्या मेघांच्या सांवर्तक नावाच्या गणाला, गोकुळात पाऊस पाडण्याची आज्ञा दिली आणि म्हटले, या जंगली गवळ्यांना केवढी ही संपत्तीची नशा चढली आहे. पहा ना ! यांनी सामान्य मनुष्य असणार्या श्रीकृष्णाच्या बळावर देवराजाचा अपमान केला. जसे या जगात काही लोक भवसागर पार करण्यासाठी असलेले ब्रह्मविद्या हे खरे साधन सोडून फुटक्या नावेसारख्या असणार्या असमर्थ कर्ममय यज्ञांनी या घोर संसारसागराला पार करू इच्छितात. कृष्ण हा एक बडबड करणारा पोरकट, अभिमानी आणि मूर्ख असूनसुद्धा स्वतःला मोठा ज्ञानी समजतो. अशा मनुष्य असणार्या कृष्णाचा आश्रय घेऊन या गवळ्यांनी माझी अवहेलना केली आहे. धनाची नशा चढलेल्या व कृष्णाने भडकावलेल्या यांची ही धनाची घमेंड जिरवा. तसेच यांच्या जनावरांचा संहार करा. तुमच्या पाठोपाठ मीसुद्धा ऐरावत हत्तीवर बसून नंदाच्या व्रजाचा नाश करण्यासाठी महापराक्रमी मरुद्गणांसह येत आहे. (१-७) श्रीशुकदेव म्हणतात - इंद्राने अशी आज्ञा दिली आणि मेघांचे बंधन काढून घेतले. तेव्हा ते जोराने मुसळधार पाऊन पाडून नंदांच्या गोकुळाला पीडा देऊ लागले. विजा चमकू लागल्या, ढग एकमेकांवर आपटून गडगडाट करू लागले आणि प्रचंड वार्याने ढकलले जाऊन मोठमोठ्या गारा पाडू लागले. अशा प्रकारे ढगांचे थव्यामागून थवे वारंवार येऊन खांबाएवढ्या पावसाच्या धारा पाडू लागले, तेव्हा व्रजभूमी पाण्याने भरून गेली आणि उंचसखल भाग दिसेनासे झाले. अतिवृष्टी आणि झंझावातामुळे जनावरे थरथर कापू लागली. तसेच गोपी-गोप थंडीने काकडून जाऊन श्रीकृष्णांना शरण गेले. मुसळधार पावसाने जेरीस आल्यामुळे सर्वांनी आपापली मस्तके झुकवून आणि मुलांना पोटाशी घरून थरथर कापत ते भगवंतांच्या चरणांजवळ आले. आणि म्हणाले, "कृष्णा ! कृष्णा ! प्रभो ! या गोकुळाचा स्वामी तूच आहेस. हे भक्तवत्सला ! इंद्राच्या क्रोधापासून आमचे रक्षण कर. भगवंतांनी पाहिले की, मुसळधार पाऊन आणि गारांच्या मार्याने व्याकूळ होऊन सर्वजण बेहोश होत आहेत. ही सर्व रागावलेल्या इंद्राचीच करामत आहे, हे त्यांना कळले. (८-१४) "आम्ही इंद्राचा यज्ञ बंद पाडला, म्हणूनच तो व्रजाचा नाश करण्यासाठी पावसाळा नसतानाही सोसाट्याचा वारा आणि प्रचंड गारांचा वर्षाव करीत आहे. ठीक आहे ! मी आपल्या योगमायेने याचा प्रतिकार करेन. स्वतःच्या मूर्खपणामुळे हे स्वतःला लोकपाल समजतात. यांचा हा ऐश्वर्याचा गर्व व अज्ञान मी आता नाहीसे करतो. सत्त्वगुणी देवांना ऐश्वर्याचा अभिमान वाटता कामा नये. सत्त्वगुणांपासून च्युत झालेल्या देवांचा मी मानभंग करीन. यामुळे त्यांना शेवटी शांतीच मिळेल. हे गोकुळ माझे आश्रित आहे. मी याचा आपलेपणाने स्वीकार केला आहे आणि मीच याचा रक्षणकर्ता आहे. म्हणून मी आपल्या योगमायेने याचे रक्षण करीन. हे तर माझे व्रत आहे. (१५-१८) असे म्हणून श्रीकृष्णांनी सहजपणे एकाच हाताने गोवर्धन पर्वत उखडून लहान मुलाने पावसाळी छत्री हातात घ्यावी, तसा तो पर्वत वर धरला. नंतर भगवान गोपांना म्हणाले, "आई, बाबा आणि व्रजवासियांनो ! तुम्ही आपल्या गुरांसह या पर्वताच्या खाली आरामात बसा. माझ्या हातावरून हा पर्वत खाली पडेल अशी भीती बाळगू नका. आता वार्याची आणि पावसाची भिती नको. तुमच्या रक्षणासाठी मी ही युक्ती योजिली आहे." श्रीकृष्णांनी जेव्हा असा धीर दिला, तेव्हा सर्व गवळी आपापली गुरे, छकडे आणि परिवाराला आपल्याबरोबर घेऊन सोयीनुसार गोवर्धन पर्वताच्या खाली गेले. सगळे व्रजवासी तहान-भुकेची व्यथा किंवा विश्रांतीची आवश्यकता विसरून श्रीकृष्णांकडेच पाहात राहिले. त्यांनी सलग सात दिवस तो पर्वत उचलून धरला. या दिवसांत एक पाऊलभरसुद्धा ते इकडे तिकडे हालले नाहीत. श्रीकृष्णांच्या योगमायेचा हा प्रभाव पाहून इंद्राच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्याचा संकल्प धुळीला मिळाला. त्यामुळे त्याचा गर्व जिरला. त्याने आपल्या मेघांना आवरले. ते भयंकर तुफान आणि घनघोर पाऊस पडणे बंद झाले असून सूर्यही दिसू लागला आहे, असे पाहून गोवर्धनधारी श्रीकृष्ण गोपांना म्हणाले. "प्रिय गोपांनो ! आता तुम्ही निर्भयपणे आपल्या स्त्रिया, गोधन, मुले वगैरेंना घेऊन बाहेर या. पहा ! तुफान व पाऊस बंद झाला असून नद्यांचे पाणीसुद्धा ओसरले आहे." तेव्हा ते गोप आपापले गोधन, स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांना बरोबर घेऊन तसेच आपले सामान छकड्यांत ठेवून हळू हळू बाहेर आले. सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा सर्वांच्या देखत सहजपणे तो पर्वत त्याच्या जागेवर पूर्ववत ठेवला. (१९-२८) व्रजवासींची मने प्रेमावेगाने भरून आली होती. श्रीकृष्णांकडे धावतच येऊन कोणी त्यांना कडकडून मिठी मारली, तर कोणी त्यांचे चुंबन घेतले. वयस्कर गोपींनी अतिशय आनंदाने प्रेमपूर्वक दही, तांदूळ, पाणी इत्यादि घेऊन त्यांचा मंगलविधी केला आणि त्यांना शुभाशिर्वाद दिले. यशोदा, रोहिणी, नंद आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असे बलराम यांनी प्रेमविह्वल होऊन श्रीकृष्णांना हृदयाशी कवटाळून आशीर्वाद दिले. परीक्षिता ! त्यावेळी आकाशात आलेले देव, साध्य, सिद्ध, गंधर्व, चारण इत्यादिंनी प्रसन्न होऊन भगवंतांची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. राजन, स्वर्गामध्ये देव शंख आणि नौबती वाजवू लागले आणि तुंबरु इत्यादि गंधर्वराज गायन करू लागले. हे राजा ! नंतर श्रीकृष्ण, बलराम व प्रेमळ गोप यांच्यासह व्रजाकडे जावयास निघाले. त्यांच्याबरोबरच प्रेमळ गोपी आपले हृदय आकर्षित करणार्या भगवंतांच्या गोवर्धनधारण इत्यादि लीलांचे गायन करीत मोठ्या आनंदाने व्रजामध्ये परत आल्या. (२९-३३) अध्याय पंचविसावा समाप्त |