श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २१ वा

वेणुगीत -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात - शरद ऋतूमुळे जेथील पाणी निर्मळ झाले होते आणि जलाशयात उमललेल्या कमळांचा सुगंध असलेला वारा वाहात होता, अशा वृंदावनात श्रीकृष्णांनी गाई व गोपाळांसह प्रवेश केला. तेथील फुलांनी बहरलेल्या वनराईत धुंद भ्रमर गुणगुणत होते आणि पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते. त्यामुळे तेथील सरोवरे, नद्या आणि पर्वत नादमय झाले होते, श्रीकृष्णांनी बलराम आणि गोपालांबरोबर तेथे गाई चारीत असताना वेणू वाजविण्यास सुरुवात केली. ते वेणुगीत भगवंतांच्या विषयी प्रेमभाव जागृत करणारे होते. ते ऐकून काही गोपी सख्यांना श्रीकृष्णांच्या मागे त्यांच्याविषयी सांगू लागल्या. हे राजा ! श्रीकृष्णांच्या लीला आठवून त्यांचे त्यांनी वर्णन करण्यास सुरुवात केली खरी; पण उत्कट प्रेमाने मन व्याकूळ झाल्यामुळे त्यांचे बोलणेच खुंटले. (त्या सांगू लागल्या,) गोपाळांसह श्रीकृष्ण वृंदावनात आले पहा ! त्यांच्या मस्तकारव मोरपंख आहे आणि कानांवर कण्हेरीचे गुच्छ आहेत. त्यांनी सोन्यासारखा पीतांबर परिधान केला असून गळ्यामध्ये वैजयंती माळा घातली आहे. त्यांचे रूप श्रेष्ठ नटासारखे किती सुंदर आहे बरे ! बासरीची छिद्रे ते आपल्या अधरामृताने भरत आहेत. गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत. हे वृंदावन त्यांच्या चरणांमुळे अधिकच रमणीय झाले आहे. परीक्षिता ! चराचराचे मन आकर्षून घेणारा वेणुनाद ऐकून सर्व गोपी त्याचे वर्णन करू लागल्या. आणि ते करीत असतानाच तन्मय होऊन त्या श्रीकृष्णांना मनाने आलिंगन देऊ लागल्या. (१-६)

गोपी म्हणाल्या - अग सख्यांनो ! आम्ही डोळे असणार्‍यांच्याही डोळ्यांची एवढीच सार्थकता मानतो, दुसरी नाही. ती हीच की, जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम मित्रांसह गुरे हाकीत वनात जातात किंवा परत येतात, तेव्हा वेणू वाजविणारे किंवा प्रेमळ कटाक्षांनी आमच्याकडे पाहणारे त्यांचे मुखकमल मनसोक्त पाहावे. (दुसर्‍या काही जणी म्हणाल्या,) पीतांबरधारी सावळे श्रीकृष्ण आणि नीलांबर नेसलेले बलराम जेव्हा आंब्याची पालवी, मोरपंख, फुलांचे गुच्छ आणि रंगी-बेरंगी कमलांच्या माळा धारण करतात, तेव्हा त्यांचा वेष अतिशय देखणा वाटतो. गोपाळांच्यामध्ये बसून काहीवेळा जेव्हा ते गाऊ लागतात, तेव्हा रंगमंचावर अभिनय करणार्‍या दोन चतुर नटांसारखे ते किती शोभून दिसतात म्हणून काय सांगू ? अग गोपींनो ! या वेणूने असे कोणते पुण्य केले आहे की, जो आम्हा गोपींचे हक्काचे दामोदरांचे अधरामृत स्वतःच अशाप्रकारे पीत आहे की, त्याचा फक्त रस शिल्लक उरला आहे. या वेणूला आपल्या पाण्याने वाढविणारे जलाशय कमळांच्या मिषाने रोमांचित होऊ लागले आहेत आणि आपल्या वंशामध्ये जन्मलेल्या भगवत्प्रेमी वेणूला पाहून वृक्षसुद्धा श्रेष्ठ पुरुषांप्रमाणे ’भगवद्‍भक्त आपला वंशज आहे’ हा विचार मनात येऊन मधुबिंदूंच्या मिषाने आनंदाश्रू ढाळीत आहेत. (७-९)

गडे ! देवकीनंदनाच्या चरणकमलांनी सुशोभित झालेले हे वृंदावन, पृथ्वीची कीर्ति चहूकडे पसरवीत आहे. जेव्हा श्रीकृष्ण मुरली वाजवितात, तेव्हा मोर धुंद होऊन नाचू लागतात आणि पर्वतशिखरांवरील पशु-पक्षी स्तब्धपणे हे पाहात राहतात. तसेच, जेव्हा सुंदर वेष धारण केलेले श्रीकृष्ण बासरी वाजवितात, तेव्हा मंदबुद्धीच्या हरिणीसुद्धा ती ऐकत काळविटांसमवेत त्यांच्याजवळ येऊन प्रेमपूर्ण नेत्रकमळांनी त्यांची जणू पूजा करतात. (१०-११)

स्वर्गातील देवी जेव्हा युवतींना आनंदित करणारे सौंदर्य आणि शील यांचा खजिना असलेल्या श्रीकृष्णांना पाहातात आणि त्यांनी बासरीवर गायिलेले मधुर संगीत ऐकतात तेव्हा मदनबाधेने विह्वल होऊन त्या विमानातच आपली शुद्ध हरपून बसतात, त्यामुळे वेणीतील फुले गळून जमिनीवर पडत आहेत याची त्यांना जाणीव नसते की शालू कमरेवरून निसटताहेत, याचेही त्यांना भान नसते. श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले वेणुगीतरूप अमृत गाई कान टवकारून पितात. आपल्या डोळ्यांतून श्यामसुंदरांना हृदयात घेऊन त्यांना आलिंगन देतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. तसेच त्यांची वासरे गाईंच्या सडांतून कृष्णप्रेमाने आपोआप स्रवणारे दूध तोंडात घेऊन तशीच उभी राहतात. त्यांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात असतात. अग आई ! या वनातील पक्षी हे बहुधा मुनीच आहेत. ते सुंदर पालवी फुटलेल्या झाडांच्या डहाळ्यांवर श्रीकृष्ण दिसतील अशा जागी किलबिल न करता गुपचुप बसतात आणि पापण्या न हालविता डोळ्यांनी त्यांचे रूपमाधुर्य पाहात राहतात. आणि त्यांनी वाजवलेली मोहक बासरी ऐकतात. (१२-१४)

या नद्यांनीही श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज ऐकला आणि त्यांच्या मनात प्रेमभाव जागृत झाला. तेच हे भोवरे. त्यामुळे त्यांचा वाहण्याचा वेगही मंदावला. त्या तरंगरूपी हातांनी त्यांचे चरण पकडून त्यांवर कमळे अर्पण करून त्यांना आलिंगन देत आहेत. श्रीकृष्ण आणि बलराम गालगोपालांसह भर उन्हात गाई चारीत आहेत आणि त्याचबरोबर बासरीही वाजवीत आहेत, असे पाहून कृष्णघनांच्या हृदयात प्रेम उचंबळून येते. ते आपल्याव वर्णाच्या घनश्यामावर आपल्या शरीराचेच छत्र धरून त्यांच्यावर तुषाररूप पुष्पवर्षाव करतात. (१५-१६)

जेव्हा या भिल्लिणी कृष्णांना पाहतात, तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाची व्याधी निर्माण होते. त्यावेळी त्या गोपींच्या वक्षःस्थळावरील जे केशर श्यामसुंदरांच्या चरणांना लागलेले असते, ते श्रीकृष्ण जेव्हा गवतावरून चालतात, तेव्हा त्याला चिकटते. या भाग्यशाली भिल्लिणी ते त्या गवतांच्या काड्यांवरून काढून आपले स्तन आणि तोंडाला लावतात आणि अशाप्रकारे आपल्या हृदयातील प्रेमदाह शांत करतात. अप गोपींनो ! हा गोवर्धन भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे. धन्य आहे याचे भाग्य ! श्रीकृष्ण-बलरामांच्या चरणकमलांचा स्पर्श झाल्याने हा किती आनंदित होतो पहा ! हा गोपाल आणि गाई यांच्यासह या दोघांचाही मोठाच सत्कार करतो. तो त्यांना पाणी देतो, गाईंसाठी गवत देतो. विश्रांतीसाठी गुहा आणि खाण्यासाठी कंदमुळे देतो. अग सख्यांनो ! जेव्हा हे डोक्याला (गाईची धार काढतेवेळी पायाला बांधण्याची) दोरी गुंडाळून आणि खांद्यावर फासा टाकून गोपाळांबरोबर गाईंना एका वनातून दुसर्‍या वनात हाकत जातात, आणि त्याचवेळी मधुर बासरीही वाजवतात, तेव्हा चालणारे देहधारी स्तब्ध होतात आणि अचल वृक्षसुद्धा रोमांचित होतात. (१७-१९)

वृंदावनविहारी श्रीकृष्णांच्या अशा एक नव्हे तर, अनेक लीलांचे आपापसात वर्णन करता करता गोपी तन्मय होऊन जात. (२०)

अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP