श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २३ वा

यज्ञपत्‍न्यांवर कृपा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

गोपाळ म्हणाले - हे पराक्रमी बलरामा ! हे दुष्टनाशना श्यामसुंदरा ! आम्हांला खूप भूक लागली आहे. ती शमविण्यासाठी काही उपाय करा. (१)

श्रीशुकदेव म्हणतात - गोपाळांनी जेव्हा देवकीनंदन भगवंतांना अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी मथुरेतील आपल्या भक्त ब्राह्मण पत्‍नींवर कृपा करण्यासाठी म्हटले. (२)

"येथून जवळच वेदवेत्ते ब्राह्मण स्वर्गाच्या इच्छेने आंगिरस नावाचा यज्ञ करीत आहेत. तुम्ही त्यांच्या यज्ञशाळेत जा. गोपाळांनो ! माझ्या सांगण्यावरून तुम्ही तेथे जाऊन माझे थोरले भाऊ भगवान बलराम आणि माझे नाव सांगून अन्न मागून आणा." जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा दिली, तेव्हा ते त्या ब्राह्मणांच्या यज्ञशाळेत गेले आणि त्यांनी अन्न मागितले. अगोदर त्यांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि मग ते हात जोडून म्हणाले, " हे ब्राह्मणांनो ! आपले कल्याण असो. आम्ही व्रजातील गवळी आहोत. भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांच्या आज्ञेने आम्ही आपल्याकडे आलो आहोत. आपण आमचे म्हणणे ऐकावे. बलराम आणि श्रीकृष्ण गाई चारीत येथे आले असून ते येथून जवळच आले आहेत. त्यांना भूक लागली असून आपणाकडून त्यांना अन्न पाहिजे आहे. ब्राह्मणांनो ! आपण धर्म जाणणारे आहात. आपल्याला मनापासून वाटत असेल तर भोजन करू इच्छिणार्‍या त्यांना अन्न द्यावे. सज्जनांनो ! ज्या यज्ञात पशुबली दिला जातो, त्यामध्ये आणि सौत्रायणी यज्ञामध्ये यजमानाच्या घरचे अन्न खाता कामा नये. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही यज्ञाच्या यजमानाचे अन्न खाण्याने दोष लागत नाही." अशी ही भगवंतांची विनंती ऐकूनही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तुच्छ फळाच्या अपेक्षेने मोठमोठ्या कर्मांत अडकलेले ते ब्राह्मण अज्ञानी असूनही स्वतःला ज्ञानवृद्ध मानीत होते. देश, काल, अनेक द्रव्ये, मंत्र, ऋत्विज, अग्नी, देवता, यजमान, यज्ञ आणि धर्म ही सर्व रूपे वास्तविक भगवंतांचेच आहेत. तेच इंद्रियातीत साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण होते. परंतु शरीराला आत्मा मानणार्‍या त्या मूर्खांना भगवंत हे एक साधारण मनुष्य वाटल्यामुळे ते कळले नाही. परीक्षिता ! ते ब्राह्मण जेव्हा ’होय’ किंवा ’नाही’ काहीच बोलले नाहीत, तेव्हा गोपाळ निराश होऊन परतले आणि ती सर्व कहाणी त्यांनी राम-कृष्णांना सांगितली. ती ऐकून सर्व जगताचे स्वामी भगवान हसून गोपाळांना लोकव्यवहार समजावीत म्हणाले. "आता तुम्ही त्यांच्या पत्‍न्यांकडे जा आणि त्यांना सांगा की, राम-कृष्ण येथे आले आहेत. तुम्हांला जेवढे पाहिजे तेवढे अन्न त्या तुम्हांला देतील. कारण माझ्यावर त्यांचे फार प्रेम असून त्यांचे मन नेहमी माझ्याकडेच लागलेले असते." (३-१४)

या वेळी गोपाल पत्‍नीशाळेत गेले. तेथील ब्राह्मणांच्या पत्‍न्या सुंदर वस्त्रे आणि दागिन्यांनी नटून थटून बसलेल्या पाहून त्यांना प्रणाम करून ते अतिशय नम्रतेने म्हणाले, "आपणा विप्र पत्‍नींना आम्ही नमस्कार करीत आहोत. आपण आमचे म्हणणे ऐका. येथून जवळच श्रीकृष्ण आलेले असून त्यांनीच आम्हांला तुमच्याकडे पाठविले आहे. ते गोपाळ आणि बलरामांसह गाई चारीत इकडे पुष्कळ लांब आले आहेत. त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना भूक लागली आहे. आपण त्यांच्यासाठी अन्न द्या." त्या ब्राह्मणपत्‍न्या पुष्कळ दिवसांपासून भगवंतांच्या लीला ऐकत होत्या. त्यामुळे त्यांचे मन त्यांच्याकडे आकर्षिले गेले होते. श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी त्या नेहमीच उत्सुक असत. श्रीकृष्ण आल्याची वार्ता ऐकताच त्या उतावीळ झाल्या. त्यांनी भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य असे चारही प्रकारचे अत्यंत स्वादिष्ट अन्न भांड्यांत भरून घेतले आणि बंधू, बांधव, पती, पुत्र नको नको म्हणत असतानाही, जशा नद्या समुद्राकडे जातात, तशा त्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णांकडे जाण्यासाठी निघाल्या. कारण फार दिवसांपासून पवित्रकीर्ति भगवंतांविषयी बरेच काही ऐकून ऐकून त्यांचे मन त्यांच्या ठिकाणी जडले होते. ब्राह्मणपत्‍नींनी यमुनेच्या तटाकी कोवळ्या पानांनी सुशोभित अशा अशोकवनामध्ये गोपालांनी वेढलेले, बलरामांच्यासह श्रीकृष्ण इकडे तिकडे फिरताना पाहिले. त्यांच्या सावळ्या शरीरावर सोनेरी पीतांबर फडफडत होता. गळ्यामध्ये वनमाला होती. कोवळ्या पालवीचे गुच्छ शरीरावर धारण करून त्यांनी एखाद्या नटासारखा वेष केला होता. एक हात आपल्या मित्राच्या खांद्यावर ठेवून दुसर्‍या हाताने ते कमळ फिरवीत होते. कानांवर कमल ठेवले होते, कुरळे केस गालावर भुरभुरत होते आणि मंद हास्यामुळे मुखकमळ विशेष शोभत होते. परीक्षिता ! आतापर्यंत आपल्या प्रियतमाचे गुण कानांनी ऐकून ऐकून त्यांनी आपल्या मनाला त्यांच्याच प्रेमरंगाने रंगविले होते. आता डोळ्यांच्या मार्गाने त्यांना आत घेऊन जाऊन पुष्कळ वेळपर्यंत त्या मनोमन त्यांना आलिंगन देत होत्या आणि अशाप्रकारे त्यांनी आपल्या हृद्यातील ताप शांत केला. जसे, सुषुप्ती अवस्थेमध्ये मन तिच्या अभिमानी प्राज्ञात लीन होऊन शांत होते. (१५-२३)

सर्वांच्या बुद्धीचे साक्षी असणार्‍या भगवंतांनी ब्राह्मणपत्‍न्या सर्व विषयांची आशा सोडून फक्त आपल्या दर्शनासाठी आल्या आहेत, हे जाणून हसत हसत ते त्यांना म्हणाले, " देवींनो ! तुमचे स्वागत असो ! या, बसा ! आम्ही तुमच्यासाठी काय करावे ? आपण आमच्या दर्शनाच्या इच्छेने इथे आला आहात, हे तुम्हांसारख्या भक्तांच्या दृष्टीने योग्यच आहे. आपले खरे हित पाहणारे बुद्धिमान लोक आपल्या प्रियतमाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमात कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा आडपडदा नसतो, यात संशय नाही. प्राण, बुद्धी, मन, शरीर, स्वजन, स्त्री, अपत्य, धन इत्यादि सर्व वस्तू ज्याच्या सान्निध्यामुळे प्रिय वाटतात, त्या आत्मस्वरूप माझ्यापेक्षा अधिक प्रिय कोण असणार ? आता तुम्ही आपल्या यज्ञशाळेत परत जा. तुमचे पती ब्राह्मण गृहस्थ आहेत. ते तुमच्यामुळेच यज्ञ पूर्ण करू शकतील." (२४-२८)

ब्राह्मणपत्‍न्या म्हणाल्या, "हे प्रभो ! आपण असे कठोर बोलू नये. आपल्याला प्राप्त झालेल्याला पुन्हा संसारात यावे लागत नाही, ही वेदवाणी आपण सत्य करा. आम्ही आपल्या नातलगांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आपल्या चरणापाशी यासाठी आलो आहोत की, आपल्या चरणांवरून पडलेली तुलसीमाला आपल्या केसांमध्ये धारण करावी. हे शत्रुदमना ! आमचे पति-पुत्र, माता-पिता, भाऊबंद किंवा हितचिंतकसुद्धा आता आमचा स्वीकार करणार नाहीत, तर मग दुसर्‍यांची काय कथा ? म्हणून आता आपल्या चरणांना शरण आलेल्या आम्हांला दुसर्‍या कोणालाही शरण जावे लागणार नाही, असे करा." (२९-३०)

श्री भगवान म्हणाले, "देवींनो, तुमचे पति-पुत्र, माता-पिता, भाऊबंद किंवा इतर लोक, कोणीच तुमचा तिरस्कार करणार नाहीत. कारण तुम्ही माझ्याशी युक्त झाला आहात. पहा ! हे देवही माझ्या म्हणण्याला अनुमोदन देत आहेत. देवींनो ! या संसारामध्ये माझ्या शरीराचा सहवास हाच काही माझ्या प्रेमाला किंवा अनुरागाला कारण ठरत नाही; म्हणून तुम्ही जा. आपले मन माझे ठिकाणी लावा. तुम्हांला लवकरच माझी प्राप्ती होईल." (३१-३२)

श्रीशुकदेव म्हणतात - असे सांगितल्यावर त्या ब्राह्मणपत्‍न्या यज्ञशाळेत गेल्या. त्या ब्राह्मणांनी आपल्या पत्‍न्यांकडे दोषदृष्टीने न पाहता त्यांच्यासह आपला यज्ञ पुरा केला. त्या स्त्रियांपैकी एकीला आधीच तिच्या पतीने कोंडून ठेवले. तेव्हा तिने पुष्कळ दिवसांपासून ऐकलेल्या भगवंतांच्या स्वरूपाचे ध्यान करून त्यांना मनोमन आलिंगन देऊन कर्मामुळे बनलेले शरीर सोडले. इकडे भगवान श्रीकृष्णांनी, त्या चार प्रकारच्या अन्नाचे गोपालांना भोजन दिले आणि नंतर स्वतः भोजन केले. अशाप्रकारे लीलामनुष्य भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यासारख्या लीला केल्या आणि आपले रूप, वाणी व कर्मांनी गाई, गोपाल आणि गोपींना आनंद देत ते स्वतःही आनंदित झाले. (३३-३६)

इकडे ब्राह्मणांना जेव्हा माहीत झाले की, श्रीकृष्ण तर स्वतः भगवान आहेत, तेव्हा त्यांना अतिशय पश्चात्ताप झाला. ते विचार करू लागले की, जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आम्ही फार मोठा अपराध केला आहे. ते तर, मनुष्यासारखी लीला करीत असूनही परमेश्वरच आहेत. आपल्या पत्‍नींची भगवंतांविषयी अलौकिक भक्ती असून आपण मात्र त्याबाबत अगदी कोरडे आहोत, हे लक्षात येऊन ते पश्चात्ताप होऊन स्वतःचीच निंदा करू लागले. ते म्हणू लागले, "अरेरे ! आम्ही भगवान श्रीकृष्णांना विन्मुख झालो, म्हणून आमचा जन्म, गायत्री मंत्र, वेदाध्ययन, बहुश्रुतपणा, उच्च घराणे, कर्मकांडात नैपुण्य या सर्वांचा धिक्कार असो ! धिक्कार असो ! भगवंतांची माया योगी लोकांनाही मोहित करते, हेच खरे. म्हणूनच तर आम्ही मनुष्यांचे गुरु ब्राह्मण असून आमचा खरा स्वार्थ आम्हांला कळला नाही. अहो पहा ना ! या स्त्रिया असूनही जगद्‌गुरू श्रीकृष्णांबद्दलच्या अगाध प्रेमाने प्रपंच नावाचा मृत्यूचा पाशसुद्धा यांनी तोडून टाकला. यांचे उपनयन झाले नाही की यांनी गुरुकुलामध्ये निवास केला नाही. तपश्चर्या केली नाही की, आत्म्यासंबंधी काही विचार केला नाही. यांच्यामध्ये तशी पवित्रताही नाही किंवा यांनी कोणतीही सत्कर्मे केलेली नाहीत. तरीसुद्धा योगेश्वरांचे ईश्वर, पुण्यकीर्ति भगवान श्रीकृष्णांच्या चरणी यांची दृढ भक्ती आहे; आणि आम्ही संस्कार वगैरेंनी संपन्न आहोत, तरीसुद्धा भगवंतांवर आमचे प्रेम नाही. गृहस्थीच्या कामांत गुंतून आत्मकल्याणाला पारख्या झालेल्या आम्हांला गोपाळांकरवी भगवंतांनी आपली आठवण करून दिली. केवढी ही त्यांची कृपा ! भगवान स्वतः पूर्णकाम असून भक्तांच्या मोक्षापर्यंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत. आमच्यावर अहैतुकी कृपा करण्याखेरीज आमच्यासारख्या क्षुद्र जीवांच्या बाबतीत त्यांचे दुसरे काय प्रयोजन असणार ? म्हणून त्यांनी याच उद्देशाने केलेली ही लीलाच म्हणावी लागेल ! स्वतः लक्ष्मी इतर देवांना सोडून आणि आपल्या चंचलता, गर्व इत्यादि दोषांचा त्याग करून ज्यांच्या चरणकमळांच्या निरंतर स्पर्शाच्या लोभाने सेवा करीत असते, तेच प्रभु दुसर्‍याकडे अन्नाची याचना करतात, हे लोकांना भुलविणेच नव्हे काय ? देश, काल, वेगवेगळी द्रव्ये, मंत्र, अनुष्ठानाची पद्धत, ऋत्विज, अग्नि, देव, यजमान, यज्ञ आणि धर्म हे सर्व काही भगवंताचेच स्वरूप आहे. तेच योगेश्वरांचेसुद्धा ईश्वर साक्षात भगवान विष्णू स्वतः श्रीकृष्णांच्या रूपाने यदुवंशामध्ये अवतीर्ण झाले आहेत, ही गोष्ट आम्ही ऐकली होती. परंतु आम्ही मूर्खांनी मात्र त्यांना ओळखले नाही. आमचे भाग्य खरेच थोर म्हणून आम्हांला अशा पत्‍न्या मिळाल्या. त्यांच्या भक्तीमुळे भगवान श्रीकृष्णांविषयी आमचीही भक्ती निश्चल झाली. नित्यज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्ण ! आपल्याला नमस्कार असो. आपल्याच मायेने आमची बुद्धी मोहित होऊन आम्ही कर्मांच्या व्यापामध्ये भटकत आहोत. ते आमच्या या अपराधाची क्षमा करोत. कारण आमची बुद्धी त्यांच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्यांचा प्रभाव जाणू शकली नाही." (३७-५१)

श्रीकृष्णांचा तिरस्कार केल्यामुळे आपला आपराध आठवून त्यांना श्रीकृष्ण-बलरामांच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली. परंतु कंसाच्या भीतीने ते त्यांच्या दर्शनाला गेले नाहीत. (५२)

अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP