|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २४ वा
इंद्रयज्ञ निवारण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - भगवान श्रीकृष्ण बलरामांच्यासह वृंदावनामध्येच राहात होते. एके दिवशी त्यांनी पाहिले की, सर्व गोप इंद्रयज्ञ करण्याची तयारी करीत आहेत. भगवान श्रीकृष्ण सर्वांचे अंतर्यामी आणि सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना ते माहीत होते, तरीसुद्धा विनम्रभावाने त्यांनी नंदबाबा इत्यादि वृद्ध गोपांना विचारले, "तात ! ही कोणत्या यज्ञाची गडबड चालू आहे ? त्याचे फळ काय आहे ? कोणाला उद्देशून आणि कोणत्या साधनांनी हा यज्ञ केला जाणार आहे ? आपण मला सांगाल का ? बाबा ! हे ऐकण्याची मला अतिशय उत्कंठा आहे. जे संत पुरुष सर्वांना आपल्या आत्मा मानतात, ज्यांच्या दृष्टीत आपला आणि परका असा भेद नसतो, म्हणून ज्याला कोणी मित्र, शत्रू वा तिर्हाईत नसतो, त्याच्यापासून लपवून ठेवावी अशी कोणतीच गोष्ट नसते. परंतु असे नसेल, तर मात्र कोणतेही रहस्य शत्रूप्रमाणेच तिर्हाइतालाही सांगता कामा नये. मित्र तर स्वतःसारखाच असतो. म्हणून त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. हा संसारी मनुष्य समजून किंवा न समजता अनेक प्रकारच्या कर्मांचे अनुष्ठान करतो. त्यांपैकी समजून करणार्यांची कर्मे जशी सफल होतात, तशी न समजता करण्यार्यांची होत नाहीत. तर आपण जो यज्ञ करणार आहात, तो विचारपूर्वक आहे, की रूढी म्हणून आहे, हे मी जाणू इच्छितो. आपण मला सयुक्तिक सांगा." (१-७) नंद म्हणाले, "देवराज इंद्र ही पर्जन्यदेवता आहे. मेघ हे त्याचे स्वतःचेच रूप आहे. सर्व प्राण्यांना तृप्त करणारे आणि जीवनदान देणारे जे पाणी, त्याचा ते वर्षाव करतात. बाळा, आम्ही यज्ञ करून पूजा करीत असतो. यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहते, त्याच अन्नाने सर्वजण धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी आपला जीवन-निर्वाह चालवितात. मनुष्यांच्या प्रयत्नांना फळ देणारा पाऊसच होय. कुलपरंपरेने चालत आलेला हा धर्म जो मनुष्य काम, लोभ, भय किंवा द्वेष या भावनेने सोडून देतो, त्याचे कधी कल्याण होत नाही." (८-११) श्रीशुकदेव म्हणतात - श्रीकृष्णाने नंद आणि अन्य व्रजवासींचे हे म्हणणे ऐकून इंद्राला क्रोध आणीत वडिलांना म्हटले. (१२) श्री भगवान म्हणाले - प्राणी आपल्या कर्मानुसारच जन्म घेतो आणि कर्मानेच मरतो. त्याला त्याच्या कर्मानुसारच सुख-दुःख, भय आणि कल्याण यांची प्राप्ती होते. ईश्वर म्हणून जर कोणी असेल, तर जीवांनी केलेल्या कर्माचे फळ देणाराच ईश्वर होय. तो कर्म करणार्यांनाच त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. कर्म न करणार्यांवर त्याचे काही चालत नाही. जर सर्व प्राणी आपापल्या कर्मांचेच फळ भोगत असतील तर आम्हांला इंद्राची काय आवश्यकता ? पूर्वसंस्कारानुसार प्राप्त होणार्या माणसांच्या कर्मफलाला जर तो बदलू शकत नसेल, तर तो कशाला हवा ? मनुष्य आपल्या पूर्वसंस्कारांच्या अधीन आहे. तो त्यानुसारच वागतो. देव, असुर, मनुष्य या सर्वांसह हे जग स्वभावावरच अवलंबून असते. जीव आपल्या कर्मानुसारच उत्तम किंवा कनिष्ठ शरीर ग्रहण करतो आणि सोडतो. कर्मानुसारच शत्रू, मित्र, उदासीन असा व्यवहार करतो. किंबहुना कर्मच गुरू आहे आणि कर्मच ईश्वर आहे. म्हणून मनुष्याने पूर्वसंस्कारानुसार आपला वर्ण आश्रम याला अनुकूल अशा धर्माचे पालन करीत कर्माचाच आदर करावा. जेणेकरून मनुष्याचे जीवन सुलभतेने चालेल तीच त्याची इष्टदेवता होय. जसे, जाराशी सहवास करणार्या स्त्रीला कधीही शांति मिळत नाही, त्याचप्रमाणे जो मनुष्य आपले जीवन चालविणार्या एका देवतेला सोडून अन्य देवाची उपासना करतो, त्यापासून त्याला कधीच सुख मिळत नाही. ब्राह्मणांनी वेदांचे अध्ययन-अध्यापन करून, क्षत्रियांनी पृथ्वीचे पालन करून, वैश्यांनी व्यापार करून आणि शूद्रांनी तीन वर्णांची सेवा करून आपला जीवननिर्वाह करावा. (१३-२०) वैश्यांचे व्यवसाय चार प्रकारचे आहेत. शेती, व्यापार, गुरांचे पालन आणि सावकारी. आम्ही त्यांपैकी फक्त गोपालनच नेहमी करीत आलो आहोत. सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे या संसाराच्या स्थिती, उत्पत्ती आणि विनाश यांना कारणीभूत आहेत. हे विविध प्रकारचे संपूर्ण जग स्त्री-पुरुषांच्या संयोगाने रजोगुणामुळे उत्पन्न होते. त्या रजोगुणाच्या प्रेरणेने मेघ सगळीकडे पाऊस पाडतात. त्यापासून अन्न आणि अन्नापासून सर्व जीवांची उपजीविका चालते. यात इंद्र काय करतो ? (२१-२३) तात ! आमच्याजवळ नगरे नाहीत, गावे नाहीत की घरेही नाहीत. आम्ही कायमचे वनवासी. जंगले, पर्वत हीच आमची घरे होत. म्हणून आपण गाई, ब्राह्मण आणि पर्वत यांच्याच पूजेला आरंभ करू. इंद्रयज्ञासाठी जी सामग्री गोळा केली आहे, त्यातूनच या यज्ञाचे अनुष्ठान होऊ द्या. वरण, शिरा, अनरसे, करंज्या, खीर इत्यादि अनेक प्रकारचे अन्नपदार्थ बनवा. सर्व दूधही बरोबर घ्या. वेदज्ञ ब्राह्मणांच्या द्वारा चांगल्या रीतीने अग्नीत हवन करा आणि तुम्ही त्यांना अनेक प्रकारचे अन्न, गाई आणि दक्षिणा द्या. याखेरीज चांडाळ, पतित इत्यादिंपासून कुत्र्यांपर्यंत सर्व प्राण्यांना यथोयोग्य अन्न देऊन गाईंना चारा घालावा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करावी. सर्वांनी अंगाला सुगंधी उटी लावून सुंदर वस्त्रे परिधान करून, अलंकार घालावेत आणि भोजन करून गायी, ग्राह्मण, अग्नी व गोवर्धनाला प्रदक्षिणा घालावी. बाबा ! माझे तर मत असे आहे. जर आपणाला योग्य वाटत असेल, तर तसे करा. हा यज्ञ गाई, ब्राह्मण, पर्वत यांना आणि मलासुद्धा अतिशय प्रिय आहे. (२४-३०) श्रीशुकदेव म्हणतात - कालरूप भगवंतांनी, इंद्राची घमेंड उतरविण्यासाठी जे सांगितले, ते नंदादि गोपांनी मनापासून स्वीकारले. भगवान श्रीकृष्णांनी जसे सांगितले होते, तसेच सर्व केले. अगोदर ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करवून घेऊन इंद्रयज्ञाच्या सामुग्रीने पर्वताला आणि ब्राह्मणांना आदरपूर्वक भेटवस्तू दिल्या. तसेच गुरांना चारा घातला. नंतर त्यांनी गुरांना पुढे घालून गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगल्या तर्हेने साजशृंगार करून गोपी-गोप, बैल जुंपलेल्या गाड्यांमध्ये बसून, भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत गिरिराजाची प्रदक्षिणा करू लागले. श्रीकृष्णच पर्वतावर गोपांचा विश्वास बसेल असे दुसरे विशाल शरीर धारण करून प्रगट झाले आणि "मीच गोवर्धन आहे" असे म्हणत सर्व अन्न खाऊ लागले. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या त्या स्वरूपाला इतर व्रजवासींसह स्वतःसुद्धा नमस्कार केला आणि म्हणू लागले - "पहा ! केवढे आश्चर्य आहे ! या गिरिराजाने साक्षात प्रगट होऊन आमच्यावर कृपा केली आहे. पाहिजे तसे रूप धारण करू शकणारा हा पर्वत, जे वनवासी याचा अनादर करतात, त्यांना नष्ट करतो. म्हणून आपले आणि गुरांचे कल्याण होण्यासाठी आपण याला नमस्कार करू या." (३१-३७) अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्या गोपांनी गोवर्धन, गाई आणि ब्राह्मणांची विधिपूर्वक पूजा केली आणि नंतर श्रीकृष्णांसह सर्वजण व्रजामध्ये परत आले. (३८) अध्याय चोविसावा समाप्त |