श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २० वा

वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणतात - गोपाळांनी घरी आल्यावर घरातील स्त्रियांना श्रीकृष्ण आणि बलरामांची प्रलंबाला मारणे, आपल्याला वणव्यातून सोडवणे इत्यादि अलौकिक कृत्ये सांगितली. वृद्ध गोप आणि गोपी ते ऐकून आश्चर्यचकित झाल्या. ते सर्वजण मानू लागले की, "श्रीकृष्ण आणि बलरामाच्या वेषात आपल्याकडे आलेले हे कोणी मोठे देव आहेत." (१-२)

यानंतर वर्षा ऋतू सुरू झाला. या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांची अधिक वाढ होते. त्यावेळी सूर्य आणि चंद्र यांच्याभोवती वारंवार खळी दिसू लागली. ढग इत्यादिंमुळे आकाश क्षुब्ध दिसू लागले. काळ्या दाट धगांमुळे व गडगडाट करणार्‍या विजांनी व्यापलेल्या आकाशातील सूर्य, चंद्र आणि तारे झाकोळून जातात. त्यामुळे आकाश, गुणांनी झाल्या गेलेल्या जीव नामक ब्रह्माप्रमाणे दिसू लागते. (सत्त्वगुणी वीज, रजोगुणी गडगडाट व तमोगुणी ढग आणि ब्रह्मस्वरूप आकाश अशी ही उपमा आहे.) राजाप्रमाणे सूर्याने पृथ्वीरूप प्रजेकडून आठ महिनेपर्यंत पाण्याच्या रूपाने जो कर वसूल केला होता, तो वेळ आल्यावर सूर्य आपल्या किरणरूपी हातांनी पुन्हा वाटू लागला. जसे दयाळू लोक दुःखी लोकांसाठी आपले प्राणसुद्धा समर्पित करतात. त्याप्रमाणे विजा असलेले ढग वेगवान वार्‍याच्या प्रेरणेने प्राण्यांना तृप्त करणारे आपले जीवन (पाणी) देऊ लागले. (३-६)

जसे सकाम भावाने तपश्चर्या करणार्‍यांचे शरीर आधी दुर्बळ होते, परंतु तेच फळ मिळताच पुष्ट होते, त्याप्रमाणे उन्हात वाळलेली जमीन पावसाच्या पाण्याने ओलीचिंब हो‍ऊन पुन्हा फुगली. कलियुगात पापाचे सामर्थ्य वाढल्याने पाखंड मत वाढून वैदिक संप्रदाय लोप पावतो, त्याप्रमाणे पावसाळ्यातील संध्याकाळच्या वेळी ढगांमुळे अंधार पसरल्यामुळे काजवे चमकतात. तारे चमकत नाहीत. जसे नित्य नैमित्तिक कर्मे आटोपल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार ब्रह्मचारी शिष्य वेदपठण करू लागतात, तसे जे बेडूक आधी गुपचूप झोपून पडले होते, ते आता ढगांची गर्जना ऐकून डराव डराव करू लागले. जसे इंद्रियांवर ताबा नसलेल्या माणसाची शरीर, धन इत्यादि संपत्ती कुमार्गाकडे जाते, तशा सुकून गेलेल्या लहान लहान नद्या आता पात्र सोडून वाहू लागल्या. हिरवळीने हिरवीगार झालेली, काही ठिकाणी पावसाळी किड्यांनी लाल दिसणारी आणि काही ठिकाणी पांढर्‍या छत्र्या उगवलेली जमीन अशी दिसत होती की, जणू एखाद्या राजाची रंगीबेरंगी सेनाच ! शेते धान्यसंपत्तीने शेतकर्‍यांना आनंद देत होती, पण तीच सर्व काही प्रारब्धाच्या अधीन आहे हे न जाणणार्‍या धनिकांच्या मनात मात्र मत्सर उत्पन्न करीत होती. (कारण आता ते त्यांना कर्जाच्या जोरावर मुठीत ठेवू शकत नव्हते.) पावसाचे नवीन पाणी सेवन करून जलचर आणि स्थलचर प्राणी यांचे सौंदर्य वाढले होते. जसे भगवंतांची सेवा केल्याने अंतर्बाह्य सौंदर्य वाढते. ज्याप्रमाणे वासनायुक्त योग्याचे चित्त विषयांशी संपर्क होताच कामनांनी उद्दीप्त होते, त्याप्रमाणे तुफानी वार्‍याने उसळणार्‍या लाटांनी खवळलेला समुद्र नद्यांचे पाणी मिळाल्याने आणखीनच खवळला. ज्यांनी आपले चित्त भगवंतांना समर्पित केले आहे, त्यांना ज्याप्रमाणे दुःखाचे डोंगर कोसळले तरी कोणत्याही प्रकारची व्यथा होत नाही, त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचे आघात होत असतानाही पर्वतांना काहीच व्यथा होत नव्हती. जरे द्विजांनी वेदांचा अभ्यास केला नाही तर कालांतराने ते विसरतात, त्याप्रमाणे ज्या वाटा साफ केलेल्या नव्हत्या, त्या गवताने झाकून गेल्यामुळे ओळखणे अवघड झाले. मेघ जरी लोकोपचारी असले तरी चंचल विजा त्यांच्यामध्ये स्थिर राहात नाहीत. जसे चंचल स्वभाव्याच्या स्त्रिया, पुरुष गुणी असले तरी त्यांच्याजवळ स्थिर चित्ताने राहात नाहीत. शब्दगुणयुक्त आकाशात निर्गुण (दोरी नसलेले) इंद्रधनुष्य शोभत होते, जसे त्रिगुणांच्या क्षोभामुळे व्यक्त होणार्‍या जगाच्या पसार्‍यात अव्यक्त निर्गुण ब्रह्म शोभत असावे. ज्याप्रमाणे स्वतःच्या चैतन्याने प्रकाशित होणारा अहंकारच जीवाला झाकून ठेवतो, त्याचप्रमाणे चंद्राच्या किरणांनी ढगांचे अस्तित्व दिसत असूनही तेच ढग चंद्राला झाकून निस्तेज करू लागले. जसे गृहस्थीच्या जंजाळात अडकून दुःखी झालेले लोक भगवंतांच्या भक्तांच्या शुभागमनाने आनंदमग्न होऊन जातात, त्याप्रमाणे ढगांच्या शुभागमनाने आनंदित झालेले मोर केकारवांनी आणि नृत्याने आनंद प्रगट करीत होते. जसे सकाम भावनेने तपश्चर्या करणारे सुरुवातीला कृश होतात परंतु कामना पूर्ण झाल्यावर पुष्ट होतात, तसे जे वृक्ष सुकून निष्पर्ण झाले होते, ते आता मुळांनी पाणी शोषून घेऊन पाना-फुलांनी डवरले होते. परीक्षिता ! जसे विषयी पुरुष काम-धंद्याच्या व्यापामुळे घरात नेहमी बेचैन असतात, तरीसुद्धा घरातच पडून राहतात, त्याप्रमाणे तळ्यांचे काठ काटे-कुटे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे साधारणतः त्रासदायकच असतात, तरीसुद्धा सारस पक्षी ते सोडीत नाहीत. जसे कलियुगामध्ये पाखंडी लोकांच्या निरनिराळ्या मिथ्या मतांमुळे वैदिक मार्ग शिथिल होतात, त्याप्रमाणे पावसाळ्यात इंद्राने पाऊस पाडल्यामुळे नद्यांचे आणि शेतांचे बांध फुटून गेले. जसे ब्राह्मणांनी प्रेरणा दिल्यानंतर धनिक लोक वेळोवेळी दान करून प्रजेच्या इच्छा पूर्ण करतात, त्याप्रमाणे वार्‍याच्या प्रेरणेने ढग प्राण्यांसाठी अमृतमय पाण्याचा वर्षाव करू लागले. (७-२४)

वृंदावन अशा प्रकारे शोभिवंत आणि पिकलेले खजूर तसेच जांभळांनी बहरलेले होते. वनात विहार करण्यासाठी बलरामाबरोबर श्रीकृष्णांनी गोपाळ आणि गुरांना घेऊन प्रवेश केला. दुधाने भरलेल्या सडांमुळे गाई हळूहळू चालत होत्या. पण जेव्हा श्रीकृष्ण हाका मारीत, तेव्हा त्या प्रेमामुळे भराभर चालू लागत. त्यावेळी त्यांच्या सडांतून दुधाच्या धारा जमिनीवर पडत असत. भगवंतांनी पाहिले की, वनवासी लोक आनंदात मग्न आहेत. वनराईतून मध गळत आहे. पर्वतातून झुळझुळ आवाज करीत झरे वाहात आहेत. आणि त्याचबरोबर पाऊन पडताना आसर्‍यासाठी गुहाही आहेत. जेव्हा पाऊस पडत असे, तेव्हा श्रीकृष्ण कधी एखाद्या वृक्षाच्या छायेत जाऊन बसत. कधी कधी एखाद्या गुहेमध्ये जाऊन बसत तर कधी कंदमुळे व फळे खाऊन बोपाळांबरोबर रमत. कधी पाण्याजवळच एखाद्या शिळेवर बसत आणि बलराम व गोपाळाच्यासह घरून आणलेला दहीभात, भाजी, चटणी इत्यादिबरोबर खात. वर्षा ऋतूमध्ये बैल, वासरे तसेच दुधाने भरलेल्या सडांच्या भारांनी थकलेल्या गाई पोट भरल्यावर हिरव्यागार गवतावर बसून डोळे मिटून रवंथ करीत असत. सर्व प्राण्यांना सुख देणार्‍या त्यांच्याकडे व आपल्याच शक्तीचा विलास असलेल्या वर्षा ऋतूच्या सौंदर्याकडे पाहून भगवंत त्यांची प्रशंसा करतात. (२५-३१)

अशा प्रकारे श्याम आणि बलराम व्रजामध्ये राहात असता वर्षा ऋतू संपून शरद ऋतू आला. आता आकाशत ढग नव्हते. पाणी निर्मळ झाले आणि वारा संथ गतीने वाहू लागला. ज्याप्रमाणे योगभ्रष्ट पुरुषांची चित्ते पुन्हा योगसाधना केल्याने निर्मळ होतात, त्याप्रमाणे शरद ऋतूमुळे आणि कमळे तयार झाल्याने पाणी स्वच्छ झाले. जसे भगवंतांची भक्ति आश्रमानुसार वागणार्‍यांचे पाप नष्ट करते, त्याचप्रमाणे शरद ऋतूने आकाशातील ढग, पावसाळ्यातील जीव, जमिनीवरचा चिखल आणि पाण्याचा गढूळपणा नाहीसा केला. जसे सर्व कामनांचा त्याग करून शांत झालेले मुनी पापमुक्त होऊन शोभतात, त्याप्रमाणे आपले सर्वस्व असलेल्या पाण्याचे दान करून ढग शुभ्र कांतीने शोभू लागले. जसे ज्ञानी पुरुष योग्य वेळी आपल्या अमृतमय ज्ञानाचे कोणा अधिकार्‍याला दान करतात आणि कोणाकोणाला करीतही नाहीत, त्याप्रमाणे आता पर्वतांमधून कुठे कुठे झरे वाहात होते, तर कुठे कुठे वाहात नव्हते. जसे कुटुंबाचे पोषण करण्यात व्यग्र झालेले मूर्ख लोक स्वतःचे आयुष्य क्षणोक्षणी कमी होत चालले आहे, हे जाणत नाहीत, त्याप्रमाणे पाणी भरलेल्या लहान लहान खड्ड्यांतील जलचरांना खड्ड्यांतील पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललेले कळत नव्हते. जसे इंद्रियांच्या ताब्यात राहाणार्‍या दीनवाण्या आणि दरिद्री गृहस्थाला निरनिराळे ताप सोसावे लागतात, त्याप्रमाणे थोड्या पाण्यात राहणार्‍या प्राण्यांना शरद ऋतूतील सूर्याच्या प्रखर किरणांचा अतिशय त्रास होऊ लागला. जसे विवेकसंपन्न साधक हळू हळू शरीर इत्यादि अनात्म पदार्थांबद्दल मी-माझेपण सोडून देतो, त्याप्रमाणे जमिनी हळू हळू चिखल सोडू लागल्या आणि वेली कोवळेपणा सोडू लागल्या. जसे मन संकल्परहित झाल्यानंतर आत्माराम पुरुष कर्मकांडाचा आग्रह सोडून देऊन शांत होतो, त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये समुद्राचे पाणी स्थिर, गंभीर आणि शांत झाले. ज्याप्रमाणे योगीजन आपल्या इंद्रियांना विषयांकडे जाण्यापासून रोखून धरून क्षीण होत जाणार्‍या ज्ञानाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे शेतकरी शेतातील पाण्याचे बांध बंदिस्त करून वाहणारे पाणी अडवू लागले. जसे देहाभिमानामुळे होणारे दुःख ज्ञान नाहीसे करते आणि विरहाने गोपींना होणारे दुःख श्रीकृष्ण नाहीसे करतात, त्याप्रमाणे शरद ऋतूतील उन्हामुळे लोकांना होणारा त्रास चंद्र नाहीसा करू लागला. जसे वेदांचा अर्थ जाणणारे सत्त्वगुणी चित्त शोभते, याप्रमाणे शरद ऋतूमध्ये मेघविरहित निर्मळ आकाश तार्‍यांच्या प्रकाशाने झगमगू लागले. जसे पृथ्वीतलावर यदुवंशीयांसमवेत यदुपती श्रीकृष्ण शोभतात, त्याचप्रमाणे आकाशात तार्‍यांसमवेत पूर्णचंद्र शोभू लागला. वनातील फुलांतून वाहणार्‍या समशीतोष्ण वार्‍याच्या स्पर्शाने लोकांचा ताप नाहीसा होत होता, तसा गोपींचा ताप मनाने श्रीकृष्णांना आलिंगन देऊन नाहीसा होत होता. जसे ईश्वराच्या आराधनेसाठी केलेल्या क्रियांचा पाठलाग त्यांची फळे करतात, तसेच शरद ऋतूमध्ये ऋतू प्राप्त झालेल्या गाई, हरिणी, चिमण्या आणि स्त्रिया यांचा वळू, हरीण, पक्षी आणि पुरुष पाठलाग करू लागले. हे राजा ! जसे राजामुळे चोरांशिवाय इतर सर्व लोक निर्भय होतात, त्याचप्रमाणे सूर्योदय झाल्यामूले चंद्रविकासी कमळांशिवाय इतर सर्व प्रकारची कमळे उमलली. त्यावेळी शहरात आणि खेड्यांमध्ये नवान्नेष्टी व लौकिक मोठ्या उत्सवांमुळे आणि विशेषतः श्रीकृष्ण व बलरामांच्या उपस्थितीमुळे परिपक्व धान्याने संपन्न पृथ्वी अत्यंत शोभिवंत दिसू लागली. साधना करून सिद्ध झालेले पुरुष जसे योग्य वेळ येताच आपल्या देव इत्यादि शरीरांना प्राप्त होतात, त्याचप्रमाणे व्यापारी, संन्यासी, राजे आणि गुरुकुलातील विद्यार्थी, जे पावसाळा असल्यामुळे एकाच ठिकाणी राहिले होते, ते तेथून निघून आपापल्या कामाला लागले. (३२-४९)

अध्याय विसावा समाप्त

GO TOP