|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २२ वा
वस्त्रहरण - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकदेव म्हणतात - हेमंत ऋतूतील मार्गशीर्ष महिन्यात नंदांच्या व्रजातील कुमारी हविष्यान्न खाऊन कात्यायनी व्रत करू लागल्या. राजा ! त्या अरुणोदय होत असतानाच यमुनेच्या पाण्यात स्नान करीत आणि तीरावर देवीची वाळूची मूर्ती तयार करून, सुगंधी चंदन, फुलांचे हार, निरनिराळ्या अन्नांचे नैवेद्य, धूप-दीप, लहान मोठ्या भेटवस्तू, पाने, फळे, तांदूळ इत्यादिंनी तिची पूजा करीत. त्याचबरोबर, "हे कात्यायनी ! हे महामाये ! हे महायोगिनी ! हे सर्वांच्या एकमात्र स्वामिनी ! नंदनंदनांना आमचा पती कर. देवी ! आम्ही तुला नमस्कार करतो." या मंत्राचा जप करीत त्या कुमारिका, देवीची आराधना करीत. ज्यांचे मन श्रीकृष्णांना समर्पित झाले होते, अशा त्या कुमारींनी नंदनंदन पती व्हावेत म्हणून एक महिनाभर भद्रकालीदेवीची अतिशय चांगल्या रीतीने पूजा केली. दररोज उषःकालीच त्या एकमेकींना हाका मारीत आणि एकेमेकींच्या हातात हात घालून उच्च स्वरात भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे गायन करीत यमुनाजलात स्नान करण्यासाठी जात. (१-६) दररोजप्रमाणे एके दिवशी सर्व मुली यमुनेच्या तटावर आपापली वस्त्रे ठेवून श्रीकृष्णांचे गुणगान करीत आनंदाने जलक्रीडा करू लागल्या. योगेश्वरांचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण गोपींचे मनोगत जाणून ते सफल करण्यासाठी आपल्या मित्रांसह यमुनाकाठी गेले. ते त्या मुलींची वस्त्रे उचलून लगबगीने एका कदंबाच्या झाडावर चढले. त्यांच्या बरोबरीचे गोपाळ खदखदा हसू लागले आणि स्वतः श्रीकृष्णसुद्धा त्यांची थट्टा करीत म्हणाले, "कुमारींनो ! येथे येऊन तुम्ही आपापली वस्त्रे खुशाल घेऊन जा. मी खरेच सांगतो, कारण व्रत करून तुम्ही खंगलात, म्हणून मी तुमची थट्टा नाही करीत. मी यापूर्वी कधीच खोटे बोललो नाही. हे माझे मित्र जाणतातच. सुंदरींनो ! तुम्ही एकेकट्या येऊन आपापले वस्त्र घेऊन जा किंवा सगळ्या जणी एकदम या." (७-११) भगवंतांची ही थट्टा पाहून गोपींची मने प्रेमाने ओथंबून गेली. त्या लाजला आणि एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. पण पाण्याबाहेर आल्या नाहीत. श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणाले, तेव्हा त्यांनी केलेल्या विनोदाने कुमारींचे चित्त आणखीनच त्यांच्यकडे आकर्षित झाले. थंड पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या त्यांची शरीर थंडीने थर थर कापत होती. त्या श्रीकृष्णांना म्हणाल्या, "हे प्रिय श्रीकृष्णा ! तू असा अन्यायाने वागून नकोस. तू नंदबाबांचा लाडका आहेस, हे आम्हांला माहीत आहे. व्रजवासीयांचाही तू आवडता आहेस. आम्ही थंडीने कुडकुडत आहोत. आमची वस्त्रे दे ना ! हे श्यामसुंदरा ! आम्ही तुझ्या दासी आहोत. तू म्हणशील, ते आम्ही करू. तुला धर्म चांगला माहीत आहे. आमची वस्त्रे आम्हांला दे. नाहीतर आम्ही नंदबाबांना सांगू. (१२-१५) श्रीभगवान म्हणाले - निरागस हसणार्या मुलींनो ! तुम्ही स्वतःला माझ्या दासी म्हणवता आणि मी सांगेन ते करू इच्छिता. तर मग येथे येऊन आपापली वस्त्रे घेऊन जा, म्हणजे झाले !" तेव्हा सर्व कुमारी थंडीने कुडकुडत दोन्ही हातांनी गुप्तांग झाकून, यमुनेच्या बाहेर आल्या. त्यावेळी थंडी त्यांना अतिशय सतावीत होती. (१६-१७) त्यांच्या या शुद्ध भावाने भगवान अतिशय प्रसन्न झाले. त्या आपल्याजवळ आल्याचे पाहून त्यांची वस्त्रे त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवली आणि प्रसन्नतेने हसत हसत म्हणाले, "अग मुलींनो ! तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलेत, त्यामुळे जलदेवता वरूण आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली आहे. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून लवून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या." हे श्रीकृष्णांचे म्हणणे ऐकून त्या व्रजकुमारींना विवस्त्र होऊन स्नान केल्याने आपल्या व्रतात उणीव राहिली, असे वाटले. म्हणून त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी सर्व कर्मांचे साक्षी असणार्या श्रीकृष्णांना नमस्कार केला; कारण पापांचे परिमार्जन करणारे तेच आहेत. भगवान श्रीकृष्ण त्यांनी नमस्कार केलेला पाहून प्रसन्न झाले. त्यांची करुणा येऊन त्यांनी त्यांना वस्त्रे देऊन टाकली. श्रीकृष्ण कुमरींना टोचून बोलले, त्यांनी त्यांना लाज सोडायला लावली, त्यांची थट्टा केली आणि कठपुतळ्यांप्रमाणे त्यांना नाचविले, इतकेच काय त्यांची वस्त्रेसुद्धा हरण केली. तरीसुद्धा त्या त्यांच्यावर रागावल्या नाहीत. उलट प्रियतमाच्या भेटीने प्रसन्नच झाल्या. गोपींनी आपापली वस्त्रे परिधान केली; परंतु श्रीकृष्णांनी त्यांचे चित्त असे हिरावून घेतले होते की, त्या तेथून एक पाऊलही पुढे जाऊ शकल्या नाहीत. आपल्या प्रियतमाच्या सहवासासाठी तयार होऊन त्या त्यांच्याकडे लाजलेल्या नजरांनी पाहात राहिल्या. (१८-२३) आपल्या चरणकमलांच्या स्पर्शाची अभिलाषा धरूनच त्या कुमारींनी हे व्रत केले आहे, हे जाणून भगवान त्यांना म्हणाले, "कुमारींनो ! तुम्ही माझी पूजा करू इच्छिता, हा तुमचा संकल्प मी जाणला. तुमच्या या इच्छेला माझी संमती आहे. तुमचा हा संकल्प पूर्ण होईल. ज्यांनी आपली बुद्धी मला समर्पित केली, त्यांची कामना त्यांना सांसारिक भोगांकडे नेण्यास असमर्थ असते. जसे भाजलेले किंवा उकळलेले बी पुन्हा उगवू शकत नाही. म्हणून मुलींनो ! आता तुम्हा आपापल्या घरी जा. तुमची साधना सिद्धझाली आहे. पुढे येणार्या शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्याबरोबर विहार कराल. सतींनो ! याच उद्देशाने तुम्ही हे व्रत आणि कात्यायनी देवीची पूजा केली होती ना ?" (२४-२७) श्रीशुकदेव म्हणतात - इच्छा पूर्ण झालेल्या त्या कुमारिका भगवंतांच्या आज्ञेने त्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत, जाण्याची इच्छा नसतानाही, कशाबशा व्रजामध्ये गेल्या. (२८) एके दिवशी भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि गोपालांसह गाई चारीत, वृंदावनापासून खूप दूर गेले. कडक उन्हाळ्यात वृक्ष आपल्याला सावली देऊन आपल्यावर छत्र धरण्याचे काम करीत आहेत, हे पाहून श्रीकृष्णांनी स्तोककृष्ण, अंशू, श्रीदामा, सुबल, अर्जुन, विशाल, ऋषभ, तेजस्वी, देवप्रस्थ, वरूथप इत्यादि गोपालांना संबोधून म्हटले. "मित्रांनो ! ज्यांचे सर्व जीवन फक्त दुसर्यांचे भले करण्यासाठीच आहे, अशा या भाग्यवान झाडांना पाहा. ही स्वतः वार्याचे झोत, पाऊस, ऊन, थंडी असे सर्व काही सहन करीत आमचे त्यांच्यापासून रक्षण करतात. यांचे जीवन किती श्रेष्ठ आहे ! कारण यांच्यामुळेच प्राण्यांचा जीवननिर्वाह चालतो. ज्याप्रमाणे एखाद्या सज्जन पुरुषाच्या घरून कोणी याचक रिकाम्या हाताने परत जात नाही, त्याचप्रमाणे या वृक्षांकडूनसुद्धा काही न मिळता परत जात नाहीत. हे आपली पाने, फुले, सावली, मुळे, साली, लाकडे, सुगंध, डिंक, राख, कोळसा, अंकूर आणि पालवी देऊन प्राणिमात्राच्या इच्छा पूर्ण करतात. या जगात प्राण्यांच्या जन्माची सार्थकता यातच आहे की, त्यांनी धनाने, बुद्धीने, वाणीने आणि प्राणांनीसुद्धा इतरांचे नेहमी कल्याणच करावे." अध्याय बाविसावा समाप्त |